जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच लातूर यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक – 41/2011 तक्रार दाखल तारीख – 17/02/2011
निकाल तारीख - 09/03/2015
कालावधी - 04 वर्ष , 22 दिवस.
मधुमती हरीराम बामणे,
वय – 35 वर्षे, धंदा – शेती,
रा. वाढवणा (बु.) ता.उदगीर जि. लातुर. ....अर्जदार
विरुध्द
1) तहसीलदार,
तहसील कार्यालय उदगीर,
ता. उदगीर जि. लातुर.
2) मा. डिव्हीजनल मॅनेजर,
डिव्हीजनल ऑफिसर,
नॅशनल इन्शुरेन्स कं.लि.,
स्टर्लींग सिनेमा बिल्डींग,
2 रा मजला, 65, मर्झबान रोड,
डी.ओ.14 फोर्ट, मुंबई.
3) शाखाधिकारी,
नॅशनल इन्शुरेन्स कं. लि.,
हानुमान चौक, मालू बिल्डींग,
लातुर. ..गैरअर्जदार
को र म - श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
श्री अजय भोसरेकर, सदस्य
श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे :- अॅड. पी.पी.काळेगोरे.
गैरअर्जदार क्र. 1 तर्फे :- स्वत:
गैरअर्जदार क्र. 3 तर्फे :- अॅड. एस.जी.दिवाण.
निकालपत्र
(घोषितव्दारा - श्रीमती ए.जी.सातपुते, मा.अध्यक्षा )
अर्जदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे.
अर्जदार ही मधुमती हरीराम बामणे रा. वाढवणा (बु) ता. उदगीर जि. लातुर येथील रहिवाशी असून ही मयत हरीराम शंकरराव बामणे यांची कायदेशीर पत्नी आहे. अर्जदाराचे पती नामे हरीराम शंकरराव बामणे यांचे नावे मौजे डांगेवाडी येथे सर्व्हे नं. 76 मध्ये 1 हेक्टर 60 आर जमीन होती. अर्जदाराचे पतीचा शेतकरी जनता अपघात विमा महाराष्ट्र शासनाने काढलेला असल्यामुळे तो गैरअर्जदार क्र. 1 ते 5 यांचा कायदेशीर ग्राहक आहे. दि. 14/02/2007 रोजी अर्जदाराचे पती हरीराम शंकरराव बामणे दुपारी 3. 15 वाजता बेळगाव वेंगुर्ला रोडवर शिरगावच्या हद्दीत त्यांचा अपघात झाला. त्यादिवशी अर्जदाराचे पती हे टँकर क्र. एम. एच. 12 सीएच- 1187 अपघात झाला व त्या अपघातामध्ये अर्जदाराचे पती हे मृत्यू पावले आहेत. त्याचा पोलीस स्टेशन चंदगढ जि. कोल्हापुर येथे गुन्हा क्र. 31/2007 कलम 279, 304 A , 337, 338, 427, 184, 177 भा.दं.वि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या विमा योजनेचा कालावधी दि. 15/07/2006 ते 14/07/2007 असा आहे. व घटना दि. 14/02/2007 रोजी झालेली आहे. म्हणून अर्जदाराच्या पतीचा मृत्यू पॉलिसीच्या कालावधीत झालेला आहे. अर्जदाराने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विम्यांतर्गत पॉलिसीचा मोबदला मिळावा म्हणून सर्व कागदपत्रे गोळा करुन प्रस्ताव तलाठी सज्जा- वाढवणा (बु) यांच्याकडे पाठवला. त्यानंतर मात्र काही उत्तर गैरअर्जदार क्र. 1 ने दि. 11/05/10 रोजी नोटीस वकिला मार्फत गैरअर्जदार विमा कंपनीस पाठवली व न्यायमंचात तक्रार दाखल केली. गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या सेवेत त्रुटी केली आहे. म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीने रु. 1,00,000/- व त्यावर 18 टक्के व्याज तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 50,000/- व अर्जाचा खर्च रु. 5,000/- देण्यात यावे.
तक्रारदाराने तक्रारी सोबत महाराष्ट्र शासन परिपत्रक, तहसिलदार यांचे कडे दिलेला अर्ज, क्लेम फॉर्म, 7/12 ची नक्कल, धारण जमीनीची नोंदवही, फेरफार नोंदवही नक्कल, नमुना नं. 6 (क) ची नक्कल, वर्दी जबाब, घटनास्थळ पंचनामा, मरणोत्तर पंचनामा, पोस्ट मार्टम, चार्ज शिट, नोटीसा, आर.पी.ए.डी पावती इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
तहसीलदार उदगीर यांच्या म्हणण्यानुसार अर्जदाराने सामनेवाला क्र. 1 कडे प्रस्ताव सादर केला होता. सामनेवाला क्र. 1 यांनी तो प्रस्ताव मंजुरीसाठी सामनेवाले क्र. 2 कडे दि. 02/08/2010 रोजी पाठवलेली आहे. त्यामुळे सामनेवाला क्र. 1 ने आपले कर्तव्य पार पाडलेले असल्यामुळे त्यांच्या विरुध्द सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
विमा कंपनीच्या म्हणण्यानुसार अर्जदाराच्या पतीचा अपघात झाल्यानंतर एका महिन्याच्या आत अर्जदाराने सदरचा प्रस्ताव तहसीलदाराकडे पाठवावयास हवा होता. त्यानंतर तहसीलदाराकडुन तो प्रस्ताव कबाल इंन्शुरन्स कंपनीकडे आल्यावर त्या प्रस्तावाच्या कागदपत्रांची पाहणी करुन तो प्रस्ताव हा विमा कंपनीकडे यावयास हवा त्यानुसार कबाल कंपनीने ती कागदपत्रे घेतलेली आहे. परंतु सदरचा अपघात हा अर्जदाराचा पती हा शेतकरी असून तो मृत्यू पुर्वी ड्रायव्हींग करत असल्यामुळे त्यांच्याकडे वैध ड्रायव्हींग लायसेंस हवे होते ते अर्जदाराने दाखल केलेले नाही. हरिराम शंकरराव बामणे हा एम.एच. 12 सीएच- 1187 हा टँकर चालवत होता. त्याने वैध वाहन परवाना दिला नसल्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी. कारण सदरचा प्रस्ताव हा प्राथमिक अवस्थेत असल्यामुळे तक्रार ही फेटाळण्यात यावी. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या सेवेत कोणतीही त्रुटी केली नसल्यामुळे तक्रार ही फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तरे
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय
2) गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? अंशत: होय
3) काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व अर्जदाराच्या पतीचा मृत्यू हा दि. 14/02/2007 रोजी अपघातात झालेला आहे. मृत्यू समयी त्याच्या नावे सर्व्हे नं. 76 मध्ये 1 हेक्टर 60 आर जमीन त्याच्या नावावर होती. त्यामुळे तो शेतकरी होता.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर अंशत: होय असून, अर्जदाराने सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्र. 1 कडे पाठवले व गैरअर्जदार क्र. 1 ने ती सर्व कागदपत्रे दि. 02/08/10 रोजी गैरअर्जदार क्र. 2 कडे पाठवले असल्याची नोंद गैरअर्जदार क्र. 1 ने आपल्या म्हणण्यामध्ये दिलेली आहे. सदर केसमध्ये इंन्शुरन्स कंपनीकडे सर्व कागदपत्रे पोहचलेली आहेत. ही बाब मान्य आहे की ती कबाल इंन्शुरन्स कंपनीकडून विमा कंपनीस जावयास हवी होती. मात्र त्या कंपनीला अर्जदाराने पार्टी केलेले नाही. त्यामुळे सदरच्या प्रकरणात गैरअर्जदार क्र. 2 कडे सर्व कागदपत्रे पोहचलेली आहेत. त्यामुळे सदरचा प्रस्ताव हा प्राथमिक अवस्थेत आहे असे म्हणता येणार नाही. तसेच सदर प्रस्तावानुसार अर्जदाराचा अर्ज तहसीलदाराकडुन गैरअर्जदार क्र. 2 विमा कंपनीस प्राप्त झाला. याचाच अर्थ गैरअर्जदार क्र. 2 व 3 या विमा कंपनीस अर्जदाराचा प्रस्ताव व कागदपत्रे पोहचलेली आहेत. त्यांच्या लेखी कथनात देखील अर्जदार हा मृत्यूसमयी स्वत: शेतकरी असून गाडी चालवत होता. तेव्हा त्याच्याजवळ वाहन परवाना असणे गरजेचे आहे व त्याने तो कागदपत्रासोबत दाखल केलेला नाही. याचाच अर्थ सर्व कागदपत्रांची पडताळणी केलेली आहे. म्हणजेच सदर केसमध्ये अर्जदाराने कागदपत्रे पोहचलेली आहेत. तरी सुध्दा विमा कंपनीने अर्जदाराचा प्रस्तावा बाबत विचार केलेला नाही, ही अर्जदाराने गैरअर्जदाराच्या सेवेत केलेली त्रुटी होय. तसेच गैरअर्जदार स्वत: अर्जदाराचा प्रस्ताव प्रथमावस्थेत आहे असे म्हणतो त्याचाच अर्थ अर्जदारास सदर प्रकरणास लागलेला 1 वर्ष 11 महिन्याच्या विलंब हा माफ करण्याजोगा आहे. म्हणून तो विलंब हे न्यायमंच रु. 500/- कॉस्ट लावून माफ करत आहे. तसेच वैध वाहन परवाना नाही. म्हणून गैरअर्जदार क्र. 2 व 3 ने जो प्रस्ताव प्रथमावस्थेत ठेवलेला आहे. त्याबाबत अर्जदाराचे पतीस दुस-या वाहनाने धडक दिलेली आहे. अर्जदाराचे पती सदर केसमध्ये दोषी आहेत. त्याच्याच वाहनाने टॅंकर ट्रक क्र. एम.एच. 12 सीएच- 1187 हा तिरकस पूर्वेकडे तोंड करुन झाडावर ठोकरले स्थितीत असून त्यावरील चालक जबर जखमी होवून जागीच मयत होवून अडकून पडलेले दिसत आहे. अशा स्थितीत चालक म्हणजेच मयत हरीराम शंकरराव बामणे हा आहे. त्यामुळे सदर केसमध्ये तो आरोपी आहे. व त्याच्याजवळ वाहन परवाना असणे गरजेचे आहे. म्हणून सदर केसमध्ये स्वत: शेतकरी असून त्याने सदरचा टँकर ट्रक चालवत असताना अपघात घडवून आणला व स्वत:च त्या गाडीत मृत झाला असल्यामुळे हे न्यायमंच गैरअर्जदाराचे वाहन परवाना दिलेला नाही हे म्हणणे रास्त आहे. म्हणून हे न्यायमंच अर्जदाराच्या सेवेत त्रुटी सिध्द होत नसल्यामुळे अर्जदाराचा अर्ज नामंजुर करत आहे.
सबब हे न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करत आहे.
आदेश
1) अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येत आहे.
2) खर्चाबाबत काही आदेश नाही.
(श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर.