Exh.No.17
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 15/2012
तक्रार दाखल झाल्याचा दि. 24/05/2012
तक्रार निकाल झाल्याचा दि.29/08/2013
श्री आनंद महादेव धुत्रे
वय वर्षे सु.48, धंदा- नोकरी,
मु.पो.कट्टा, ता.मालवण,
जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
तालुका निरीक्षक,
भूमि अभिलेख कार्यालय,
कुडाळ, जि.सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारतर्फेः- व्यक्तीशः
विरुद्ध पक्षातर्फे- वकील श्री ए.एस. सामंत.
निकालपत्र
(दि. 29/08/2013)
मंचाचे निर्णयाद्वारे श्रीमती वफा जमशीद खान, सदस्याः- तक्रारदार यांनी त्यांचे जमिनीच्या अतिसत्वर मोजणीसाठी रक्कम भरणा करुनही वेळीच मोजणी करुन दिली नसल्याने झालेले नुकसान भरुन मिळण्यासाठी व विनाविलंब जमीन मोजणी करुन मिळणेसाठी विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दाखल केली आहे.
2) तक्रारीची थोडक्यात हकीगत अशी की, तक्रारदार यांची गाव मौजे पडवे, ता.कुडाळ येथे गट नं.1486 क्षेत्र 27 गुंठे इतकी जमीन असून सदर जमीनीच्या अतिसत्वर मोजणीकामी दि.05/01/2009 रोजी रक्कम रु.1500/-तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे भरणा केले होते. दि.15/04/2009 रोजी तालुका निरीक्षक यांनी मोजणी नोटीस पाठवून मोजणीची ता.30/04/2009 अशी ठरवून दिली. नोटीसीतील सूचनांप्रमाणे प्रत्यक्ष जागेवर पूर्ण तयारी करुन प्रत्यक्षात मोजणी कामाला सुरुवात केली. मोजणीचे कामकाज साधारण 4-5 तास चालू होते. परंतू मोजणी कर्मचारी यांनी आपल्या कार्यालयीन तांत्रिक अपूर्णता असल्याचे कारण सांगून सदर जमीनीची हद्द दाखविली नाही. या जमीनीची हद्द 15 दिवसांमध्ये येऊन दाखवितो असे सांगितले. परंतू अद्यापपर्यंत या ठिकाणी कोणीही कर्मचारी आलेला नाही किंवा संबंधीत खात्याने तक्रारदार यांचेशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही. अतिसत्वर मोजणी फी भरुन सुध्दा वेळीच मोजणी न झाल्यामुळे तक्रारदार यांचे अतोनात नुकसान झाले आहे, याची भरपाई मिळावी व झालेला खर्च रु.20,000,00/- विरुध्द पक्ष यांचेकडून मिळावा अशी विनंती तक्रारदारने त्यांचे तक्रार अर्जात केली आहे.
3) तक्रार अर्जासोबत तक्रारदारने तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ शपथपत्र, जमीन मोजणी फी भरलेची पावती, जमीन मोजणी संबंधाने नोटीस, जमीन 7/12 उतारा व जमीन नकाशा यांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत. तसेच नि.4 वर तक्रार दाखल करणेस झालेल्या विलंबास माफी मिळणेसाठी शपथपत्रासह अर्ज दाखल केला आहे.
4) तक्रारदार यांची तक्रार दाखल करुन घेणेस पात्र असल्याचे मंचाचे मत झाल्याने तक्रारदाराचा तोंडी युक्तीवाद ऐकून तक्रार अर्ज दाखल करुन घेऊन विरुध्द पक्षास नोटीस पाठवण्यात आली. विरुध्द पक्ष त्यांचे वकील प्रतिनिधी मार्फत मंचात हजर होऊन त्यांनी शपथपत्रासह त्यांचे लेखी म्हणणे दाखल केले ते नि.9 वर आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रार अर्ज आणि विलंब माफीचा अर्ज या दोन्हीवर एकत्रीत लेखी म्हणणे दाखल करुन सदर दोन्ही अर्ज खोटे व खोडसाळ असल्याने ते त्यातील बाबी अमान्य करुन दोन्ही अर्ज फेटाळण्याची विनंती केली आहे.
5) विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे असे आहे की, तक्रारदारने मौजे पडवे, ता.कुडाळ येथील गट क्र.1486 ची मोजणी होऊन हद्द कायम करुन मिळावी म्हणून अर्ज सादर केला. त्याप्रमाणे अ.स.ह.का.मो.र.नं.1198/05/01/2009 ने अर्जदार व लगत कब्जेदार यांना आगावू नोटीसीने कळवून दि.30/04/2009 रोजी मोजणी तारीख नेमून त्यांचे कार्यालयामार्फत फलक यंत्राच्या सहाय्याने मोजणी काम करण्यात आले. मोजणीअंती प्रकरणी मूळ अभिलेखाची पडताळणी केली असता एकत्रित गटबुकाप्रमाणे होणारा गटाचा नकाशा व मूळ सर्व्हे नंबर व हिस्सा नंबरचा गटबुकाचा नकाशा हा मेळात नसल्याचे दिसून आले. त्यामुळे संबंधीत भूकरमापक यांनी गट क्रमांक 1486 ची हद्द त्यावेळी जागेवर दाखविलेली नाही, तशी समज संबंधीत भूकरमापक यांनी तक्रारदार यांना मोजणीअंती दिलेली आहे. तरी आजपावेतो तक्रारदार यांनी या कार्यालयाकडे संपर्क साधलेला नाही.
6) विरुध्द पक्ष यांचे पूढे असेही म्हणणे आहे की, मौजे पडवे, ता.कुडाळ येथील सन 1996 सालचे मंजूर जमीन एकत्रिकरण योजना पत्रक पाहता मूळ स.नं.93 हिस्सा नं.2 अ, क्षेत्र 0-27-0 आर पासून गट क्र.1486 बनलेला आहे. क्षेत्र व आकार मेळात आहे, कायम आहे. त्यात कुठलाही बदल झालेला नाही. फक्त नकाशात बदल झालेला आहे. गट क्र.1486 मध्ये दुरुस्ती करतांना लगतचे गट क्र.991, 1485 हे पण बाधीत होतात. म्हणून चौकशीची तारीख नेमून तक्रारदार यांना चौकशीसाठी बोलावून लगतचे गटक्रमांक 991, 1485, गटाचे खातेदारांना बोलावून त्यांना समजून सांगून त्यानंतर गटाच्या हद्दी दुरुस्ती होणेसाठी शुध्दीपत्रक करणे आवश्यक आहे. त्यासाठी तक्रारदार यांनी मा.उप संचालक, भूमि अभिलेख, कोकण प्रदेश मुंबई यांचेकडे मा. जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख सिंधुदुर्ग यांचेमार्फत जाऊन त्यानंतर वाजवी त्या दुरुस्तीचे आदेश पारीत होतील. दुरुस्तीचे आदेश प्राप्त झाल्यानंतरच सुधारित हद्द दुरुस्त नकाशाप्रमाणे दाखविले जातील अशी कार्यपध्दती असतांना अर्जदार यांनी दुरुस्तीसाठी अर्ज केलेला नसल्याने कोणतीही दुरुस्तीची कार्यवाही झालेली नाही. परिणामी गट क्र.1486 ची हद्द जागेवर दाखविता आलेली नाही. तसेच प्रकरण निकाली झालेले नाही, त्यामुळे या प्रकरणी विरुध्द पक्ष कार्यालयाकडून तक्रारदारांचे नुकसान झाले हे तक्रारदाराचे म्हणणे वाजवी नाही आणि ते विरुध्द पक्ष यांना मान्य वा कबुल नाही; असे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे.
7) विरुध्द पक्ष यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारदारने सदरची तक्रार तक्रारीस कारण निर्माण झाल्यापसून योग्य त्या मुदतीत दाखल केलेली नाही तसेच विलंब माफीच्या अर्जामध्ये दिलेले कारणही खोटे व खोडसाळ असून ते समर्पक नाही. त्यामुळे विरुध्द पक्षाने तक्रारदार यांची तक्रार फेटाळण्याची विनंती केली आहे. सोबत विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना विरुध्द पक्ष यांनी दिलेले पत्र दि.06/06/2012 व त्यास तक्रारदारने विरुध्द पक्ष यांना पाठविलेले उत्तर दि.07/06/2012 चे यादीलगत दाखल केले आहे. दरम्यानचे कालावधीत विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारने मंचात दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दुरुस्तीचा प्रस्ताव त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून त्यासंबंधीचे कागदपत्र तसेच अभिलेख्यामध्ये दुरुस्ती करण्यासंबंधाने नोटीस, पत्रव्यवहार, वरिष्ठ कार्यालयाचे आदेश इत्यादींच्या झेरॉक्स प्रती सादर केल्या आहेत.
8) सदर तक्रार प्रकरणात उभय पक्षकारांकडून दाखल करणेत आलेली पुराव्याची कागदपत्रे, उभय पक्षांकडून करणेत आलेल्या तक्रारी व त्यावरील कथने तसेच तोंडी युक्तीवाद विचारात घेता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदाराची तक्रार मुदतीत आहे काय ? | होय |
2 | विरुध्द पक्षाने तक्रारदार या ग्राहकास देण्यात येणा-या सेवेमध्ये त्रुटी ठेवली आहे काय ? | नाही |
3 | तक्रारदारांची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | होय. अंशतः |
4 | आदेश काय ? | अंतीम आदेशात नमूद केलेप्रमाणे |
9) मुद्दा क्रमांक 1- सदर तक्रार अर्ज तक्रारदारने विलंबाने दाखल केला आहे. त्यामुळे तक्रार फेटाळण्यास पात्र आहे असे विरुध्द पक्षाचे म्हणणे आहे, परंतु तक्रारदार यांचे म्हणणे असे आहे की, त्याने जमीन मोजणीसाठी फी ची रक्कम भरली. विरुध्द पक्षाने दि.30/04/2009 रोजी मोजणी केली परंतु जमीनीच्या हद्दी दाखविल्या नाहीत. तक्रारदारचे म्हणण्यानुसार त्यावेळी भूकरमापक यांनी आपल्या काही कार्यालयीन तांत्रिक अडचणी असल्याने आज हद्द दाखवू शकत नाही; जमीन लगतदार व तक्रारदार यांना पुन्हा नोटीस काढून 15 दिवसांनी हद्द ठरवितो, असे सांगितले होते. परंतू एक महिना होवून सुध्दा त्याची कोणतीही दखल घेतली जात नव्हती म्हणून त्यानंतर तक्रारदार यांनी वेळोवेळी विरुध्द पक्ष यांचे कार्यालयात विचारणा केली तेव्हा विरुध्द पक्ष यांचे एकच उत्तर होते ‘तुम्हांला आम्ही नंतर कळवितो’ या त्यांच्या साचेबंद उत्तराला वैतागुन तक्रारदार यांने विरुध्द पक्ष यांचेशी संपर्क साधण्याचे टाळले व ग्राहक मंचामध्ये तक्रार दाखल केली. विरुध्द पक्षाने देखील तक्रारदार यांचे मोजणीचे प्रकरण बंद केलेले नाही. सदरची बाब ही विरुध्द पक्षाचे नि.9 वरील लेखी म्हणण्यातील पान नं.2 वरील परिच्छेद क्र.3 वरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्ष यांनी लेखी म्हणण्यामध्ये गट क्र.1486 ची सुधारित हद्द दाखवून प्रकरण निकाली झालेले नाही’ असेच म्हटले आहे. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस सातत्याने कारण उद्भवत आहे असे आम्हांस वाटते. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे या मतास आम्ही आलो आहोत. सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
10) मुद्दा क्रमांक 2 – तक्रारदाराचे तक्रार अर्जामध्ये असे म्हणणे आहे की, त्यांनी जमीनीची अतिसत्वर मोजणी होणेकरिता मोजणी फी भरली; परंतु मोजणी होऊन देखील मोजणी कर्मचारी यांनी त्यांच्या कार्यालयीन तांत्रिक अपूर्णता असल्याचे कारण सांगून अद्यापपर्यंत कोणीही कर्मचारी आलेला नाही किंवा संबंधीत खात्याने तक्रारदार यांचेशी कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे व मानसिक त्रास झाला आहे, असे तक्रारदार यांचे म्हणणे आहे. विरुध्द पक्षाचे त्यावर असे म्हणणे आहे की, सदर गावामध्ये जमीन एकत्रिकरण योजना राबविणेत आलेली होती. एकत्रीकरण योजना संमत झाल्यानंतर जमीन एकत्रीकरण संबंधाने वाद असल्यास संबंधीत जमीन मालकाने एकत्रीकरण योजना पत्रक प्रसिध्द झाल्यापासून एक महिन्याच्या आत तशी लेखी तक्रार सेटलमेंट कमीशन यांचेकडे करणे आवश्यक होते; पण तसे घडलेले नाही. समजा तक्रारदार यांचा त्यावेळी सदर जमीनीशी संबंध नव्हता, पण जेव्हा मोजणीच्या वेळी, तक्रारदार प्रत्यक्ष हजर असतांना सदर बाब लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांने सदर जमीनीच्या हद्दी दुरुस्तीसाठी तसा अर्ज करणे आवश्यक होते परंतू मोजणीचे वेळी संबधीत भूकरमापक यांनी तक्रारदार यांस समज देवूनही तक्रारदार यांनी नियमाप्रमाणे हद्द दुरुस्तीकरिता अर्ज दिलेला नाही. त्यामुळे ग्राहक मंचाचे नोटीस सोबत असलेला तक्रार अर्ज विचारात घेऊन विरुध्द पक्षाने तक्रारदारास दि.06/06/2012 रोजी पत्र पाठवून दि.11/06/2012 रोजी दुपारी 4.00 वाजता गट क्र.1486 च्या हद्दी दुरुस्ती होणेकरिता शुध्दीपत्रक मंजूर करुन घेणे आवश्यक असल्याने चौकशीकरिता हजर राहून म्हणणे मांडावे असे कळविले. सदरचे पत्र नि.क्र.10/1 वर आहे. सदर पत्रास तक्रारदार यांनी दिलेले उत्तर नि.10/2 वर आहे. त्या उत्तरामध्ये ‘मोजणी प्रकरण सिंधुदुर्ग ग्राहक मंचामध्ये न्याय प्रविष्ठ असल्याने हजर राहून कोणत्याही प्रकारचा जाबजबाब देवू इच्छित नसल्याचे’ तक्रारदारने विरुध्द पक्षास कळविले आहे. मुंबई धारण जमीनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1947 या कायदयाप्रमाणे संबंधीत गटबांधणीमध्ये फेरबदल करणेचा असल्यास दुरुस्ती करणेचे प्रावधान आहे, परंतू त्यासाठी संबंधीत जमीन मालक यांनी आपला प्रस्ताव मा.सेटलमेंट कमीशनर यांचेकडे पाठविणे आवश्यक आहे. सबब ती दुरुस्ती करुन शुध्दीपत्रक प्रसिध्द झाल्याशिवाय मोजणी अंतीम करता येत नाही असे युक्तीवादादरम्यान स्पष्ट केले. मुंबईचा धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियम, 1947 मधील तरतूदींचा विचार करता वादातीत जमीन संबंधाने एकत्रिकरण योजना पूर्वीच संमत झालेली असल्यामुळे विरुध्द पक्षाचे म्हणणे ग्राहय आहे. तक्रारदार यांनी मोजणीच्या वेळी भूकरमापक यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे हद्दी दुरुस्तीबाबत प्रस्ताव विरुध्द पक्ष अथवा त्यांचे वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविल्याचे पुराव्यानिशी सिध्द केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांस द्यावयाच्या सेवेमध्ये कोणतीही त्रुटी विरुध्द पक्षाने ठेवलेली नाही, असे आमचे मत आहे.
11) मुद्दा क्रमांक 3 - i) उपरोक्त विवेचनानुसार विरुध्द पक्षाने सेवा देणेत त्रुटी ठेवलेली नाही हे स्पष्ट होते. दरम्यानच्या काळात म्हणजेच तक्रारदारने मंचात तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदाराचा मंचासमोर दाखल केलेला अर्ज हाच दुरुस्तीकरिताचा प्रस्ताव समजून विरुध्द पक्षाने लेखी म्हणणे दाखल करणेपूर्वीच तक्रारदाराच्या जमीनीच्या हद्दी संबंधाने कार्यवाहीला सुरुवात केली होती. विरुध्द पक्षाने मौजे पडवे, ता.कुडाळ येथील गट नं.1486 बाबत दुरुस्ती करुन त्याचा अंमल गाव नकाशात घेणेत आलेला आहे आणि सदर करणेत आलेली दुरुस्ती अधिनियम/कायदयानुसार बरोबर आहे आणि दुरुस्ती नकाशाप्रमाणे मोजणी काम करणे संयुक्तीक आहे, असे नि.15 वर दाखल केलेल्या कागदपत्रांमध्ये विरुध्द पक्षाने नमूद केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्यांचे गट क्र.1486 च्या हद्दी दाखवून मोजणीचे काम पूर्ण करुन देणे आवश्यक आहे. त्यामुळे तक्रारदारची ही मोजणी कामासंबंधाने मागणी मंजूर होणेस पात्र आहे असे आम्हांस वाटते.
ii) तक्रारदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये विविध आर्थिक मागण्या केलेल्या आहेत; तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून देणेत आलेल्या सूचनेप्रमाणे दुरुस्तीकरिता तातडीने प्रस्ताव दिला असता तर कालापव्यय आणि आर्थिक नुकसानीस तक्रारदारला त्याचे म्हणण्याप्रमाणे सामोरे जावे लागले नसते. विरुध्द पक्षाने सेवेमध्ये त्रुटी केल्याचे तक्रारदारने सिध्द केले नसल्यामुळे तक्रारदार नुकसान भरपाई मिळणेस पात्र नाही. सबब उभय पक्षकारांनी आर्थिक भार आपापला सोसावयाचा आहे.
12) मुद्दा क्रमांक 4 – मुद्दा क्रमांक 1 ते 3 मध्ये केलेल्या विस्तृत विवेचनाला अनुलक्षून आम्ही तक्रारदार यांची तक्रार अंशतः मंजूर करीत असून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2) विरुध्द पक्ष यांनी सदर आदेश प्राप्तीपासून 60 दिवसांचे आत तक्रारदार यांच्या मालकीच्या मौजे पडवे, ता.कुडाळ, गट क्र.1486 ची मोजणी करुन मोजणी काम पूर्वील मोजणी फी मध्येच पूर्ण करावे.
3) उभय पक्षकारांनी त्यांचा खर्च सोसावा.
4) तक्रारदाराच्या अन्य मागण्या फेटाळण्यात येतात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी.
दिनांकः 29/08/2013
Sd/- sd/-
(वफा खान) (डी. डी. मडके)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.