निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 27/12/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 04/01/2012
तक्रार निकाल दिनांकः- 04/07/2012
कालावधी 07 महिने.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL
सदस्या - सौ. सुवर्णा देशमुख.
---------------------------------------------------------------------------------------
सिंधु भ्र.बालाजी मिसे. अर्जदार
वय 32 वर्ष.धंदा. घरकाम. अड.ए.डी.खापरे
रा.मसनेरवाडी ता.गंगाखेड जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय,गंगाखेड. स्वतः
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायण एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग.
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1. टाउन सेंटर.
सिडको.औरंगाबाद.
3 शाखा व्यवस्थापक. अड.रवि.गायकवाड.
युनायटेड इंडीया इन्शुरन्स कं.लि.
दयावान कॉम्प्लेक्स.स्टेशन रोड.परभणी
4 विभागीय व्यवस्थापक. ==”==
युनाइटेड इंडीया इन्शुरन्स कंपनी.लि.
मंडल कार्यालय.क्र.2 अंबिका हाउस.
शंकर नगर.चौक.नागपूर 400 010
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) सौ. सुवर्णा देशमुख. सदस्या.
-------------------------------------------------------------------------------------------------------
( निकालपत्र पारित व्दारा – श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.)
शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत देय नुकसान भरपाई मयत शेतक-याच्या वारसास देण्याचे विमा कंपनीने नाकारुन त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की, अर्जदार मौजे मसनेरवाडी ता.गंगाखेड जि. परभणी येथील रहिवाशी आहे.महाराष्ट्र शासनाने राज्यातील संपूर्ण खातेदार शेतक-यांचा गैरअर्जदार क्रमांक 4 यानी पुरस्कृत केलेल्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा उतरविलेला होता त्या पॉलीसीचा अर्जदारचा मयत पती बालाजी मिसे हा देखील लाभार्थी होता तारीख 24/05/2010 रोजी त्याचा ट्रकने धडक दिल्यामुळे अपघातात मृत्यू झाला. गंगाखेड पोलिस स्टेशनला अपघाती मृत्यू गु.र.क्रमांक 141/10 नोंद झाली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा, मरणोत्तर पंचनामा करुन पोस्टमार्टेमसाठी शव गंगाखेड येथील सरकारी दवाखान्यात पाठवले.अर्जदारने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 कडे आवश्यक त्या कागदपत्रासह नुकसान भरपाई क्लेम दाखल केला गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी ती कागदपत्रे जिल्हा कृषी अधिकारी यांचेकडे तारीख 01/11/2010 रोजी पाठवली.जिल्हा कृषी अधिकारी यांनी तो प्रस्ताव मंजुरीच्या कार्यवाहीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे जावक क्रमांक 4641 ने 02/11/10 रोजी पाठवला. त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारला पत्र पाठवुन काही अपु-या कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळवले होते त्याही त्रुटीची पुर्तता केली,परंतु क्लेम मंजुरी अथवा नामंजुरी बाबत गैरअर्जदाराने काहीच कळवले नाही व विनाकारण प्रलंबीत ठेवुन सेवेतील त्रुटी केली आहे.म्हणून त्याची कायदेशिर दाद मिळणेसाठी ग्राहक मंचात प्रस्तुतचा तक्रार अर्ज दाखल करुन नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 टक्के व्याजासह मिळावी याखेरिज मानसिकत्रासापोटी रु.25,000/- आणि अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे.
तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराने आपले शपथपत्र ( नि. 2) व पुराव्यातील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 22 कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी तारीख 07/05/2012 रोजी आपले लेखी म्हणणे (नि.20) सादर केले. गैरअर्जदार क्रमांक 2 यानी पोष्टाव्दारे आपले लेखी म्हणणे मंचाकडे पाठविले होते ते दिनांक 09.02.2012 रोजी प्रकरणात नि. 10 ला समाविष्ठ केले. गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी एकत्रितरित्या तारीख 06/03/2012 रोजी लेखी म्हणणे (नि.15) सादर केले.
गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी आपल्या लेखी जबाबात (नि.20) तक्रार अर्जातील शेतकरी विम्यासंबंधीचा, अर्जदारचा मयत पती शेतकरी विम्याचा लाभार्थी असल्याचा आणि त्यांच्याकडे मयत बालाजी मिसे याच्या नुकसान भरपाईचा विमा प्रस्ताव अर्जदाराने दिला होता या संबंधीचा मजकूर नाकारलेला नाही.त्यांचे एवढेच म्हणणे आहे की, अर्जदारने क्लेम दाखल केल्यानंतर प्रकरणाबाबत एकदाही भटली नाही त्यामुळे तिला मानसिकत्रास व शारीरिक त्रास देण्याचा प्रश्नच उदभवत नाही व दावा मंजूर करणे हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या कक्षेत बसत नसल्यामुळे क्लेम मंजुरीचा अथवा प्रलंबित ठेवण्याचा प्रश्नच उदभवत नाही.सबब त्यांच्या विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी.अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाचे पुष्टयर्थ शपथपत्र नि.21 दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 यानी आपल्या लेखी जबाबात (नि.10) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा नुकसान भरपाई दावा क्लेम संदर्भातील कागदपत्राची विमा कंपनीकडे आवश्यक ती पूर्तता व छाननी करण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत बालाजी पंडीतराव उर्फ हरी मिसे याच्या डेथक्लेमची कागदपत्रे त्यांना तारीख 03/11/2010 रोजी प्राप्त झाली होती.त्यामध्ये काही अपुरी कागदपत्रे होती त्यांची पुर्तता करण्यासाठी अर्जदारला तारीख 07/12/2010 च्या पत्राने कळवले हाते,परंतु पुर्तता न झाल्यामुळे संबंधीत कागदपत्रे शेवटी विमा कंपनीकडे आवश्यक तो शेरा मारुन तारीख 21/12/010 रोजी पाठवली त्यानंतर विमा कंपनीने तारीख 24/03/11 चे अर्जदारला पत्र पाठवले व फाईल बंद केली. सबब गैरअर्जदार क्रमांक 2 यांना या प्रकरणातून वगळण्यात यावे.अशी शेवटी विनंती केली आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत विमा कंपनीने अर्जदारास पाठवलेल्या क्लेम नाकारलेल्या पत्राची छायाप्रत व कागदपत्र पुर्तते संबंधी गैरअर्जदार क्रमांक 2 ने पाठवलेल्या पत्राची छायाप्रत अनुक्रमे (नि.11 व 12) दाखल केले आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यांनी एकत्रितरित्या सादर केलेल्या लेखी जबाबात (नि.15) असा खुलासा केला आहे की, अर्जदाराच्या मयत पतीचा नुकसान भरपाईचा विमा प्रस्ताव नियम व अटी प्रमाणे 90 दिवसाचे आत मिळालेला नव्हता अटीचे उल्लंघन झालेले असल्यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई देवु शकत नाही.अर्जदारचा मयत पती शेतकरी विम्याचा लाभार्थी होता हे तीने सिध्द करावे. अपघाताची घटना व तक्रार अर्जातील इतर सर्व मजकूर त्यांनी साफ नाकारुन तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबाचे पुष्टयर्थ शपथपत्र (नि.18) दाखल केले आहे.
तक्रार अर्जाचे अंतीम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड.खापरे आणि गैरअर्जदार क्रमांक 3 च 4 तर्फे अड रवि गायकवाड यानी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत पतीच्या
शेतकरी अपघात विम्याची नुकसान भरपाई बेकायदेशिररित्या
नामंजूर करुन सेवात्रुटी केली आहे काय ? होय
2 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2 -
अर्जदाराचा मयत पती बालाजी मिसे हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या नि.4/12 वरील 7/12 उतारा, नि.4/14 वरील फेरफार उतारा, नि.4/13 वरील गाव नं.नं.8-अ चा उतारा, नि.4/15 वरील गाव न.नं.6 – क चा उतारा, या रेव्हीन्यु कागदपत्रातील नोंदी मधून शाबीत झाले आहे. दिनांक 24.05.2010 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अर्जदारचा पती हिरो होंडा मोटार सायकल एम. एच. 22 एम. 1190 वरुन गंगाखेड पालम रोडवरुन जात असतांना ट्रक नं. एम.एच.12 ए.क्यु. 3125 च्या चालकाने मोटार सायकलला धडक दिल्याने बालाजी मिसे हो जबर जखमी होवुन अपघातात मरण पावला होता. ही वस्तुस्थिती पुराव्यात दाखल केलेल्या नि.4/17 वरील गंगाखेड पोलिस स्टेशन गु.रजि.नं. 141/10 मधील एफ.आय.आर. नि.4/18 वरील घटनास्थळ पंचनामा नि.4/17 वरील पी.एम.रिपोर्ट नि.4/19 या पुराव्यातून शाबीत झाले आहे.
मयत बालाजी मिसे हा शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे अर्जदाराने ( मयताची पत्नी ) विम्याची नुकसान भरपाई रुपये 1 लाख मिळणेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे अपघाता नंतर विमा क्लेमसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे सादर केलेली होती हे गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबात मान्य केले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 यांने त्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाकडे ती कागदपत्रे तारीख 02/11/11 रोजी पाठवलेली होती.ही देखील अडमिटेड फॅक्ट आहे.जिल्हा कृषी अधिका-याने नंतर तो प्रस्ताव मंजुरीच्या कार्यावाहीसाठी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवलेला होता.तत्पूर्वी गैरअर्जदार क्रमांक 1 ने पाठवीलेल्या पत्रानुसार मयत बालाजी मिसेच्या वडीलांचे नांव पंडीतराव उर्फ हरी असे प्रस्तावात नमुद केले होते.म्हणून पंडीतराव उर्फ हरी ही एकच व्यक्ति असल्या संबंधीचे शपथपत्र दाखल करण्याबाबत अर्जदारास कळविले होते त्याची ही अर्जदाराने पुर्तता केली होती. त्या शपथपत्राची प्रत देखील पुराव्यात नि.4/2 वर दाखल केलेली आहे. त्रुटीच्या कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 कडे प्रस्ताव पाठविल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी तारीख 07/12/2010 चे पत्र पाठवुन मयताचा इन्क्वेस्ट पंचनामाची पुर्तता करणे बाबत अर्जदारास कळविले होते. परंतु पुर्तता न झाल्यामुळे तारीख 21/12/2010 रोजी तसा शेरा मारुन क्लेमची कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठवली. असे गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी लेखी जबाबात म्हंटलेले आहे.याबाबत जिल्हा मंचाचे मत असे की, अर्जदाराने क्लेम प्रस्तावा सोबत पी.एम.रिपोर्ट पाठवला होता म्हंटल्यानंतर वास्तविक मरणोत्तर पंचनाम्याची मागणी करण्याची काही आवश्यकता नव्हती.केलेली मागणी निश्चितच बेकायदेशिर होती. गैरअर्जदार क्रमांक 4 कडे विमा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पाठविल्यानंतर ती कागदपत्रे त्यांना पॉलिसी नियम अटी प्रमाणे 90 दिवसात प्राप्त न झाल्यामुळे विमा कंपनीवर नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी येत नाही.हे कारण दाखवुन त्यांनी अर्जदाराचा विमा क्लेम तारीख 24/03/11 च्या पत्राने (नि.11) नामंजुर केला होता त्या पत्राची छायाप्रत गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबासोबत दाखल केलेली आहे. अर्जदारने पुराव्यात नि.4 लगत कागदपत्रांच्या छायाप्रती दाखल केलेल्या आहेत.त्यावरुन देखील विमाक्लेम व आवश्यक ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे पॉलिसी नियम
अटी प्रमाणे योग्य त्या मुदतीत सादर केलेली होती. हे स्पष्ट दिसते. मुदतीत कागदपत्रे सादर केलेली नाहीत असा गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचा आक्षेपही नाही.त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 ने लेखी जबाबातून घेतलेल्या बचावात पॉलिसीची मुदत संपल्यानंतर 90 दिवसात दाखल केला नाही म्हणून क्लेम नामंजूर केल्याचे दिलेले कारण मुळीच ग्राह्य धरता येणार नाही. कारण शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना संदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकामध्ये नुकसान भरपाई क्लेम ठराविक मुदतीतच दाखल केला पाहीजे ही अट मुळीच बंधनकारक नाही मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमीप्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
या संदर्भात मा. महाराष्ट्र राज्य आयोगानेही रिपोर्टेड केस 2008 (2) All MR (Journal) page 13 आय.सी.आय.लोंबार्ड विरुध्द सिंधुताई खैरनार या प्रकरणात असे मत व्यक्त केले आहे की, क्लेम दाखल करण्यास उशीर झाला ही अट मुळीच बंधनकारक तथा मॅडेटरी नाही हे मत प्रस्तूत प्रकरणालाही लागू पडते याखेरीज मा. राष्ट्रीय आयोगाने देखील रिट पिटीशन 3329/07 युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विरुध्द अरुणा या प्रकरणात 22.10.2007 रोजी दिलेल्या निकालपत्रात देखील वरील प्रमाणेच मत व्यक्त केलेले आहे.ते प्रस्तुत प्रकरणाला लागु पडते. अर्जदाराचा क्लेम चुकीच्या पध्दतीने नाकारुन तीला मानसिक त्रास दिला आहे व सेवेतील त्रूटी केलेली असल्याचे स्पष्ट दिसते.गैरअर्जदार क्रमांक 4 विमा कंपनीने यांनी मयत बालाजी मिसे याचा डेथक्लेम बेकायदेशिररित्या नाकारुन त्याच्यावर अन्याय केलेला आहे व नुकसान भरपाई मिळणे पासून वंचित ठेवलेले आहे.
सबब मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार नं 4 यांनी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथक्लेमची नुकसान भरपाई
रु 1,00,000/- आदेश तारखेपासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास द्यावी.
3 याखेरीज मानसिक त्रास व सेवेतील त्रूटीबद्यल नुकसान भरपाई म्हणून रुपये 2000/- व तक्रार अर्जाचा खर्च म्हणून रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा.
4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात
सौ. सुवर्णा देशमुख. श्री. सी.बी. पांढरपट्टे
सदस्या अध्यक्ष