निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 08/07/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 15/07/2013 तक्रार निकाल दिनांकः- 06/03/2014
कालावधी 07 महिने.19 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
1 रेणुका भ्र. शेषेराव खुळे. अर्जदार
वय 28 वर्षे. धंदा.शेती, अॅड.जे.बी.गिरी.
रा.राहटी ता.जि.परभणी.
2 बापुराव पिता शेषेराव खुळे,
वय 10 वर्षे, अ.पा.क.आई
अर्जदार क्रमांक 1.
3 ज्ञानेश्वर पिता शेषेराव खुळे,
वय 08 वर्षे, अ.पा.क.आई,
अर्जदार क्रमांक 1.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी, गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय, स्वतः
पेडगाव रोड, परभणी जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक, स्वतः
डेक्कन इन्शुरंन्स अॅण्ड रिइन्शुरन्स ब्रोकींग
प्रा.लि. औरंगाबाद.
3 व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अॅशुरन्स कंपनी लि.
87,महात्मा गांधी मार्ग फोर्ट,मुंबई.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार क्रमांक 1 चे पती नामे शेषेराव बापुराव खुळे यांचा दिनांक 19/12/2010 रोजी गणपूर शिवार ता.पूर्णा येथे मोटार वाहन टिपर व रेल्वे मध्ये झालेल्या अपघातात मृत्यू झाला.
अर्जदाराचे म्हणणे की, तिचे पती हयात असताना शेती करुन कुटूंबाचा उदरनिर्वाह करत होते, अर्जदार क्रमांक 1 च्या पतीने इ.स. 2003 मध्ये मौजे राहटी ता.पूर्णा येथे गट क्रमांक 25 मध्ये 36 गुंठे जमीन खरेदी केली होती व सदरची जमीन अर्जदार क्रमांक 2 यांच्या नावे खरेदी केली होती व अज्ञान पालन कर्ता म्हणून मयत शेषेराव बापुराव खुळे यांचे नाव लावण्यात आले. सदर जमीन खरेदी करते वेळी अर्जदार क्रमांक 2 चे वय फक्त 1 वर्षे होते. सदर खरेदी खतानुसार अर्जदार क्रमांक 1 च्या पतीचे नांव 7/12 उता-यावर आले व अर्जदार क्रमांक 2 चे अज्ञान पालन कर्ता म्हणून नाव लावण्यात आले होते.
अर्जदाराचे म्हणणे की, शेषेराव बापुराव खुळे यांच्या मृत्यू नंतर त्यानी शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा म्हणून मयत शेषेराव खुळे यांचा विमादावा सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदाराकडे दाखल केला होता, परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मयताच्या नावावर पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी शेतकरी म्हणून 7/12 उता-यावर नोंद नव्हती, म्हणून अर्जदाराचा विमादावा दिनांक 16/12/2011 च्या पत्राव्दारे विमादावा नाकारण्यात आला.
अर्जदाराचे म्हणणे की, संबंधीत तलाठ्याने मयत शेषेराव खुळे हे शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. गैरअर्जदारास शेतकरी आहे. किंवा नाही ठरवण्याचा अधिकार नाही व तो केवळ ठरवण्याचा अधिकार तलाठ्यास आहे.
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा चुकीच्या पध्दतीने नामंजूर करुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह मंजूर करण्यात यावी. व गैरअर्जदारांना आदेश करावा की, त्याने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत अर्जदार क्रमांक 1 च्या मयत पतीच्या विमादाव्यापोटी 1 लाख रु. अर्जदारास द्यावेत, त्रुटीची सेवा दिली म्हणून 5,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 4 वर 20 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये Repudiation Letter, क्लेमफॉर्म भाग -1, भाग -1 चे सहपत्र, क्लेमफॉर्म भाग -3, क्लेमफॉर्म भाग -2, Death Certificate of shesherao 7/12 उतारा, होल्डींग प्रमाणपत्र, खरेदी खत, प्रपत्र –ग, फेरफार नोंद, वारसाचे प्रमाणपत्र, एफ.आय.आर.ची प्रत, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, Post Mortem Report, Driving License, रहिवाशी प्रमाणपत्र, रेशनकार्डची प्रत, बँक पासबुकच्या प्रती दाखल केले आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 15 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने मयत शेषेराव खुळे यांचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा त्यांच्या कार्यालयात दाखल केला होता व तो प्रस्ताव आम्ही दिनांक 27/06/2011 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांचेकडे पाठविला व त्यांनी तो विमा कंपनीकडे 30/09/2011 रोजी पाठविला. सदर प्रस्ताव दाखल केल्यानंतर विमा कंपनीने शेषेराव खुळे यांचे नावावर जमीन नाही, या कारणाने अर्जदाराचा प्रस्ताव नाकारला आहे. आम्ही आमचे कार्य चोखपणे पार पाडलेले आहे. म्हणून प्रस्तुत प्रकरणातून आम्हांस मुक्त करावे.
गैरअर्जदार क्रमांक 1 याने नि.क्रमांक 16 वर लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 6 वर आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था ही विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशीलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून कारणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते. या कामासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची फी अथवा आर्थिक मदत मागीतलेली नाही वा स्विकारली नाही.
अर्जदाराने दाखल केलेली आमच्या विरुध्दची तक्रार ही अपु-या माहितीमुळे व गैरसमजुतीमुळे दाखल केली आहे. आम्ही आमचे कार्य केलेले आहे. आम्ही अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही, म्हणून प्रस्तुत प्रकरणातून आम्हांस मुक्त करावे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 10 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे व ती खारीज होणे योग्य आहे. अर्जदार हा आमचा ग्राहक नाही व तसेच विमा हप्त्यापोटी रक्कम देखील अर्जदाराने आमच्याकडे भरलेली नाही, म्हणून सदरची तक्रार खारीज होणे योग्य आहे. विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही.
पॉलिसी जारी केल्या तारखे दिवशी मयत शेषेराव खुळे हे शेतकरी नव्हते म्हणून विमा कंपनीने दिनांक 16/12/2011 रोजीच्या पत्राव्दारे अर्जदाराचा विमादावा नाकारल्याचे अर्जदारास लेखी कळविले व ते योग्यच व कायदेशिर होते. अर्जदार क्रमांक 1 चे मयत पती हे कधीही शेतकरी नव्हते अर्जदाराच्या मयत पतीने मौजे राहटी येथील गट क्रमांक 25 मधील जमीन ही अर्जदार क्रमांक 2 च्या नावे खरेदी केली होती त्यामुळे अर्जदाराचे पती हे अर्जदार क्रमांक 2 चे अज्ञान पालनकर्ता दाखवुन शेती खरेदी केली होती याचा अर्थ असा होत नाही की, अर्जदाराचे पती शेतकरी होते. विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली नाही. म्हणून मंचास विनंती केली आहे की, सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 14 वर पॉलिसीची प्रत दाखल
केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा
योजने अंतर्गत अर्जदाराचा विमादावा नामंजूर करुन अर्जदारास
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार क्रमांक 2 बापुराव शेषेराव खुळे अज्ञान पालकर्ता म्हणून त्याचे वडील नामे शेषेराव बापुराव खुळे यांनी दिनांक 08/04/2003 रोजी मौजे राहटी ता. व जि परभणी येथील गट क्रमांक 25 मधील 36 गुंठे जमीन सदर जमीनीचे मुळ मालक सखाराम धोंडीबा खुळे यांना जमीनीची पूर्ण किंमत 73,000/- रु. देवुन कायमचे खरेदीखत करुन घेतले. ज्या खरेदीखताचा क्रमांक 630/2003 हा होता. ही बाब नि.क्रमांक 4/9 वर दाखल केलेल्या खरेदी खतावरुन सिध्द होते.
व सदर खरेदी खता आधारे अर्जदार क्रमांक 2 यांचे अज्ञान पालनकर्ता मयत शेषेराव बापूराव खुळे यांना दाखवुन 7/12 नोंद आली. ही बाब नि.क्रमांक 4/6 वर दाखल केलेल्या 7/12 उता-यावरुन व तसेच नि.क्रमांक 4/11 वर दाखल केलेल्या फेरफार नकलेवरुन सिध्द होते.
अर्जदार क्रमांक 1 यांचे पती व अर्जदार क्रमांक 2 व 3 यांचे वडील नामे शेषेराव बापुराव खुळे यांचा दिनांक 19/12/2010 रोजी मोटार वाहन व रेल्वे यांच्यात अपघात होवुन अपघाती मृत्यू झाला होता. ही बाब नि.क्रमांक 4/15 वर दाखल केलेल्या Crime No. 196/10 पोलीस ठाणे पूर्णा यांच्या घटनास्थळ पंचनाम्याच्या प्रतीवरुन व नि.क्रमांक 4/14 वर दाखल केलेल्या एफ.आय.आर. च्या प्रतीवरुन सिध्द होते व तसेच सदरची बाब नि.क्रमांक 4/17 वर दाखल केलेल्या पोस्टमार्टेम रिपोर्टवरुन सिध्द होते.
अर्जदार हे मयत शेषेराव बापुराव खुळे यांचे वारसदार आहेत. ही बाब नि.क्रमांक 4/13 वर दाखल केलेल्या संबंधी ग्रामसेवकाने दिलेल्या वारस प्रमाणपत्रा वरुन सिध्द होते. शेषेराव बापुराव खुळे यांचा सदर अपघाती मृत्यू नंतर अर्जदाराने शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळावा. म्हणून मयत शेषेरावाचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 कडे सर्व आवश्यकत्या कागदपत्रांसह दाखल केला होता. ही बाब नि.क्रमांक 4/3 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग -3 च्या कागदपत्रावरुन सिध्द होते. तसेच शेषेराव बापुराव खुळे हे शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत समाविष्ट असून अपघातामुळे त्यांचे वारस 1 लाख रु. रक्कमेच्या दाव्यास पात्र आहेत. बाबतचे प्रमाणपत्र तलाठी सज्जा नांदगाव खु. यांनी दिलेल्या क्लेमफॉर्म भाग – 2 च्या तलाठ्याच्या प्रमाणपत्रावरुन दिसून येते.
सदरचा अर्जदाराचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने दिनांक 16/12/2011 रोजीच्या पत्राव्दारे नामंजूर केला होता, “ पॉलिसी जारी केलेल्या तारखे दिवशी म्हणजे दिनांक 15/08/2010 रोजी मयत शेषेराव बापुराव खुळे यांच्या नावे शेतजमीन नव्हती व 7/12 उता-यावर मयताचे शेकरी म्हणून नाव नव्हते. ” असे कारण दर्शवुन अर्जदाराचा विमादावा फेटाळला होता. ही बाब नि.क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते.
याबाबत अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 4/6 वरील 7/12 उतारा व नि.क्रमांक 4/9 वरील खरेदीखत क्रमांक 630/2003 चे अवलोकन केले असता, असे निष्पन्न होते की, मयत शेषेराव बापुराव खुळे यांनी अर्जदार क्रमांक 2 च्या नावे सदर जमीन खरेदी केली होती व खरेदीखत करते वेळी अर्जदार क्रमांक 2 याचा अज्ञान पालनकर्ता म्हणून मयत शेषेराव खुळे यांचे नांव होते. याचाच अर्थ असा निघतो की, सदर शेत जमीनीचा मालक हा अर्जदार क्रमांक 2 आहे. केवळ तो अज्ञान असल्यसामुळे मयत शेषेराव खुळे यास अज्ञान पालनकर्ता दाखविले आहे.
कायद्या प्रमाणे अर्जदार क्रमांक 2 हा सज्ञान झाल्यावर तोच सदर शेतीचा मालक होतो. अज्ञान पालनकर्ता होत नाही.
मयत शेषेराव खुळे हा सदर शेतीचा मालक म्हणून व शेतकरी म्हणून विम्याचा लाभार्थी होवू शकत नाही. असे मंचाचे ठाम मत आहे. कारण विमा कंपनीने पॉलिसीच्या कालावधीत जे शेतकरी म्हणून 7/12 उता-यावर नाव आहे. त्यांचा विमा त्याने काढला होता. ही बाब नि.क्रमांक 14 वरील पॉलिसीच्या प्रत वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार विमा कंपनीने योग्यच कारण दर्शवुन अर्जदाराचा विमादावा फेटाळला आहे.अर्जदाराच्या विधीज्ञाने दाखल केलेल्या केसलॉ मधील वस्तुस्थिती व प्रस्तुत प्रकरणातील वस्तुस्थिती विभीन्न आहेत.विमा कंपनीने अर्जदारास सेवात्रुटी दिल्याचे कोठेही निष्पन्न होत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे नकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी करावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.