निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 05/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 18/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 10/06/2013
कालावधी 01 वर्ष 09 महिना 23 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
सोनाजी पिता दत्तरामजी नादरे. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.शेती. अड.आर.एम.घुले पाटील.
रा.गिरगांव ता.वसमत जि.हिंगोली.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
वसमत ता.वसमत जि.हिंगोली.
2 शाखा अधिकारी, अड.जी.एच.दोडीया.
दि.युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि.
दयावान कॉम्प्लेक्स स्टेशन रोड, परभणी ता.जि.परभणी.
3 मे.कबाल इन्शुरंस ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देय नुकसान भरपाई मयत शेतक-यांच्या वारसास देण्याची विमा कंपनीने नाकारुन त्रुटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार हा शेतकरी असून त्याची मयत पत्नी काशीबाई सोनाजी नादरे ही सुध्दा शेतकरी होती. अर्जदाराच्या पत्नीच्या नावे मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा परभणी येथे सर्व्हे नंबर 189 मध्ये 68 गुंठे जमीन होती महाराष्ट्र शासनाच्या योजने प्रमाणे गैरअर्जदार क्रमाक 3 यांनी तक्रारदाराच्या पत्नीचा गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे पॉलिसी क्रमांक 230200/47/10/99/00000067 अन्वये विमा काढला होता त्यामुळे तक्रारदाराच्या पत्नीचा वारस या नात्याने तक्रारदाराने हा गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांचा ग्राहक असून सदरची केस दाखल केलेली आहे. अर्जदाराचे म्हणणे की,अर्जदाराची पत्नी काशीबाई सोनाजी नादरे हिचा दिनांक 25/07/2010 रोजी गंगाखेड परभणी रस्त्यावर झालेल्या अपघाता मध्ये मृत्यू झाला.याबद्दलची तक्रार पोलीस स्टेशनला दिलेली असून ज्याचा गुन्हा क्रमांक 190/10 अशी नोंद झालेली आहे. अर्जदाराची पत्नी मयत झाल्यानंतर अर्जदाराने संबंधीत तलाठ्याकडून गाव नमुना क्रमांक 7 दिनांक 28/07/2010 रोजी घेतला व फेरफारची नक्कल त्याच दिवशी घेंतली नंतर अर्जदाराने 29/07/2010 रोजी तलाठ्याकडून फॉर्म भाग 2 घेतले त्याच प्रमाणे अर्जदाराने ग्राम पंचायत कार्यालय गिरगांव यांच्या वारसाचे प्रमाणपत्र व मृत्यू प्रमाणपत्र त्याच दिवशी घेतले अर्जदाराने संबंधीत अधिका-याकडून गाव नमुना 6 क मिळवण्यासाठी अर्ज केला नंतर दिनांक 14/09/2010 रोजी तो अर्जदारास मिळाला, अर्जदाराचे म्हणणे हे की, दिनांक 31/07/2010 रोजी प्रपत्र ग दिले त्यानंतर 01/08/2010 रोजी तहसिलदार वसमत यांच्याकडे 20 रुपायांच्या बॉंडवर प्रतिज्ञापत्र करुन दिले अर्जदाराने सर्व कागदपत्रे गोळा करुन शेतकरी विमा मिळवण्याकरीता दिनांक 02/08/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे क्लेम फॉर्मसह सर्व कागदपत्रे जमा केली तक्रारदाराने 14/09/2010 रोजी मिळालेला गाव नमुना 6 क देखील सदरच्या अर्जासोबत गैरअर्जदाराकडे जमा केले अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे सर्व कागदपत्रे जमा करुन तसचे शपथपत्र दिनांक 14/11/2010 रोजी जमा केल्यानंतरही गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तक्रारदाराचा अर्ज दिनांक 31/12/2010 रोजी संदर्भ 230200 शेतकरी बिमा 2010 अन्वये खारीज केला व खारीज करण्याचे कारण अपुरी कागदपत्रे असल्यामुळे व ते आपण दिनांक 14 नोव्हेंबर 2010 पर्यंत न दिल्यामुळे असे दर्शविले. वास्तविक अर्जदाराने क्लेमफॉर्म सोबत सर्व कागदपत्रे दिली असतांना देखील गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सदर विमा संबंधी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याशी व्यवस्थीत पाठपुरावा केला नाही, म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे,असे अर्जदाराचे म्हणणे आहे.
अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या मार्फत आणि गैरर्जदार क्रमांक 3 यांच्या मार्फत गैरअर्जदार क्रमांक 2 कडे दिनांक 02/08/2010 रोजी सादर केला होता, तरी सुध्दा गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी जाणुन बुजून अर्जदारास नुकसान भरपाई न देण्याचे हेतुने वरील चुकीची कारणे दर्शवुन तक्रारदारास नुकसान भरपाई देण्याचे नाकारले,म्हणून गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी सेवेत त्रुटी दिली आहे, त्यामुळे सदरचा अर्ज विद्यमान न्यायालयास चालविण्याचा पुर्ण अधिकार आहे.अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, गैरअर्जदार 2 यांनी तक्रारदारास नियमा प्रमाणे 1,00,000/- रुपये नुकसान भरपाई दिलेली नाही, त्यामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिकत्रास सहन करावा लागला, म्हणून अर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन तक्रारदारास नुकसान भरपाई म्हणून 1,00,000/- अपघात दिनांका पासून द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने व मानसिकत्रासापोटी 5,000/- रुपये व दाव्याच्या खर्चापोटी 2,000/- रुपये गैरअर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे, नि.क्रमांक 5 वर एकुण 12 कागदपत्रांच्या यादीसह 12 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये 5/1 वर एफ.आय.आर. ची कॉपी पोलीस स्टेशन गंगाखेड क्रमांक 190/10, 5/2 वर स्पॉट पंचनामा, 5/3 वर इन्क्वेस्ट पंचनामा, 5/4 वर पी.एम. रिपोर्ट, 5/5 वर गैरअर्जदार इंन्शुरन्स कंपनीचे दिनांक 31/12/2010 चे विमा प्रस्ताव नाकारल्याचे पत्र, 5/6 वर क्लेमफॉर्म, 5/7 वर 6 क चे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीचा अर्ज, 5/8 वर रहिवासी प्रमाणपत्र, 5/9 वर अर्जदारास निवडणुक आयोगाने दिलेले ओळखपत्राची प्रत, 5/10 वर मयत काशीबाई यांना निवडणुक आयोगाने दिलेले ओळखपत्राची प्रत, 5/11 वर मयत काशीबाई सोनाजी नादरे यांचे मृत्यू प्रमाणपत्र, 5/12 वर अर्जदाराने तलाठी गिरगांव यांस वारसास नोंद होण्या बाबत दिलेले अर्ज इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 30/09/2011 रोजी नि.क्रमांक 8 वर आपले लेखी म्हणणे सादर केले, त्यामध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे हे म्हणणे आहे की, अर्जदार नादरे सोनाजी दत्तरामजी मु.पो.गिरगांव तालुका वसमत जिल्हा हिंगोली यांनी क्लेमफॉर्म दिनांक 03/08/2010 रोजी सादर केला त्याचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने सदरचा विमा दावा दाखल करते वेळी 6 क व प्रतिज्ञापत्र दिले नसल्यामुळे सदरची कागदपत्रे सादर करावीत अशा सुचना तोंडी दिल्या होत्या व सदर कागदपत्रे दाखल करण्यासाठी संबंधीतास उशीर होत असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 च्या कार्यालयाने त्याचा प्रस्ताव जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंगोली यांना पत्र क्रमांक 1786/2010 दिनांक 20/08/2010 रोजी सादर केला, परंतु गैरअर्जदार क्रमांक 3 यांना प्राप्त झालेला प्रस्ताव अपुर्ण कागदपत्रे असल्यामुळे कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी 07/09/2010 रोजी प्रस्ताव परत केला, त्या पत्राची प्रत पत्र क्रमांक 1957/2010 दिनांक 20/09/2010 रोजी अर्जदार यांना दिली व त्याबाबत सदरची प्रत मिळाल्याची देखील स्वाक्षरी घेतली व गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे हे म्हणणे आहे की, दिनांक 06/10/10 रोजी फेरफार, प्रतिज्ञापत्र, गाव नमुना नं. 6 क अर्जदाराने त्याच्या कार्यालयात सादर केला व अर्जदाराची कागदपत्रे पत्र क्रमांक 2068/2010 दिनांक 11/10/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे पाष्टाव्दारे सादर केली त्या पत्राची प्रत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंगोली यांना सादर केली, परंतु गैरअर्जदार कमांक 3 यांनी स्मरणपत्र 3 नुसार फेरफार व नावातील बदल बाबत कळविले त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे हे म्हणणे आहे की, अर्जदारास त्यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलली नाही. म्हणून जबाब दाखल केला आहे.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 9 वर तालुका कृषी अधिकारी वसमत यांचे शपथपत्र, नि.क्रमांक 10 वर गैरअर्जदार क्रमांक 1 ने कागदपत्रे दाखल करण्यासंबंधीचा अर्ज व नि.कमांक 11 वर एकुण 15 कागदपत्रांच्या यादीसही 15 कागदपत्रे दाखल केलेली आहेत ज्यामध्ये 11/1 वर क्लेमफॉर्म भाग 1, 11/2 वर क्लेमफॉर्म भाग 3, 11/3 वर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांची पोच पावती, 11/4 वर गैरअर्जदार क्रमांक 3 ने 07/09/2010 रोजीचे पत्र, 11/5 वर 7/12 नक्कल, 11/6 मयत काशीबाई सोनाजी नागदे यांच्या नावे असलेले नमुना नं.8 अ, 11/7 वर 100 रुपयाच्या स्टँप पेपरवर प्रतिज्ञापत्र, 11/8 वर फेरफार नक्कल, 11/9 वर 20 रुपायांच्या स्टँप पेपरवर अर्जदाराचे शपथपत्र, 11/10 वर गाव नमुना 6 क, 11/11 वर गैरअर्जदार क्रमांक 3 यांना कागदपत्रे पाठविल्याची प्रत, 11/12 वर यु.पी.एस. केल्याची प्रत, 11/13 वर गैरअर्जदार क्रमांक 3 चे स्मरणपत्र, 11/14 वर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंगोली यांना पोच झाल्याची पावती.11/15 वर दिनांक 18/12/2010 ची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांस मंचाची नोटीस तामिल झाल्यानंतर वकिला मार्फत हजर व नि.क्रमांक 17 वर आपले लेखी म्हणणे सादर केले गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे हे म्हणणे आहे की, अर्जदार व त्याची मयत पत्नी हे दोघेही गैरअर्जदार क्रमांक 2 चे ग्राहक नाहीत त्यामुळे सदरच्या मंचास तक्रार चालवण्याचा अधिकार नाही व तसेच त्याचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराने किंवा त्याच्या मयत पत्नीने हप्त्याच्या स्वरुपात गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे एक पैसाही जमा केलेला नाही त्यामुळे अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 2 चा ग्राहक होण्याचा प्रश्नच उदभवत नाही व तसेच त्यांचे हे म्हणणे आहे की, ट्राय पार्टी अग्रीमेंट प्रमाणे शेतकरी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडून कंपनी विरुध्द ग्राहक या नात्याने दावा दाखल करु शकत नाही, म्हणून सदरची तक्रार खारीज होण्या योग्य आहे. व तसेच त्यांचे हे म्हणणे आहे की, सदराची तक्रार ही खोटी व बनावट असून ग्राहक संरक्षण कायद्याच्या विरुध्द आहे. म्हणून ती खारीज होणे योग्य आहे व गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही म्हणून सदरची तक्रार ही कायद्याच्या विरुध्द आहे व तक्रार खारीज होण्या योग्य आहे व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे हे म्हणणे आहे की, सदरची तक्रार खोटी दाखल केली आहे व अर्जदार हा शेतकरी नाही व तसेच मयत पत्नी काशीबाई ही देखील शेतकरी नव्हती व तसेच गैरअर्जदाराचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराची मयत पत्नी यांच्या नावे मौजे गिरगाव ता.वसमत जि.हिंगोली येथे शेती नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या मयत पत्नीचा मृत्यू हा अपघातामुळे दिनांक 25/07/2010 रोजी परभणी ते गंगाखेड रस्त्यावर झाला नाही व तसेच संबंधीत पोलीस स्टेशन मध्ये दिलेली तक्रार ही खोटी व बनावट आहे. म्हणून अर्जदार हा गैरअर्जदाराकडून 1,00,000/- घेण्यास पात्र नाही व अर्जदारास कोणत्याही प्रकारचा मानसिकत्रास व सेवेत त्रुटी दिली नाही.म्हणून गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी, गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी आपल्या लेखी म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 18 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पत्नीच्या
शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई बेकायदेशिररित्या नामंजूर
करुन सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहे काय ? नाही
3 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्दा क्रमांक 1 व 2
अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, अर्जदाराच्या पत्नीचा मृत्यू दिनांक 25/07/2010 रोजी गंगाखेड परभणी रस्त्यावर अपघाताने झाला हि बाब नि.क्रमांक 5/1, 5/2, 5/3, 5/4 वर दाखल केलेल्या पोलीस पेपर्स व पी.एम.रिपोर्ट वरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे मयत पत्नीचा अपघात विमादावा दिनांक 02/08/2010 रोजी दाखल केला होता हि बाब नि.क्रमांक 5/6 वरील कागदपत्रावरुन सिध्द होते.
सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवल्याचे नि.क्रमांक 11 वर दाखल केलेलया कागदपत्रावरुन सिध्द होते व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 ने कृषी अधिकारी हिंगोली यांना दिनांक 07/09/2010 रोजी पत्रान्वये अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्यास सांगितले हि बाब नि.क्रमांक 11/4 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडत परत एकदा वाटनीपत्राची प्रत पाठवण्यास सांगीतले हे नि.क्रमांक 11/11 वर दाखल केलेल्या कागदपत्रावरुन सिध्द होते.त्यानंतर नि.क्रमांक 5/5 वरील कागदपत्रांवरुन हे सिध्द होते की, गैरअर्जदार क्रमांक 2 च्या मुख्य कार्यालय नागपूर यांनी दिनांक 31/12/2010 रोजी अर्जदारास अपुरे कागदपत्र असल्यामुळे व ते दिनांक 14 नोव्हेंबर 2010 पर्यंत न दिल्यामुळे अपघाती मृत्यू संबंधी पॉलिसीच्या अटी वरुन नुकसान भरपाई देण्याचे नाकारले.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सर्व संबंधीत कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे पाठवली आहेत. असे त्यांच्या लेखी म्हणण्यांत म्हंटले आहे व तसेच ती कागदपत्रे मंचासमोर दाखल केलेली आहेत जे नि.क्रमांक 11 वर दाखल केलेल्या यादी प्रमाणे आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे म्हणणे की, अर्जदाराची मयत पत्नी शेतकरी नव्हती ती गैरअर्जदार क्रमांक 2 यांची ग्राहक होत नाही, व अर्जदारास अपघाती विमा योजने अंतर्गत विमादावा मागण्याचा अधिकार नाही, हि बाब मंचास योग्य वाटते.कारण पॉलिसीच्या Eligibility(पात्रता) Clause मध्ये असे स्पष्ट म्हंटले आहे की,
( ll ) Eligibility:
The Farmers name should be in the Land Record Register i.e. 7/12 on the date of the issuance of policy. तसेच सदर पॉलिसी ही दिनांक 15/08/2009 ते 14/08/2010 पर्यंत वैध होती व नि.क्रमांक 11/8 वरील कागदपत्रावरुन हे सिध्द होते की, मयत काशीबाई सोनाजी नादरे रा.गिरगांव हि वाटनी आधारे दिनांक 24/07/2010 रोजी तीच्या नांवे फेर मंजूर झाला व तीचे सातबारा वर नांव आले, या वरुन असे दिसते की, तीचे दिनांक 15/08/2009 रोजी नांव सातबाराच्या उता-यांत नव्हते या वरुन हे स्पष्ट होते की, अर्जदाराची मयत पत्नी ही गैरर्जदार क्रमांक 2 या विमा कंपनीची ग्राहक नव्हती त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तीचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली आहे, असे म्हणता येणार नाही व म्हणून अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही, म्हणून मुद्दा क्रमांक 1 व 2 यांचे उत्तर नकारार्थी देवुन मंच पुढील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष