निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 12/11/2012
तक्रार नोदणी दिनांकः- 26/11/2012
तक्रार निकाल दिनांकः- 09/01/2014
कालावधी 01 वर्ष.01महिना. 14दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
सुवर्णमाला भ्र.बापु गिराम. अर्जदार
वय 21 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.अरुण डी.खापरे.
रा.बोरवंड खु.ता.जि.परभणी.
विरुध्द
1 तालुका कृषी अधिकारी. गैरअर्जदार.
तालुका कृषी कार्यालय, परभणी. ता. जि. परभणी.
2 विभागीय व्यवस्थापक. स्वतः
डेक्कन इन्शुरंन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि.
हारकडे भवन भानुदास नगर, बिग बाजारच्या पाठी मागे,
आकाशवाणी चौक, औरंगाबाद.
3 विभागीय व्यवस्थापक. अॅड.जी.एच.दोडीया.
न्यु इंडीया अॅशुरन्स कं.लि.
विभागीय कार्यालय, क्रं. 153400
सावरकर भवन शिवाजी नगर, कॉंग्रेस हाउस रोड,
पुणे 422005.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा तिच्या मयत पतीचा शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमादावा मंजूर करण्याचे नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराचे मयत पती हे हयात असताना मौजे बोरवंड खु. ता.जि.परभणी येथील गट क्रमांक 125 मधील त्यांच्या मालकीच्या शेतात शेती करत होते, याबद्दल तिच्या मयत पतीचे नावाची नोंद 7/12 उतारा, 6 क, 6 ड या प्रमाणपत्रा वरुन आलेली आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीचा दिनाक 16/06/2011 रोजी काकडे नगर परभणी जवळ रेल्वेने प्रवास करत असतांना रेल्वेतून पडून अपघाती मृत्यू झाला, त्यानंतर संबंधीत पोलीसानी सदर घटनेची माहिती रल्वे स्टेशन मास्टर यांच्या मार्फत कळाल्यानंतर इंन्क्वेस्ट पंचनामा तयार करुन अर्जदाराच्या मयत पतीचे प्रेत पोस्टमार्टेमसाठी सामान्य रुग्णालय परभणी येथे नेले व पोस्टमार्टेम करण्यात आला. सदर अर्जदाराच्या मयत पतीच्या खिशातील चिठ्ठीवरुन डॉ. गिराम व्दारा अर्जदारास सदर घटनेची माहिती मिळाली. अर्जदाराच्या पतीचा रेल्वे अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर अर्जदारास मानसिकत्रास झाला,
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत तिच्या मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे सर्व कागदपत्रांसह दिनांक 19/09/2011 रोजी दाखल केला सदरचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडे 01/10/2011 रोजी सादर केला व त्यांनी तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठविला व सदरचा विमादावा मंजुरीसाठी त्यांनी तो गैरअर्जदार विमा कपंनीकडे पाठविला.
अर्जदाराचे म्हणणे की, सदर विम्या दाव्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 कडे चौकशी केली असता त्यांनी असे सांगीतले की, तुमचा विमादावा मंजुरीसाठी पाठवलेला आहे, अजून विमा कंपनीकडून कांही आलेले नाही, आल्यानंतर कळवु असे म्हंटले.
अर्जदाराचे म्हणणे की, गैरअर्जदार विमा कंपनीने 02/02/2012 च्या पत्राव्दारे अर्जदारास कळविले की, अर्जदाराच्या पतीने दारुच्या नशेत आत्महत्या केल्यामुळे त्यांचे निधने झाले आहे व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे मद्याधुंद अवस्थेत कोणतेही कृत्य केल्यास त्याला विमादावा रक्कम देता येत नाही, असे कळविले. व अर्जदाराचा विमादावा नाकारला.
अर्जदाराचे म्हणणे की, विमा कंपनीचे सदरचे कारण एकदम चुकीचे आहे. विमा कंपनीने अर्जदारास सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा अर्ज मंजूर करुन गैरअर्जदाराना असा आदेश करावा की, त्यांनी अर्जदाराला 1 लाख रु. मृत्यू तारखे पासून द.सा.द.शे. 18 टक्के प्रमाणे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत द्यावेत. तसेच गैरअर्जदारांना असा आदेश करावा की, मानसिक त्रासापोटी 25,000/- रु. व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- देण्याचा आदेश करावा.
अर्जदाराने तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केलेले आहे.
अर्जदाराने नि.क्रमांक 4 वर 27 कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये विमा कंपनीचे पत्र, तालुका कृषी अधीकारी यांचे पत्र, तपासाचे कागदपत्र, अकस्मात मृत्यू रिपोर्ट, अकस्मात मृत्यू खबर, स्टेशन मास्टर यांचे पत्र, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, शवफॉर्म, वरीष्ठांचे तपास आदेश, पोस्टमार्टेम करणे बाबत पत्र, पोस्टमार्टेम रिपोर्ट, प्रेत पोच पावती, मयताचे फोटो, मयताच्या खिशातील चिठ्ठी, वारसाचे रहिवाशी प्रमाणपत्र, क्लेमफॉर्मची कागदपत्रे, गाव नमुना नं. 6 क, 7/12 उतारा, गाव नमुना नं. 8 (अ), बँकेचे पासबुक, मृत्यू प्रमाणपत्र, फेरफार वारसा प्रमाणपत्र, इ. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदाराना नोटीसा काढण्यात आल्या.
गैरअर्जदार क्रमांक 1 यास मंचाची नोटीस तामील होवुनही
मंचासमोर हजर नाहीत, ( नि.क्रमांक 10 पोचपावती ) त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 विरुध्द एकतर्फा आदेश आरीत करण्यात आला.
गैरअर्जदार क्रमांक 2 मंचासमोर हजर व नि.क्रमांक 13 वर आपला लेखी जबाब सादर केला व त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, आमची संस्था ही विनियामक आणि विकास प्राधीकरण मान्यता प्राप्त विमा सेवा देणारी संस्था आहे. आमच्या अशीलास विमा सेवा पुरविणे आणि विमा कंपनी आणि आमचे आशील यांचेत मध्यस्थ म्हणून काम करणे एवढेच मर्यादित काम आमची संस्था करते, अर्जदाराने आमच्या विरुध्द दाखल केलेली तक्रार हि अपु-या माहितीवर गैरसमजाने आणि चुकीने केलेली आहे. या नेमणुकीसाठी आम्ही महाराष्ट्र शासनाकडून कोणत्याही प्रकारची फिस अथवा आर्थिक मदत घेतलेली नाही, सदर दाव्यातून आम्हांस मुक्त करावे असे म्हणणे आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 याने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 13/1 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 वकीला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 14 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावटी आहे. अर्जदार हा आमचा ग्राहक नाही, त्याने विम्या हप्त्यापोटी रक्कम देखील आमच्या विमा कंपनीकडे भरलेली नाही, म्हणून तो आमचा ग्राहक होत नाही व Consumer Protection Act प्रमाणे सदरची तक्रार विद्यमान मंचासमोर चालु शकत नाही, व ती खारीज होणे योग्य आहे. व Triparte करारा प्रमाणे शेतकरी विमा कंपनी विरुध्द सदरची तक्रार दाखल करु शकत नाही, व आमच्या विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. व तसेच विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, अर्जदाराचा विमादावा त्यांचेकडे प्राप्त झाल्यानंतर सर्व कागदपत्राची पहाणी केल्यानंतर असे निदर्शनास आले की, अर्जदाराच्या मयत पतीने आत्महत्या दारुच्या नशेत केली आहे व पॉलिसीच्या Exclusion Clause मध्ये असे लिहिले आहे की, व्यक्तीने आत्महत्या किंवा आत्महत्याचा प्रयत्न केल्यास पॉलिसीच्या अंतर्गत त्याला लाभ देता येणार नाही. गैरअर्जदार विमा कंपनीचे हे म्हणणे आहे की, दारुच्या किंवा Drugs च्या नशेत माणुस मेला तर त्याला पॉलिसी कव्हर होत नाही, व तसेच त्यांचे म्हणणे आहे की, संबंधीत पोलीसांनी घटनेची संपुर्ण चौकशी करुन तालुका दंडाधिका-यां समोर अंतीम अहवाल सादर केला. व सदरचे कागदपत्र हे Public Document आहे व सदरचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीने दिनांक 02/02/2012 रोजी अर्जदाराचा विमादावा योग्य त्या कारणास्तव नाकारला आहे. म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी. अशी मंचास विनंती केली आहे.
गैअरर्जदार विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
गैरअर्जदार विमा कंपनीने नि.क्रमांक 18 वर 3 कागदपत्रे दाखल केली आहेत,ज्यामध्ये पोलीसांचा अंतीम अहवालाची प्रत, Repudiation Letter, व पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने अर्जदाराच्या मयत
मयत पतीचा अपघात विमादावा देण्याचे नाकारुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे मयत पती नामे बापु त्र्यंबकराव गिराम शेतकरी अपघात विमा योजनेचे लाभार्थी होते ही, बाब नि. क्रमांक 4/21 वरील गांव नमुना सहा (क) व नि.क्रमांक 4/22 वरील 7/12 उतारा व नि.क्रमांक 4/24 वरील गाव नमुना नं. 8 (अ) च्या रेव्हेन्यु रेकॉर्ड वरुन सिध्द होते. अर्जदाराच्या पतीचा दिनांक 16/06/2011 रोजी काकडे नगर परभणी जवळ रेल्वेच्या पटरीखाली सापडून अपघाती मृत्यू झाला होता, ही बाब नि.क्रमांक 4/4 वरील अकस्मात मृत्यू रिपोर्ट वरुन व 4/7 वरील घटनास्थळ पंचनाम्यावर दिसून येते.
अर्जदार ही मयत बापु त्र्यंबकराव गिराम यांची पत्नी वारस आहे, ही बाब नि.क्रमांक 4/19 वरील क्लेमफॉर्म भाग -2 च्या तलाठ्यानी दिलेल्या प्रमाणपत्रावरुन सिध्द होते.
अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत पतीचा विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे कागदपत्रांसह दाखल केला होता ही बाब नि.क्रमांक 4/17 वरील क्लेमफॉर्म – भाग 1 च्या कागदपत्रावरुन सिध्द होते, व तो विमादावा गैरअर्जदार क्रमांक 1 ने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे पाठवला होता ही बाब नि.क्रमाकं 4/16 वर दाखल केलेल्या क्लेमफॉर्म भाग – 3 वरुन सिध्द होते. अर्जदाराचा सदर विमादावा गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने दिनांक 02/02/2012 रोजीच्या अर्जदारास पत्र पाठवुन अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला होता व नामंजूर करण्याचे कारण “ अर्जदाराचे मयत पती बापू गिराम यांनी दारुच्यानशेत आत्महत्या केल्यामुळे व पॉलिसी प्रमाणे मद्यधुंद अवस्थेत विमा धारकाने कोणतेही कृत्य केल्यास दावा रक्कम देता येत नाही ” लिहून अर्जदाराचा विमादावा नाकारला ही बाब नि. क्रमांक 4/1 वर दाखल केलेल्या Repudiation Letter वरुन सिध्द होते.
गैरअर्जदार विमा कंपनीचे सदर नाकारल्याचे कारण मंचास योग्य वाटत नाही, कारण गैरअर्जदार विमा कंपनीने केवळ पोलीसांच्या अंतीम अहवाला वरुन हा निष्कर्ष काढला आहे. व सदर अंतीम अहवालाचे ( नि.क्रमांक 18/1 वर दाखल केलेल्या अवलोकन केले असता तपासाच्या वेळी मानीक गिराम याने असे सांगीतले की, मयतास दारु पिण्याची सवय होती व त्याने आत्महत्या केली केवळ सदर व्यक्तीच्या सांगण्यावरुन मयताने दारुच्या नशेत आत्महत्या केली असे म्हणणे योग्य ठरणार नाही, असे मंचाचे ठाम मत आहे.
सदर अर्जदाराच्या मयताचे पोस्टमार्टेम रिपोर्ट ( नि.क्रमांक 4/11) चे अवलोकन केले असता मयताने दारु पिली होती, असे कोठेही आलेले नाही म्हणून विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा केवळ पोलीसाचा अंतीम अहवाल ग्राहय धरुन अर्जदाराचा विमादावा नाकारला असे दिसून येते. याबाबत मा. राज्य आयोग छत्तीसगढ रायपूर यांनी 2011 (4) CPR 165 Oriental Insurance Company Ltd. V/s Chamar Singh Valdekar And Anr. F.A.No. 646/2010 मध्ये असे म्हंटले आहे की, There can be no presumption of suicide by a normal person.
गैरअर्जदार विमा कंपनीने मयत बापु गिराम यांनी मृत्यूवेळी दारु पिली होती व आत्महत्या केली असा कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही.
मुळातच राज्यातील सर्व खातेदार शेतक-यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे घेतलेल्या शेतकरी विमा पॉलीसीचा खर्च लाभार्थी शेतक-यांचा अकस्मात अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटूबांला आर्थिक हातभार मिळावा व कुटूंबावर उपासमारीची पाळी येवू नये या उदात्त हेतूने शेतकरी विम्याची कल्याणकारी योजना राबविली गेली आहे. असे असतानाही विमा कंपनीने क्लेम मुदतीत दाखल केला नाही, हे तांत्रीक कारण दाखवून अर्जदाराचा क्लेम बेकायदेशीररित्या नाकारुन निश्चीतपणे सेवा त्रूटी केली आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो. क्लेम उशीरा दाखल केला म्हणून विमा कंपनीस पॉलीसी हमी प्रमाणे मयताच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई देण्याचे विमा कंपनीला मुळीच टाळता येणार नाही.
गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा अयोग्य कारण दाखवून नामंजूर करुन निश्चितच अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे मत आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 विमा कंपनीने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत
विमा रक्कम आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत अर्जदारास रु.1,00,000/-
फक्त ( अक्षरी रु. एकलाख फक्त ) द्यावेत.
3 गैरअर्जदाराने तक्रार अर्ज खर्चापोटी अर्जदारास रु. 1,000/- फक्त ( अक्षरी रु.
एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावेत.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.