(घोषित दि. 23.02.2012 व्दारा श्री.डी.एस.देशमुख,अध्यक्ष)
विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
थोडक्यात तक्रारदाराची तक्रार अशी आहे की, तिचे पती एकनाथ यांचे दिनांक 23.04.2006 रोजी अपघाती निधन झाले. त्यावेळी महाराष्ट्र शासनाने गैरअर्जदार क्रमांक 2 आय.सी.आय.सी.आय लोबांर्ड जनरल इन्शुरन्स कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा उतरविलेला असल्यामुळे तिने दिनांक 27.07.2006 रोजी आवश्यक कागदपत्रांसह गैरअर्जदार क्रमांक 1 तहसीलदार यांच्याकडे विमा दावा दाख केला. परंत तिचा विमा दावा अद्याप गैरअर्जदार विमा कंपनीने निकाली काढलेला नसून विमा दावा विनाकारण प्रलंबित ठेवला. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, तिचा प्रलंबित विमा दावा निकाली काढण्याबाबत विमा कंपनीला आदेश द्यावेत.
गैरअर्जदार क्रमांक 1 तहसीलदार यांनी लेखी म्हणणे दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने दाखल केलेला विमा दावा विमा कंपनीच्या स्तरावर प्रलंबित आहे.
गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचा विमा दावा त्यांना मिळालेलाच नाही. त्यामुळे तिचा विमा दावा प्रलंबित असण्याचा प्रश्न नाही व तिला त्रुटीची सेवा देण्याचा देखील प्रश्न उद्भवत नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात
मुद्दे उत्तर
1.गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? नाही
2.आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे
कारणे
मुद्दा क्रमांक 1 – दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराच्या वतीने अड.आर.व्ही.जाधव आणि गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीच्या वतीने अड.पी.एम.परिहार यांनी युक्तीवाद केला.
तक्रारदाराने तिच्या पतीच्या अपघाती मृत्यू नंतर शेतकरी अपघात विमा योजनेनुसार नुकसान भरपाई मिळावी म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 तहसीलदार यांच्याकडे विमा दावा दाखल केलेला असला तरी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे तिचा विमा दावा दाखल झाल्याबाबत कोणताही पुरावा नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे तक्रारदाराच्या पतीचा अपघात दिनांक 23.04.2006 रोजी झाला त्यावेळी गैरअर्जदार क्रमांक 2 विमा कंपनीकडे शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत कोणतीही पॉलीसी नव्हती. पॉलीसीचा कालावधी दिनांक 10.04.2005 ते 09.04.2006 असा होता. सदर बाब विमा कंपनीने दाखल केलेल्या पॉलीसीवरुन दिसून येते. पॉलीसीची मुदत दिनांक 09.04.2006 रोजी संपली आणि तक्रारदाराच्या पतीचा अपघात दिनांक 23.04.2006 रोजी झालेला आहे. त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने तक्रारदाराला सदर पॉलीसीच्या अनुषंगाने नुकसान भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले.
म्हणून खालील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
- तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च संबंधितांनी आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.