निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 07/02/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 14/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 14/07/2011 कालावधी 05 महिने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या. सदस्या. सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. चांगुणाबाई भ्र.मदन भुसनर. अर्जदार वय 35 धंदा.घरकाम.. अड.ए.डी.खापरे रा.गोपा ता.गंगाखेड जि.परभणी. विरुध्द 1 तहसिलदार साहेब. गैरअर्जदार. तहसिल कार्यालय,गंगाखेड.ता.गंगाखेड जि.परभणी. 2 तालुका कृषी अधिकारी. तालुका कृषी कार्यालय.गंगाखेड.ता.गंगाखेड.जि.परभणी. 3 विभागीय व्यवस्थापक. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीसेस प्रा.लि. भास्करायन एच.डी.एफ.सी. होम लोन बिल्डींग, प्लॉट क्रमांक 7 सेक्टर इ – 1, टाऊन सेंटर, सिडको, औरंगाबाद. 4 व्यवस्थापक. . अड.गोपाल दोडीया रिलायन्स जनरल इंन्शुरन्स कंपनी लिमीटेड, 570 रेक्टीफायर हाऊस, इंन्दुरी जीन इलेक्ट्रीक. नायगम क्रॉस रोड,नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल. इस्टेट, वडाळा ( वेस्ट ) मुंबई 400031. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार मौजे गोपा ता.गंगाखेड जिल्हा परभणी येथील रहिवासी असून तीचा पती मयत मदन धोंडिराम भुसनर हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 24/3 मौजे गोपा येथे शेतजमिन आहे. दिनांक 24/12/2008 रोजी तो मरडसगाव ते गंगाखेड रोड वरील मासोळी पुलावरुन जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघातात मरण पावला.घटनेची खबर पिंपळदरी पोलिस स्टेशनला दिल्यावर अ.मृत्यू रजिस्टर करुन पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा व मरणोत्तर पंचनामा केला.त्यानंतर सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 तारीख 01/08/2009 रोजी तलाठ्या मार्फत पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह तहसिलदारकडे क्लेम दाखल केला. परंतू बरेच दिवस मंजूरी विना प्रकरण विमा कंपनीने रखडत ठेवले.म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 ते 4 यांना तारीख 11/01/2011 रोजी विनंती पत्र पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली परंतु त्यालाही दाद दिली नाही. अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळवी. याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 21.कागदपत्रे दाखल केली आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 ने नोटीस स्विकारुनही नेमलेल्या तारखेस हजर राहून आपले म्हणणे सादर न केल्यामुळे त्याचेविरुध्द दिनांक 27.04.2011 रोजी एकतर्फा हुकूम करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने तारीख 08/04/2011 रोजी लेखी जबाब (नि.16) दाखल केला.गैरअर्जदार क्रमांक 3 ने पोष्टामार्फत पाठवलेले लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 23.03.2011 रोजी नि. 11 ला समाविष्ट करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपला लेखी जबाब (नि. 18) दिनांक 27.04.2011 रोजी सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात ( नि.16) अर्जदाराचा मयत पती शेतकरी विमा योजनेचा लाभार्थी असल्याचा व विमा पॉलिसीचा तक्रार अर्जातील मजकूर मान्य केला आहे.मात्र अपघाताची घटनेबाबतचा खुलासा त्यांचेशी संबंधीत नाही.एवढाच त्रोटक खुलासा दिला. गैरअर्जदार क्रमांक 2 चे म्हणणे असे आहे की,कागदपत्रांच्या त्रुटीची पुर्तता करुन त्यानी विमा कंपनीकडे क्लेम मंजुरीसाठी पाठविला आहे.त्याबाबत त्यानी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही,सबब त्याना या प्रकरणातून वगळण्यात यावे.अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात (नि.11) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत मदन भुसनर याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना 21.01.2009 रोजी मिळाले. त्यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे नव्हती त्याची पूर्तता करण्यासाठी डी.ए.एस.ओ.परभणी यांना कळविलेले होते.कागदपत्रांची पुर्तता झाल्यावर मंजुरीसाठी विमा कंपनीकडे क्लेम पाठविण्यात आला आहे.अद्यापी तो प्रलंबीत आहे. सबब त्याना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपले लेखी जबाबात ( नि.18) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत मदन भुसनर याच्या शेतकरी विमा क्लेम संबंधी पाठवलेल्या कागदपत्रात बरीच कागदपत्रे अपूरी असल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 3 यानी डी.ए.एस.ओ.परभणी यांना कळविले होते,परंतु त्यांचेकडून कागदपत्रांची पूर्तता झाली नाही त्यामुळे क्लेम मंजूर करता आलेला नाही.या बाबतीत त्यांचेकडून कोणत्याही प्रकारे सेवात्रुटी झालेली नाही शिवाय अर्जदाराला तक्रार करण्यास कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही.तक्रार अर्जातील त्यांचे विरुध्द केलेली सर्व विधाने साफ नाकारली आहेत. सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 4 चे शपथपत्र (नि. 19) दाखल केले आहे. तक्रारीत दाखल केलेले कागदपत्रे व उभय पक्षकारांतर्फे वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराचे मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 100000/- देण्याचे आज पर्यंत रखडत ठेवुन सेवात्रूटी केली आहे काय ? होय 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्दा क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा पती मयत मदन धोंडीबा भुसनर रा.गोपा ता.गंगाखेड हा शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या कागदपत्रातील नि. 4/7 व वरील शेत जमिनीचा 7/12 उतारा, नि.4/8 व नि.4/15 वरील नमुना क्रमांक 8-अ चे उतारे, नि. 4/14 वरील नमुना नं. 6-क चा उतारा, नि. 4/6 वरील फेरफार , नि. 4/3 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 24.12.2008 रोजी मयत मदन भुसनर याचा मरडसगाव ते गंगाखेड रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघाती मृत्यू झाला होता. ही वस्तूस्थिती देखील पुराव्यात दाखल केलेल्या नि. 4/13 व नि.4/9 वरील पोलिस स्टेशन पिंपळदरी ता.गंगाखेड गुन्हा रजि.नं.84/2008 मधील एफ.आय.आर. नि. 4/11 वरील घटनास्थळ पंचनामा, नि.4/10 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/12 वरील पोस्टमार्टेम रिपोर्ट या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. मयत मदन भुसनर हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी. अर्जदाराने वर नमूद केलेल्या आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 तहसिलदार गंगाखेड यांचेकडे नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता व ती कागदपत्रे गैरअर्जदारांना मिळालेली होती ती अडमिटेड फॅक्ट आहे त्या व्यतिरीक्तही आणखी काही कागदपत्रांची आवश्यकता होती म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी अर्जदाराकडून पुर्तता करुन घेवुन गैरअर्जदार क्रमांक 3 मार्फत विमा कंपनीकडे क्लेम मंजुरीसाठी पाठविले होता.असे गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यांनी लेखी जबाबा मधून मान्य केलेले आहे. अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेल्या सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता शासनाच्या परिपत्रकात नमुद केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार नं 4 विमा कंपनीडके कबाल ब्रोकरेज मार्फत दिली गेली आहेत.याबद्दल कोणतीही शंका उरत नाही.पुराव्यात ही बाब सिध्द झालेली असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 4 यांनी कागदपत्रांची अर्जदाराकडून पुर्तता झाली नाही असे खोटे निवेदन केवळ नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच केले असले पाहीजे यापेक्षा वेगळा निष्कर्ष निघूच शकत नाही. विमा कंपनीने आपल्या लेखी जबाबात खोटा व चुकीचा बचाव घेवून मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असे खेदाने म्हणावे लागते. अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिलेली असताना गैरअर्जदार क्रमांक 4 यानी अर्जदाराच्या विमा क्लेम मंजूर करण्याचे व अर्जदाराला नुकसान भरपाई देण्याचे प्रकरण आज पर्यंत रखडत ठेवुन अर्जदारावर अन्याय केलेला आहे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 4 कडून निश्चतीपण सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 4 यानी अर्जदाराच्या मयत पतीच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 100000/- ( रुपये एक लाख फक्त ) आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 % दराने प्रकरण दाखल तारखेपासून म्हणजे दिनांक 14.02.2011 पासून व्याजासह द्यावी. 3 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 4 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |