( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, मा. अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 30 मार्च, 2011 )
यातील सर्व तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रारी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केलेल्या आहेत.
सदरच्या सर्व तक्रारी ह्या वेगवेगळ्या तक्रारदारांनी दाखल केलेल्या असल्या तरी, त्यातील गैरअर्जदार हे समान आहेत आणि या सर्व प्रकरणात तपशिलाचा भाग वगळता बहुतांश वस्तूस्थिती आणि कायदेविषयक मुद्दे हे सुध्दा समान आहेत. म्हणुन या सर्व तक्रारींचा एकत्रितपणे निकाल देण्यात येत आहे.
यातील सर्व तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे :-
प्रस्तुत प्रकरणातील सर्व तक्रारदार हे अनुसुचित जातीत येत असल्यामुळे त्यांना गैरअर्जदार क्रं.1 यांचेकडुन इंदिरा आवास योजना सन 2010-2011 मध्ये घरकुल मंजूर झाले परंतु गैरअर्जदार क्रं.2 ने सिमांकन करुन भुखंडाचा ताबा न दिल्यामुळे तक्रारदारानी या तक्रार मंचात दाखल केल्या आहेत. तक्रारदारांनी गैरअर्जदार यांचेकडे सदर भुखंडाच्या मोजणी करिता रक्कमेचा भरणा केला. गैरअर्जदार यांनी तक्रारदारास दिलेल्या दिनांक 14/12/2010 च्या पत्रात मोजणीसाठी नमुद केलेल्या दिनांक 24/12/2010 रोजी तक्रारदार आवश्यक त्या संपुर्ण सामानासह मोक्यावर हजर झाले. तसेच मोक्यावर इतर लोकही हजर होते. सदर दिवशी तक्रारदाराचे भुखंडाचे मोजणीकरिता मोक्यावर हजर असलेल्या व्यक्तिमध्ये सौ प्रतिभा विलास गिरी, मु.पिंपळा, सौ सरस्वता उमराव वानखेडे, माजी सरपंच पिंपळा, श्री लायनू बारमाटे व प्रकाश येकुणकर या लोकांनी गैरअर्जदार भुमापक अधिकारी यांचेशी वाद घातला त्यामुळे गैरअर्जदार यांनी तक्रारकर्त्यांच्या भुखंडाची मोजणी करुन हद्द कायम (सिमांकन ) करुन दिली नाही. गैरअर्जदार क्रं.1 यांनी ताबा न देऊन तसेच गैरअर्जदार क्रं.2 यांनी सदर भुखंडांची मोजणी करुन हद्द कायम करुन सिमांकन करुन दिले नाही म्हणुन तक्रारकर्त्यांनी सदर तक्रारी दाखल करुन गैरअर्जदाराने मुळ भुमापन क्रं.(सर्व्हे क्रं.) 4, येथील परिशिष्ट-अ मधील नमुद भुखंडाची हद्द कायम करुन ( सिमांकन ) प्रत्यक्ष ताबा द्यावा. तक्रारदारास झालेल्या मानसिक त्रासापोटी 50,000/- प्रत्येकी रुपये व न्यायीक खर्चापोटी 5,000/- रुपये प्रत्येकी मिळावे अशी मागणी केली.
सर्व तक्रारकर्त्यानी आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात तहसिलदाराचे पत्र, मोजणी नोटीस, पैसे भरल्याची पावती,समन्स,वकीलाचा नोटीस, पोस्टाची पावती, पोहोचपावती, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत.
तक्रारदारांनी घेतलेला भुखंड त्याचा तपशील, किंमत, क्ष्ेात्रफळ, इत्यादींचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
परिशिष्ट ‘ अ ‘
तक्रार क्रमांक |
तक्रारदाराचे नांव |
भुमापन क्रमांक |
भुखंड क्रमांक |
क्षेत्रफळ |
भुखंडाची किंमत |
128/2011 |
श्रीमती कंचलता सुनिल भोंडेकर |
4 |
09 |
30 x 30 चौ.फु. |
3250/-
|
129/2011 |
श्री बळीराम झिंगरु मेश्राम |
4 |
40 |
30 x 30 चौ.फु. |
3250/- |
130/2011 |
श्रीमती मीरा गणपत बावणे |
4 |
37 |
30 x 30 चौ.फु. |
3250/- |
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्रं.1 ने आपले जवाबात तक्रारदाराने शासकीय आबादी भुखंड मिळण्याकरिता तहसिलदार पारशिवनी यांचे कार्यालयात रुपये 3250/- एवढी रक्कम चलनाद्वारे शासनाकडे जमा केल्याचे मान्य केले आहे. परंतु तक्रारदाराचे इतर आरोप अमान्य केलेले आहे. मंडळ अधिकारी पारशिवनी व तलाठी पिपळा यांनी सदर भुखंडाचे मोक्कयावर जावून चौकशी व पंचनामा केल्याचे नमुद केले व त्याची प्रत उत्तरासोबत दाखल केली आहे.
गैरअर्जदार क्रं.2 ने तक्रारदाराचे सदर भुखंडाचे मोजणी करण्याकरिता दिनांक 24/12/2010 रोजी गैरअर्जदार क्रं.2 चे अधिकारी मोक्यावर हजर असल्याचे म्हणणे मान्य केले व हेही मान्य केले की हजर व्यक्ति श्री प्रतिभा विलास गिरी व श्रीमती सरस्वता उमराव वानखेडे श्री लहानु बारमाटे तसेच प्रकाश येनुरकर या लोकांनी सदर गैरअर्जदाराचे मोजणी कामात अडथळा आणुन गैरअर्जदार यांचेशी वाद घातला व त्यांचे मोजणीचे साहित्य नालीत फेकल्यामुळे मोजणी न करता पंचनामा करावा लागला. वास्तविक सदर भुखंडावर तक्रारदाराचा ताबा नसुन त्यावर दुस-या कोणचा तरी ताबा आहे. तक्रारदार सदर भुखंडाची हद्द दाखविण्यास असमर्थ होता व इतर लोकांनी सदर मोजणीवर आक्षेप घेतलेला होता. त्यामुळे सदर बाबींची मोजणी होऊ शकली नाही. यास्तव गैरअर्जदार यांचे सेवेत कमतरता नाही म्हणुन गैरअर्जदार क्रं. 2 यांचे विरुध्द विनाकारण केलेली तक्रार दंडासह खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
तक्रारकर्त्यातर्फे वकील श्री भेदरे यांचा युक्तिवाद ऐकला. गैरअर्जदाराचे 1 गैरहजर. गैरअर्जदार क्रं.2 चा युक्तिवाद ऐकला.
. -: का र ण मि मां सा :-
यातील गैरअर्जदार क्रं.1 ने सर्व तक्रारदारांकडुन भुखंडाची किंमत वसुल केल्याची बाब मान्य केलेली आहे आणि तक्रारदार हे अनुसुचित जातीतील मजूर वर्गातील लोक असल्याचे दिसते त्यामुळे ते बळाचा वापर करुन अन्य लोकांच्या ताब्यातील जमीन मागतील अशी त्यांचेकडुन अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्रं.1 तहसीलदार यांची याप्रकरणात प्राथमिक जबाबदारी ही ठरते की , त्यांनी संबंधीत तक्रारदारांना त्यांचा भुखंड ओळखुन, शोधुन देऊन, त्यांचे क्षेत्रफळ आणि सिमांकन निर्धारीत करुन घेऊन, जर तो अन्य अतीक्रामकांच्या ताब्यात असल्यास पोलीसांची मदत घेऊन त्याचा प्रत्यक्ष ताबा तक्रारदारास देणे आणि ही सेवा गैरअर्जदार क्रं.1 यांनी अद्यापी दिलेली नाही. ही बाब स्पष्ट होते आणि ही त्यांचे सेवेतील त्रुटी आहे. यास्तव आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. सर्व तक्रारदारांच्या तक्रारी अंशतः मंजूर करण्यात येतात.
2. गैरअर्जदार क्रं.1 यांनी तक्रारदारांना मंजूर केलेल्या भुखंडाचे गैरअर्जदार क्रमांक 2 यांचे सहाय्याने शोधुन घेऊन , त्यांची ओळख पटवुन , त्यांची मोजणी करुन व सिमांकन करुन घेऊन, त्यामध्ये अन्य अतीक्रामकांचा ताबा असल्यास, तो ताबा हटवुन ते भुखंड तक्रारदारांच्या प्रत्यक्ष ताब्यात द्यावे. गैरअर्जदार क्रं.1 यांना आवश्यकता असल्यास पोलीस खात्यातील लोकांची योग्य ती मदत घेऊ शकतील. वरील कारवाईनंतर मोजणी फीची रक्कम गैरअर्जदार क्रं.2 ने तक्रारदारास पत्र देऊन वसुल करावी ती रक्कम देण्याची जबाबदारी तक्रारदारांची असेल.
3. गैरअर्जदार क्रं.1 ने सर्व तक्रारदारांना तक्रारखर्चाबद्दल प्रत्येकी रुपये 500/- व नुकसानी दाखल प्रत्येकी रुपये 500/-द्यावे.
3.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 1
महिन्याचे आत करावे.