(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 05/04/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द मंचात दिनांक 07.12.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडून दि.10.07.2010 रोजी होंडा कंपनीचे दुचाकी वाहन ‘डिओ डिलक्स’ बुक केले होते व त्याकरीता रु.1,000/- गैरअर्जदारांकडे जमा केले. तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, तिला दि.10.10.2010 ला सदर वाहन देण्याचे गैरअर्जदारांनी मान्य केले होते. तसेच तक्रारकर्तीने पुढे असेही नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी दि.20.10.2010 रोजी नक्की वाहनाची डिलीव्हरी देण्यांचे मान्य केले होते व उर्वरित रक्कम रु. 46,563/- घेऊन बोलवले होते. ते भरण्यांस सांगितले त्यानुसार तक्रारकर्तीने दि.26.12.2010 रोजी 46,563/- गैरअर्जदारांकडे जमा केले तसेच तक्रारकर्तीने नमुद केले आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीला 1, नोव्हेंबर-2010 ला ‘डिओ डिलक्स’ गाडी घेऊन जाण्याकरीता बोलावले, परंतु अजुन पर्यंत सदर गाडी दिलेली नाही, ही त्यांचे सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचात दाखल केली असुन गाडीची भरलेली संपूर्ण रक्कम परत मागितली असुन शारीरिक, मानसिक त्रासाकरीता रु.25,000/-, नोटीसच्या खर्चाकरीता रु.1,000/-, वकील फी व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.4,000/- व गाडीचे नोंदणी शुल्क रु.1,000/- परत मिळण्याबाबत मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना बजावण्यांत आली असता त्यांनी सदर तक्रारीला आपले उत्तर दाखल केलेले आहे ते खालिल प्रमाणे ... गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्तीने दि.10.10.2010 पर्यंत गाडीची संपूर्ण रक्कम न भरल्यामुळे तिला गाडीची डिलीव्हरी देण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. तसेच तक्रारकर्तीने स्वइच्छेने दि.26.10.2010 रोजी गाडीची रक्कम गैरअर्जदारांकडे जमा केली व त्यानुसार दि.03.11.2010 पर्यंत गाडी देण्याची शक्यता वर्तविली होती. गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीची इतर सर्व म्हणणे नाकारले असुन सदर तक्रार खारिज करण्यांची मंचास विनंती केलेली आहे. 4. सदर तक्रार मंचासमक्ष मौखीक युक्तिवादाकरीता दि.24.03.2011 रोजी आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीलामार्फत ऐकला. तसेच मंचासमक्ष दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 5. तक्रारकर्तीने गैरअर्जदारांकडे होंडा मोटरसायकल व स्कुटर इंडिया प्रा.लि. ची ‘डिओ डिलक्स’ ही गाडी खरेदी करण्याकरीता रु.1,000/- जमा केले होते, ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होते. 6. तक्रारकर्तीने तक्रारीत नमुद केले आहे की, तिला दि.10.10.2010 रोजी गाडीची डिलीव्हरी गैरअर्जदार देणार होते, परंतु तक्ररकर्तीने तक्रारीत नमुद केल्यानुसार, तिने दि.26.10.2010 रोजी गैरअर्जदारांकडे गाडीची रक्कम जमा केली आहे, यावरुन तक्रारकर्तीचे तक्रारीतील कथन अस्पष्ट असुन परस्पर विरोधी आहे. या उलट गैरअर्जदारांनी आपल्या उत्तरासोबत नागपूर महानगर पालिकेच्या ऑक्ट्राय नाक्याची रशिद दाखल केलेली आहे. त्यानुसार सदर गाडी ही गैरअर्जदारांकडे दि.10.11.2010 रोजी आल्याचे स्पष्ट होते. सदर प्रकरणामधे गैरअर्जदारांचा सत्कृत दर्शनी असा कोणताही दृष्टीकोन दिसत नाही, तसेच त्यांनी तक्रारकर्तीस कधीही निश्चित वेळेत वाहनाची डिलीव्हरी देण्याचे आश्वासन दिल्याचे सुध्दा कोणत्याही दस्तावेजांवरुन स्पष्ट होत नाही. फक्त अंदाजे तारीख (Expected Date) म्हणून दि.10.10.2010 रोजीचा उल्लेख आहे, परंतु तक्रारकर्तीने त्यानंतर दि.26.10.2010 रोजी गाडीच्या किमतीची संपूर्ण रक्कम जमा केल्याचे तक्रारीसोबत दाखल केलेल्या दस्तावेज क्र.4 वरुन स्पष्ट होत असल्यामुळे दि.10.10.2010 लाच गाडी मिळण्याबाबतचे तक्रारकर्तीचे म्हणणे न्यायोचित नसल्याचे मंचाचे मत आहे. 7. सदर प्रकरणी गैरअर्जदारांनी तक्रारकर्तीस गाडी देण्याची तयारी दर्शविलेली आहे व त्यानुसार तक्रारकर्तीने गाडी घेतल्यास तिचे कोणतेही आर्थीक व शारीरिक नुकसान होणार नाही, असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही वरील निष्कर्षांच्या आधारे खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्तीची तक्रार खारिज करण्यांत येते. 2. उभय पक्षांनी तक्रारीचा खर्च स्वतः सोसावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |