अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नागपूर
तक्रार क्रमांक: 88/2011 तक्रारदाखलदिनांक: 01/10/2011
आदेश पारित दिनांकः 15/03/2012
तक्रारकर्ता :- श्री धनराज पंचम मेश्राम
वय–35, व्यवसाय - मजुरी,
मु.पो. पिंपळा, जि.- नागपूर
-// वि रु ध्द //-
गैरअर्जदार :- 1. तहसीलदार साहेब
तहसिल कार्यालय पारशिवनी,
ता.पारशिवनी, जि- नागपूर
2. उप-अधिक्षक, भूमी अभिलेख
पारशिवनी, यांचे कार्यालय, पारशिवनी,
जि.नागपूर
गणपूर्ती :- 1. श्री. विजयसिंह ना. राणे - अध्यक्ष
2. श्रीमती जयश्री येंडे - सदस्या
उपस्थिती :– तक्रारदारातर्फे वकीलश्री दादाराव भेदरे
गैरअर्जदार क्रं.1 स्वतः
गैरअर्जदार क्रं.2 स्वतः
( आदेश पारित द्वारा : श्रीमती जयश्री येंडे मा. सदस्या )
आदेश
( पारित दिनांक : 15 मार्च, 2012 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराचे म्हणण्यानुसार तक्रारदार हे अनुसुचित जातीत येत असल्यामुळे त्यांनी गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडे ता. पारशिवनी, मुळ भुमापन क्रं.(सर्व्हे क्रं.) 4, आराजी 1.22 हे.आर.या जागेत भुखंड क्रं.32 आराजी 30 बाय 30 (900) चौ.फुट या जागेकरिता 3250/- एवढया रक्कमेचा चालान क्रं.24, दिनांक 5/2/2010 रोजी गैरअर्जदार क्रं. 1 यांना दिले. परंतु गैरअर्जदाराने सदर भुखंडाचा ताबा तक्रारदारास दिला नाही. तसेच तक्रारदाराने गैरअर्जदारयांचेकडे सदर भुखंडाच्या मोजणी करिता रक्कमेचा भरणा केला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या दिनांक 14/12/2010 च्या पत्रात मोजणीसाठी नमुद केलेल्या दिनांक 24/12/2010 रोजी तक्रारदार आवश्यक त्या संपुर्ण सामानासह मोक्यावर हजर झाले.
तसेच मोक्यावर इतर लोकही हजर होते. सदर दिवशी तक्रारदाराचे भुखंडाचे मोजणीकरिता मोक्यावर हजर असलेल्या व्यक्तिमध्ये सौ प्रतिभा विलास गिरी, मु.पिंपळा, सौ सरस्वता उमराव वानखेडे, माजी सरपंच पिंपळा, श्री लायनू बारमाटे व प्रकाश येकुणकर या लोकांनी गैरअर्जदार यांचेशी वाद घातला त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारदारास सदर भुखंडाची मोजणी करुन हद्द कायम (सिमांकन ) करुन दिली नाही. गैरअर्जदार क्रं.1 यांनी ताबा न देऊन तसेच गैरअर्जदार सदर भुखंडाची मोजणी करुन हद्द कायम करुन सिमांकन करुन दिले नाही म्हणुन तक्रारदाराने सदर तक्रार दाखल करुन गैरअर्जदाराने मुळ भुमापन क्रं.(सर्व्हे क्रं.) 4, आराजी 1.22 हे.आर.या जागेत भुखंड क्रं.32 आराजी 30 बाय 30 (900) चौ.फुट या भुखंडाचे हद्द कायम करुन ( सिमांकन ) प्रत्यक्ष ताबा द्यावा. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी 5,000/- रुपये व न्यायीक खर्चापोटी 5,000/- रुपये मिळावे अशी मागणी केली.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात तहसिलदाराचे पत्र, मोजणी नोटीस, पैसे भरल्याची पावती,समन्स,वकीलाचा नोटीस, पोस्टाची पावती, पोहोचपावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत.
यात गैरअर्जदार क्रं.1 व 2 यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.1 ने आपले जवाबात तक्रारदाराने शासकीय आबादी भुखंड मिळण्याकरिता तहसिलदार पारशिवनी यांचे कार्यालयात रुपये 3250/- एवढी रक्कम चलनाद्वारे शासनाकडे जमा केल्याचे मान्य केले आहे परंतु तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. गैरअर्जदार यांचेमते सदर भुखंडधारकांचे आपसात भांडण झाल्यामुळे पोलीस स्टेशन पारशीवनी यांनी सी आर पी सी नियमानुसार इस्तगासा सादर केल्यावरुन कलम 107,116(3)अंतर्गत नियमानुसार कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे वकीलांनी पाठविलेल्या नोटीसला उत्तर पाठविण्यात आलेले आहे. असा उजर घेतला.
गैरअर्जदार क्रं.2 ने तक्रारदाराचे सदर भुखंडाचे मोजणी करण्याकरिता दिनांक 24/12/2010 रोजी गैरअर्जदार क्रं.2 चे अधिकारी मोक्यावर हजर असल्याचे म्हणणे मान्य केले व हेही मान्य केले की हजर व्यक्ति श्री प्रतिभा विलास गिरी व श्रीमती प्रकाश येनुरकर या लोकांनी सदर गैरअर्जदाराचे मोजणी कामात अडथळा आणुन गैरअर्जदार यांचेशी वाद घातला व त्यांचे मोजणीचे साहित्य नालीत फेकल्यामुळे मोजणी न करता पंचनामा करावा लागला. वास्तविक सदर भुखंडावर तक्रारदाराचा ताबा नसुन त्यावर दुस-या कोणचा तरी ताबा आहे. तक्रारदार सदर भुखंडाची हद्द दाखविण्यास असमर्थ होता व इतर लोकांनी सदर मोजणीवर आक्षेप घेतलेला होता. त्यामुळे सदर बाबींची मोजणी होऊ शकली नाही. यास्तव गैरअर्जदार यांनी सेवेत कमतरता नाही म्हणुन गैरअर्जदार क्रं. 2 यांचे विरुध्द विनाकारण केलेली तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी अशी विनंती गैरअर्जदार क्रं.2 यांनी केलेली आहे.
तक्रारकर्त्यातर्फे वकील श्री भेदरे यांचा युक्तिवाद ऐकला. गैरअर्जदाराचे वकील गैरहजर. तक्रारदाराने लेखी युकितवाद दाखल केला.
. -: का र ण मि मां सा :-
प्रस्तुत प्रकरणातील एकंदरीत वस्तुस्थिती पाहता कागदपत्र क्रं.6 वरुन असे दिसुन येते की, तक्रारदाराने शासनाकडे आबादी भुखंड मिळण्याकरिता तहसिलदार पारशिवनी यांचे कार्यालयात दिनांक 5/2/2010 रोजी रुपये 3250/- एवढी रक्कम भरलेली होती व तक्रारदारास सदर भुखंड क्रं.32 आराजी 30 बाय 30 चौ.फुट. (कागदपत्र क्रं. 6) त्याप्रमाणे दिनांक 14/12/2012 चे नोटीसद्वारे सदर भुखंडाची मोजणी करण्याचे दिनांक 24/12/2010 रोजी ठरले होते. सदर दिवशी उभयपक्ष मोजणीचे ठिकाणी हजर होते हे दिसुन येते. त्याच प्रमाणे कागदपत्र क्रं. 20 वरील संबंधीत पोलीस स्टेशनला गैरअर्जदार यांनी दिलेले प्रतिवेदन कागदपत्र क्र.23 वरील पंचनामा तसेच 24 वरील पंचनामा तसेच प्लॉट मोजणी थांबविण्याबाबत मौजा पिंपाळा येथील नागरिकांनी दिलेले निवेदन पाहता असे निर्देशनास येते की काही लोकांनी आक्षेप घेतल्यामुळे व मोजणीचे सामान फेकुन दिल्यामुळे गैरअर्जदार क्रं.2 यांना मोजणी करता आली नाही. काही लोकांच्या आक्षेपामुळे व केलेल्या अडथळयामुळे गैरअर्जदार यांना मोजणी करता आली नाही ही बाब तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारीत मान्य केलेली आहे.
वरील वस्तुस्थिती पाहता हे मंच या निष्कर्षाप्रत येते की सदर मोक्क्याच्या ठिकाणी गैरअर्जदार क्रं.2 प्रत्यक्ष मोजणीसाठी गेले असता काही गावक-यांच्या मोजणीसाठी गेले असता काही गावक-यांच्या आक्षेपामुळे त्यांनी मोजणीसाठी अडथळा केल्यामुळे त्यांना सदर मोजणी करता आली नाही. यात गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या सेवेत त्रुटी ठेवली असे म्हणता येणार नाही परंतु गैरअर्जदार यांनी पोलीस सरंक्षण घेऊन सदर भुखंडाची रितसर मोजणी करुन भुखंडाचा ताबा तक्रारदारास द्यावा या निर्णयाप्रत हे मंच येते सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदार यांनी पोलीस सरंक्षण घेऊन तक्रारदाराचे मुळ भुमापन क्रं.(सर्व्हे क्रं.) 4, आराजी 1.22 हे.आर.या जागेत भुखंड क्रं.32 आराजी 30 बाय 30 (900) चौ.फुट या भुखंडाची हद्द कायम करुन ( सिमांकन ) प्रत्यक्ष ताबा तक्रारदारास द्यावा.
3. दोन्ही पक्षांनी दाव्यापोटीचा खर्च आपआपला सोसावा.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन
1 महिन्याचे आत करावे.
( जयश्री येंडे ) (विजयसिंह ना. राणे )
सदस्या अध्यक्ष
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर