निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 31/12/2010 तक्रार नोदणी दिनांकः- 06/01/2011 तक्रार निकाल दिनांकः- 14/07/2011 कालावधी 06 महिने 08 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. कमलबाई भ्र.आंबादास पवार. अर्जदार वय 38 वर्ष.धंदा. घरकाम. अड.अरुण डी.खापरे. रा.गडदगव्हाण तांडा. ता.जिंतूर जि.परभणी. विरुध्द 1 तहसिलदार साहेब, गैरअर्जदार. तहसिल कार्यालय,जिंतूर. ता.जिंतूर जि.परभणी. 2 तालुका कृषी अधिकारी. प्रतिनिधी. कृषी अधिकारी कार्यालय,जिंतूर. ता.जिंतूर जि.परभणी. 3 विभागीय व्यवस्थापक. कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हिसेस प्रा.लि. भास्करायन, एच.डी.एफ.सी.होमलोन बिल्डींग. प्लॉट नं.7,सेक्टर ई-1, टाऊन सेंटर सिडको.औरंगाबाद.431 003. 4 व्यवस्थापक, अड.जी.एच.दोडिया. रिलायंस जनरल इन्शुरन्स कं.लि. 570,रेटी फायर हाउस,इन्दुरी जिन इलेक्ट्रीक. नायगम क्रॉस रोड, नेक्सट टू रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट, वडाळा वेस्ट,मुंबई. ------------------------------------------------------------------------------------ कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष. ) अर्जदारास शेतकरी अपघात विमा योजना अंतर्गत देण्यात येणारी नुकसान भरपाई नाकारुन त्रुटीची सेवा दिल्याबद्दल गैरअर्जदारां विरुध्द अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार टाकळी गडदगव्हाण तांडा ता.जिंतूर येथील रहिवासी असून तीचा पती मयत आंबादास पवार हा खातेदार शेतकरी होता त्याच्या मालकीची गट क्रमांक 42 ही शेतजमिन आहे. दिनांक 22/09/2007 रोजी तो मोटार सायकल वरुन जात असताना समोरुन येणा-या बस क्रमांक MH.20 / D 6286 ने धडक दिल्यामुळे जबर जख्मी झाला. दवाखान्यात उपाचार घेत असताना त्याचे निधन झाले. सरकारी दवाखान्यात प्रेताचे पोष्टमार्टेम केले. अर्जदाराने त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पतीच्या अपघाती मृत्यूची शेतकरी विम्याची नुकसान भरपाई रुपये एक लाख मिळण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रासह तारीख 04/12/2007 रोजी क्लेम दाखल केला. परंतू बरेच दिवस मंजूरीविना प्रकरण विमा कंपनीने रखडले ठेवले त्यानंतर तारीख 20/03/2009 च्या पत्राव्दारे गैरअर्जदारास क्रमांक 3 ने काही कागदपत्रांची मागणी केली त्याचीही अर्जदाराने पुर्तता तारीख 28//05/2009 रोजी केली तरी देखील नुकसान भरपाई मिळाली नाही.अशारीतीने गैरअर्जदारानी सेवा त्रूटी करुन नुकसान भरपाई मिळणे पासून वंचीत ठेवले आहे म्हणून अर्जदाराने ग्राहक मंचात प्रस्तूतचा तक्रार अर्ज दाखल करुन गैरअर्जदार विमा कंपनीकडून विम्याची नुकसान भरपाई रु.1,00,000/- द.सा.द.शे. 18 % व्याजासह मिळवी याखेरीज मानसिक त्रासापोटी रुपये 25000/- व तक्रार अर्जाचा खर्च रुपये 5000/- मिळावा अशी मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारीसोबत शपथपत्र (नि.2) आणि पुराव्यतील कागदपत्रात नि. 4 लगत एकूण 26.कागदपत्र दाखल केले आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदारांना मंचातर्फे नोटीसा पाठविल्यावर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी नोटीसा स्विकारुनही नेमलेल्या तारखेस हजर राहून आपले म्हणणे सादर न केल्यामुळे त्यांचेविरुध्द दिनांक 08/04/2011 रोजी एकतर्फा हुकूम करण्यात आला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने पोष्टामार्फत पाठवलेले लेखी म्हणणे प्रकरणात दिनांक 16.02.2011 रोजी नि. 10 ला समाविष्ट करण्यात आले. गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपला लेखी जबाब नि. 24 दिनांक 25.03.2011 रोजी सादर केला. गैरअर्जदार क्रमांक 3 ने त्यांच्या लेखी जबाबात (नि.10) असे निवेदन केले आहे की, शासनातर्फे उतरविलेल्या शेतकरी अपघात विमा क्लेम मधील कागदपत्रांची छाननी करुन व संबधीताकडून आवश्यक ती पूर्तता करुन घेण्यासाठी व मंजूरीसाठी विमा कंपनीकडे पाठविण्यासाठी शासनाने त्याना मध्यस्थ सल्लागार म्हणून नेमलेले आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ते कोणताही मोबदला घेत नाहीत किंवा त्यांचेकडून विम्याचा हप्ताही स्विकारला जात नाही. मयत आंबादास पवार याच्या डेथ क्लेमची कागदपत्रे त्याना 11/12/2007 रोजी मिळाले त्यामध्ये काही आवश्यक कागदपत्रे नव्हती त्या अपू-या कागदपत्रात फेरफार उतारा, न.नं.6-क चा उतारा, इन्क्वेस्ट पंचनामा, ड्रायव्हींग लायसन्स, आर.सी.बुक, पाठवले नसल्यामुळे त्याची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराला दिनांक 29.01.2008 रोजी कळविले होते त्यानंतर तारीख 10.04.2008 तारीख 21/05/2008 तारीख 10/11/2008 रोजी स्मरणपत्र पाठविली. शिवाय विमा कंपनीने ही दिनांक 23.06.2010 च्या पत्राव्दारे कागदपत्रांची मागणी करुनही अर्जदाराने पूर्तता केली नाही म्हणून विमा कंपनी ने 24.11.2010 च्या पत्राव्दारे प्रकरण मंजूरी विना बंद केले. सबब त्याना प्रकरणातून वगळण्यात यावे अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबासोबत विमा कंपनीचे दिनांक 23.06.2010 चे पत्र तसेच तारीख.21.05.2008, तारीख 30.07.2008, तारीख 10.11.2010 वगैरेच्या स्मरणपत्रांच्या छायाप्रती ( नि.11 ते 19 ) दाखल केल्या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 4 ने आपल्या लेखी जबाबात ( नि.24) अर्जदाराच्या तक्रार अर्जातील सर्व विधाने साफ नाकारुन मयत आंबादास पवार याच्या शेतकरी विमा क्लेम संबंधी कोणतीही कागदपत्रे त्यांचेकडे आलेली नाहीत.त्यामुळे नुकसान भरपाई मंजूर करण्याचा प्रश्नच उदभवत नाही.त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळण्यात यावी असे सुरवातीला नमुद केले आहे.याउलट पुढे असाही खुलासा केला आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 व 3 यानी अर्जदाराला पत्र व स्मरणपत्रे पाठवूनही त्याचेकडून मागणी केलेल्या कागदपत्रांची पूर्तता झाली नाही त्यामुळे नाइलजाने क्लेम दिनांक 24.11.2010 रोजी नामंजूर करावा लागला असे त्यांचे म्हणणे आहे. अर्जदाराला त्याबाबत पून्हा तक्रार करण्यास कोणतेही कायदेशीर कारण घडलेले नाही.तक्रार अर्जातील शेतकरी विमा संदर्भाचा मजकूर वगळता बाकीची सर्व विधाने त्यांनी साफ नाकारली आहेत. सबब तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी निवेदनाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 4 चे शपथपत्र (नि. 25) दाखल केले आहे. तक्रारीत दाखल केलेले कागदपत्रे व संबंधीत वकिलांच्या युक्तीवादावरुन निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदार क्रमांक 4 ने अर्जदाराचे मयत पतीच्या अपघाती निधनाची विमा नुकसान भरपाई रुपये 100000/- देण्याचे दिनांक 24.11.2010 चे पत्रातून बेकायदेशीररित्या नाकारुन सेवा त्रूटी केली आहे काय ? होय 2 निर्णय? अंतिम आदेशा प्रमाणे. कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराचा पती मयत आंबादास गणानाईक पवार शेतकरी अपघात विमा पॉलीसीचा लाभार्थी होता हे अर्जदाराने पुराव्यात सादर केलेल्या कागदपत्रातील नि. 4/22 वरील शेत जमिनीचा 7/12 उतारा, नि.4/23 वरील होल्डींग प्रमाणपत्र, (नमुना क्रमांक 8-अ चा उतारा ) नि. 4/11 वरील फेरफार, नि. 4/21 वरील तलाठयाचे प्रमाणपत्र या कागदपत्रातील नोंदीतून शाबीत झाले आहे. दिनांक 22.09.2007 रोजी मयत आंबादास पवार याचा मोटार सायकल अपघातात मृत्यू झाला होता ही वस्तूस्थिती देखील पुराव्यात दाखल केलेल्या नि. 4/13 वरील परभणी ग्रामीण पो. स्टे. गु.र.नं. 176/07 मधील एफ.आय.आर,नि. 4/13 वरील घटनास्थळाचा पंचनामा, नि.4/15 वरील मरणोत्तर पंचनामा, नि.4/16 वरील ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे मयताचे पोस्टमार्टेम केलेला रिपोर्ट या कागदपत्रातून शाबीत झाले आहे. मयत आंबादास पवार हा शेतकरी वैयक्तिक अपघात विम्याचा लाभार्थी असल्यामुळे त्याच्या अपघाती मृत्यूची नुकसान भरपाई रुपये 100000/- मिळणेसाठी. अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रासह गैरअर्जदार क्रमांक 1 यांचेकडे तलाठ्या मार्फत नुकसान भरपाई क्लेम दाखल केलेला होता हे नि.4 लगत दाखल केलेल्या क्लेम फॉर्मसह सर्व कागदपत्रांचे अवलोकन करता व शपथपत्रातील कथनावरुन स्पष्ट दिसते.शासन परिपत्रकात दिलेल्या यादी प्रमाणे आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह क्लेम फॉर्म भरुन गैरअर्जदार क्रमांक 1 कडे दिला असताना तहसिलदार आणि कृषी अधिकारी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना तारीख 21/05/2008, तारीख 30/09/2008, तारीख 10/11/2008 व शेवटी तारीख 20/03/2009 रोजी अर्जदाराकडून काही कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत कळविले होते हे शाबीत करण्यासाठी गैरअर्जदार क्रमांक 4 तर्फे पुराव्यात नि.12 ते नि.18 व स्मरणपत्रांच्या कॉपीज दाखल केलेल्या आहेत.नि.4/24वरील तारीख 20/03/2009 शेवटच्या स्मरणपत्रात ज्या कागदपत्रांची मागणी केलेली होती त्यामध्ये 1) क्लेम फॉर्म 2) तहसिलदार प्रमाणपत्र 3) 7/12 उतारा 4) मृत्यू प्रमाणपत्र 5) वयाचा दाखला 6) पोलिस एफ आय.आर. 7) घटनास्थळ पंचनामा 8) पी.एम.रिपोर्ट 9) ड्रायव्हींग लायसेन्स ही कागदपत्रे पाठविण्याबाबत वेळोवेळी स्मरणपत्रे देवूनही त्यानी कागदपत्राची पूर्तता केली नाही असे गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यानी आपल्या लेखी जबाबात बचाव घेतलेला आहे तो चुकीचा व खोटा असल्याचे अर्जदाराने पुराव्यात नि. 27 व नि 28 वर दाखल केलेल्या मंडल कृषी अधिकारी आडगाव व तालुका कृषी अधिकारी जिंतूर (गैरअर्जदार क्रमांक 1) यानी दिनांक 06.06.2009 रोजी जिल्हा कृषी अधिक्षक यांचेकडे मयत आंबादास पवार याच्या डेथ क्लेम सोबत पाठविलेल्या कागदपत्रांच्या सविस्तर तपशीलाची यादीसह कव्हरींग लेटरची (नि.27/1, 27/2) सर्टीफाइट कॉपी दाखल केलेली आहे तीचे बारकाईने अवलोकन केले असता गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे शेवटचे दिनांक 20/03/2009 च्या (नि.4/24) च्या स्मरणपत्रातून केलेल्या कागदपत्राची मागणीप्रमाणे केलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता अर्जदाराने केलेली होती हे स्पष्ट दिसते.त्यानुसार ती सर्व कागदपत्रे जिल्हा कृषी अधिका-यानी क्लेम फॉर्मसह ती सर्व कागदपत्रे गैरअर्जदार क्रमांक 3 कडे नक्कीच पाठविली असलीच पाहीजेत याबद्यल तिळमात्र ही शंका वाटत नाही. पुराव्यात दाखल केलेल्या संबंधीत कागदपत्रांच्या छायाप्रती वरुनही हे सिध्द झालेली असल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 व 4 यानी कागदपत्रांची अर्जदाराकडून पूर्तता झाली नाही असे खोटे निवेदन केवळ नुकसान भरपाई देण्याचे टाळण्यासाठीच केले असले पाहीजे यापेक्षा वेगळा निष्कर्ष निघूच शकत नाही.गैरअर्जदार क्रमांक 4 कंपनीने सादर केलेल्या लेखी जबाबातील पहिल्या परिच्छेदामध्ये अर्जदाराच्या मयत पतीच्या क्लेमची काणेतीही कागदपत्रे त्यांचेकडे आलेली नाहीत त्यामुळे नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उदभवत नाही असे केले आहे या उलट निवेदन करुन त्याच परिच्छेदा मध्ये पुढे असे म्हणतात की,अर्जदाराच्या मयत पतीच्या क्लेमची कागदपत्रे मिळाली,परंतु त्यामध्ये अपूर्णता होती म्हणून वेळोवेळी स्मरणपत्रे पाठवली असे अगदी विरुध्द टोकाचे कथन केलेले असलयामुळे घेतलेल्या बचावात मुळीच खरेपणा वाटत नाही.प्रस्तूत प्रकरणात आपल्या लेखी जबाबात खोटा व चुकीचा बचाव घेवून मंचाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे असे खेदाने म्हणावे लागते. अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेली आवश्यक ती सर्व कागदपत्रे दिलेली असताना गैरअर्जदार क्रमांक 4 यानी अर्जदाराच्या विमा क्लेम दिनांक 24.11.2010 रोजीच्या पत्राव्दारे बेकायदेशीररित्या नामंजूर करुन अर्जदारावर अन्याय केलेला आहे याबाबतीत गैरअर्जदार क्रमांक 4 कडून निश्चतीपण सेवा त्रूटी झालेली आहे. सबब मुद्या क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदार क्रमांक 4 यानी अर्जदाराचा मयत पती आंबादास पवारच्या डेथ क्लेम ची नुकसान भरपाई रुपये 100000/- ( रुपये एक लाख फक्त ) आदेश तारखेपासून 30 दिवसाचे आत द.सा.द.शे. 9 % दराने क्लेम नाकारले तारखेपासून म्हणजे दिनांक 24.11.2010 पासून व्याजासह द्यावी. 2 याखेरीज मानसिक त्रास व सेवा त्रूटीबद्यल रुपये 1000/- व अर्जाचा खर्च रुपये 1000/- आदेश मुदतीत द्यावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरावाव्यात सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |