(घोषित दि. 05.09.2014 व्दारा श्रीमती. माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांचे पती श्री छबूराव बाजीराव इघारे हे शेतकरी असून दिनांक 23.03.2005 रोजी जालन्याकडे मोटार सायकलवर जात असताना वाहनाची धडक लागून झालेल्या अपघातामध्ये गंभीररित्या जखमी होवून मृत्यू पावले. अपघातानंतर त्यांना शासकीय रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिका-यांनी मृत घोषित केले. मयताचे प्रेत शवविच्छेदना करिता पाठविण्यात आले. सदर अपघाताची माहिती पोलीसांनी मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा व इनक्वेस्ट पंचनामा केला तसेच धडक दिलेल्या वाहन चालका विरुध्द गुन्हयाची नोंद केली.
तक्रारदारांनी पतीच्या मृत्यूनंतर शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह विहीत मुदतीत म्हणजेच दिनांक 23.09.2005 रोजी तहसीदार घनसावंगी यांचेकडे दाखल केला. अद्याप पर्यंत तक्रारदारांचा प्रस्ताव मंजूर अथवा नामंजूर केला नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय आयोग दिल्ली यांचेकडे गैरअर्जदार यांचे विरुध्द तक्रार क्रमांक 27/2008 दाखल केली असून शासनाने परिपूर्ण प्रस्ताव दाखल असलेल्या शेतक-यांना नुकसान भरपाईची रक्कम आदेशा नंतर सहा महिन्यात देण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. गैरअर्जदार विमा कंपनीने सदर प्रकरणात परिपूर्ण प्रस्ताव असलेल्या शेतक-यांचे यादी दाखल केली असून तक्रारदारांचा प्रस्ताव अनुक्रमांक 31 MUM/000/0501 Date 23.03.2005 4005/000/2134 येथे नमुद केला आहे. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांनी अद्याप पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम अदा केली नाही अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार क्रमांक 1 यांना नोटीस मिळूनही गैरहजर असल्यामुळे त्यांचे विरुध्द एकतर्फा आदेश घेण्यात आला.
गैरअर्जदार 2 यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांची तक्रार मुदतबाह्य आहे. तक्रारदारांनी प्रस्तावा सोबत मयताचे ड्रायव्हिंग लायसन्स, फेरफार वगैरे कागदपत्रे दाखल केली नाही. सदर कागदपत्रांची मागणी करुनही पुर्तता केली नाही. त्यामुळे तक्रारदारांच्या प्रस्तावाची फाईल बंद करण्यात आली आहे.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्र यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदारांचे विव्दान वकील श्री.आर.व्ही.जाधव यांचा युक्तीवाद ऐकला. गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे विव्दान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील दाखल कागदपत्रे व दोनही वकीलांचा युक्तीवाद यावरुन खालील प्रमाणे मुद्दे स्पष्ट होतात.
- तक्रारदारांचे पती शेतकरी असून त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर गैरअर्जदार यांचेकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव दाखल केला आहे.
- गैरअर्जदार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांच्या पतीचा मृत्यू सन 2005 मध्ये झालेला असून सदरची तक्रार मुदतबाहय आहे. तक्रारदारांनी दाखल केलला प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. या कारणास्तव सदर प्रस्तावाची फाईल बंद करण्यात आली. यावरुन तक्रारदारांचा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही. मंजूर अथवा नामंजूर केला नाही, म्हणजेच गुणवत्तेवर निकाली केला नाही.
- तसेच तक्रारदारांना या संदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. कोणत्या कागदपत्रांची त्रुटी होती किंवा काय ? याबाबत कळवले नाही. गैरअर्जदार यांची सदरची कृती सेवेतील त्रुटी आहे. त्याच प्रमाणे विमा प्रस्ताव प्रलंबित अवस्थेत असल्यामुळे तक्रारदारांना सदर तक्रार दाखल करण्यास सतत कारण घडले आहे (Continuous Cause of action) अशा परिस्थितीत सदरची तक्रार मुदतबाह्य नाही असे न्याय मंचाचे मत आहे.
- महाराष्ट्र शासनाने सदरची योजना शेतक-यांकरीता कल्याणकारी योजना राबवलेली असून प्रस्ताव दाखल झाल्यानंतर त्वरीत कार्यवाही होवून निर्णय देणे आवश्यक आहे. तक्रारदारांच्या प्रस्तावामध्ये काही कागदपत्रांची अपूर्णता आहे असे गैरअर्जदार यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तक्रारदारांनी विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठवणे उचित होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
- गैरअर्जदार यांनी तक्रारदारांचा परिपूर्ण प्रस्ताव मिळाल्यानंतर विलंबाचा मुद्दा वगळून गुणवत्तेवर निकाली करणे योग्य होईल असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करत आहे.
आदेश
- तक्रारदारांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव आवश्यक कागदपत्रासह गैरअर्जदार 2 यांचेकडे आदेश मिळाल्यापासून 60 दिवसात पाठवावा.
- गैरअर्जदार 2 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांचा विमा प्रस्ताव मिळाल्यानंतर 60 दिवसात विलंबाचा मुद्दा वगळून गुणवत्तेवर निकाली करावा.