निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/11/2010
तक्रार नोदणी दिनांकः- 18/11/2010
तक्रार निकाल दिनांकः- 15/06/2012
कालावधी 01वर्ष 06महिने 27दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B.
सदस्या. श्रीमती सुवर्णा देशमुख.
गंगुबाई भ्र.अंबादास पवार. अर्जदार.
वय 60 धंदा.वर्षे, धंदा – घरकाम. अड.अरुण खापरे.
रा.दैठणा ता.जि.परभणी.
विरुध्द
1 तहसिलदार. गैरअर्जदार.
तहसिल कार्यालय,परभणी.
ता.जि.परभणी.
2 तालुका कृषी अधिकारी.
कृषी अधिकारी कार्यालय,गंगाखेड.
ता.गंगाखेड जि.परभणी.
3 विभागीय व्यवस्थापक,कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हिसेस प्रा.लि.
भास्करायन,एच.डी.एफ.सी.होम लोन बिल्डींग.
प्लॉट नं.7 सेक्टर ई 1, टाऊन सेंटर.
सिडको,औरंगाबाद.
4 व्यवस्थापक,रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड, अड.जी.एच.दोडीया.
570 रेक्टीफायर हाऊस इंदोरिजीन इलेक्ट्रीक लिमीटेड,
नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट वडाळा ( वेस्ट ),
मुंबई
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष.
2) श्रीमती.सुवर्णा देशमुख. सदस्या.
( निकालपत्र पारित व्दारा.श्री.सी.बी.पांढरपट्टे अध्यक्ष. )
अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार मौजे दैठणा ता.जि.परभणी येथील रहिवासी असून तीचा पती मयत अंबादास संतोबा पवार हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 246 दैठणा येथे शेतजमिन आहे.दिनांक 14/11/2008 वाहान अपघातात जबर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची पोलिस स्टेशनला खबर दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळाचा व मरणोत्तर पंचनामा केला. साक्षीदारांचे जबाब घेतल्यावर सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे मयत पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह तारीख 02/01/2009 रोजी क्लेम दाखल केला.त्यानंतर क्लेम मंजुरी बाबत वेळोवेळी चौकशी केली असता कागदपत्रे विमा कंपनीकडे पाठविली असल्याचे गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी सांगितले. मात्र आजपर्यंत नुकसान भरपाई मंजुरी बाबत काहीच कळविलेले नाही.अशा रितीने विमा कंपनीने सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळवी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी सोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 17 कागदपत्र दाखल केले आहेत.
तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नोटीस स्विकारुनही नेमलेल्या तारखेस हजर राहून आपले म्हणणे सादर न केल्यामुळे त्याचे विरुध्द दिनांक 11.03.2011 रोजी एकतर्फा हुकूम करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने पोष्टामार्फत पाठवलेले लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 27.12.2011 रोजी नि. 9 ला समाविष्ट करण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपला लेखी जबाब (नि. 25) दिनांक 04.02.2012 रोजी सादर केला.
गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात (नि.9) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत अंबादास संतोबा पवार याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना 11.02.2009 रोजी मिळाले त्यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे नव्हती त्या अपू-या कागदपत्रात डेथ सर्टीफिकेट, फेरफार उतारा, वयाचा दाखला, एफ.आय.आर., इन्क्वेस्ट पंचनामा ही कागदपत्रे नसल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराला डी.एस.ए.ओ.मार्फत दिनांक 08.10.2009 रोजी कळविले होते त्यानंतर 14.12.2009 व 01/02/2010 रोजी स्मरणपत्रे पाठविली, परंतु कागदपत्रांची पुर्तता केली नसल्यामुळे क्लेम मंजुरीसाठी विमा कंपनीकडे पाठविलेला नाही तो प्रलंबित आहे. सबब रु.2000/- च्या खर्चासह प्रकरण खारीज करावे अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी जबाबासोबत जिल्हा कृषी अधिका-यांना संबंधीताकडून कागदपत्रे पुर्तता करणे बाबत पाठविलेल्या पत्रांच्या छायाप्रती दाखल केल्या आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपले लेखी जबाबात ( नि.26) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत अंबादास पवार याच्या शेतकरी विमा क्लेम संबंधी कोणतीही कागदपत्रे कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांचेकडून आजपर्यंत त्यांचेकडे आलेली नाहीत त्यामुळे क्लेम मंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही. त्यांच्याकडून कसलीही सेवात्रुटी झोलेली नाही. तक्रार अर्जातील बाकीची सर्व विधाने नाकारली असून तक्रार अर्जाची कायदेशिर मुदतीची बाधा येत असल्याचाही त्यांचा आक्षेप आहे वरील सर्व बाबी विचारात घेवुन तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे.
लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 4 चे शपथपत्र नि. 27 दाखल केले आहे.
प्रकरणाचे अंतिम सुनावणीचे वेळी अर्जदारातर्फे अड खापरे व विमा कंपनी तर्फे
अड गोपाल दोडीया यांनी युक्तिवाद केला.
निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती निधनाची
विमा नुकसान भरपाई रुपये 100,000/- मंजूर
करण्याचे गैरअर्जदासर क्रमांक 3 यांनी
आजपर्यंत रखडत ठेवुन सेवा त्रूटी केली आहे काय ? होय
2 निर्णय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
मुद्या क्रमांक 1 व 2 ः-
अर्जदाराचा पती मयत अंबादास संतोबा पवार शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या कागदपत्रातील नि. 4/3 वरील तीन शेत जमिनीचे 7/12 उतारे, नि.4/1 ते वरील नमुना क्रमांक 8-अ चा उतारा, नि. 4/2 वरील नमुना नं. 6-क चा उतारा, नि. 4/4 वरील फेरफार , नि. 4/15 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 14/11/2008 रोजी दैठणा येथे जीप रजि.क्रमांक एम.एच.22 एफ 5006 वरील ड्रायव्हरने अर्जदाराचा पती अंबादास पवारला ठोकरल्यामुळे अपघातात जबर जखमी होवुन त्याचा मृत्यू झाला ही वस्तुस्थिती पुराव्यातील नि.4/5 वरील दैठणा पोलिस स्टेशन गु.र.नं.81/08 मधील एफ.आय.आर., नि.4/8 पी.एम.रिपोर्ट, नि.4/6 वरील घटनास्थळ पंचनामा नि.4/7 वरील मरणोत्तर पंचनामा नि.4/12 वरील ग्राम पंचायत दैठणा यांनी दिलेले मृत्यू प्रमाणपत्र या कागदपत्रातून शाबीत झाले आहे.
मयत अंबादास पवार हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- मिळणेसाठी. अर्जदाराने वर नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 तहसिलदार यांचेकडे दिनांक 02/09/2009 रोजी नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता व ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे दिलेली होती हे पुराव्यातील संबंधीत कागदपत्रांवरुन व नि.4/16 वरील गैरअर्जदार क्रमांक 1 च्या पत्रावरुन शाबीत झाले आहे,अर्जदाराने दिलेली कागदपत्रे स्वीकारुन व शेतकरी विमा नुकसान भरपाई क्लेमफॉर्म भरुन घेवुन गैरअर्जदार क्रमांक 1 ने तो प्रस्ताव गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पुढिल कार्यवाहीसाठी दिनांक 14/01/2009 रोजी पाठविलेला होता.हे पुराव्यातील नि.4/16 वरील गैरअर्जदार क्रमांक 2 च्या कव्हरींग लेटर वरुन लक्षात येते. गैरअर्जदार क्रमांक 3 यांना अर्जदाराचा प्रस्ताव दिनांक 11/02/2009 रोजी मिळाला होता. हे त्यानी आपल्या लेखी जबाबात (नि.9) मध्येही मान्य केलेले आहे. सदर क्लेम प्रस्तावात आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता होती म्हणून गैरअर्जदार क्रमांक 3 याने अर्जदारास अनुक्रमे तारीख 08/10/2009 रोजी (नि.16) आणि दिनांक 14/12/2009 (नि.11) रोजी डी.ए.एस.ओ. यांना पत्र पाठवुन काही कागदपत्रांची मागणी केलेली होती त्यामध्ये 1) डेथ सर्टीफिकेट, 2) नमुना नं. 8-अ चा उतारा, 3) वयाचा दाखला, 4) एफ.आय.आर.ची कॉपी, 5) इन्क्वेस्ट पंचनामा, 6) फेरफार उतारा ही कागदपत्रे पाठविणे बाबत कळविले होते,परंतु या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी यांना वेळोवेळी स्मरणपत्रे देवुनही त्यांच्याकडून कागदपत्रांची पुर्तता झाली नाही असा गैरअर्जदार क्रमांक 3 ने आपल्या लेखी जबाबात खुलासा केला आहे. तो चुकीचा व खोटा असलयाचे अर्जदाराने पुराव्यात नि.31 लगत दाखल केलेल्या जिल्हा कृषी अधिकारी परभणी यांनी तारीख 21/02/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांनी मागणी केलेल्या सर्व अपु-या कागदपत्रांची पुर्तता केली होती हे स्पष्ट होते. या पुराव्या वरुन अर्थातच अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 कडे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतर जिल्हा कृषी अधिकारी यांच्या मार्फत जा.क्र. 718/10 तारीख 21/02/2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 3 कडे पाठविलेली कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 यांना मिळालीच असली पाहिजे याबद्दल तीळमात्रही शंका वाटत नाही.अशी वस्तुस्थिती पुराव्यातून दिसत असतानाही गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपल्या लेखी जबाबात अर्जदाराच्या विमा प्रस्तावातील कागदपत्रांची पुर्तता झालेली नाही त्यामुळे पुढिल कार्यवाही केली जावु शकत नाही असे खोटे निवेदन करुन मंचाची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.असे खेदाने म्हणावे लागते.अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता अर्जदाराचा विमा प्रस्ताव मंजूर करण्याच्या बाबतीत कोणतीही कागदपत्रे अपुरी नाहीत असे स्पष्ट दिसते.ती कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 ला मिळाल्यानंतर वास्तविक त्यानी अर्जदाराचा विमाक्लेम मंजूरीसाठी गैरअर्जदार क्रमांक 4 कडे लगेच पाठवायला काहीच हरकत नव्हती, परंतु तो न पाठवता स्वतःकडे ठेवुन याबाबतीत निश्चितपणे सेवात्रुटी केलेली आहे. व अर्जदारावर अन्याय केलेला आहे. असाच यातून निष्कर्ष निघतो. अर्जदाराच्या पतीचे अपघाती निधन झालेले असल्यामुळे व तो शेतकरी विम्याचा लाभार्थी असल्यामुळे पॉलिसी हमी प्रमाणे नुकसान भरपाई
रु. 1,00,000/- मिळणेस अर्जदार नक्कीच पात्र आहे. व तीला ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सबब मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत.
आदेश
1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 1,00,000/- चा शेतकरी विमाक्लेम प्रस्ताव आदेश तारखेपासून 15 दिवसाचे आत गैरअर्जदार क्रमांक 4 यांचेकडे पाठवावा. क्लेम प्रस्ताव प्राप्त होताच गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी पुढिल 30 दिवसात मुदतीची बाधा विचारात न घेता अर्जदारास नुकसान भरपाई द्यावी.
3 पक्षकारांनी आपला खर्च आपण स्वतः सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्रीमती. सुवर्णा देशमुख. श्री. सी.बी. पांढरपटटे
सदस्या अध्यक्ष