निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 01/08/2011 कालावधी 05 महिने 18 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. प्रभावती भ्र.उत्तम कुंडगीर अर्जदार वय 35 वर्ष.धंदा. घरकाम. अड.अरुण डी.खापरे. रा.बोथी.ता.गंगाखेड.जि.परभणी. विरुध्द 1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार. तालुका कृषी कार्यालय,गंगाखेड. प्रतिनिधी. ता.गंगाखेड जि.परभणी. 2 विभागीय व्यवस्थापक. गैरअर्जदार. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. भास्करायन, एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग. प्लॉट नं.7,सेक्टर ई-1, टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद. 3 व्यवस्थापक, रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.लि. अड.जी.एच.दोडिया. 570,रेटी फायर हाउस,इन्दुरी जिन इलेक्ट्रीक. नायगम क्रॉस रोड, नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा वेस्ट,मुंबई. ------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई आजपर्यंत न देवुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार रा.बोथी ता.गंगाखेड येथील रहिवासी असून तीचा पती मयत उत्तम कुंडगीर हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 228 बोथी येथे शेतजमिन आहे. दिनांक 06/04/2009 रोजी त्याचा वाहन अपघातात मृत्यू झाला.घटनेची खबर पिंपळदरी पोलिस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा केला त्यानंतर सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह तारीख 01/08/2009 रोजी क्लेम दाखल केला. परंतू आज पर्यंत मंजूरीविना प्रकरण विमा कंपनीने रखडत ठेवले आहे. अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळावी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 29 कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदारांना नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने तारीख 08/04/2011 रोजी लेखी म्हणणे नि.15 सादर केले.गैरअर्जदार क्रमांक 2 ने पोष्टामार्फत पाठवलेले लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 23.03.2011 रोजी नि. 9 ला समाविष्ट करण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 3 ने लेखी जबाब नि. 17 दिनांक 27.04.2011 रोजी सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात (नि.15) पॉलिसी संबंधीचा तक्रार अर्जातील परिच्छेद 1 ते 5 मधील मजकूर मान्य केला आहे.अर्जदाराचा दिनांक 01/08/2009 रोजी अर्ज प्राप्त झाला त्यानंतर कागदपत्रांसह तो प्रस्ताव दिनांक 10/09/2009 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पाठविला.त्यांनी विमा कंपनीकडे त्यानंतर कागदपत्र पाठविले नुकसान भरपाई मंजूर करण्याची जबाबदारी गैरअर्जदार 2 व 3 यांची आहे त्याबाबत गैरअर्जदार 1 कडून सेवात्रुटी झालेली नाही सबब त्यांचे विरुध्दातील तक्रार रद्द करावी असे शेवटी म्हंटले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी म्हणणे (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत उत्तम कुंडगीर याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना 17/09/2009 रोजी मिळाले त्यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे नव्हती त्याची पुर्तता करण्यासाठी डि.एस.ए.ओ. परभणी यांना कळविले होते.त्याप्रमाणे कागदपत्रे मिळाल्यावर मंजुरीसाठी विमा कंपनीकडे तारीख 05/02/2011 रोजी प्रस्ताव पाठवला होता.तो प्रलंबीत आहे. सबब त्याना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपल्या लेखी जबाबात ( नि.17) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत उत्तम कुंडगीर याच्या शेतकरी विमा क्लेम संबंधी कोणतीही कागदपत्रे त्यांचेकडे आलेली नाहीत.त्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी असे सुरवातीला नमुद केले आहे.याउलट पुढे असाही खुलासा केला आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 कडून असे समजले आहे की, डि.एस.ए.ओ मार्फत अर्जदार कडून काही कागदपत्रे मागीवली होती त्या कागदपत्रांची पुर्तता झाली नाही त्यामुळे याबाबतीत विमा कंपनीकडून मुळीच सेवात्रुटी झालेली नाही.तक्रारीस कायदेशीर कारण घडलेले नाही.तक्रार अर्जातील शेतकरी विमा संदर्भाचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्यांनी साफ नाकारुन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 3 चे शपथपत्र (नि. 18) दाखल केले आहे. तक्रारीत दाखल केलेले कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचे मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 100000/- आजपर्यंत न देवुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा पती मयत उत्तम मोतीराम कुंडगीर शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात नि.4 लगत दाखल महसुल रेकॉर्डचे उतारे (नि.4/1 ते 4/7) या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 06.04.2009 रोजी मयत उत्तम कुंडगीर स्वतःची जीप एम.एच.15 /ए.क्यु.7244 गंगाखेड ते राणीसावरगाव रोडवरुन निघाला असतांना समोरुन भरधाव येणारा ट्रॅक्टर एम.एच.24/ डी.2402 वरील चालकाने जीपला धडक दिल्याने अपघातात त्याचा मृत्यू झाला होता हे पुराव्यात दाखल केलेली पिंपळदरी पोलिस स्टेशन गु.र.नं.23/09 मधील पोलिस पेपर्स, पी.एम.रिपोर्ट वगैरे नि.4/26 ते 4/29 वरील पुराव्यातून दिसते.मयत उत्तम कुंडगीर हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी. अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता हे नि.4 लगत दाखल केलेल्या क्लेम फॉर्मसह इतर सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता व शपथपत्रातील कथनावरुन स्पष्ट दिसते.शासन परिपत्रकात दिलेल्या यादी प्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिल्यावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-याने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे ती कागदपत्रे तारीख 10/09/2009 रोजी पुढिल कार्यवाहीसाठी पाठविले असल्याचे गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबात म्हंटलेले आहे त्यामुळे विमा कंपनीने उत्तम कुंडगीर यांच्या डेथक्लेमची कागदपत्रे त्यांना मिळालेली नाही हा खोटा बचाव नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच घेतलेला आहे असा यातून निष्कर्ष निघतो.अर्जदाराच्या पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे व तो शेतकरी विमा योजनेचा लाभार्थी असल्याने पतीच्या मृत्यू पश्चात तिला विम्याची नुकसान भरपाई आज पर्यंत न देवुन विमा कंपनीने अर्जदारावर अन्याय केलेला आहे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 3 कडून निश्चतीपणे सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 3 याने अर्जदाराचा मयत पती उत्तम कुंडगीरच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- ( रुपये एक लाख फक्त ) आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 % दराने तक्रार अर्ज दाखल तारखे पासून म्हणजे दिनांक 14.02.2011 पासून व्याजासह द्यावी. 2 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |