निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 18/01/2013
तक्रार नोदणी दिनांकः-30/01/2013
तक्रार निकाल दिनांकः- 24/09/2013
कालावधी 07 महिने. 25 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
गंगासागर भ्र.बालाजी चव्हाण. अर्जदार
वय 52 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.पी.डी.देसाई.
रा.संबर ता.जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
परभणी जि.परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स अँड रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
201,मॉन्ट वर्ट झेनिथ, कुंदन गार्डन समोर,
बाणेर रोड,ता.हवेली जि.पुणे 411 045.
3 मा.शाखा व्यवस्थापक, अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अॅशुरन्स कं लि.
यशोदिप बिल्डींग, नानलपेठ, परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा शेतकरी अपघात विमादावा देण्याचे टाळून अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्या बद्दलची तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी की,
अर्जदाराचे पती मौजे संबर ता.जि.परभणी येथील गट नं. 371 मधील जमिनीचा मालक व कब्जेबदार होता, व याची नोंद 7/12 उतारा, 8-अ, 6 ड, 6 क, प्रमाणपत्रा मध्ये आलेली आहे.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती हे जिपने धडक दिल्यामुळे दिनांक 28/01/2011 रोजी गंभीर जखमी झाले,त्यामुळे त्याना परभणी येथील स्पंदन हॉस्पीटल मध्ये अॅडमिट करण्यात आले, त्यानंतर त्यांची प्रकृती अधीकच बीघडल्यामुळे नांदेड येथील यशोदा हॉस्पीटल मध्ये अॅडमिट करण्यात आले. व दिनांक 30/01/2011 रोजी अर्जदाराचे पतीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अर्जदाराचे पतीचे मृत्यूचे कारण अर्जदारास व त्याच्या नातेवाईकांस माहिती असल्यामुळे मयताचे पोस्टमार्टेम करण्यात आले नव्हते.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती बालाजी चव्हाण यांचा मृत्यू अपघाता मध्ये झालेला असून त्या संबंधी जिप चालका विरुध्द पोलीस स्टेशन हट्टा ता. वसमत जि.हिंगोली येथे गुन्हा क्रमांक 12/11 नुसार कलम 299, 304, of IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अर्जदाराने त्यानंतर सर्व कागदपत्रांसह दिनांक 09/08/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडे विमादावा सादर केला. व तो प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 1 याने तो गैरअर्जदार क्रमांक 2 यांचेकडे पूढील कार्यवाहीसाठी अर्जदाराचा विमा प्रस्ताव दाखल केला. व सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 2 ने गैरअर्जदार क्रमांक 3 कडे सादर केला. व सदर विमा प्रस्तावा बाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केले असता त्यांनी अर्जदारास असे सांगीतले की, तुमचा विमा प्रस्ताव विमा कंपनीकडे मंजूरीसाठी पाठविले आहे. व मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कळवू असे सांगीतले.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 याने दिनांक 17/11/2011 रोजी अर्जदारास पत्राव्दारे पोस्टमार्टेम व इनक्वेस्ट पंचनाम्याची प्रतीची मागणी केली. अर्जदाराचे पतीचा मृत्यू रस्ता अपघातामुळे झाले असलेमुळे त्याचा पोस्टमार्टेम व इनक्वेस्ट पंचनामा केला नाही, असे अर्जदाराचे म्हणणे आहे. शेवटी दिनांक 06/08/2012 व 24/11/2012 रोजी गैरअर्जदाराचे पत्र आले व त्यात देखील त्याने सदर कागदपत्रांची मागणी केली.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 ने आपसात संगनमत करुन अर्जदाराचा विमादावा अनावश्यक कागदपत्रांची मागणी करुन विमादावा मंजूर करण्यात टाळाटाळ केली व सेवेत त्रुटी दिली. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार मंचा समोर दाखल करणे भाग पडले व मंचास अशी विनंती केली की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास असा आदेश करण्यात यावा की, अर्जदाराला 1,00,000/- मृत्यू झालेल्या तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत. व तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 25,000/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु. 5,000/- गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर व नि.क्रमांक 21 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदाराने नि.क्रमांक 6 वर दोन कागदपत्रांच्या यादीसह दोन कागदपत्रे ज्यामध्ये पोस्टकार्ड, डेक्कन इंशुरंसची प्रत दिं. 28/08/2012, व पोस्टकार्ड डेक्कन इंशुरंस दि. 24/11/2012 ची प्रत दाखल केली आहे. व नि. क्रमांक 23 वर 9 कागदपत्रांच्या यादीसह 9 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये फायनल चार्जशिटची नक्कल, स्पंदन हॉस्पीटलचे प्रमाणपत्र, स्पंदन हॉस्पीटलचे प्रमाणपत्र, यशोदा हॉस्पीटलचे प्रमाणपत्र तालुका कृषी अधिकारीचा अर्ज, विमादावाची नक्कल, 7/12 उतारा, ई. कागदपत्रे दाखल केली आहेत.व तसेच नि.क्रमांक 27 वर 1 कागदपत्र ज्यामध्ये विमादावा दाखल केलेला आहे.
मंचातर्फे लेखी म्हणणे सादर करण्याकरीता गैरअर्जदारास नोटीसा काढण्यात आल्या. गैरअर्जदार क्रमांक 1 मंचासमोर हजर व आपला लेखी जबाब सादर केला. व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचे पती बालाजी चव्हाण यांना सदरील योजनेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने आम्ही शासन निर्णयांत नमुद अटी नुसार सर्व कागदपत्रांची पुर्तता करुन विहीत मार्गानी संबंधीत प्रस्ताव दाखल केला व तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 चे असे म्हणणे आहे की, अर्जदाराचा प्रथम प्रस्ताव 06/09/2011 रोजी प्राप्त झाला व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी परभणी यांच्याकडे सादर करण्यात आला व तोच प्रस्ताव विमा कंपनीकडे सादर करण्यात आला, आमची भुमिका एवढीच आहे की, विमा प्रस्ताव दाखल करुन घेवुन त्याच्या अर्जाची छाटणी करुन संबंधीताकडे विमा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवणे व त्रुटीची पुर्तता करणे एवढीच आहे. त्यानुसार विमा कंपनीने सदरच्या विमा दाव्यात पोस्टमार्टेम, पंचनामा नसल्याचे 06/08/2012 ला त्यांना कळविले. त्यानंतर सदर कागदपत्राची पुर्तता करा म्हणून आम्ही अर्जदारास कळविले. त्यामुळे सदरच्या प्रकरणात आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही व आम्हास दोषी धरणे योग्य नाही.
गैरअर्जदार क्रमांक 2 ने नि.क्रमांक 12 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की,सदरची विमा कंपनी ही विमा विनियामक आणि विकास प्राधिकरण मान्यता प्राप्त विमा देणारी संस्था आहे. आमच्या आशिलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी व आमचे आशिल यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते. आम्ही अर्जदाराकडून महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची फि अथवा आर्थिक मदत मागीतलेली नाही, आम्ही अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिलेली नाही अथवा आम्ही जबाबदार नाहीत. नि.क्रमांक 13 वर गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि. क्रमांक 19 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आ.हे सदरचा अर्जदार हा आमाचा ग्राहक नाही व एक रुपया देखील हप्त्याच्या स्वरुपात आम्हाला फि दिलेली नाही व तसेच ट्रायपार्टी अॅग्रीमेंट असल्यामुळे सदरच्या शेतक-यास गैरअर्जदार विमा कंपनी विरुध्द दावा दाखल करण्याचा काही एक अधिकार नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यात यावी व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार चालवण्याचा मंचास काही एक अधिकार नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 च्या शाखेने कोणत्याही प्रकारची पॉलिसी अर्जदारास दिलेली नाही व तसेच पुणे येथील पार्टी आवश्यक असल्या कारणाने व ती न केल्याने सदरची तक्रार चालवणे योग्य नाही व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, विमा कंपनीने सदरच्या विमा दाव्यात अर्जदाराच्या मयत पतीचे पोस्टमार्टेम व इनक्वेस्ट पंचनाम्याची कागदपत्रे सादर करा म्हंटले असता देखील अर्जदारने ते हेतुपूरस्सरपणे दाखल केलेली नाही. म्हणून गैरअर्जदार विमा कंनीने त्याचा विमादावा निकाली काढला नाही व गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास कोणत्याही प्रकारे सेवेत त्रुटी दिलेली नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्याची विनंती केली आहे.
नि.क्रमांक 20 वर गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.व गैरअर्जदार क्रमांक 3 ने नि.क्रमांक 25 वर 1 कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्ये पॉलिसीची प्रत इत्यादी आहेत.
दोन्ही पक्षांच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराच्या मयत पतीचा विमादावा
पोस्टमार्टेम व इनक्वेस्ट पंचनामा कागदपत्रांची मागणी करुन
अपघात विमा रक्कम अर्जदारास देण्याचे टाळून सेवेत त्रुटी
दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराच्या पतीचा मृत्यू अपघाता मध्ये झाला होता ही बाब नि.क्रमांक 23/1 वरील दाखल केलेल्या एफ.आय.आर. कॉपी वरुन सिध्द होते. अर्जदाराच्या पतीस मौजे संबर जिल्हा परभणी येथे गट क्रमांक 371 मध्ये शेत जमीन होती ही बाब नि.क्रमांक 23/8 वरील दाखल केलेल्या 7/12 उतारावरुन सिध्द होते. अर्जदाराने त्याच्या पतीचा अपघात विमादावा मिळावा म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे प्रस्ताव दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 27 वरील दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग 3 व क्लेमफॉर्म भाग 1 वरुन सिध्द होते. गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास मरणोत्तर पंचनामा व पोस्टमार्टेम रिपोर्ट कागदपत्रांची मागणी केली होती ही बाब नि.क्रमांक 6/1 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते व अर्जदाराचा शेतकरी अपघात विमादावा लटकत ठेवला ही बाब देखील नि.क्रमांक 6/1 वरील कागदपत्रांवरुन सिध्द होते. वास्तविक अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा अपघाता नंतर उपचारा दरम्यान झाला ही बाब एफ.आय.आर. कॉपी वरुन व नि.क्रमांक 23/2, 23/3, 23/4 व 23/5 वर दाखल केलेल्या स्पंदन व यशोदा हॉस्पीटलच्या कागदपत्रावरुन दिसून येते. यावरुन असे दिसते की, अर्जदाराच्या पतीचा मृत्यू जिपने धडक दिल्यामुळे झाला हे सिध्द होते. वास्तविक पोस्टमार्टेम व इनक्वेस्ट पंचनामा या कागदपत्रांची आवश्यकता जर माणसाचा मृत्यू हा आत्महत्येमुळे झाला असेल तरच सदर कागदपत्रांची आवश्कता असते. व अर्जदाराच्या मयत पतीचा मृत्यू अपघातात झाला असल्यामुळे सदरच्या कागदपत्रांची आवश्यकता मंचास वाटत नाही. या बाबत मा.राष्ट्रीय आयोग शिमला यांनी अपील नंबर 298/2009, 2010 (2) 269 सी.पी.आर. श्रीमती रुक्मणी देवी विरुध्द नॅशनल इंशुरंस कंपनी या मध्ये असे म्हंटले आहे की, Insurance claim should not be rejected on hyper technical grounds.सदरचा निकाल या तक्रारीस लागु पडतो, म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदाराचा विमादावा पोस्टमार्टेम व इनक्वेस्ट पंचनामाची मागणी करुन प्रलंबीत ठेवून अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. तसेच राज्यातील सर्व खातेदार
शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या लटकत ठेवुन निश्चीतपणे सेवा त्रूटी दिली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो. विमा कंपनीस पॉलीसी हमी प्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 ने अर्जदारास रु.1,00,000/- फक्त (अक्षरी रु.एकलाख
फक्त) आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत द्यावे, तसेच मानसिक
त्रासापोटी रु.3,000/- फक्त ( अक्षरी रु.तीनहजार फक्त ) द्यावेत.
3 याखेरीज गैरअर्जदाराने अर्जदारास तक्रारीचा खर्च म्हणून रु. 2,000/- फक्त
(अक्षरी रु.दोनहजार फक्त) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.