तक्रारदारातर्फे – स्वत:,
सामनेवालेतर्फे – वकील – एस.पी.थोरात,
।। निकालपत्र ।।
( घोषितद्वारा सौ.एम.एस.विश्वरुपे – सदस्या )
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी की, तक्रारदार हे दत्तात्रेय सेवा संघ,बीड संचलीत श्री दत्तात्रेय प्रभू मंदिर, तळेगांव ता.जि.बीड हे अध्यक्ष असुन पाक्षिक पंचकृष्ण संदेश 2010 प्रथमवर्षे अक्षर प्रिंटेक्स,बीड येथून छापून ता.15.12.2010 ला श्री दत्तात्रेय पंचकृष्ण मंदिर, तळेगांव, बीड येथून प्रकाशीत केली. तक्रारदारांनी सदरची दिनदर्शिका 2010 ची छपाई उशिराने झाल्याने 2011 ची दिनदर्शिका छपाईसाठी मौजे संगमनेर जिल्हा अहमदनगर संजय ऑफसेट यांचे एजन्ट श्री विजय दा. वैराळ रा.मंगळापूर ता. संगमनेर यांनी आमचेशी संपर्क साधला असता त्यांनी बीड येथे तक्रारदाराचे संपर्क साधुन सामनेवाले संदिप लाहोटी यांनी चक्रधर कॅलेंडर आमचे मार्फत छापून दिले आहे,असे सांगीतले. त्यामुळे तक्रारदारांनी त्याचेकडे संपर्क साधुन कॅलेंडर 2010 पेक्षा चांगली किंवा तसेच एक महिन्यात देणे बाबत बोलणी केली. सामनेवाले यांनी संजय ऑफसेट क्वालीटी पिंटर्स, संगमनेर श्री. संदीप लाहोटी हे तक्रारदारांशी ता.16.9.2010 रोजी चर्चाकरुन पंचकृष्ण संदेश कालगणना 2011 ची छपाई एक महिन्यात 5,000 कॅलेंडर्स 65,000/- रुपयामध्ये छापून देण्या बाबत ठराव केला. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून ता.16.9.2010 रोजी संपूर्ण छपाई संदर्भात कागदपत्र सादर केली. सामनेवाले यांनी अतिशय निष्काळजीपणे तक्रारदारांबरोबर छपाई संदर्भात व्यवहार केला. तक्रारदारांनी वारंवार सामनेवाले यांचेकडून प्रथम प्रुफ व अंतिम प्रुफसाठी संपर्क साधला. त्यानंतर दोन महिन्यानी ता.6.11.2010 ला सामनेवाले यांचेकडे रक्कम रु.30,000/- चा भरणा करुन 2500 कॅलेंडरची मागणी केली असता फक्त 2000 कॅलेंडर्स देण्यात आली. सदर कॅलेंडरची तपासणी केली असता, त्यामध्ये त्रूटी आढळून आल्या. सामनेवाले यांनी ठरावानुसार काम केले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी ता.24.11.2010 रोजी सामनेवाले यांना लेखी नोटीस दिली. सामनेवाले यांनी कॅलेन्डरसोबत सुदर्शन चक्रधारी श्रीकृष्ण पूर्णपान आर्टपेपरवर फोटो देण्याचे मान्य केले होते. तक्रारदारांनी या संबधात वारंवार तगादा केला असुन फोटोची किंमत प्रत्येकी 2 रुपये प्रमाणे रु.10,000/- ची आकारणी केली. सामनेवाले यांनी 2011 चे कॅलेंडर गडद रंगात 2010 चे कॅलेंडर प्रमाणे छापून देतो म्हणुन अस्पष्ट चार रंगात छापून दिले. त्यामुळे सदर कॅलेंडरचे विक्रीवर होणारा परिणाम प्रत्येकी रु.1 प्रमाणे रु.5000/- ची नुकसान भरपाई देणे बंधनकारक आहे.
तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे प्रथम प्रुफ व अंतिम प्रुफसाठी प्रत्येक वेळेस प्रवास केला, प्रवास खर्च रु.4,900/- तसेच तसेच नुकसान भरपाई रु.25,900/- शारिरीक, मानसिक त्रासाची रु.10,000/- खर्चाची रक्कम रु.5,000/- सामनेवाले यांचेकडून वसूल होवून मिळावी.
सदर प्रकरणात सामनेवाले हे हजर झाले असुन त्यांनी त्यांचा खुलासा ता.11.2.2011 रोजी दाखल केला आहे. तक्रारदार व सामनेवाले यांचा कॅलेंडर छपाईचा व्यवहार संगमनेर येथे झाल्यामुळे सदरचा अर्ज संगमनेर, जि.अहमदनगर येथे दाखल करणे आवश्यक होते. सदरची तक्रार चालविण्याचा अधिकार सदर न्यायमंचास येत नाही. सदरची 2011 ची दिनदर्शिका छपाईसाठी तक्रारदार स्वत: आमच्याकडे आले होते. विजय दा. वैराळ यांना सामनेवाले ओळखत नाहीत. तसेच सदरचे कॅलेंडर 2010 पेक्षा चांगली तसेच एक महिन्याचे आत मिळण्या संदर्भात सामनेवाले यांचे प्रत्येक्ष तक्रारदारासोबत बोलणे झाले नाही. सदरची छपाई 2011 करीता 5000 कॅलेंडर रु.65,000/- मध्ये छापून देण्या बाबत सामनेवाले यांना मान्य आहे. तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केलेल्या तारखांना संगमनेर येथे आले, वेळोवेळी छपाई संदर्भात प्रुफ तपासून घेतले, तेव्हा कोणतीही तक्रार केलेली नाही. त्याच प्रमाणे ता.6.11.2010 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु.25,000/- दिले आहे. सामनेवाले यांनी ठरल्याप्रमाणे 5000 कॅलेंडर छापलेले असुन 2000 कॅलेंडर घेवून गेले. उर्वरीत 3000 कॅलेंडर पैसे देवून घेवून जातो असे तक्रारदारांनी सांगीतले. सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता.20.12.2001 रोजी लेखी अर्ज देवून रु.35,000/- उर्वरीत 3000 कॅलेंडर घेवून जाण्या बाबत कळविले. परंतु तक्रारदारांनी पैसे दिले नाहीत, अथवा कॅलेंडरही नेले नाहीत. अशा परिस्थितीत सामनेवाले यांना रु.35,000/- चा कॅलेंडर छपाईचा खर्च करावा लागला. तक्रारदारांनी रु.35,000/- बुडविण्या करीता सदरची खोटी तक्रार सदर न्यायमंचात केला असल्यामुळे तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात यावी.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, शपथपत्र, लेखी युक्तीवाद, सामनेवाले यांचा खुलासा यांचे सखोल वाचन केले.
तक्रारीतील कागदपत्रे पहाता, तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे पंचकृष्ण कालगणना दिनदर्शिका 2011 ची 5000 कॅलेंडरची रु.65,000/- त छपाई करण्याचे ठरले. त्याच प्रमाणे सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता.6.11.2010 रोजी छपाई पूर्ण करुन 2000 कॅलेंडर दिले असता तक्रारदारांनी सामनेवाले यांना रु.30,000/-चा भरणा केला.
तक्रारदारांनी तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे सदरची कॅलेंडरची छपाई ठरल्याप्रमाणे गडद रंगात करण्यात आले नाही. तसेच कॅलेंडर छपाईसाठी प्रथम व अंतिम प्रुफ तपासणीसाठी 7 वेळा संगमनेर येथे जावे लागले. प्रत्येक वेळेस रु.700/- प्रमाणे रु.4,900/- एवढा खर्च झाला. सामनेवाले यांचे खुलाशानुसार तक्रारदार सामनेवाले यांचेकडे तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तारखाना केवळ प्रुफसाठी संगमनेर येथे आलेले नसल्याने महानुभव पंथाच्या कार्यक्रमाला आलेले होते. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांची ठरल्याप्रमाणे 5000 कॅलेंडर छापलेली असुन तक्रारदारांनी 3000 कॅलेंडर रु.35,000/- देवून घेवून जाण्या बाबत कळविले आहे. परंतु तक्रारदार उर्वरीत रु.35,000/- दिले नाहीत अथवा कॅलेंडरही घेतले नाहीत.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता, तक्रारदारांनी सामनेवाले यांना यासंदर्भात ता.24.11.2010 रोजी लेखी नोटीस पाठविण्यात आल्याचे दिसून येते. त्यानंतर ता.23.12.2010 रोजीच्या पत्रामध्ये सामनेवाले यांचे ता.20.12.2010 रोजीचे पत्र मिळाले बाबत नमुद असलेले सदरचे सामनेवाले यांनी तक्रारदारांना ता.20.12.2010 रोजी पाठविलेले पत्र दाखल केले असुन सदर पत्राप्रमाणे तक्रारदारांनी रु.30,000/- सामनेवाले यांचेकडे जमा करुन 2000 कॅलेंडर घेवून गेले. तसेच उर्वरीत कॅलेंडर व उर्वरीत रु.35,000/- देवून घेवून जाण्याबाबत नमुद केल्याचे दिसून येते. तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन तक्रारदारांनी सामनेवाले यांना उर्वरीत 3000 कॅलेंडरचे रु.35,000/- दिले नाही ही बाब स्पष्ट होते. त्यामुळे तक्रारदारांनी ता.6.11.2010 रोजी 2000 कॅलेंडर रु.30,000/- सामनेवाले यांचेकडे जमा करुन ताब्यात घेतले असल्याची बाब स्पष्ट झाली असुन त्यावेळी तक्रारदारांनी सदर कॅलेंडरच्या छपाई बाबत त्रुटी असल्याचे ता.24.11.2010 रोजी लेखी पत्र सामनेवाले यांना दिल्याचे दिसून येते.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये छपाई बाबतचा करार संगमनेर जि.अहमदनगर येथे झालेला असुन सदर कॅलेंडरची छपाई संगमनेर येथे झाल्याचे तसेच सदर छपाई संबंधी तक्रारदार सामनेवाले यांचेकडे संगमनेर येथे गेल्याचे तक्रारीत आलेल्या पुराव्यावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी 2000 कॅलेंडर रु.30,000/- संगमनेर येथे सामनेवाले यांना दिल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत तक्रारीचे कारण संगमनेर जि.अहमदनगर येथे घडले असल्यामुळे सदरची तक्रार न्यायमंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही, असे न्यायमंचाचे मत आहे. सदरची तक्रार न्यायमंचाचे अधिकारक्षेत्रात येत नसल्यामुळे या संदर्भात कोणत्याही प्रकारचे भाष्य करणे उचित होणार नाही, असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
।। आ दे श ।।
1. तक्रारदारांची तक्रार रद्द करण्यात येते.
2. सामनेवाले खर्चाबाबत आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
( सौ.एम.एस.विश्वरुपे ) ( पी. बी. भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,बीड जि. बीड