(आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक) 1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम प्राप्त करण्यासाठी दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्ती क्रमांक 1 चे पती मयत श्री. सुखदेव नामदेव जिभकाटे हे मौजा विरली (खंदार), ता. पवनी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून ते तक्रारकर्ते क्रमांक 2 ते 5 चे वडील आहेत. दिनांक 05/08/2009 रोजी मयत सुखदेव जिभकाटे हे विरली (खंदार) येथील गाव तलावात त्यांच्या मालकीच्या म्हशी तलावातील पाण्यात बसल्या होत्या म्हणून त्या म्हशींना तलावातून बाहेर काढण्यासाठी गेले असता पाय घसरून त्यांचा पाण्यात तोल गेला व ते पाण्यात पडले. गावक-यांनी त्यांना तलावाच्या बाहेर काढले व ग्रामीण रूग्णालय अड्याळ येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सदर घटनेसंबंधात पोलीस स्टेशन, अड्याळ, ता. पवनी, जिल्हा भंडारा येथे तक्रार नोंदविण्यात आली. त्यानुसार अपराध क्रमांक 25/09 कलम 174 अन्वये गुन्हा दर्ज करून घटनास्थळाचा पंचनामा, मृतकाचे शवविच्छेदन इत्यादी करण्यात आले. 3. श्री. सुखदेव जिभकाटे हे शेतकरी असून त्यांच्या मालकीची मौजा विरली (खंदार), त.सा.क्रमांक 5, तह. पवनी, जिल्हा भंडारा येथे सर्व्हे नंबर 413/2 ब, आराजी 0.30 हे.आर. शेतजमीन होती. त्यांच्या मृत्यु पश्चात ती शेतजमीन महसूल रेकॉर्डला तक्रारकर्त्यांच्या नावाने लागली. तक्रारकर्ता क्रमांक 1 हिने तिच्या पतीच्या अपघाती मृत्युमुळे मिळण्यात येणारा शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रांसहित अर्ज विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे सादर केला. त्यानंतर तक्रारकर्तीने विरूध्द पक्ष क्रमांक 2 तहसीलदार, पवनी यांच्याकडे दिनांक 22/12/2009 रोजी चौकशी केली असता तिला असे कळले की, विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांच्याकडे प्रस्ताव पाठविला नाही. त्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 2 यांनी विरूध्द पक्ष क्रमांक 1 यांना दिनांक 23/12/2009 ला पत्र देऊन तक्रारकर्तीच्या विमा प्रस्तावासह दिनांक 24/12/2009 रोजी कार्यालयास हजर राहण्याचे निर्देशित केले. विरूध्द पक्ष क्रमांक 3 यांनी तक्रारकर्तीचा अर्ज कागदपत्रासहित विरूध्द पक्ष क्रमांक 4 यांच्याकडे दिनांक 10/02/2010 ला सादर केला व त्यांनी तो विरूध्द पक्ष क्रमांक 5 यांच्याकडे दिनांक 11/02/2010 रोजी सादर केला. 4. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, तिने विम्याचा प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 1 कडे विहित कालावधीत सादर करून देखील तिला विम्याचा लाभ प्राप्त झाला नाही. त्यामुळे तिने अॅड. नंदागवळी यांच्यामार्फत दिनांक 06/11/2010 रोजी विरूध्द पक्ष यांना नोटीस बजावली. विरूध्द पक्ष 1, 4, 5 व 6 यांना नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी त्यास उत्तर दिले नाही तर विरूध्द पक्ष 2 यांनी उत्तर दिले. विरूध्द पक्ष 2 यांनी उत्तरामध्ये दिनांक 10/02/2010 रोजी विमा प्रस्ताव पुढील कायर्वाहीस्तव विरूध्द पक्ष क्रमांक 4 यांच्याकडे सादर केला असे कळविले. तक्रारकर्तीचे म्हणणे आहे की, तिच्या विमा प्रस्तावाबाबत विरूध्द पक्ष यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही अथवा तिला विम्याची रक्कमही प्राप्त झाली नाही. ही विरूध्द पक्ष यांची कृती त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. त्यामुळे तक्रारकर्तीस शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला म्हणून तक्रारकर्तीने मंचासमोर सदर तक्रार दाखल केली आहे. 5. तक्रारकर्तीने आपल्या तक्रारीत शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम रू. 1,00,000/- ही 15% व्याजासह मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई आणि तक्रारीच्या खर्च मिळावा अशीही मागणी केली आहे. आपल्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्तीने दस्तऐवज दाखल करण्याच्या यादीप्रमाणे एकूण 32 दस्तऐवज दाखल केले आहेत. 5. मंचाची नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी आपले लेखी उत्तर दाखल केले आहे. 6. विरूध्द पक्ष 1 तलाठी, विरली (खंदार) यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ती हिने दाखल केलेल्या तक्रार अर्जामध्ये तिला सदर तक्रार दाखल करण्याकरिता कारण घडलेले आहे याबाबतचा उल्लेख केलेला नाही तसेच विमा कंपनीद्वारे नुकसानभरपाईचा अर्ज काही संयुक्तिक कारणवश नाकारलेला आहे याबाबत कारणमिमांसा न केल्यामुळे तक्रारकर्तीचा अर्ज खारीज करण्याची विनंती केलेली आहे. 7. विरूध्द पक्ष 1 चे पुढे असेही म्हणणे आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची अंमलबजावणी व विमा योजनेअंतर्गत होणा-या अपघाती नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी ही दिनांक 06/09/2008 च्या परिपत्रकानुसार कृषी विभागाची असून महसूल खात्याला सदर योजनेची प्रसिध्दी, योजनेसंबंधी माहिती व अर्जाचा नमूना पुरविणे तसेच अर्जदारास वारसान म्हणून लागणारे उतारे व तलाठी प्रमाणपत्र उपलब्ध करून देणे यापूरती मर्यादित आहे. दिनांक 17/09/2009 ला तक्रारकर्ती ही विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे आली असता त्यांनी मृतकाचा अपघाती विमा आहे व त्याअन्वये रू. 1,00,000/- नुकसानभरपाई मिळू शकते यासंबंधात तिला माहिती दिली होती. शासनाच्या दिनांक 06/09/2008 च्या परिपत्रकानुसार विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे अपघाती विम्याची नुकसानभरपाई मिळण्याच्या अनुषंगाने सात/बारा उतारा, गाव नमुना 8 उपलब्ध करून देणे तसेच दावा अर्ज वगैरे भरून देणे एवढीच जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. विरूध्द पक्ष 1 यांनी त्यांची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली असे त्यांचे म्हणणे आहे. 8. विरूध्द पक्ष 2 चे म्हणणे आहे की, अर्जदाराने आवश्यक कागदपत्र प्राप्त करून घेण्याकरिता तलाठी कार्यालयास अर्ज सादर केला. तलाठी यांनी अपघात विम्याच्या संपूर्ण कागदपत्रांसह प्रस्ताव अर्जदारास परत केला व अर्जदाराने संपूर्ण प्रस्ताव मंडळ कृषी अधिकारी, कोंढा यांचेमार्फत तालुका कृषी अधिकारी, पवनी यांना दिनांक 22/01/2010 रोजी सादर केला. त्यांनी माननीय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा यांना दिनांक 10/02/2010 रोजी पुढील कार्यवाहीस्तव सादर केला. 9. विरूध्द पक्ष 3 चे म्हणणे आहे की, तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास दिनांक 22/01/2010 रोजी प्राप्त झालेला असून हा प्रस्ताव माननीय जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, भंडारा म्हणजेच विरूध्द पक्ष 4 यांच्या कार्यालयास त्यांचे कार्यालयीन पत्र क्रमांकः शेअवि/196/2010, दिनांक 10/02/2010 रोजी पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आलेला आहे. विरूध्द पक्ष 3 चे पुढे असेही म्हणणे आहे की, त्यांच्या कार्यालयास तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव मुळातच उशीरा प्राप्त झाल्यामुळे त्यांनी दिनांक 10/02/2010 रोजी वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविला. त्यामुळे त्यांच्या कार्यालयाकडून कोणत्याही प्रकारची दिरंगाई झालेली नाही. विरूध्द पक्ष्ा 3 यांनी त्यांनी दाखल केलेले उत्तर हाच त्यांचा युक्तिवाद समजण्यात यावा असे त्यांच्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. 10. विरूध्द पक्ष 4 चे म्हणणे आहे की, त्यांच्या कार्यालयास विमा प्रस्ताव दिनांक 25/02/2010 रोजी प्राप्त झाला. कागदपत्रे कमी असल्याने पूर्ततेसाठी विलंब झाला. दिनांक 03/05/2010 ला विरूध्द पक्ष 5 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांना प्रस्ताव सादर केला असता त्यांच्या भंडारा येथील प्रतिनिधीने मागील कालखंडाचा प्रस्ताव असल्याचे दर्शवून प्रस्ताव स्विकारला नाही असे कारण नमूद केले असल्याने सदर विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी, पवनी यांच्यामार्फत परत करण्यात आला. विरूध्द पक्ष 4 यांच्या कार्यालयाने सदरील प्रस्तावाबाबत कर्तव्य व जबाबदारी मध्ये कोणतीही कसूर केलेली नाही असे त्यांचे म्हणणे आहे. विरूध्द पक्ष 4 यांनी प्रस्ताव परत आल्याचे पत्र तसेच कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर यांच्याकडे प्रस्ताव पाठविल्याचे पत्र दाखल केलेले आहे. 11. विरूध्द पक्ष 5 यांचे लेखी उत्तर मंचास कुरिअरद्वारे प्राप्त झालेले आहे. विरूध्द पक्ष 5 यांचे म्हणणे आहे की, मयत सुखदेव जिभकाटे यांचा अपघात दिनांक 05/08/2009 रोजी झाला व सदरील विमा प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास प्राप्त न झाल्याने ते या प्रस्तावाबाबत काहीही सांगण्यास असमर्थ आहेत. 12. विरूध्द पक्ष 6 चे म्हणणे आहे की, शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष 5 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड हे अभिकर्ता म्हणून काम करतात व त्यांच्या मार्फतच प्रस्ताव हा विरूध्द पक्ष 6 विमा कंपनीकडे संपूर्ण कागदपत्रांची पडताळणी करून पाठविला जातो व त्यानंतरच विमा कंपनी दावा मंजूर करावयाचा किंवा नाही याबाबत निर्णय घेत असते. प्रस्तुत प्रकरणात विरूध्द पक्ष 5 कडून विमा प्रस्ताव विरूध्द पक्ष 6 यांना प्राप्तच झालेला नाही त्यामुळे विरूध्द पक्ष 6 हे त्याबाबत निर्णय घेऊ शकले नाहीत. विरूध्द पक्ष 6 यांचे पुढे असेही म्हणणे आहे की, तक्रारकर्तीची तक्रार ही अपरिपक्व आहे. विरूध्द पक्ष 6 यांच्या सेवेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नसल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रारकर्तीची प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात यावी अशी त्यांनी विनंती केलेली आहे. विरूध्द पक्ष 6 यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेचा शासन निर्णय व त्रिपक्षीय करारनामा दाखल केलेला आहे. विरूध्द पक्ष 6 यांनी त्यांचा लेखी युक्तिवाद देखील दाखल केलेला आहे. 13. तक्रारकर्तीची तक्रार व त्यासोबत दाखल केलेले दस्तऐवज, विरूध्द पक्ष यांचे लेखी उत्तर व दाखल दस्तऐवज तसेच तक्रारकर्तीच्या वकिलांचा व विरूध्द पक्ष 6 यांचे वकीलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? -ः कारणमिमांसा ः- 14. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 05/08/2009 ला झालेला आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांनी दाखल केलेल्या शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेच्या परिपत्रकानुसार योजनेचा कालावधी दिनांक 15/08/2008 ते 14/08/2009 या एक वर्षाच्या कालावधीकरिता लागू करण्यात आलेला होता. सदर विमा योजनेमध्ये पृष्ठ क्रमांक 9 वर विमा कंपनीची योजनेची अंमलबजावणी, कार्यपध्दती, कर्तव्य व जबाबदारी नमूद केलेली आहे. ज्यामध्ये 3.3 मध्ये शेतक-याचा विमा प्रस्ताव विहित कागदपत्रांसह विमा योजनेच्या कालावधीत कधीही प्राप्त झाला तरी तो विचारात घेणे विमा कंपनीला बंधनकारक राहील, अखेरच्या दिवसात झालेल्या अपघातासाठी योजनेचा कालावधी संपल्यापासून 90 दिवसापर्यंत विमा प्रस्ताव स्विकारण्यात येतील, समर्थनीय कारणास्तव 90 दिवसानंतर प्राप्त दावे स्विकारण्यात यावेत तथापि अपघाताचे सूचनापत्र विमा कालावधी संपल्यानंतर 90 दिवसापर्यंत घेणे बंधनकारक राहील व त्यानुसार सविस्तर प्रस्तावावर कार्यवाही करणे कंपनीस बंधनकारक राहील असे नमूद करण्यात आलेले आहे. 15. सदर प्रकरणात तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु हा दिनांक 05/08/2009 ला झाला असून योजनेचा कालावधी हा दिनांक 14/08/2009 ला संपतो. तक्रारकर्तीच्या तक्रारीमध्ये तिने विरूध्द पक्ष 1 यांच्याकडे 90 दिवसांच्या आंतमध्येच प्रस्ताव सादर केलेला आहे असे नमूद केलेले आहे. विरूध्द पक्ष 1 च्या लेखी उत्तरामध्ये त्यांनी नमूद केले आहे की, दिनांक 02/10/2009 ला त्यांनी तक्रारकर्तीस 7/12 उतारा, गाव नमुना 8-अ हे उपलब्ध करून दिले. तक्रारकर्तीच्या पतीचा मृत्यु झाल्यानंतर तिने त्याबाबतची सूचना विरूध्द पक्ष यांना दिली होती असे तिने आपल्या तक्रारीत नमूद केलेले आहे. विरूध्द पक्ष 3 यांच्याकडून प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 4 यांच्या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या प्रतिनिधी सौ. प्रेमलता तरारे यांनी दिनांक 03/05/2010 ला विरूध्द पक्ष 4 यांना प्रस्ताव परत केला. तर विरूध्द पक्ष क्रमांक 5 चे म्हणणे आहे की, प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास प्राप्तच झाला नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 5 च्या प्रतिनिधीने तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव परस्पर परत केल्यानंतर तो प्रस्ताव विरूध्द पक्ष क्रमांक 5 यांच्या कार्यालयास प्राप्त होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरूध्द पक्ष क्रमांक 5 यांनी त्यांच्या भंडारा येथील प्रतिनिधीद्वारे त्यांच्या कार्यालयास प्रस्ताव प्राप्त झाला किंवा नाही याबाबत शहानिशा न करता सदर प्रस्ताव त्यांच्या कार्यालयास प्राप्त झाला नाही असे मोघम कारण आपल्या लेखी उत्तरात नमूद केलेले आहे. विरूध्द पक्ष क्रमांक 5 यांच्या कार्यालयाने विमा प्रस्ताव परस्पर परत केल्यामुळे विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांच्या कार्यालयास विमा प्रस्ताव प्राप्त झाला नाही हे विरूध्द पक्ष क्रमांक 6 चे म्हणणे मंचास ग्राह्य वाटते. 16. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम देण्याची जबाबदारी अंतिमतः ही विमा कंपनी म्हणजेच विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांचीच असल्यामुळे त्यांच्या कार्यालयास परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त होणे आवश्यक आहे. युक्तिवादा दरम्यान विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, जर त्यांच्या कार्यालयास यंत्रणेमार्फत विमा प्रस्ताव प्राप्त झाला तर ते आजही त्या प्रस्तावाबाबत विचार करू शकतात. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना ही शेतक-यांचा नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यु झाल्यास अथवा घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होत असल्याने अशा अपघातग्रस्त शेतक-यास अथवा त्याच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता कोणतीही स्वतंत्र विमा योजना नसल्यामुळे शासनाने सदर योजना कार्यान्वित केलेली आहे. त्यामुळे सदर योजनेचा लाभ तक्रारकर्तीस मिळणे अनिवार्य असल्यामुळे तक्रारकर्तीचा विमा प्रस्ताव संपूर्ण कागदपत्रांसह परिपूर्ण करून पुन्हा विरूध्द पक्ष क्रमांक 5 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांच्या कार्यालयास विरूध्द पक्ष क्रमांक 4 यांनी सादर करावा व विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांनी योजनेचे स्वरूप लक्षात घेता त्याबाबत योग्य निर्णय घ्यावा असे मंचाचे स्पष्ट मत आहे. करिता आदेश. आदेश तक्रारकर्त्यांची तक्रार निकाली काढण्यात येते. 1. विरूध्द पक्ष क्रमांक 4 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यांचा परिपूर्ण विमा प्रस्ताव आदेश प्राप्त झाल्यापासून 30 दिवसांच्या आंत विरूध्द पक्ष क्रमांक 5 मार्फत विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांच्याकडे सादर करावा. 2. सदर परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष क्रमांक 6 यांनी त्यावर त्यापुढील 30 दिवसांचे आंत उचित निर्णय घ्यावा. 3. खर्चाबाबत आदेश नाही.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |