(घोषित दि. 05.01.2015 व्दारा श्रीमती. रेखा कापडिया, सदस्या)
अर्जदाराच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनेनुसार विमा रक्कम मिळण्यासाठी गैरअर्जदार यांच्याकडे प्रस्ताव दाखल केला. परंतु अद्याप पर्यंत विमा रक्कम न मिळाल्याने अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीनुसार त्यांची गट नंबर 490 मौजे भाकरवाडी, जालना येथे शेतजमीन आहे. दिनांक 07.12.2011 रोजी त्यांचे पती रामचंद्र दहिगळ मोटर सायकलवरुन जात असताना समोरुन येणा-या बसशी अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला. अर्जदाराने शासनाच्या शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम मिळण्यासाठी दिनांक 13.08.2012 रोजी तालुका कृषी अधिकारी, बदनापूर यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. त्यानंतर ऑगस्ट 2013 मध्ये त्यांना विमा दावा नामंजूर झाल्याचे पत्र आले. अर्जदाराने कायदेशीर नोटीस पाठवून विमा दाव्याचा पुनर्रविचार करण्यासंबंधी विनंती केली. परंतु गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत कोणतीही दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने मंचात तक्रार दाखल करुन विमा रक्कम व्याजासह देण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत दिनांक 08.08.2011 च्या शासन निर्णयाची प्रत, प्रस्ताव, शासनाचे शुध्दिपत्रक, विमा दावा नामंजूर केल्याचे गैरअर्जदार कंपनीचे पत्र, तक्रारदाराने पाठविलेली कायदेशीर नोटीस इत्यादी कागदपत्रे मंचात दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 तालुका कृषी अधिकारी, बदनापूर यांनी मंचामध्ये जावक क्रमांक 3540/14 चे पत्र दाखल केले असून त्यामध्ये सोजरबाई रामचंद्र दहिगळ यांनी ता.बदनापूर येथे दिनांक 13.08.2012 रोजी जनता अपघात विमा प्रस्ताव सादर केल्याचे म्हटले असून दिनांक 09.01.2013 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांना पुढील कार्यवाहीस्तव सादर केल्याचे लिहीले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 डेक्कन इन्शुरन्स व रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांनी पत्र दाखल केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, सदर प्रस्ताव न्यु इंडिया इन्शुरन्स कंपनीने दिनांक 23.07.2013 रोजीच्या पत्रानुसार नाकारलेला आहे व सदर प्रस्तावाची मूळ कागदपत्रे व प्रस्तावाबाबत कोणतीही सुचना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांच्याकडून आजपर्यंत मिळालेली नाही व जोपर्यंत जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयाकडून प्रस्ताव येत नाही तोपर्यंत ते कोणत्याही प्रकारची कार्यवाही करु शकत नाही. त्यांचे कार्य केवळ जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयातून प्राप्त दाव्यांची कागदपत्रे/दस्तऐवज विमा कंपनीस पाठविणे व दाव्याच्या निर्णयासाठी काही कागदपत्रे/दस्तऐवज अपूर्ण असल्यास संबंधित जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालयास कळविणे इतकेच आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी त्यांचा लेखी जवाब दाखल केला आहे. त्यांच्या जवाबानुसार त्यांनी केलेल्या त्रिपक्षीय करारानुसार प्रस्ताव हा डेक्कन इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. या कंपनीकडून आल्यास तो ग्राहय धरला जातो. प्रस्ताव थेट अर्जदाराकडून आल्यास तो विचाराधीन घेता येत नाही. सदरील प्रस्ताव दिनांक 21.12.2012 नंतर म्हणजे विमा कराराच्या मुदतीनंतर प्राप्त झाला असल्यामुळे विमा कंपनीच्या पुणे शाखेने तो नामंजूर करुन त्याची एक प्रत डेक्कन इन्शुरन्स कंपनीला पाठविली आहे व ते योग्य आहे. सदरील दावा मुदतबाह्य असल्यामुळे तो खारीज करण्यात आला आहे.
अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन व सुनावणीवरुन असे दिसुन येते की,
- अर्जदाराचे पती रामचंद्र शिवलाल दहिगळ हे एम.एच.20 एक्स 5571 या मोटार सायकलवरुन दिनांक 07.12.2011 रोजी जात असताना समोरुन येणा-या बस सोबत अपघात होऊन गंभीर जखमी झाले व त्यात त्यांचा मृत्यू झाला असल्याचे घटनास्थळ पंचनामावरुन दिसुन येते. अर्जदाराने इन्क्वेस्ट पंचनामा, पोस्ट मार्टम अहवाल मंचात दाखल केलेला आहे.
- अर्जदाराने दिनांक 13.08.2012 रोजी तालुका कृषी अधिकारी, बदनापूर यांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव दाखल केला. मंचाने नोटीस पाठविल्यानंतर कृषी अधिकारी बदनापूर यांनी पत्र दाखल केले आहे त्या पत्रामध्ये त्यांना प्रस्ताव दिनांक 13.08.2012 रोजी मिळाला असल्याचे म्हटले असून तो प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांच्याकडे पाठविला असल्याचे म्हटले आहे.
- सदरील प्रस्ताव त्रिपक्षीय कराराप्रमाणे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकरी यांनी डेक्कन इन्शुरन्स आणि रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि. यांच्याकडे पाठवून तो नंतर विमा कंपनीकडे पाठविण्यात यायला हवा. परंतु गैरअर्जदार क्रमांक 2 म्हणजेच डेक्कन इन्शुरन्स कंपनीने सदरील प्रस्ताव त्यांना प्राप्त झाला नसल्याचे म्हटले असून गैरअर्जदार क्रमांक 3 म्हणजेच विमा कंपनीचे प्रस्ताव नाकारल्याचे पत्र त्यांना मिळाल्याचे म्हटले आहे. म्हणजेच हा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, बदनापूर यांच्याकडे दाखल झाला परंतु तो जिल्हा कृषी अधिक्षकाकडून डेक्कन इन्शुरन्स कंपनी व त्यांच्याकडून विमा कंपनीस प्राप्त झालेला नाही. परंतु विमा कंपनीने प्रस्ताव नाकारल्याचे पत्र दिले आहे. म्हणजेच तक्रारदाराने त्यांच्याकडे प्रस्ताव दिलेला आहे.
- तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू दिनांक 07.12.2011 रोजी झाला असून तालुका कृषी अधिका-यास प्रस्ताव दिनांक 13.08.2012 रोजी मिळालेला आहे. मा.राष्ट्रीय आयोगाने लक्ष्मीबाई व इतर /वि/ डेप्युटी डायरेक्टर (रिव्हीजन अर्ज क्रमांक 3118-3144/2010) या निवाडया मध्ये 2 वर्षा पर्यंतचा कालावधी ग्राहय मानला आहे. त्यामुळे विलंबाच्या कारणामुळे गैरअर्जदार कंपनी विमा प्रस्ताव नाकारु शकत नाही.
- त्यामुळे अर्जदाराने शासनाच्या प्रपत्र ड मध्ये दर्शविल्याप्रमाणे सर्व कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 3 दि न्यु इंडिया अॅशुरन्स कंपनीकडे प्रस्ताव पाठवावा व गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तो गुणवत्तेवर निकाली काढावा.
आदेश
- अर्जदाराने आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव 30 दिवसात गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे पाठवावा व त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सदरील प्रस्ताव 30 दिवसात गुणवत्तेवर निकाली काढावा.
- खर्चा बाबत आदेश नाहीत.