जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – २०८/२०१२
तक्रार दाखल दिनांक – २९/११/२०१२
तक्रार निकाली दिनांक – ३०/०९/२०१३
श्रीमती. कमलबाई पुंडलिक देसले
उ.वय.४०, धंदा – घरकाम
राह.-देऊर खु., ता.जि. धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
१. मा. तहसिलदार सो.,
धुळे. ता.जि. धुळे.
२. मा. शाखाधिकारी सो.
कबाल जनरल इन्शु. सर्व्हिसेस प्रा.लि.
४ अे, देहमंदीर को – ऑप - हौसिंग
सोसायटी, श्रीरंगनगर, पंपीग स्टेशन रोड,
गंगापुर रोड, नाशिक ४२२००२.
३. मा.शाखाधिकारी सो.
दि. ओरिएंटल विमा कंपनी,
नागपुर, विभागीय कार्यालय,
शुक्ला भवन, वेस्ट हायकोर्ट रोड,
धरम पेठ, नागपुर, ४४००१०.
४. मा.शाखाधिकारी सो.,
दि.ओरिएंटल विमा कंपनी,
लि. धुळे, जि. धुळे. ------------- सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.डी.ए. घरटे)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.सी.के. मुगूल)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
सामनेवाला यांनी तक्रारदार यांचा विमा दावा मंजूर न केल्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार या मंचात दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांचे थोडक्यात तक्रार अशी आहे की, तक्रारदार हिचे पती मयत पुंडलिक रूपा देसले दि.२३/०८/२००८ रोजी शेतात मोटर चालू करणेसाठी गेले असता शॅक लागून अपघाती मृत्यु झालेला आहे. सदर तक्रारदार यांचे पती हे अपघात समयी शेतकरी होते. त्यांनी शेतकरी अपघात विमा योजनेत विमा उतरविलेला होता.
सदर अपघातानंतर तक्रारदार यांनी नियमानुसार सामनेवाला नं.१ मा.तहसिलदार सो. धुळे यांच्याकडे सर्व कागदपत्रांची पुर्तता करून दि.२८/०८/२००८ रोजी प्रस्ताव दाखल केला. त्यांनी सामनेवाला नं.२ कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांचेकडे सदर कागदपत्र पाठविली. त्यांनतर तक्रारदार हिने सामनेवाला नं.१ ते ४ यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधला असता सामनेवाला नं.१ व २ यांनी तक्रारदार यांना सांगितले की, आमचे काम फक्त प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्याचे आहे. तुम्ही विमा कंपीनी कडे जावे. त्यानंतर तक्रारदार ही सामनेवाला नं.४ विमा कंपनीकडे दि.२१/११/२०१२ रोजी गेली असता, तुमच्या विम्याची रक्कम देण्याची जबाबदारी आमची नाही असे सांगून तक्रारदार यांना त्यांचे पतीची अपघाती मृत्युची कायदेशीर शेतकरी अपघात विम्याची रक्कम देण्यास स्पष्टपणे नकार देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला व सेवा देणेस कसुर केला आहे.
२. तक्रारदार यांनी सामनेवाला यांचेकडून विम्याची रक्कम रू.१,००,०००/- व विमा रकमेवर दि.२३/०८/२००८ पासून द.सा.द.शे. १८% प्रमाणे होणारे व्याज, तसेच शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रू.५०,०००/- तक्रार अर्जाचा खर्च रू.५०००/- व सदर दोन्ही रकमेवर द.सा.द.शे. १८% प्रमाणे व्याज देण्याचा आदेश करावा अशी विनंती केली आहे.
३. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ नि.५ सोबत नि.५/१ वर खबर, नि.५/२ वर मरणोत्तर पंचनामा, नि.५/३ वर शवविच्छेदन अहवाल, नि.५/४ वर ७/१२ उतारा, नि.५/५ वर खाते उतारा, नि.५/६ वर वारसा तक्ता, नि.५/७ वर शिधावाटप पत्रिका, नि.५/८ वर प्रस्तावाची प्रत, नि.१२ सोबत नि.१२/३ वर फेरफार नोंद क्र.५५८ ची प्रत, नि.१२/५ वर सामनेवाला नं.२ यांना पाठविलेल्या प्रस्तावाची मूळ प्रत, तसेच नि.१५ वर अपघाताच्या ठिकाणाचा नकाशा, इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
४. सामनेवाला नं.१ हे मे. मंचाची नोटीस स्विकारूनही मुदतीत हजर न झालेने त्यांचेविरूध्द ‘एकतर्फा’ आदेश पारित करण्यात आला आहे.
५. सामनेवाला नं.२ यांनी आपले लेखी म्हणणे नि.८ वर दाखल केलेले आहे. त्यात त्यांनी असे नमुद केले आहे की, कबाल इन्शुरन्स ब्रोकिंग सर्व्हीसेस प्रा.लि. ही बीमा विनियामक और विकास प्राधिकरण भारत सरकार यांची अनुज्ञत्पि प्राप्त विमा सल्लागार कंपनी आहे. महाराष्ट्र राज्य शासनाला सदरील विमा योजना राबवण्यासाठी विना मोबदला सहाय करतो. यामध्ये मुख्यत्वे शेतक-यांचा विमा दावा अर्ज तालुका कृषी अधिकारी/तहसीलदार यामार्फत आमच्याकडे आल्यावर विमा दावा अर्ज योग्यपणे भरला आहे का? सोबत जोडलेली कागदपत्रे विमा कंपनीने मागणी केल्या प्रमाणे आहेत का? नसल्यास तालुका कृषी अधिकारी तहसीलदार यांना कळवून त्यांची पुर्तता करवून घेणे व सर्व योग्य कागदपत्रे मिळाल्यवर योग्य त्या विमा कंपनीकडे पाठवून देणे व विमा कंपनीकडून दावा मंजूर होवून आलेला धनादेश संबंधीत वारसदारांना देणे एवढाच आहे. यासाठी आम्ही राज्य शासन वा शेतकरी यांच्याकडून कोणताही मोबदला घेत नाही, तसेच कोणताही विमा प्रिमियम घेतलेला नाही असे म्हटले आहे.
कबाल इन्शुरन्स यांनी पुढे असे म्हटले आहे की, सदरील प्रस्ताव आमच्या कार्यालयास प्राप्त न झाल्याने आम्ही आपणांस काहीही सांगण्यास असमर्थ आहोत, असे नमुद केले आहे.
६. सामनेवाला ने.३ विमा कंपनीने आपले लेखी म्हणणे नि.९ वर दाखल केले आहे. त्यात त्यांनी तक्रारीतील मागणी खोटी आहे. तक्रारदारची तक्रार मुदतीत नसल्याने रदृ होणेस पात्र आहे. सदर मयत पुंडलिक देसले हा शेतकरी असल्याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा नाही. सदर योजनेच्या लाभाकरिता मयताच्या नावाने शेती असणे आवश्यक आहे. तक्रारदारचा प्रस्ताव कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस कडे व त्यांच्यामार्फत विमा कंपनीकडे आलेला नाही. त्यामुळे सामनेवाला यांनी क्लेम नाकारण्यास कोणतीही कायदेशीर चूक नाही. सेवेत कोणतेही कमतरता नाही. तसेच प्रस्ताव पाठविला होता याबाबतचे कोणतेही कागदपत्रे तक्रारदारने मे.मंचात दाखल केलेले नाहीत. सबब सदरचा अर्ज खर्चासहित रदृ करावा अशी मागणी केलेली आहे.
७. तक्रारदार यांची तक्रार, सामनेवाला यांचे खुलासे व दाखल कागदपत्रे पाहता व युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुददे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुददे निष्कर्ष
१. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय
२. तक्रारदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे
३. आदेशकाय? खालीलप्रमाणे
विवेचन
८. मुद्दा क्र.१- तक्रारदार यांची मुख्य तक्रार अशी आहे की, तक्रारदार यांनी त्यांचे पती कै.पुंडलिक देसले हे दि.२३/०८/२०१२ रोजी अपघातात मयत झालेने शेतकरी अपघात विमा योजनेनुसार विमा रक्कम मिळणेसाठी तहसिलदार सो. यांचे मार्फत सामनेवाला विमा कंपनीकडे मुदतीत प्रस्ताव पाठविला. तरीही विमा दावा प्राप्त झालेला नाही. हया कारणाने तक्रारदारचा विमा दावा नाकारलेला आहे.
विमा कंपनीने आपल्या खुलाश्यात अशाप्रकारचा कोणताही प्रस्ताव विमा कंपनीकडे आलेला नाही. तक्रारदारचे पती मयत पुंडलिक हा शेतकरी आहे याबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. असे नमुद केलेले आहे. तसेच कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांनीही आपल्या खुलाश्यातही सदरील प्रस्ताव त्यांना प्राप्त झालेला नाही असे नमुद केलेले आहे.
९. याबाबत आम्ही तक्रारदारने दाखल केलेल्या कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारदारने नि.५/८ वर विमा योजना प्रस्तावाची प्रत दाखल केलेली आहे. सदर प्रस्तावावर तहसिलदार कार्यालयास सदर प्रस्ताव मिळाल्याबाबत पोच आहे. सदर प्रस्तावावर दि.२९/०८/२००८ ही तारीख नमुद आहे. तसेच नि.१२/५ वर कबाल इन्शुरन्स सर्व्हिसेस यांचे दि.१५/०९/२००८ चे पत्र दाखल आहे. सदरचे दोन्ही पत्र पाहता तक्रारदार यांनी विमा प्रस्ताव मुदतीत सादर केलेला होता हे सिध्द होत आहे. तसेच शेतकरी अपघात विमा योजनेच्या परिपत्रकाचे अवलोकन केल्यानंतर हे स्पष्ट होते की विमा कंपनीला विमा प्रस्ताव परिपूर्ण मिळावा यासाठी तहसिलदार, कृषि अधिकारी, कबाल इन्शुरन्स यांची सेवा घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर प्रस्ताव तहसिलदार यांच्याकडे प्राप्त झाल्यानंतर तो विमा कंपनीस प्राप्त झाला असे समजले जाते. त्यामुळे विमा प्रस्ताव मिळाला नाही असे म्हणता येणार नाही असे आम्हांस वाटते.
यावरून विमा कंपनीने तक्रारदारास विमा दावा नाकारून सेवेत त्रृटी केली आहे, या मतास आम्ही आलो आहोत म्हणून मुदृा क्र.१ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
१०. मुद्दा क्र.२ - तक्रारदार यांनी सामनेवाला यांच्याकडून विम्याची रक्कम रू.१,००,०००/- त्यावर दि.२३/०८/२००८ पासून द.सा.द.शे.१८% प्रमाणे व्याज तसेच मानसिक आर्थिक व शारिरिक त्रासापोटी रू.५०,०००/- तक्रार अर्जाचा खर्च रू.५०००/- वरील दोन्ही रकमेवर द.सा.द.शे. १८% प्रमाणे व्याज मिळावा अशी मागणी केली आहे.
कबाल इन्शुरन्स यांनी मा.राज्य आयोग अपील क्र.१११४/०८ कबाल इन्शुरन्स विरूध्द सुशिला सोनटक्के हा न्यायिक दृष्टांत दाखल केला आहे व ते रक्कम देण्यास जबाबदार नाहीत असे म्हटले आहे. आम्ही सदर निकालपत्राचे बारकाईने अवलोकन केले आहे. त्यात मा.राज्य आयोग यांनी कबाल इन्शुरन्स सर्व्हीसेस यांना पॉलिसीची रक्कम देण्यास जबाबदार ठरविता येणार नाही असे तत्व वीषद केले आहे. त्यामुळे विरुध्द पक्ष क्र.२ यांच्या विरुध्द रक्कम देण्याचा आदेश करता येणार नाही.
शेतकरी अपघात विमा योजना परिपत्रकानुसार शेतक-यांचा विमा प्रस्ताव परिपूर्णरितीने विमा कंपनीस मिळावा यासाठी सामनेवाला क्र.१ यांची सेवा घेण्यात आलेली असल्याने सामनेवाला क्र.१ यांच्या विरूध्द ही रक्कम देण्याचा आदेश करता येणार नाही.
आमच्या मते तक्रारदार हे सामनेवाला क्र.३ विमा कंपनीकडून विमा रक्कम रू.१,००,०००/- व त्यावर विमा दावा नाकारल्याचा दि.२१/११/२०१२ पासून सदर रकमेवर द.सा.द.शे. ९% दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रू.३०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.२०००/- मिळण्यास पात्र आहेत
११. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरून आम्ही खालीलप्रमाणे ओदश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत आहे.
२. सामनेवाला दि. ओरिएंटल विमा कंपनी लि. यांनी तक्रारदारास रक्कम रू.१,००,०००/- व त्यावर दि. २१/११/२०१२ पासून द.सा.द.शे. ९% दराने व्याज या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाचे आत दयावे.
३. सामनेवाला दि. ओरिएंटल विमा कंपनी लि. यांनी मानसिक त्रासापोटी रक्कम रू.३०००/- व तक्रार अर्जाचा खर्च रू.२०००/- या आदेशाच्या दिनांकापासून ३० दिवसाच्या आत दयावेत.
धुळे.
दि.३०/०९/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.