जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 936/2010
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-12/07/2010.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 30/11/2013.
विजुबाई नामदेव चौधरी,
उ.व.सज्ञान, धंदाः शेती,
रा.दुसखेडा,ता.यावल,जि.जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. तहसिलदार,
तहसिल कार्यालय,यावल,ता.यावल,जि.जळगांव.
2. तालुका कृषी अधिकारी,
तालुका कृषी कार्यालय, यावल,
ता.यावल,जि.जळगांव.
3. व्यवस्थापक,
कबाल इंन्शुरन्स प्रायव्हेट लि,
4 अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंगनगर,
माईलेले श्रवण विकास महाविद्यालयाजवळ,
पंपींग स्टेशन रोड,नाशिक.
4. डिव्हीजनल मॅनेजर,
ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि,
डिव्हीजन ऑफीस नं.2,
8, हिंदुस्थान कॉलनी, नेरआंजन चौक,फरदा रोड,
नागपूर. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.सतीश तुकाराम पवार वकील.
विरुध्द पक्ष 1 एकतर्फा.
विरुध्द पक्ष क्र.2 व 3 तर्फे प्रतिनिधी.
विरुध्द पक्ष क्र.4 तर्फे श्री.एस.बी.अग्रवाल वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत विमाधारक मृत्यु झाल्यानंतर त्याचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन दिलेल्या सेवेतील त्रृटी दाखल प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदाराचे पती नामदेव श्रावण चौधरी यांचे दि.17/03/2009 रोजी अपघाती अपघाती निधन झाले. मयत नामदेव श्रावण चौधरी यांचे नावावर मौजे दुसखेडा, ता.यावल, जि.जळगांव येथे शेती होती व ते शेती वहीवाटदार होते. शासन निर्णय क्र.एनएआयएस 1204/सी आर 166/11-अ दि.5 जानेवारी,2005 नुसार शेतक-याचा अपघाती मृत्यु झाल्यास रु.1,00,000/- नुकसान भरपाई विरुध्द पक्षाने द्यावायाची आहे. तक्रारदार हिने योग्य त्या कागदपत्रांसह विमा रक्कम मागणीसाठी तालुका कृषी अधिकारी, यावल यांचेमार्फत फॉर्म भरुन पाठविला असता तसेच विरुध्द पक्षाचे मागणीनुसार कागदपत्र पुरविले असतांनाही विमा कंपनीने तक्रारदारास विमा रक्कम देण्याचे नाकारुन सदोष सेवा दिलेली आहे. सबब विमा क्लेमपोटी रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- तसेच मंजुर रक्कमेवर द.सा.द.शे.18 टक्के प्रमाणे व्याज मिळावे व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी याकामी हजर होऊन म्हणणे दाखल केले नसल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. विरुध्द पक्ष क्र.2 याकामी हजर होऊन शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई मिळणेचा प्रस्ताव या कार्यालयाचे पत्र जा.क्र.तालुका/तंत्र/शेअवियो/1210/09,यावल दि.10/06/2009 अन्वये जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,जळगांव यांचे कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी सादर केलेला आहे असे लेखी म्हणण्यातुन कळविलेले आहे.
5. विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होऊ शकत नाहीत. ज्या विमा कंपनीने राज्य शासनाकडुन विमा प्रिमियम स्विकारुन जोखीम स्विकारलेली आहे त्यांचेच तक्रारदार ग्राहक होऊ शकतात. विरुध्द पक्ष हे केवळ मध्यस्थ व सल्लागार म्हणुन विनामोबदला काम करीत आहेत. मयत नामदेव चौधरी, गांव दुसखेडा,ता.यावल याचा अपघात दि.18/2/2009 रोजी झाला व सदरचा विमा प्रस्ताव विरुध्द पक्षाचे कार्यालयास दि.3/12/2009 रोजी प्राप्त झाला. सदरील प्रस्ताव ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनीकडे दि.4/12/2009 रोजी पाठविण्यात आला. वारंवार चौकशी करुनही सदरचा दावा विमा कंपनीकडे प्रलंबीत असल्याचे कथन विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी केलेले आहे.
6. विरुध्द पक्ष क्र.4 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदार व विमा कंपनी दरम्यान कोणताही करार नव्हता, तक्रारदार हे विमा कंपनीचे ग्राहक नाहीत. मयताचा मृत्यु अपघातामुळे झाला याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रार अर्जासोबत दाखल नाही. तक्रारदाराचे पतीचे दि.17/3/2009 रोजी अपघाती निधन झाले हे म्हणणे विरुध्द पक्षास मान्य नाही. मयत हा शेतकरी होता व त्याचेकडे शेतजमीन होती याबाबत तक्रारदार हिने कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही त्यामुळे विमा कंपनी तक्रारदारास काहीएक रक्कम देण्यास जबाबदार नाही. तक्रारदाराच्या दाव्याचे कागदपत्र विमा कंपनीस तक्रारदार व विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 कडुन विमा कराराच्या विहीत मुदतीत प्राप्त झालेले नव्हते तक्रारदार हे विमा कंपनीचे ग्राहक नाहीत. विरुध्द पक्ष विमा कंपनीचे सेवेत कोणतीही सेवा त्रृटी झालेली नाही. वरील कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज रद्य करण्यात यावा व तक्रारदाराने हेतुतः खोटी तक्रार केल्यामुळे विमा कंपनीस तक्रारदाराकडुन रु.25,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी विनंती विरुध्द पक्ष क्र.4 यांनी केलेली आहे.
7. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. तक्रारदार हे विरुध्द पक्षांचे ग्राहक आहेत काय ? होय.
2. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? असल्यास कोणी ? होय, विरुध्द पक्ष क्र.4 यांनी
3. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
8. मुद्या क्र. 1 - तक्रारदार हे विरुध्द पक्षाचे ग्राहक होतात काय,
याबाबत तक्रारदाराने तक्रार अर्जातुन ती मयत नामदेव श्रावण चौधरी यांची पत्नी असल्याचे कथन केलेले आहे. तक्रारदाराचा विमा क्लेम विरुध्द पक्ष क्र. 2 तालुका कृषी अधिकारी यांनी पुढे कृषी अधिका-यांकडे पाठवतांना मुळ दावा व सोबत योग्य त्या सर्व कागदपत्रांसह सादर केल्याचे त्यांचे लेखी म्हणण्यातुन स्पष्ट केलेले असुन त्याची एक प्रत म्हणण्यासोबत जोडली आहे त्याचे बारकाईने अवलोकन करता तहसिलदार, यावल यांनी नामदेव श्रावण चौधरी, दुसखेडा, ता.यावल, जि.जळगांव हे शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजने अंतर्गत समाविष्ट असुन अपघातामुळे प्रपत्र ई तील प्राधान्यक्रमानुसार श्रीमती विजुबाई नामदेव चौधरी हे त्यांचे वारस रु.1,00,000/- एवढया रक्कमेच्या दाव्यास पात्र असल्याचा दाखला दि.22/5/2009 रोजी दिलेला आहे. तसेच सोबत तलाठी दुसखेडा यांनी प्रमाणपत्र दिलेले असुन मयत नामदेव श्रावण चौधरी यांचे नांवे वहीवाटीखाली 4 हे 10 आर जमीन असुन सोबत खातेउतारा जोडल्याचे प्रमाणपत्र दिलेले आहे. तसेच सोबत दाखल गाव हक्काचे पत्रक क्र. 6 मध्ये फेरफार नोंद क्र.655 नुसार दि.17/3/2009 वारसाने नामदेव श्रावण चौधरी हे दि.18/2/2009 रोजी मयत झाल्याने त्यांना मयत वारस श्रीमती विजुबाई नामदे चौधरी, पत्नी या असुन त्यांचे हक्कात गट क्रमांक 10 अ 160 व 161 ही शेतजमीन असल्याचे म्हणजेच, मृत्यु समयी तक्रारदाराचे पती, त्या गटाचे मालक, म्हणुन शेतकरी होते ही बाब स्पष्ट होते. परिणामी ग्रा.सं.कायदा 1986 कलम 2(1) ड ला असलेल्या स्पष्टीकरणा अन्वये नामदेव चौधरी चे वारस म्हणुन तक्रारदार सामनेवाला क्र. 4 यांची ग्राहक ठरते. यास्तव मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
9. मुद्या क्र. 2 - विरुध्द पक्ष क्र.2 यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत नुकसान भरपाई मिळणेचा प्रस्ताव या कार्यालयाचे पत्र जा.क्र.तालुका/तंत्र/शेअवियो/1210/09,यावल दि.10/06/2009 अन्वये जिल्हा अधिक्षक, कृषी अधिकारी,जळगांव यांचे कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी सादर केलेला होता असे लेखी म्हणण्यातुन कळविलेले आहे व सोबत तक्रारदाराचा क्लेम फार्म व सोबत योग्य ती सर्व कागदपत्रांच्या छायाप्रतीही सादर केलेल्या आहेत. विरुध्द पक्ष क्र. 3 हे केवळ मध्यस्थ व सल्लागार म्हणुन विनामोबदला काम करीत असुन त्यांनी त्यांचे लेखी म्हणण्यातुन मयत नामदेव चौधरी, गांव दुसखेडा,ता.यावल याचा अपघात दि.18/2/2009 रोजी झाला व सदरचा विमा प्रस्ताव विरुध्द पक्षाचे कार्यालयास दि.3/12/2009 रोजी प्राप्त झाला. सदरील प्रस्ताव ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनीकडे दि.4/12/2009 रोजी पाठविण्यात आला. वारंवार चौकशी करुनही सदरचा दावा विमा कंपनीकडे प्रलंबीत असल्याचे प्रतिपादन विरुध्द पक्ष क्र. 3 यांनी केलेले आहे. विरुध्द पक्ष क्र. 4 विमा कंपनीने मयताचा मृत्यु अपघातामुळे झाला याबाबत कोणताही कागदोपत्री पुरावा तक्रार अर्जासोबत दाखल नाही असा प्रमुख आक्षेप घेऊन. तक्रारदाराचे पतीचे दि.17/3/2009 रोजी अपघाती निधन झाले हे कथन त्यांना मान्य नसल्याचे लेखी म्हणण्यातुन स्पष्ट केले आहे.
10. वरील एकंदर विवेचन विचारात घेता विरुध्द पक्ष क्र.1,2 व 3 यांची याकामी तक्रारदाराकडुन विमा क्लेम ची योग्य ती सर्व कागदपत्रे घेऊन क्लेम विमा कंपनीस सादर करण्याची जबाबदारी असल्याचे स्पष्ट होते. विरुध्द पक्ष क्र.2 यांनी याकामी हजर होऊन तक्रारदाराचा विमा क्लेम त्यांचे वरीष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केल्याचे लेखी म्हणण्यासोबतचे तक्रारदाराचे क्लेम फॉर्म व सोबत दाखल कागदपत्रांवरुन पुराव्यानिशी सिध्द केलेले आहे. उपरोक्त क्लेम फॉर्म सोबत दाखल पुरावे पाहता तक्रारदाराचे पती हे शेतकरी असल्याचे शासन यंत्रणेतील जबाबदार अधिकारी तहसिलदार व तलाठी यांनी प्रमाणपत्रे देऊन घोषीत केलेले आहे. तसेच पोष्ट मार्टेम रिपोर्ट मध्ये तक्रारदाराचे पतीचा रेल्वे अपघातात डोक्याला गंभीर स्वरुपाच्या इजा होऊन अपघाती मृत्यु झाल्याचे स्पष्टपणे नमुद आहे. तक्रारदाराने योग्य त्या सर्व कागदोपत्री पुराव्यानिशी विमा क्लेम मिळण्याकरिता दाखल केलेला असतांनाही विरुध्द पक्ष क्र.4 विमा कंपनीने तक्रारदारा सारख्या खेडयात राहणा-या विधवा महीलेचा विमा क्लेम देण्याचे नाकारुन सेवेत अक्षम्य दिरंगाई व सेवा त्रृटी केल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सामनेवाला क्र. 1 ते 3 यांची प्रस्तृत प्रकरणात मर्यादीत व केवळ फॉरर्वडींग एजन्सी म्हणुन भुमिका असल्यामुळे त्यांनी सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 4 च्या पुरता होकारार्थी देत आहोत.
11. मुद्या क्र. 3 - तक्रारदाराने याकामी तक्रार अर्जातुन विमा रक्कम रु.1,00,000/-, मानसिक त्रासापोटी रु.25,000/- अशी एकुण रक्कम रु.1,25,000/- द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह मिळावेत व तक्रार अर्जाचा संपुर्ण खर्च मिळावा अशी विनंती केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराचा विमा क्लेम नाकारुन सेवेत त्रृटी केलेली आहे. परिणामी शासन निर्णयाप्रमाणे रु.1,00,000/- विमा रक्कम मिळण्यास तक्रारदार पात्र ठरतात. कोणतेही संयुक्तीक कारणाशिवाय विमा दावा नाकारल्यामुळे रक्कम रु.1,00,000/- वर विरुध्द पक्ष क्र.4 यांनी प्रस्तुत तक्रार दाखल तारीख 12/07/2010 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याज मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत असे आमचे मत आहे. तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी रु.25,000/- मागणी केली आहे तथापी आमचे मते तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रु.15,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- मिळणेस आमचे मते पात्र आहेत. सबब वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र.4 ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजनेअंतर्गत रक्कम रु.1,00,000/-(अक्षरी रक्कम रु.एक लाख मात्र) तक्रार दाखल दि.12/07/2010 पासुन द.सा.द.शे.9 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
3. विरुध्द पक्ष क्र.4 ओरिएंटल इंन्शुरन्स कंपनी लि यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासा दाखल रु.15,000/- (अक्षरी रक्कम रु.पंधरा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचा खर्च रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 30/11/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.