(घोषित दि. 21.02.2012 व्दारा श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्या)
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात अशी आहे की,
तक्रारदारांचे पती श्री. शिवाजी चव्हाण हे दिनांक 20.06.2006 रोजी अंगावर वीज पडून झालेल्या अपघातात मृत्यू पावले. सदर अपघाता बाबत एफ.आय.आर. क्रमांक 13/2008 ची नोंद करण्यात आली. मयताचे प्रेत पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले.
तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 यांचेकडे दिनांक 09.08.2006 रोजी दाखल केला. परंतू अद्याप पर्यंत नूकसान भरपाईची रक्कम मिळाली नाही. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 1 यांनी दिनांक 24.10.2011 रोजी लेखी म्हणणे दाखल केले असून, गैरअर्जदार 1 यांच्या लेखी म्हणण्यानूसार सदरील तक्रारदारांच्या माध्यमातून गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे पाठवला असता, सदरील दावा पात्र/अपात्र ठरविण्याचा अधिकार या कार्यालयास नाही. सदरील दावा विमा कंपनीच्या स्तरावर प्रलंबित असून दाव्याची रक्कम गैरअर्जदार 2 विमा कंपनीच्या माध्यमातून तक्रारदारांना देण्यात येणार आहे.
सदर प्रकरणात गैरअर्जदार 2 हजर झालेले असून लेखी म्हणणे दिनांक 24.01.2012 रोजी दाखल केले आहे. गैरअर्जदार 2 यांच्या लेखी म्हणण्यानूसार तक्रारदारांचा विमा प्रस्ताव गैरअर्जदार 2 यांच्या कार्यालयात प्राप्त झालेला नाही.
तक्रारदारांची तक्रार, दाखल कागदपत्र, गैरअर्जदार 1 व 2 यांचे लेखी म्हणणे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदारांचे विद्वान वकील श्री.आर.व्ही.जाधव, गैरअर्जदार 2 यांचे विद्वान वकील श्री.पी.एम.परिहार यांचा युक्तीवाद ऐकला.
तक्रारदारांचे पती शिवाजी चव्हाण हे वीज अंगावर पडून झालेल्या अपघातात दिनांक 20.06.2006 रोजी मृत्यू पावले. तक्रारदारांनी पतीच्या नूकसान भरपाईची रक्कम रुपये 1,00,000/- मिळण्याकरीता शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार 1 यांचेकडे दिनांक 09.08.2008 रोजी आवश्यक कागदपत्रासह दाखल केला. परंतू अद्याप पर्यंत नूकसान भरपाईची रक्कम मिळली नाही. अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
गैरअर्जदार 1 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांचा प्रस्ताव गैरअर्जदार 1 यांचेकडे दाखल केला आहे.तक्रारदारांच्या माध्यमातून गैरअर्जदार 2 यांचेकडे दाखल केलेला प्रस्ताव गैरअर्जदार 2 यांचेकडे प्रलंबित आहे. गैरअर्जदार 1 यांनी तक्रारदारांचा प्रस्ताव कोणत्या तारखेस कार्यालयास प्राप्त झाला व कोणत्या तारखेस सदर प्रस्ताव पूढील कार्यवाहीस्तव गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे पाठवल्याबाबत माहिती दिली नाही. गैरअर्जदार 1 यांनी संदीग्ध खूलासा दाखल केल्याचे दिसून येते. तक्रारदारांचा प्रस्ताव कोणत्या तारखेस दाखल झाला ? कोणत्या तारखेस विमा कंपनीकडे पाठविण्यात आला या बाबत माहिती दिलेली नाही. गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा प्रस्ताव त्यांना मिळालाच नाही असे स्पष्टपणे सांगितलेले असल्यामुळे विमा कंपनीला विमा प्रस्ताव प्राप्त झाला होता हे सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारावर होती. परंतू तक्रारदाराने विमा प्रस्ताव विमा कंपनीला मिळाल्याबाबत कोणताही पुरावा दिलेला नाही. गैरअर्जदार 2 यांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांचा प्रस्ताव त्यांचे कार्यालयास प्राप्त झालेला नसल्यामूळे प्रस्तावावर कार्यवाही झालेली नाही.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजने अंतर्गत दाखल केलेल्या क्लेम फॉर्मचे अवलोकन केले असता सदरचा प्रस्ताव गैरअर्जदार 1 यांचेकडे दाखल केल्याबाबत सदर कार्यालयास प्राप्त झाल्याबाबत दिसून येत नाही. तसेच गैरअर्जदार 1 यांनी गैरअर्जदार 2 विमा कंपनीकडे सदरचा प्रस्ताव पाठवल्याबाबतचा कोणताही पुरावा न्याय मंचासमोर दाखल केला नाही. त्याच प्रमाणे तक्रारदारांनी सदर प्रस्ताव गैरअर्जदार 2 यांचेकडे पाठवल्याबाबतचा पुरावा न्याय मंचासमोर दाखल केला नाही.
तक्रारदारांनी सदर योजने अंतर्गत विमा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे दाखल केल्याची बाब पुराव्यानिशी सिध्द् केलेली नाही. तक्रारदारांचा प्रस्ताव गैरअर्जदार यांचेकडे दाखल केलेला नसल्यामूळे प्रस्तावावर कार्यवाही झालेली नाही. अशा परिस्थितीत गैरअर्जदार यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही. असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब न्याय मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.