निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 26/09/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 28/09/2012
तक्रार निकाल दिनांकः- 19/12/2013
कालावधी 01 वर्ष.02महिने.21 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल. M.Sc.LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गयाबाई भ्र.बापुराव पाठक. अर्जदार
वय 60 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.ए.डी.खापरे.
रा. महिपाल गल्ली पाथरी ता.पाथरी जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषि अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषि अधिकारी कार्यालय,पाथरी.
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
कबाल इन्शुरन्स ब्रेाकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग,
प्लॉट नं. 7, सेक्टर ई 1,
टाउन सेंटर,सिडको औरंगाबाद.
3 विभागीय व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
युनायटेड इंडिया इन्शुरंन्स कंपनी लि.
मंडळ कार्यालय, क्रं. 2 अंबीका हाउस,
शंकर नगर चौक, नागपूर 400010.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या पतीचा शेतकरी अपघात विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराच्या पतीचा नामे बापुराव गोविंदराव पाठक यांचा दिनांक 25/11/2009 रोजी माळीवाडया मध्ये पायी जात असतांना ट्रक क्रमांक MH-18 M-2707 ने धडक देवुन गंभीर जखमी केले व उपचार चालू असतांना त्यांचा त्यात सदरील दिवशी मृत्यू झाला, त्यानंतर संबंधीताने सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन पाथरी येथे दिली व त्यानंतर संबंधीत पोलीसांनी साक्षीदाराचे जबाब घेतले व इन्क्वेस्ट पंचनामा केला व पोस्टामार्टेम सिव्हील हॉस्पीटल पाथरी येथे करण्यात आले.
अर्जदाराचे पती हयात असतांना त्यांना मौजे देवनांद्रा येथे गट क्रमांक 320 मध्ये शेत जमीन होती, याबाबत तलाठी सज्जा पाथरी ता पाथरी येथे त्यांच्या नावे 7/12, 6 क, 6 ड मध्ये नोंदी आहेत.
अर्जदाराचे म्हणणे की, त्याच्या पतीच्या मृत्यू नंतर त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे अपघात विमादावा सादर केला, गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी सदर दावा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे पाठवला व गैरअर्जदार क्रमांक 2 ने सर्व कागदपत्रांची तपासणी करुन तो गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठवला.
अर्जदाराचे म्हणणे की, त्यानी विमादावा सादर केल्यानंतर सदर विमादावा बाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता त्याने सांगीतले की, गैरअर्जदार विमा कंपनीने तुमचे पती हे शेतकरी नसले कारणाने तुमचा विमादावा नामंजूर केला आहे. असे सांगीतले . गैरअर्जदार विमा कंपनीने चुकीचे कारण दाखवुन अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करावा व गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, त्यांनी अर्जदाराला शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाण 1 लाख रुपये अर्जदारास द्यावेत व तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश द्यावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 20 कागदपत्रे दाखल केले आहेत. ज्यामध्ये क्लेमफॉर्म भाग -1, भाग -2, क्लेमफॉर्म भाग-3, 4, 7/12 उतारा, फेरफार, गाव नमुना नं 6 (क), शपथपत्र, होल्डींग प्रमाणपत्र, मतदान ओळखपत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, प्रोव्हिजनल पोस्टमार्टेम रिपोर्ट, पासबुक, बातमी, फेरफार, होल्डींग प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 9 वर लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विमादावाचा प्रस्ताव त्यांचेकडे आल्यानंतर त्यांनी तो प्रस्ताव दिनांक 16/11/2009 रोजी मा.जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेकडे योग्य त्या कार्यवाहीस्तव दाखल केला.
गैरअर्जदाराचे म्हणणे की, विमा प्रस्तावातील त्रुटीची पुर्तता करण्याचे काम तालुका कृषी अधिकारी यांचेकडून करण्यात आले, सदर प्रस्तावात कांही कागदपत्रांची त्रुटी होती ते अर्जदारास कळविली त्याप्रमाणे त्याने कागदपत्रांची पुर्तता केली.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 7 वर आपले लेखी निवेदन सादर केले त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदार आमचा ग्राहक नाही महाराष्ट्र शासनाने आमची फक्त मध्यस्थी म्हणून नियुक्ती केली आहे. विमा प्रस्ताव स्विकारुन त्याची छाननी करुन पूर्ण प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवणे एवढेच आमचे कार्य आहे. प्रस्तुत प्रकरणात अर्जदाराचा विमादावा आल्यानंतर आम्ही त्याची छाननी करुन आम्ही तो प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 03/06/2010 रोजी पाठवला व सदरचा अर्जदाराचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 12/08/2010 रोजी नाकारला व अर्जदारास माहिती कळविण्यात आली. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही, म्हणून अर्जदाराचा अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
गैरर्अजदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 16 वर आपला लेखी जबाब सादर केला, त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे, व ती खारीज होणे योग्य आहे. तसेच अर्जदार हा आमचा ग्राहक नाही अर्जदाराने विमा हप्त्यापोटी रक्कम देखील भरलेली नाही व तसेच Tripartite करारा प्रमाणे शेतकरी विमा कंपनी विरुध्द तक्रार दाखल करु शकत नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, सदर पॉलिसी ही दिनांक 15/08/2009 ते 14/08/2010 पर्यंत आहे व तसेच त्यांचे म्हणणे की, पॉलिसी जाहिर झालेल्या तारखे दिवशी म्हणजेच 15/08/2009 रोजी जे शेतकरी आहेत, त्यांचीच पॉलिसी काढलेली आहे व सदर प्रकरणात अर्जदाराचे मयत पती हे फेरफार दिनांक 03/03/2010 रोजी अन्वये शेतकरी झालेले आहेत व सदरची पॉलिसी ही दिनांक 15/08/2009 रोजी शेतकरी असणा-या व्यक्तीचाच विमा काढलेला आहे.
व प्रस्तुत प्रकरणातील अर्जदाराचे पती दिनांक 15/08/2009 रेाजी शेतकरी नसले कारणाने गैरअर्जदार विमा कंपनीने सदरचे योग्य कारण देवुन अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला ते योग्यच आहे. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 17 वर आपला लेखी शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराच्या पतीचा
शेतकरी अपघाती विमा योजने अंतर्गत अर्जदाराचा विमा दावा
मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराच्या पतीच्या दिनांक 25/09/2009 रोजी माळीवाड्यामध्ये पायी जात असतांना ट्रक क्रमांक MH-18 M-2707 ने धडक दिल्याने अपघातात मृत्यू झाला, ही बाब नि.क्रमांक 4/2 वर दाखल केलेल्या Crime No. 110/09 अन्वये पोलीस स्टेशन पाथरीचा एफ.आय.आर. प्रतीवरुन व तसेच नि.क्रमांक 4/14 वरील मरणोत्तर पंचानाम्यावरुन व नि.क्रमांक 4/15 व 4/16 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्ट वरुन सिध्द होते. अर्जदाराचे तक्रार अर्जा मध्ये म्हणणे की, तिच्या पतीचा मृत्यू दिनांक 25/11/2009 रोजी झाले. मंचास वरील कारणास्तव योग्य वाटत नाही. अर्जदाराने तीच्या पतीच्या मृत्यूनंतर मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/1 वरील क्लेमफॉर्म भाग -1 व नि.क्रमांक 4/2 वरील क्लेमफॉर्म भाग-2 वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार क्रमांक 1 ने अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला होता, ही बाब नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -3 वरुन दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदाराचा सदरचा विमादावा मंजूरी करीता गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीकडे पाठवला व गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 12/08/2010 रोजी अर्जदाराचा विमादावा मयत बापुराव गोविंदराव पाठक यांचे शेतकरी म्हणून नांव 7/12 रेकॉर्ड वर पॉलिसी जाहिर झालेल्या तारखे दिवशी नव्हते तर ते पॉलिसी जारी झाल्यानंतर टाकण्यात आलेले आहे, त्यामुळे पॉलिसीच्या अटीनुसार नुकसान भरपाई देवु शकत नाही. त्यामुळे अर्जदाराचा नुकसान भरपाई दावा No Claim करण्यात आलेला आहे व अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला होता ही बाब नि.क्रमांक 7/1 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार विमा कंपनीने त्यांच्या लेखी जबाबात म्हंटले आहे की, सदर पॉलिसीचा कालावधी हा 15/08/2009 ते 14/08/2010 असा होता, ही बाब नि.क्रमांक 17/1 वरील पॉलिसीच्या प्रतवरुन सिध्द होते. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे मयत अर्जदाराचे पती नामे बापुराव गोविंदराव पाठक हे पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी म्हणजे दिनांक 15/08/2009 रोजी शेतकरी नव्हते हे म्हणणे मंचास योग्य वाटते. कारण मयत बापुराव पाठक यांचे नावे मौजे देवनांद्रा ता.पाथरी जि. परभणी येथील गट नं. 320 मध्ये फेर क्रमांक 1889 व्दारे प्रकाश बापुराव पाठक व मयत बापुराव गोविंदराव पाठक यांचे मध्ये वाटणी होवुन वाटणीपत्रा आधारे मयत बापुराव पाठक यांना 59 गुंठे जमीन वाटून आली व त्या आधारे मयत बापुराव पाठक यांचे नाव वरील फेर अन्वये दिनांक 18/09/2009 रोजी फेर मंजूर झाला ही बाब नि.क्रमांक 4/19 वरील दाखल केलेल्या फेरफार नक्कल वरुन सिध्द होते, म्हणजे निश्चितच मयत बापुराव पाठक हे दिनांक 15/08/2009 रोजी शेतकरी नव्हते हे सिध्द होते.
गैरअर्जदार विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराचे मयत पती हे पॉलिसी जारी केल्या दिवशी शेतकरी नव्हतें व ते गैरअर्जदार विमा कंपनीचे ग्राहक होवु शकत नाहीत व अर्जदारास अपघाती विमा योजने अंतर्गत विमादावा दाखल करण्याचा अधीकार नाही ही बाब मंचास योग्य वाटते, कारण गैरअर्जदाराने लेखी जबाबासोबत नि.क्रमांक 17/1 वर दाखल केलेल्या पॉलिसीच्या Eligibility (पात्रता) Clause मध्ये असे स्पष्ट म्हंटले आहे की,
II Eligibility:-
The farmers name should be in the Land Record Register i.e. 7/12 on the date of the issuance of policy.
सदर नियमाच्या आधीन राहून गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारला हे दिसून येते, अर्जदाराचे पती पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी म्हणजेच दिनांक 15/08/2009 रोजी शेतकरी नव्हते. म्हणून विमा कंपनीने अर्जदाराचा विमा दावा फेटाळला आहे. हे दाखल केलेल्या कागदपत्रावरुन दिसून येते व ते योग्यच आहे. असे मंचाचे ठाम मत आहे.
अर्जदाराने दाखल केलेल्या केसलॉ मधील वस्तुस्थिती व प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती वेगळी असल्याचे मंचास दिसून येते. कारण अर्जदाराने सदर प्रकरणात शासन परिपत्रक दाखल केले नाही, त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याचे दिसून येत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश.
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्याने सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.