निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 19/03/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 05/04/2011 तक्रार निकाल दिनांकः- 09 /11/2011 कालावधी 07 महिने 04 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. सत्यभामाबाई भ्र.केशवराव फड. अर्जदार वय 60 वर्ष.धंदा.घरकाम. अड.अरुण.डि.खापरे. रा.ढेबेवाडी ता.गंगाखेड.जि.परभणी. विरुध्द 1 मा.तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार. तालुका कृषी कार्यालय,गंगाखेड. ता.गंगाखेड जि.परभणी. 2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीस प्रा.लि. भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग. प्लॉट नं.7.सेक्टर ई 1.टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद. 3 व्यवस्थापक. अड.जी.एच.दोडीया. रिलायन्स जनरल इन्शुरंस कं.लि. 570,रेक्टेफायर हॉउस,इंदोरी जिन, इलेक्ट्रीक लि.नायगम क्रॉस रोड,नेकस्ट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट,वडाळा वेस्ट मुंबई ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- (निकालपत्र पारित व्दारा श्रीमती. अनिता ओस्तवाल.सदस्या.) गैरअर्जदाराने त्रुटीची सेवा दिल्याच्या आरोपावरुन अर्जदाराने हि तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, दिनांक 23/05/2009 रोजी अर्जदाराच्या पतीचा खुन झाल्याने मृत्यू झाला अर्जदाराचा पती शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत विमा योजनेचा लाभार्थी होता. त्यामुळे दिनांक 14/08/2009 रोजी अर्जदाराने तीच्या मयत पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दाखल केला. तदनंतर गैरअर्जदार क्रमांक 1 याने अर्जदाराला त्रुटीची पुर्तता करण्याविषयी कळविले त्या अनुषंगाने अर्जदारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे केली.तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी पुढील कार्यवाहीस्तव दिनांक 23/02/10 रोजी जिल्हा अधिक्षक यांचे कार्यालयातून गैरअर्जदार क्रमांक 2 यांना दिनांक 17/02/2010 च्या पत्रान्वये कागदपत्राची पुर्तता केल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांनी अर्जदारास अद्याप पावेतो तिच्या प्रस्तावा बाबत काहींच कळविलेले नाही शेवटी अर्जदाराने दिनांक 09/03/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना शेवटची विनंती केली, परंतु गैरअर्जदारांनी काहीही प्रतिसाद न दिल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन गैरअर्जदारांनी रक्कम रु.1,00,000/- अर्जदाराच्या पतीचा मृत्यू झाल्या तारखेपासुन द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत तसेच अर्जदारास मानसिक व शारीरिक त्रासापोटी रक्कम रु.25000/- व तकार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.5000/- द्यावेत अशा मागण्या मंचासमोर केल्या आहेत. अर्जदाराने तक्रार अर्जासोबत शपथपत्र नि.2 वर व पुराव्यातील कागदपत्र नि.4/1 ते नि.4/22 व नि.26/1 ते नि.26/2 मंचासमोर दाखल केले. मंचाची नोटीस गैरअर्जदार क्रमांक 1, 2 व 3 यांना तामील झाल्यानंतर त्यांनी लेखी निवेदन अनुक्रमे नि.19, नि.9 व नि.23 वर मंचासमोर दाखल केले. गैरअर्जदार क्रमांक 1 चे म्हणणे असे की,अर्जदाराने दि.17/08/2009 रोजी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याने दिनांक 09/09/2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडे पाठविला. तसेच अर्जदाराचा प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 ची आहे त्यांनी गैरर्जदार क्रमांक 1 यांना केलेल्या कार्यवाहीचा अहवाल कळविलेला नाही पुढे गैरअर्जदाराचे म्हणणे असे की, अर्जदार हा गैरअर्जदार क्रमांक 1 चा ग्राहक नसल्यामुळे त्यांच्या विरोधात मंचापुढे तक्रार करण्याचा अधिकार अर्जदारास पोहोचत नाही गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे की, IRDA ची मान्यता प्राप्त विमा सल्लागार कंपनी म्हणून ते कार्यरत आहेत.महाराष्ट्र शासनाने सल्लागार म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे विमा कंपनीकडे प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी कागदपत्राची छाननी करुन परिपूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याची त्यांची जबाबदारी आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अथवा विमा धारकाकडून कसलेही मानधन किंवा शुल्क ते आकारत नाहीत सदर प्रकरणात त्यांना दिनांक 17/09/2009 रोजी प्रस्ताव मिळाला, परंतु सदर प्रस्ताव त्रुटीपूर्ण असल्याचे अर्जदारास DSAO मार्फत वेळोवेळी कळविण्यात आले होते त्यासाठी दिनांक 01/02/2010 रोजी दिनांक 15/04/2010 रोजी स्मरणपत्रे पाठवुन आवश्यक कागदपत्राची मागणी अर्जदाराकडे केली होती, परंतु अर्जदाराने त्याची पुर्तता न केल्यामुळे दिनांक 21/12/2010 रोजी अपूर्ण असा शेरा मारुन गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. प्रस्ताव अपूर्ण असल्यामुळे 31/12/2010 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदारास क्लेम बंद करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले म्हणून वरील सर्व कारणास्तव गैरअर्जदार क्रमांक 2 यांना सदर प्रकरणातून वगळण्यात यावे तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2000/- मिळावेत अशा मागण्या गैरअर्जदार क्रमांक 2 ने मंचासमोर केल्या आहेत. गैरअर्जदाराने लेखी निवेदना सोबत पुराव्यातील कागदपत्र नि.10 ते नि.17 मंचासमोर दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 चे म्हणणे असे की, कृषी आयुक्ताला यांच्या सोबत झालेल्या करारा नुसार परिपूर्ण प्रस्ताव 90 दिवसांच्या आत त्यांच्या कार्यालयास मिळायला हवा. सदर प्रकरणात अर्जदाराच्या पतीचा दि.23/05/09 रोजी मृत्यू झाला सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 2 ला दिनांक 17/09/09 रोजी अर्जदाराचा प्रस्ताव मिळाला, परंतु प्रस्ताव त्रुटीपूर्ण असल्याचे व काही कागदपत्रे जसे मुळ मृत्यू प्रमाणपत्र, एफ. आय. आर, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा या सारख्या कागदपत्रांची र्पुतता अर्जदाराने केलेली नसल्यामुळे अर्जदारास DSAO परभणी मार्फत कागदपत्राची पुर्तता करण्याविषयी कळविण्यात आले हाते. तदनंतर दिनांक 01/02/2010 , दि.15/04/2010 रोजी स्मरणपत्रे देखील पाठविली होती, परंतु अर्जदाराने मागणी प्रमाणे कागदपत्रांची पुर्तता न केल्यामुळे दिनांक 31/12/2010 रोजी अर्जदारास पत्र पाठवुन क्लेम बंद करण्यात आल्याचे कळविण्यात आले हाते. म्हणून वरील सर्व कारणास्तव अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती गैरअर्जदार कमांक 3 ने मंचासमोर केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी निवेदना सोबत शपथपत्र नि 24 वर दाखल केले. दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर 1 गैरअर्जदारानी अर्जदारास त्रुटीची सेवा दिल्याचे शाबीत झाले आहे काय ? होय. 2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 अर्जदाराच्या पती शेतकरी असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या शेतकरी व्यक्तीगत विमा अपघात योजने अंतर्गत लाभार्थी होता.त्याचा दिनांक 23/05/09 रोजी खुन झाला तदनंतर उपरोक्त योजने अंतर्गत पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अर्जदाराने दिनांक 14/08/2009 रोजी आवश्यक कागदपत्रासह प्रस्ताव गैरअर्जदाराकडे दाखल केला तदनंतर प्रस्ताव त्रुटीपूर्ण असल्याचे अर्जदारास कळविल्यामुळे तीने मागणी केलेल्या कागदपत्रांची पुर्तता केली, परंतु गैरअर्जदारांनी अद्याप पावेतो अर्जदाराचा प्रस्ताव प्रलंबीत ठेवला. अशी थोडक्यात अर्जदाराची तक्रार आहे.यावर गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी असा बचाव घेतला आहे की, मागणी करुनही कागदपत्रांची पुर्तता अर्जदाराने न केल्यामुळे अर्जदाराची फाईल बंद करण्यात आली. निकालासाठी महत्वाचा मुद्दा असा की, गैरअर्जदारांनी अर्जदाराची फाईल बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे का ? यावर मंचाचे मत असे की, महाराष्ट्र शासनाने उपरोक्त योजना शेतक-यांच्या कुटूंबीयांसाठी आर्थीक लाभ देण्याच्या उद्देशाने कार्यान्वीत केलेली असल्यामुळे विमा कंपनीने सदर योजनेचा फायदा लाभार्थीना मिळावा हा उद्देश समोर ठेवुनच सहकार्य करणे अपेक्षीत आहे अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन किंवा अडमुठपणांची भुमिका घेवुन लाभार्थींयांची अडवणुक करण्याचे धोरण राबवु नये असे मंचास वाटते. सदर प्रकरणात गैरअर्जदारांनी मागीतलेल्या कागदपत्राची पुर्तता केल्याचे अर्जदाराचे म्हणणे आहे याच्या पुष्टयर्थ दिनांक 23/02/2010 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या संदर्भात पाठविलेल्या पत्राची झेरॉक्स प्रत नि.4/22 वर मंचासमोर दाखल केली आहे, परंतु नेमके कोणते कागदपत्र पाठविलेले आहे याचा खुलासा या पत्रावरुन होत नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी निवेदनातून या संदर्भात मौन बाळगले आहे. त्यामुळे दिनांक 23 जून 2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 ने मागणी केल्या प्रमाणे (नि.10) अर्जदाराने कागदपत्रांची पुर्तता करावी असा आदेश देणे न्यायोचित ठरेल. तसेच गैरअर्जदाराने अर्जदाराची फाईल बंद केल्याचे अर्जदारास कळविल्याचे म्हंटले आहे, परंतु तत्सम पुरावा मंचासमोर गैरअर्जदाराच्या वतीने दाखल करण्यात आलेला नाही त्यामुळे अर्जदारास तीच्या क्लेम बाबतचा कोणताच निर्णय कळविण्यात आला नसल्याने तिने तक्रार अर्जातून तिचा प्रस्ताव प्रलंबीत असल्याचे कथन केले आहे. हि बाब नक्कीच गैरअर्जदाराच्या सेवेत त्रुटी असल्याचे दर्शविते. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2 अर्जदाराने निकाल कळाल्यापासून 15 दिवसांच्या आत दिनांक 23/06/2010 रोजी च्या पत्राव्दारे मागणी केलेल्या कागदपत्राची पुर्तता गैरअर्जदाराकडे करावी.व गैरअर्जदार क्रमांक 3 ने संबंधित कागदपत्र मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत अर्जदाराचा क्लेम मंजूर करावा. 3 दोन्ही पक्षांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष.
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |