निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 10/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 30/01/2013 तक्रार निकाल दिनांकः- 03/03/2014
कालावधी 01वर्ष.01महिना.01दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
1 कु.वैशाली पिता हरीचंद्र हाके, अर्जदार
वय वर्षे. धंदा.शिक्षण. अॅड.अरुण.डी.खापरे.
2 कु.प्रतिक्षा पिता हरीचंद्र हाके,
वय वर्षे, धंदा शिक्षण,
अज्ञान पालक कर्ती आजी,
इंदुबाई भ्र.बापुराव हाके
वय 60 वर्षे, धंदा घरकाम.
रा.पांगरी हाके ता.गंगाखेड,जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, स्वतः
गंगाखेड, ता.गंगाखेड जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक, स्वतः
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
राज अपार्टमेंट जी. सेक्टर, प्लॉट नं. 29,
रिलायंन्स फ्रेशच्या पाठीमागे, टाउन सेंटर, सिडको औरंगाबाद.
3 विभागीय व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
युनायइटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि.
शाखा कार्यालय,
दयावान कॉम्प्लेक्स, राजधानी हॉटेल,
परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत वडीलाचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार क्रमांक 1 व 2 चे आई वडील दिनांक 10/10/2009 रोजी शेतातील काम आटोपून स्वतःच्या घरात झोपले असता रॉकेलची चिमनी पडून पेट घेतल्यामुळे दोघेही भाजून गंभीर जखमी झाले. त्यावेळेस दोघांनीही आरडाओरडा केला, त्यावेळेस शेजा-यांनी पाणी घालून आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास यश आले नाही. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी सरकारी दवाखान्यात शरीक केले उपचारा दरम्यान दिनांक 13/10/2009 रोजी अर्जदाराच्या वडीलाचा मृत्यू झाला व आईचा दिनांक 15/10/2009 रोजी मृत्यू झाला या अपघाता संबंधी पोलीसांना माहिती दिली व त्यानंतर पोलीसानी घटनेचा तपास करुन स्थळ पंचनामा व मरणोत्तर पंचनामा करुन मयताचे पी.एम. करण्यासाठी सरकारी दवाखाना परभणी येथे बॉडी पाठवली.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 12/04/2010 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत त्याने आजी तर्फे सर्व कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 कडे मयत वडीलांचा विमादावा दाखल केला. सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 याने जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-यांकडे सादर केला व त्यानी तो गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला. व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे अर्जदाराचा विमादावा मंजुरीसाठी पाठविला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदरच्या विमा दाव्याबाबत त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता व त्यावेळी त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 च्या मागणी प्रमाणे कांही कागदपत्रे मागीतली, त्याप्रमाणे अर्जदाराने सर्व कागदपत्राची पुर्तता केली.
अर्जदाराचे म्हणणे की, त्यानी परत एकदा विमादाव्या बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 ला चौकशी केली असता, त्यानी अर्जदारास उत्तर दिले की, गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने तुमचा विमादावा दिनांक 24/03/2011 रोजी बंद केला आहे. सदरचा विमादावा बंद करुन विमा कंपनीने अर्जदारावर अन्याय केला आहे व त्याबाबत विमा कंपनीने अर्जदारास लेखी कळविले देखील नाही. व अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार मंजूर करुन गैरअर्जदाराना आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत 1 लाख रु. देण्याचा आदेश व्हावा. व तसेच गैरअर्जदारानी मानसिक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- रु. अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 21 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये त्रुटीची पूर्तता बाबतचे पत्र, गैरअर्जदार क्रमांक 2 ला विमादावा दाखल, गैरअर्जदार क्रमांक 1 चे पत्र, क्लेमफॉर्म, प्रतीज्ञापत्र, 7/12 उतारा, गाव नमुना 6 क, गाव नमुना (8 क), फेरफार, रहिवाशी प्रमाणपत्र, होल्डींग प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यू नोंदणी, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, वारसाचे प्रमाणपत्र, इन्क्वेस्ट पंचनामा, पी.एम.अहवाल, क्लेमफॉर्म भाग -2, मृत्यू खबरी रिपोर्ट, प्रवेश निर्गम उतारा, गैरअर्जदार नं 2 चे पत्र, घटनास्थळ पंचनामा, इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने तिच्या मयत वडीलाचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत मयत वडीलाचा विमादावा त्यांचेकडे दाखल केला होता. अर्जदार हा आमचा ग्राहक होवु शकत नाही व आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, अर्जदाराचा विमादावा प्राप्त झाल्यानंतर आम्ही तो विमादावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिका-याकडे पाठवला व त्यानी तो गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविला त्यात आमचा कांहीही दोष नाही, तरी सदर प्रकरणात आम्हांस जबाबदार धरु नये.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार हा आमचा ग्राहक होवु शकत नाही ते फक्त विमा कंपनीचेच ग्राहक होवु शकतात. आम्ही फक्त मध्यस्थ आहोंत व शासनास विना मोबदला सहाय्य करतो. मयत हरीशचंद्र बापुराव हाके गाव पांगरी ता.गंगाखेड जि. परभणी अपघात दिनांक 13/10/2009 सदरील प्रस्ताव हा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी मार्फत आमच्या कार्यालयास प्राप्त झाला व तो प्रस्ताव आम्ही मंजुरीसाठी विमा कंपनीकडे पाठविला असता सदर विमादावा विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 रोजी नामंजूर केल्याचे वारसदारास कळविण्यात आले. तरी मंचास विनंती की, सदर तक्रारीतून आमची पुर्णपणे मुक्तता करावी.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदार हा आमचा ग्राहक होत नसल्याकारणाने सदरची तक्रार मंचासमोर चालु शकत नाही, आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराच्या विमादाव्या बाबत त्यानी नागपूर येथील मुख्य शाखेत चौकशी केली असता, त्यांना माहिती मिळाली की, अर्जदाराचा विमादावा पॉलिसी समाप्ती नंतर 90 दिवसानंतर प्राप्त झाला व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे सदर विमादावा 90 दिवसाच्या आत दाखल करणे आवश्यक होते, परंतु ते न केले मुळे अर्जदाराचा विमादावा नाकारुन बंद केला व तसेच विमा कंपनीचे म्हणणे की, विमा कंपनीने योग्यच कारण दर्शवुन अर्जदाराचा विमादावा नाकारला आहे. तसेच अर्जदाराची तक्रार ही मुदत बाहय आहे, म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी.
लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 12 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा
योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत वडीलाचा विमादावा मंजूर
करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे वडील नामे हरीचंद्र बापुराव हाके यांना मौजे पांगरी ता.गंगाखेड जि.परभणी येथील गट क्रमांक 44 मध्ये 1 हेक्टर 54 आर शेत जमीन होती व शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत ते लाभार्थी होते, ही बाब नि.क्रमांक 4/13 वर दाखल केलेल्या 7/12 उता-यावरुन व तसेच नि.क्रमांक 4/14 गाव नमुना नं. 6 क व तसेच नि.क्रमांक 4/15 वर दाखल केलेल्या गाव नमुना नं. 8 अ कागदपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या वडीलाचा नामे हरीचंद्र हाके यांचा दिनांक 13/10/2009 रोजी भाजल्याने जखमी होवुन अपघाता उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता, ही बाब नि.क्रमांक 4/24 वर दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनाम्याच्या प्रतीवरुन व तसेच नि.क्रमांक 4/25 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या वडीलाच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत वडीलाचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला होता, ही बाब नि.क्रमांक 4/7 वर दाखल केलेल्या कागदपत्रवरुन सिध्द होते, तसेच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कागदपत्रच्या मागणी प्रमाणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी मार्फत 1) मृत्यू प्रमाणपत्र 2) बॅंक पासबुक 3) दावा अर्ज 4) शपथपत्र 5) घटनास्थळ पंचनामा 6) पी.एम.रिपोर्टच्या कागदपत्रची पुर्तता केली होती. ही बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या गैरअर्जदार क्रमांक 1 याने गैरअर्जदार क्रमांक 2 यास लिहिलेल्या पत्रावरुन सिध्द होते.
अर्जदार क्रमांक 1 व 2 हे मयत हरीचंद्र हाके यांचे कायदेशिर वारस आहेत. ही बाब नि.क्रमांक 4/23 वर दाखल केलेल्या वारस प्रमाणपत्रा वरुन सिध्द होते.
अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने दिनांक 24/03/2011 च्या पत्राव्दारे करारानुसार क्लेम पॉलिसी संपल्यानंतर 90 दिवसाच्या आत न दिलेमुळे अर्जदाराचा विमादावा मंजूर करण्याचे नाकारले होते, ही बाब नि.क्रमांक 9/1 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते व सदरचे पत्र हे दिनांक 24/03/2011 रोजीचे आहे व अर्जदाराने प्रस्तुत तक्रार ही दिनांक 10/01/2013 रोजी दाखल केली आहे. जे की, ग्राहक संरक्षण कायद्या प्रमाणे दावा लावण्याचे कारण घडल्यापासून दोन वर्षाच्या आत दाखल करणे आवश्यक आहे. त्या प्रमाणे सदरची तक्रार ही मुदतीत आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारण्याचे सदरचे कारण मंचास योग्य वाटत नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही, मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही. हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला. म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला, ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही, हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते. याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे. ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास निश्चित सेवेत त्रुटी दिली आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदाराच्या मयत वडीलाच्या विमा
दाव्यापोटी रु. 1,00,000/- फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) अर्जदारास
द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.