जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
तक्रार क्रमांक 937/2010
तक्रार दाखल तारीखः- 12/07/2010
तक्रार निकाल तारीखः- 05/12/2012
1. सुलभा उमाकांत पाटील, ..........तक्रारदार
उ व 28 धंदा शेती,
रा.तामसवाडी ता.रावेर ता.यावल जि.जळगांव.
विरुध्द
1. तहसिलदार, ..........विरुध्दपक्ष.
तहसील कार्यालय रावेर,
ता.रावेर जि.जळगांव.
2. तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय,रावेर,
ता.रावेर जि.जळगांव.
3. व्यवस्थापक,
कबाल इन्शरन्स प्रा.लि
4 अ, देहमंदीर सोसायटी,श्रीरंगनगर,
माईलेले श्रवण विकास महाविद्यलयाजवळ,
पंपीग स्टेशन रोड, नाशिक.
4. डिव्हीजनल मॅनेजर,
ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि,
डिव्हीजन ऑफिस नं. 2,
8, हिंदुस्थान कॉलनी,नेरआंजन चौक,
फरदा रोड, नागपुर.
कोरम –
श्री. डी.डी.मडके अध्यक्ष.
सौ.एस.एन.जैन. सदस्या.
--------------------------------------------------
तक्रारदार तर्फे अड.एस.टी.पवार.
सामनेवाला तर्फे अड.एस.बी.अग्रवाल.
नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके,अध्यक्ष - तक्रारदार यांना विमा पॉलिसीनुसार विम्याचे लाभ न मिळाल्याने त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की त्यांचे पती उमाकांत राजेंद्र पाटील हे दि.13/07/2009 रोजी रेल्वे अपघातात मयत झाले. ते शेतकरी होते व त्यांचे नांवावर शेतजमीन होती. महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शेतक-यांच्या हितासाठी शेतकरी अपघात विमा योजना राबवली आहे. त्यानुसार प्रिमीयमची रक्कम शासनाने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि,(यापुढे संक्षिप्ततेसाठी विमा कंपनी असे संबोधण्यात येईल) यांना अदा केली आहे. तक्रारदार यांनी तहसीलदार रावेर यांचे मार्फत क्लेम फॉर्म भरुन पाठवला. त्यानंतर कागदपत्रांची पुर्तताही केली परंतु विमा कंपनीने विम्याचे लाभ दिले नाहीत व सेवेत त्रुटी केली.
3. तक्रारदार यांनी तालुका कृषी अधिकारी रावेर यांच्या मार्फत विमा प्रस्ताव सादर केला. तसेच मागणीनुसार कागदपत्रांची पुर्तताही केली. परंतु त्यांना विम्याचे लाभ देण्यात आले नाहीत व सेवेत त्रुटी केली आहे.
4. तक्रारदार यांनी विमा कंपनीकडुन रक्कम रु.1,00,000/- व त्यावर 18 टक्के दराने व्याज, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व तक्रारअर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती केली आहे.
5. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्टयार्थ, नि.2 वर शपथपत्र तसेच नि.5 वरील कागदपत्रांच्या यादीनुसार 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.5/1 वर अर्ज, नि.5/2 वर मृत्यु प्रमाणपत्र, घटनास्थळ पंचनमा, मरणोत्तर पंचनामा इ. दाखल केला आहे.
6. विरुध्दपक्ष क्र. 1 हे हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला.
7. विरुध्दपक्ष क्र.2 यांनी नि. 18 वर आपला खुलासा दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदाराचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता परंतु त्यात त्रुटी असल्यामुळे त्याची पुर्तता करणेबाबत तक्रारदारास कळवणेत आल्यानंतरही त्यांनी पुर्तता केली नाही. त्यामुळे प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी पाठवणेत आला नाही.
8. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी आपल्या म्हणण्यासोबत नि.18/2 वर तक्रारदार यांना पाठवलेल्या पत्राची प्रत, कृषी अधिकारी यांचे पत्र इ.कागदपत्रे दाखल केली आहेत.
9. विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी नि.7 वर पत्र देऊन कागदपत्रांची मागणी केली. परंतु कागदपत्रे संचीकेत असतांना खुलासा सादर केला नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द विना खुलासा प्रकरण चालवण्याचा आदेश करण्यात आला.
10. विमा कंपनीने आपला खुलासा नि.11 वर दाखल करुन तक्रारदाराची तक्रार, त्यातील म्हणणे व मागणे खोटे आहे म्हणुन तक्रार रद्य करावी अशी विनंती केली आहे.
11. विमा कंपनीने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार यांचा प्रस्ताव विमा कंपनीकडे प्राप्त नाही. त्यामुळे सेवेत त्रुटी केली हे म्हणणे चुकीचे आहे.
12. विमा कंपनीने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयार्थ नि.13 वर शपथपत्र दाखल केले आहे.
13. तक्रारदार यांची तक्रार, शपथपत्र, त्यांनी दाखल कागदपत्रे पाहिल्यानंतर आमच्या निष्कर्षासाठी खालील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार यांचा विमा प्रस्ताव प्रलंबीत ठेवुन विरुध्दपक्ष
यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय? नाही.
2. आदेश काय? खालीलप्रमाणे
14. मुद्या क्र. 1 - तक्रारदार यांचे पती उमांकात राजेंद्र पाटील यांचा रेल्वे अपघातात मृत्यु झाला आहे व ते शेतकरी होते याबद्यल वाद नाही. त्यांनी विमा प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांचेकडे दि.17/09/2009 रोजी दाखल केला होता हे कृषी अधिकारी यांनी आपला खुलासा नि.18 मध्ये मान्य केलेले आहे. परंतु त्यात त्रुटी असल्यामुळे त्यांनी तक्रारदारास दि.05/12/2009 रोजी पत्र देउन 1) वारस तक्ता तलाठी कडील 2) मृत्य दाखला मुळ प्रत 3) घटनास्थळ पंचनामा 4) लाभार्थी बँक पासबुक झेरॉक्स ची पुर्तता करणेबाबत तक्रारदारास कळवले होते. सदर त्रुटींची पुर्तता तक्रारदाराने केली नाही त्यामुळे प्रस्ताव प्रलंबीत आहे असे त्यांनी म्हटले आहे. तक्रारदार यांनी तक्रारअर्जात कागदपत्रांची पुर्तता केली आहे असे म्हटले आहे परंतु त्याबाबत पुरावा दिलेला नाही. विमा कंपनीने प्रस्ताव मिळालेला नाही त्यामुळे सेवेत त्रुटी केलेली नाही असे म्हटले आहे. या परिस्थीतीत विरुध्दपक्ष यांनी सेवेत त्रुटी केली हे तक्रारदाराचे म्हणणे मान्य करता येणार नाही. त्यामुळे मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहेत.
15. मुद्या क्र. 2 – तक्रारदार यांनी कृषी अधिकारी यांचे पत्र दि.05/12/2009 नि.18/2 नुसार कागदपत्रांची पुर्तता केलेली नसल्यामुळे त्यांचा दावा प्रलंबीत आहे असे दिसुन येते. दाखल कागदपत्रे पाहता कै.उमाकांत पाटील हे शेतकरी होते याबाबत 7/12 हक्काचे पत्रकावरुन दिसुन येते. तसेच त्यांचा अपघाती मृत्यु झाल्याचे फिर्याद,घटनास्थळ पंचनामा इ, वरुन स्पष्ट आहे. त्यांचे दि.01/01/2007 रोजी 31 वर्ष वय होते हे निवडणुक आयोगाच्या ओळखपत्रावरुन स्पष्ट आहे. त्यामुळे ते शेतकरी अपघात विमा योजनेनुसार रक्कम मिळण्यास पात्र आहेत असे दिसुन येते. परंतु प्रस्तावच विमा कंपनीस कागदपत्रांच्या त्रुटीमुळे पाठवणेत आलेले नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी या आदेशापासुन 30 दिवसांचे आंत कागदपत्रांची पुर्तता करावी व कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर विमा कंपनीकडे पाठवावा व विमा कंपनीने प्रस्ताव मिळाल्यानंतर 30 दिवसांचे आंत त्यावर निर्णय घ्यावा असा आदेश करणे आम्हास योग्य व न्यायाचे वाटते.
आदेश.
1. तक्रारदार यांनी या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आत 1) वारस तक्ता तलाठी कडील 2) मृत्य दाखला मुळ प्रत 3) घटनास्थळ पंचनामा 4) लाभार्थी बँक पासबुक झेरॉक्सची प्रत ही कागदपत्रे कृषी अधिकारी यांचेकडे सादर करावीत.
2. तक्रारदार यांनी आदेश क्र. 1 नुसार कागदपत्रे दिल्यानंतर कृषी अधिकारी यांनी सदर प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवावा.
3. आदेश क्र. 2 नुसार प्रस्ताव मिळाल्यानंतर विमा कंपनीने 30 दिवसांचे आंत त्यावर निर्णय घेऊन तक्रारदारास कळवावा.
4. तक्रारदार यांना आदेश क्र. 3 मान्य नसल्यास ग्राहक मंचात दाद मागण्याचा हक्क राहील.
5. तक्रारदार व विरुध्दपक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सौ.एस.एस.जैन ) (श्री.डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव