जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 25/2012 तक्रार दाखल तारीख – 15/02/2012
तक्रार निकाल तारीख– 17/04/2013
निर्मला भ्र.विष्णू ढगे
वय 50 वर्षे, धंदा शेती,
रा.केज ता.केज जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1) तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय, केज
ता.केज जि.बीड.
2) विभागीय व्यवस्थापक,
डेक्कन इन्शुरन्स व रिइन्शुरन्स ब्रोकर्स प्रा.लि.
फरकडे बिल्डींग, बिग बझारच्या मागे,
भानुदास नगर, आकाशवाणी चौक,
औरंगाबाद ता.जि.औरंगाबाद. ...गैरअर्जदार
3) व्यवस्थापक,
दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.
अप्पा बळंवत चौक, पुणे
नोटीस बजावणीसाठी पत्ता
व्यवस्थापक,
दि न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी लि.
अण्णाभाऊ साठे चौक,जालना रोड.बीड.ता.जि.बीड.
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.एस.आर.राजपूत
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – स्वतः
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.3 तर्फे - अँड. एस.एल.वाघमारे
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदाराचे पती विष्णू अण्णा ढगे यांना दि.26.11.2010 रोजी शेतावर कापसाचे पिकावर फवारणीचे औषध नाक व तोडांत गेल्याने विषबाधा झाली. त्यांचा दि.19.12.2010 रोजी मृत्यू झाला. शासनाने दि.15.8.2010 ते दि.14.08.2011 या कालावधीसाठी शेतक-यांचा विमा काढलेला आहे. सदरचे विमा रक्कम मिळणेसाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्जदाराने दि.17.02.2011 रोजीला दावा दाखल केला. दि.07.07.2011 रोजी गैरअर्जदार क्र.3 यांनी व्हिसेरा रिपोर्ट नसल्यामुळे दावा रक्कम देता येणार नाही असे सांगितले व दि.04.10.2011 रोजी सदर प्रकरण आत्महत्या असल्याकारणाने विमा रक्कम देता येणार नाही असे कळवले. म्हणून तक्रारदाराची तक्रार आहे. तिने आपल्या तक्रारीसोबत मयताचा 8-अ, 7/12 चा उतारा, मृत्यू प्रमाणपत्र, शवविच्छेदन अहवाल, आकस्मात मृत्यू अहवाल, घटनास्थळ पंचनामा, विमा दावा नाकारल्याचे पत्र इत्यादी गोष्टी दाखल केल्या व शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- मात्र एवढी मागणी केली आहे.
गैरअर्जदार क्र.1 तालुका कृषी अधिकारी, केज व गैरअर्जदार क्र.3 न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी हे मंचासमोर हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 हे डेक्कन इन्शुरन्स कंपनी मंचासमोर गैरहजर असल्याने त्यांचें विरुध्द तक्रार एकतर्फा चालली.
गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या लेखी जवाबाबत म्हटले की, त्यांनी अर्जदाराकडून मिळालेल्या सर्व कागदपत्रांसह विमा दावा गैरअर्जदार क्र.2 मार्फत गैरअर्जदार क्र.3 यांचे कडे मुदतीत पाठवलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्र.3 यांनी आपल्या लेखी जवाबात म्हटले आहे की, सकृतदर्शनी असे दिसते की, मयताचा मृत्यू अपघाती नसून आत्महत्या आहे. शवविच्छेदन अहवालात “ विषबाधेचा संशय पण रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल येईपर्यत अंतिम मत राखून ठेवत आहोत.” असे नमूद केले आहे. तक्रारदाराला स्मरणपत्र पाठवून देखील त्याने व्हिसेरा अहवाल गैरअर्जदारांकडे दाखल केला नाही. विम्यातील अटीप्रमाणे व शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे विमाधारकाचा मृत्यू ही आत्महत्या असेल तर विमा रक्कम देता येत नाही म्हणून तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी.
तक्रारदारातर्फे विद्वान वकील श्री. राजपूत व गैरअर्जदार क्र.3 तर्फे विद्वान वकील श्री.वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले की, फिर्यादीमध्ये व मृत्यू प्रमाणपत्रामध्ये विषारी औषधाची फवारणी करण्यासाठी झाकण उघडत असताना औषध नाका-तोंडात जावून विषबाधा झाली असा स्पष्ट उल्लेख आहे. शवविच्छेदन अहवालात देखील “ विषबाधेचा संशय “ असेच मृत्यूचे कारण दिले आहे. प्रयत्न करुन देखील तक्रारदाराला व्हिसेरा रिपोर्ट मिळू शकलेला नाही तरी तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात यावी.
गैरअर्जदारांच्या वकिलांनी त्यांच्या युक्तीवादात मयताचा मृत्यू हा अपघाती नसून ती आत्महत्या आहे या मुददयावर भर दिला. त्यांनी युक्तीवादा दरम्यान “ जनता पर्सनल अँक्सिडेंट इन्शुरन्स पॉलिसी ” ची प्रत दाखल केली व त्यातील कलम 4 (a) कडे मंचाचे लक्ष वेधले. ज्यामध्ये मयताचा मृत्यू अथवा अपंगत्व स्वतःला जाणीवपूर्वक जखमी केल्याने असेल, आत्महत्या व आत्महत्येचा प्रयत्न असेल तर विमा कंपनी विमा रक्कम देण्यास जबाबदार नाही अशी तरतुद आहे. शेवटी त्यांनी तक्रारदाराची तक्रार खारीज करावी अशी विनंती केली आहे.
वरील विवेचनावरुन खालील मुददे मंचाने विचारात घेतले.
मूददे उत्तर
1. तक्रारदाराने मयताचा मृत्यू अपघाती आहे हे सिध्द
केले आहे का ? नाही.
2. तक्रारदार ही शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत
विमा रक्कमेस पात्र आहे का ? नाही.
3. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः-
तक्रारदाराने दाखल केलेल्या फिर्यादीत औषधाचे झाकण उघडत असताना नाका तोंडात विषारी औषध गेल्यामुळे विषबाधा झाली असे म्हटले आहे. परंतु या गोष्टीला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही. घटनास्थळ पंचनामा दि.23.12.2010 रोजी म्हणजे ब-याच उशीराने केला आहे. त्या पंचनाम्यात काहीही जप्त केल्याचा उल्लेख नाही. घटना दि.26.11.2010 रोजी झाली व मयताचा मृत्यू
दि.19.12.2010 रोजी झाला. या मधल्या कालावधीत मयताचा जवाब किंवा त्यांला औषधोपचार करणा-या डॉक्टरांचा जवाब यापैकी काहीही दाखल नाही. शवविच्छेदन अहवालात “ रासायनिक प्रयोगशाळेचा अहवाल आवश्यक व्हिसेरा घेतला आहे ” अशी नोंद आहे. व्हिसेरा रिपोर्ट मिळालेला नाही. अशा परिस्थितीत मयताचा मृत्यू अपघाती आहे हे तक्रारदार सिध्द करु शकली नाही असे मंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
2. खर्चाबददल काहीही आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड