आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक 1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अंतर्गत शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम प्राप्त होण्यासाठी दाखल केली आहे. सदर तक्रारीसोबत तक्रारकर्त्यांनी तक्रार मुदतीमध्ये न दाखल केल्यामुळे विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे. त्यामुळे मंच सुरूवातीला विलंब माफीच्या अर्जावर आदेश पारित करीत आहे. 2. तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता क्र. 1 ची पत्नी आणि तक्रारकर्ता क्र. 2 व 3 ची आई शोभा भुरे हिचा दिनांक 17/05/2007 ला पांढराबोडी, ता. जिल्हा भंडारा येथील नवा तलावाचे शेतशिवारात रांगोळी खदानीत रांगोळी खणण्याकरिता गेली असता रांगोळी खदानीचा पडपा तिच्या अंगावर पडल्याने त्यात दबून तिचा मृत्यु झाला. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी दिनांक 10/07/2007 ला माननीय तहसीलदार, भंडारा यांच्याकडे शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्यासंदर्भात दावा अर्ज सादर केला. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी दावा अर्ज विरूध्द पक्ष क्र. 2 यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविला. परंतु ब-याच कालावधीनंतर सुध्दा त्याबाबत काहीही माहिती न मिळाल्याने अर्जदारांनी/तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष क्र. 1 यांची भेट घेतली. मात्र तक्रारकर्त्यांची विमा रक्कम प्राप्त न झाल्यामुळे व विरूध्द पक्ष यांनी योग्यरित्या उत्तर न दिल्यामुळे तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्याकडे विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्या विरोधात दिनांक 09/01/2008 रोजी तक्रार केली. विरूध्द पक्ष क्र. 1 यांची भेट घेतली असता त्यांनी तक्रारकर्त्यांना सांगितले की, तुमचा दावा अर्ज पाठविलेला आहे. परंतु तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही केली नाही आणि टाळाटाळीची उत्तरे दिली. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी वकिलामार्फत विरूध्द पक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस पाठविली. विरूध्द पक्ष यांनी नोटीसचे उत्तर दिले नाही, त्यामुळे तक्रारकर्त्यांनी 560 दिवसांच्या विलंबासह सदर तक्रार दाखल केली. 3. तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब हा विरूध्द पक्ष क्र. 1 ते 3 च्या निष्काळजीपणामुळे व दिरंगाईमुळे झालेला आहे. हा विलंब तक्रारकर्त्यांच्या दुर्लक्षतेमुळे वा निष्काळजीपणामुळे झालेला नाही. त्यामुळे विलंब माफीचा अर्ज मंजूर न केल्यास तक्रारकर्त्यांना प्राप्त होणा-या सवलतीपासून वंचित केल्या जाऊन तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीची पूर्तता करणे अशक्य होईल. 4. तक्रारकर्त्यांच्या उपरोक्त अर्जावर विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही. फक्त विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी लेखी उत्तर दाखल केले आहे. विरूध्द पक्ष क्र. 3 चे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्यांनी दिनांक 10/07/2007 रोजी विरूध्द पक्ष क्र. 1 यांच्याकडे विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्यासाठी दावा दाखल केला नाही. तक्रारकर्त्यांनी लिहिलेला मजकूर खोटा आहे. तसेच तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकारी, भंडारा यांना पत्र दिलेले नाही व आपला दावा वेळेत बसावा म्हणून तसेच आपल्यावर झालेला उशीराचा बोजा येऊ नये म्हणून त्यांनी अर्जात खोटे प्रतिपादन केले आहे. विरूध्द पक्ष क्र. 3 यांचे म्हणणे आहे की, दावा अर्ज अर्जदारांनीच विलंबाने दाखल केलेला असून तो त्यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा दावा अर्ज खारीज करण्यात यावा. 5. तक्रारकर्त्यांनी तक्रारीसोबत दस्तऐवह क्र. 18 वर लोकशाहीदिनी दिलेले दिनांक 09/01/2008 रोजीचे जिल्हाधिका-यांचे पत्र दाखल केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रच पाठविले नाही हे विरूध्द पक्ष क्र. 3 यांचे म्हणणे खोटे ठरते. शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनंअंतर्गत जिल्हाधिकारी हे महत्वाचे व्यक्ती असून तहसीलदार हे त्यांच्या अंतर्गत कार्य करतात. तसेच जिल्हा नियंत्रण समितीचे अध्यक्ष या नात्याने प्रत्येक महिन्याच्या लोकशाही दिनी या योजनेचा तालुकानिहाय आढावा घेणे व अडचणीचे निराकरण करणे तसेच योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्याचे दृष्टीने सुधारणा/सूचना याबाबत आयुक्त (कृषि) यांना अवगत करावे ही जबाबदारी जिल्हाधिकारी यांची असते. तक्रारकर्त्यांनी दिनांक 07/01/2008 ला जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी त्यांच्या विमा दाव्या संदर्भात काय निर्णय झाला याबाबत कळविले नाही असे नमूद केलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांना तक्रार दाखल करण्याचे कारण हे दिनांक 07/01/2008 पासून सुध्दा सुरूच राहील. तक्रारकर्त्यांनी प्रस्तुत तक्रार दिनांक 01/01/2011 ला दाखल केलेली आहे. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यांच्या तक्रारीवर काय निर्णय घेतला याबाबत त्यांना माहिती न दिल्यामुळे तक्रार दाखल करण्याचे कारण अव्याहतपणे सुरू आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात येतो. 6. तक्रारकर्त्यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्ता क्र. 1 च्या पत्नीचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे त्याने पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/05/2007 रोजी तक्रार नोंदविली. त्यानंतर पोलीसांनी CRPC च्या कलम 174 अन्वये अपराध क्रमांक 52/2007 नुसार गुन्हा दाखल करून पंचनामा तसेच इतर दस्तऐवज तयार केले आहेत. तक्रारकर्त्यांनी संपूर्ण दस्तऐवज तक्रारीच्या पृष्ठ क्र. 12 ते 39 अन्वये दाखल केलेले आहेत. तक्रारकर्त्यांनी विरूध्द पक्ष यांच्याकडे मुदतीमध्ये विमा दावा प्रपत्र दस्तऐवजासह पाठवून देखील विरूध्द पक्ष यांनी त्यांच्या विमा दाव्यासंदर्भात काहीही कार्यवाही केली नाही. या विरूध्द पक्ष यांच्या सेवेतील त्रुटीबाबत तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्यांनी आपल्या तक्रारीत विमा दाव्याची रक्कम व्याजासह मिळण्याची तसेच शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली आहे. 8. मंचाची नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष यांनी आपले लेखी उत्तर दाखल केलेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 1 चे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्यांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गतचे प्रकरण त्यांच्या कार्यालयास दिनांक 10/07/2007 ला सादर केले. सदर प्रकरणाची परिपूर्ण कार्यवाही करून तसेच आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याच दिवशी विरूध्द पक्ष क्र. 2 कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस प्रा. लि. यांच्याकडे मंजुरीकरिता व पुढील कार्यवाहीकरिता पाठविण्यात आले. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ पृष्ठ क्र. 54 ते 77 प्रमाणे दस्तऐवज दाखल केलेले आहेत. 9. विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी आपले लेखी उत्तर कुरिअरद्वारे पाठविलेले आहे. लेखी उत्तराच्या परिच्छेद क्र. 5 मध्ये विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी नमूद केले आहे की, मयत शोभा प्रकाश भुरे, गाव पांढराबोडी, ता. जिल्हा भंडारा हिला दिनांक 13/12/2006 रोजी अपघात झाला. सदरील प्रस्ताव आमच्या कार्यालयास प्राप्त न झाल्याने आम्ही या प्रस्तावाबाबत काहीही सांगण्यास असमर्थ आहोत. 10. विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल केलेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यांची संपूर्ण तक्रार अमान्य केलेली आहे. तसेच मयत शोभा हिचा मृत्यु रांगोळी खदानीत काम करीत असतांना रांगोळी खदानीचा पडपा तिच्या अंगावर पडून मृत्यु झाला हे सुध्दा अमान्य केलेले आहे. परंतु शोभा ही तक्रारकर्ता क्र. 1 ची पत्नी असून ती शेतकरी होती व तिचा अपघाती मृत्यु झाल्यामुळे ती शेतकरी व्यक्तिगत अपघात विम्याची रक्कम मिळण्यास पात्र आहे असे आपल्या लेखी उत्तरामध्ये मान्य केलेले आहे. विरूध्द पक्ष क्र. 3 यांचे म्हणणे आहे की, तक्रारकर्त्यांनी तक्रार अर्जासोबत दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवालामध्ये मृतकाच्या अंगावर कोणत्याही जखमा दिसत नाही व मृत्युचे कारण शरीराच्या नाजूक भागाला दुखापत असे दिलेले आहे हे खोटे आहे असे विरूध्द पक्ष क्र. 3 चे म्हणणे आहे. विरूध्द पक्ष क्र. 3 यांचे पुढे असे म्हणणे आहे की, विरूध्द पक्ष क्र. 3 यांची सेवेत कोणतीही त्रुटी नाही. 11. दोन्ही पक्षांनी दाखल केलेले दस्तऐवज तसेच त्यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्त्यांची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? -ः कारणमिमांसा ः- 12. तक्रारकर्त्यांनी अपराध क्रमांक 52/2007 चा पोलीस रिपोर्ट, इन्क्वेस्ट रिपोर्ट, पोलीस पंचनामा, शवविच्छेदन अहवाल इत्यादी दस्तऐवज दाखल केलेले आहेत. गुन्ह्याच्या तपशीलामध्ये स्पष्टपणे लिहिलेले आहे की, मृतक ही रांगोळी खोदत असतांना खदानीचा वरचा पडपा अंगावर पडून दबून मरण पावली. विरूध्द पक्ष यांचे हे म्हणणे नाही की, तक्रारकर्तीचा मृत्यु हा नैसर्गिक कारणाने झालेला आहे. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांवरून हे स्पष्ट होते की, मृतक शोभा हिचा मृत्यु हा “Probable cause of death to Head injury and injury to vital organs” या कारणामुळे झालेला आहे असे शवविच्छेदन अहवालावरून सिध्द होते. त्यामुळे शोभा हिचा मृत्यु अपघाताने झाले हे स्पष्ट होते. 13. विरूध्द पक्ष क्र. 2 यांचे म्हणणे आहे की, शोभा हिचा अपघात दिनांक 13/12/2006 रोजी झाला. परंतु तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजांवरून हे स्पष्ट होते की, शोभा हिचा अपघात दिनांक 17/05/2007 ला 15.30 वाजता झाला. याचाच अर्थ विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी आपल्या लेखी उत्तरात खोटी तारीख नमूद केलेली आहे. वास्तविकतः दिनांक 13/12/2006 या तारखेचा सदर प्रकरणाशी काहीही संबंध नाही. विरूध्द पक्ष क्र. 2 काहीएक शहानिशा न करता मंचाची दिशाभूल करण्यासाठी चुकीचे उत्तर कुरिअरद्वारे पाठवित आहेत. प्रत्यक्षात विरूध्द पक्ष क्र. 2 मंचामध्ये हजर राहात नाहीत व सदर प्रकरणात न्याय देण्याच्या दृष्टीकोनातून मदत करीत नाहीत. वास्तविक शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेअंतर्गत विरूध्द पक्ष क्र. 2 चे कर्तव्य आहे की, त्यांनी विमा नुकसानभरपाईचे दावे यांची तपासणी/पडताळणी करून परिपूर्ण प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे मंजुरीसाठी सादर करावा. परंतु या प्रकरणात त्यांनी तक्रारकर्त्यांना काहीही मदत न करता उलट चुकीची माहिती नमूद केली. विरूध्द पक्ष क्र. 2 यांनी या घटनेची भविष्यात पुनरावृत्ती करू नये. 14. विरूध्द पक्ष क्र. 3 यांच्याकडे शासनाने शेतक-यांचा अपघाती मृत्यु झाल्यास त्यांच्या वारसांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी विमा रकमेचा हप्ता जमा केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात विमा रक्कम देण्याची वेळ आल्यास विरूध्द पक्ष क्र. 3 ती देण्यास टाळाटाळ करतात. विरूध्द पक्ष क्र. 3 यांची सदरची कृती ही त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे. त्यामुळे सदरची तक्रार विरूध्द पक्ष क्र. 3 विरूध्द मान्य होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. 15. विरूध्द पक्ष क्र. 1 यांनी शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत त्यांचे कर्तव्य योग्यप्रकारे पार पाडल्यामुळे त्यांच्या विरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते. करिता आदेश. आदेश तक्रारकर्त्यांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 1. विरुद्ध पक्ष क्र. 3 यांनी तक्रारकर्त्यांना शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत विमा रक्कम रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 9 टक्के व्याजासह द्यावे. व्याजाची आकारणी दिनांक 17/05/2007 पासून ते रक्कम प्रत्यक्षात अदा होईपर्यंत करण्यात यावी. 2. विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चाबद्दल रू. 1,000/- तक्रारकर्त्यांना द्यावेत. 3. विरूध्द पक्ष क्र. 1 व 2 विरूध्दची तक्रार खारीज करण्यात येते 4. विरूध्द पक्ष क्र. 3 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत करावे.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |