जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2010/199 प्रकरण दाखल तारीख - 18/08/2010 प्रकरण निकाल तारीख – 15/11/2010 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती.सुवर्णा देशमुख. - सदस्या श्री.निळकंठ पि.ग्यानोबा पावडे, वय वर्षे 23, धंदा शेती, रा.वडगांव (बु) ता.हदगांव जि.नांदेड. अर्जदार. विरुध्द. 1. तहसीलदार, तहसील कार्यालय, हदगांव, ता.हदगांव जि.नांदेड. गैरअर्जदार 2. व्यवस्थापक, रिलासंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि, 19, रिलायंस सेंटर, वालचंद हिराचंद मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400038. 3. रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी लि, मार्फत शाखा व्यवस्थापक, शाखा – उज्वल इंटरप्राईजेसच्यावर, हनुमान गड कमानी जवळ,हिंगोली नाका, नांदेड. 4. कबाल इंशुरन्स सर्व्हीसेस प्रा.लि. दिशा अलंकार शॉप नं.2,टाऊन सेंटर, सिडको कॅनॉट, औरंगाबाद – 431003. अर्जदारा तर्फे वकील - अड.पी.जी.नरवाडे. गैरअर्जदार क्र.1 तर्फे वकील - एकतर्फा. गैरअर्जदार क्र.2 व 3 तर्फे वकील - अड. अवीनाश कदम. गैरअर्जदार क्र. 4 - स्वतः निकालपत्र (द्वारा- मा.श्री.बी.टी.नरवाडे पाटील,अध्यक्ष) 1. अर्जदार निळकंठ ग्यानोबा पावडे यांनी गैरअर्जदारांनी अर्जदाराची शेतकरी पत्नी सौ.उज्वला निळकंठ पावडे ही सर्प दंशाने दि.02/02/2008 रोजी मयत झालेली असतांना देखील व शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी गैरअर्जदारांना कागदपत्र दाखल करुनही त्यांनी अपघात विमा योजनचे रु.1,00,000/- न देऊन सेवेत त्रुटी केल्याबद्यल ही फिर्याद दाखल केली आहे. 2. अर्जदार निळकंठ पावडे यांचे म्हणणे असे की, त्यांची पत्नी सौ.उज्वला निळकंठ पावडे ही व्यवसायाने शेतकरी होती व तीच्या नांवावर मौजे वडगांव (बु) ता.हदगांव जि.नांदेड येथे शेत जमीन गट नं.268 क्षेत्रफळ एक हेक्टर 74 आर ही जमीन आहे व ती स्वतः शेती करीत असून कुटूंबाचे उदरनिर्वाह करते. दि.02/02/2008 रोजी सर्प दंश झाल्यामूळे तीचा अपघाती मृत्यू झाला ज्याबद्यल पोलिस स्टेशन, हदगांव येथे कलम 174 CR P.C. नुसार अपघाती मृत्यू क्र. 10/2008 ची नोंद झालेली आहे. पत्नीचे सदरील आकस्मीक मृत्यूनंतर अर्जदाराने सर्व आवश्यक त्या कागदपत्रासहीत तहसील कार्यालया मार्फत अपघाती विमा योजने अंतर्गत क्लेम दाखल केला. 3. अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील सर्व शेतक-याचे अपघाती विमा योजनेनुसार प्रिमीअम गैरअर्जदार क्र.2 कडे भरलेली आहे. त्यावेळी गैरअर्जदार क्र. 2 यांनी सर्व जोखीम स्विकारली व अर्जदाराच्या पत्नीच्या हक्कात विमा दिला व त्या विम्याची प्रिमीअम महाराष्ट्र शासनाने शेतक-याच्या वतीने भरलेली आहे. त्यामुळे अर्जदाराची पत्नी ही लाभार्थी आहे व म्हणुन ती गैरअर्जदार क्र.2 ची ग्राहक आहे. सदरील विम्याचा कालावधी हा दि.15/08/2007 ते 14/08/2008 या कालावधी पुरता आहे व सदरील शेतकरी सौ.उज्वला यांचा मृत्यु दि.02/02/2008 रोजी झाल्यामुळे त्यांचा मृत्यू विमा पॉलिसीच्या कालावधी मध्येच आहे म्हणुन अर्जदार हे तीचे पती व वारस असल्यामुळे पॉलिसीचे पैसे मिळण्यास हक्कदार आहेत. 4. अर्जदाराचे असेही म्हणणे आहे की, त्यांनी योग्य व सर्व कागदपत्र गैरअर्जदार क्र. 1 तहसीलदार, हदगांव यांच्या मार्फत गैरअर्जदार क्र. 4 तर्फे गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे पाठविले आहे. अर्जदाराने अनेक वेळा तोंडी विनंती करुन देखील गैरअर्जदारांनी नुसते आश्वासन देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ केली म्हणुन नाईलाजाने अर्जदाराने त्यांच्या वकीला मार्फत दि.20/07/2010 रोजी गैरअर्जदारांना नोटीस पाठवीली तरी देखील त्या नोटीसचे पुर्तता केली नाही व उत्तरही दिले नाही. म्हणुन ही फिर्याद दाखल करणे क्रमप्राप्त झाले. त्यांची विनंती आहे की, गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्याकडुन सदरील शेतकरी अपघात विम्याची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने वसुल करुन द्यावी व अर्जदारास मानसिक त्रास दिल्याबद्यल रु.50,000/- व दावा खर्च म्हणुन रु.5,000/- देखील वसुल करुन द्यावे म्हणुन ही फिर्याद दाखल केली आहे. 5. गैरअर्जदार क्र. 1 तहसीलदार यांना नोटीस मिळून देखील ते या मंचापुढे हजर झाले नाही म्हणुन हे प्रकरण त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालवीण्याचा आदेश नि. नं. 1 वर करण्यात आला. 6. गैरअर्जदार क्र. 4 यांनी त्यांना नोटीस मिळाल्यानंतर त्यांचे म्हणणे नि.नं.6 पोस्टाने पाठवून दिला, त्यांचे म्हणण्याप्रमाणे सदरील कागदपत्र मिळाल्यानंतर त्यांनी तो क्लेम रिलायंस इन्शुरन्स कंपनी मुंबईकडे दि.26/06/2009 रोजी पाठवून दिला परंतु अद्याप त्यांनी त्यावर निर्णय दिलेला नाही. 7. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी त्यांचे म्हणणे नि.नं.13 वकीला मार्फत दाखल केले. अर्जातील बराच मजकुर त्यांनी नाकारण्याचा प्रयत्न केला. त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदारानेच त्यांची पत्नी सौ.उज्वला निळकंठ पावडे ही दि.02/02/2008 रोजी सर्प दंशाने मृत्यू पावली हे सिध्द करावे. त्यांचे लेखी म्हणण्याचे परिच्छेद क्र.5 मध्ये त्यांनी आश्चर्यचकीत विधान केले आहे की, सदरील सौ.उज्वला निळकंठ पावडे यांचा मृत्यू वैद्यकिय निष्काळजीपणामुळे व चुकीचा उपचार दिल्यामुळे झाला आहे.? त्यांनी पोलिसाकडे दिलेला एफ.आय.आर., पंचनामा इत्यादी सर्व गोष्टी नाकारण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. त्यांचे म्हणणे असे आहे की, सदरील सौ. उज्वला निळकंठ पावडे हे शेतकरी होती व त्यांच्या नांवावर सदरील गट नं. 268 मध्ये एक हेक्टर 74 आर जमीन होती हे अर्जदारानेच सिध्द करावे. 8. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी शेतक-याची पॉलिसी महाराष्ट्र शासना मार्फत घेतल्याचे कबुल केलेले आहे. तथापी सदरील मयत उज्वला ही त्यांची ग्राहक होते हे त्यांनी कबुल केलेले नाही.? त्यांचे म्हणणे असे आहे की, अर्जदाराने त्यांचेकडे कोणतेही कागदपत्र दिलेले नाहीत त्यामुळे ही फिर्यादच प्रिमॅच्युअर्ड आहे. म्हणुन ती खारीज करण्यात यावी. त्यांचे मते या न्यायमंचास ही केस चालविण्यास हक्क नाही.? गैरअर्जदार क्र. 2 व 3 चे असेही म्हणणे आहे की, सदरील घटना घडल्यानंतर एक आठवडयाच्या आंतच क्लेम दाखल करायला पाहीजे होते परंतू सदरील मयत सौ.उज्वला निळकंठ पावडे ही दि.02/02/2008 रोजी मयत होऊन देखील फिर्यादीने तहसीलदार हदगांव यांचेकडे त्यांचा क्लेम दि.08/09/2008 रोजी म्हणजे उशिराने दाखल केला म्हणून गैरअर्जदारावर क्लेम मंजुर करण्याची जिम्मेदारी नाही. वैकल्पे करुन त्यांचे असेही म्हणणे आहे की, जर हे न्यायमंच हे क्लेम मुदतीत आहे असे गृहीत धरणार असेल तर अर्जदाराने ‘काहीकागदपत्र’ दाखल केलेले नसल्यामूळे सदरील फिर्याद नामंजुर करण्यात यावी. त्यांचे असेही म्हणणे आहे की, सदरील मयत सौ.उज्वला निळकंठ पावडे यांचे इतरही वारस मुले,मुली नामे मनीषा, मंजूषा, मधूश्री,गजानन, प्रवीण, निळकंठ आहेत. परंतू फिर्यादीने त्यांना या केसमध्ये पार्टी केलेले नाही किंवा सदरील फिर्याद ते अज्ञान मुलांचे पालक या नात्याने दाखल केले नाही म्हणुन ही सदरील फिर्याद रु.10,000/- दंडनिय खर्चासह खारीज करण्यात यावी.? 9. आपल्या म्हणण्याच्या प्रित्यर्थ अर्जदार निळकंठ ग्यानोबा पावडे यांचे स्वतःचे शपथपत्र नि. 2 वर दिले आहे. त्याशिवाय यादी नि.नं.4 प्रमाणे त्यांनी क्लेम, जमीनीचा 7/12 ची नक्कल, जमीन धारणा प्रमाणपत्र नमूना C अ, गांव नमूना 6 क,फेरफार क्र.393 ची प्रत,मृत्यू प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आकस्मात मृत्यू रिपोर्ट,मरणोत्तर पंचनामा, नोटीसची स्थळप्रत इ. कागदपत्र दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी फक्त त्यांचे तर्फे साक्षीदार म्हणुन त्यांचे अधिकारी गणेश कृष्णराव जाधव यांचे शपथपत्र नि.नं.15 वर दाखल केलेले आहे. 10. दोन्ही पक्षाने दाखल केलेले कागदपत्र व त्यांचा युक्तीवाद ऐकून जे मुद्ये उपस्थित होतात ते मुद्ये, त्यावरील सकारण उत्तरासह, खालील प्रमाणे. 11. मुद्ये. उत्तर. 1. अर्जदार गैरअर्जदार क्र.2 व 3 कडुन शेतकरी अपघात विमा योजनेची रक्कम रु.1,00,000/- मिळण्यास पात्र आहे का? होय. 2. गैअर्जदार क्र.2 व 3 यांनी सदरील रक्कम अर्जदारास न देऊन सेवेतील त्रुटी केली आहे का? होय. 3. अर्जदार हे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांच्याकडुन सदरील विमा पॉलिसीची रक्कम रु.1,00,000/- व त्यावर व्याज व मानसिक त्रास इ. मिळण्यास पात्र आहे का? अंतीम आदेश प्रमाणे. 4. काय आदेश? अंतीम आदेशा प्रमाणे. कारणे. मुद्ये क्र.1 ते 4 11 एकंदरीत वरील सर्व मुद्ये एकमेकास पुरक असल्यामूळे ते एकत्रितरित्या चर्चा करुन सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत. वर नमुद केल्याप्रमाणे अर्जदाराने स्वतःचे शपथपत्रा व्यतिरिक्त क्लेम फॉर्म, मयताच्या नांवे असलेल्या जमीनीचा 7/12 ची नक्कल, गाव नमुना 8 ए, गाव नमुना 6 क, फेरफारची प्रत, मयत सौ.उज्वला निळकंठ पावडे यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र,त्यांचा त्यांनी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अपघाताच्या मृत्यूचा रिपोर्ट जे पोलिस स्टेशन हदगांव येथे नोंदविण्यात आला त्याची नक्कल, मरणोत्तर (इन्क्वेस्ट) पंचनामाची नक्कल, पोस्ट मॉर्टेम रिपोर्ट ज्यामध्ये सदरील सौ.उज्वला यांचा मृत्यु सर्प दंशाने झाल्याचा उल्लेख आहे इ. कागदपत्र व वकीला मार्फत पाठविलेली नोटीसची स्थळप्रत देखील दाखल केली आहे. 12. वरील सर्व कागदपत्र पाहून एक गोष्ट निश्चित आहे की, सदरील सौ. उज्वला पावडे याचा मृत्यु दि.02/02/2008 रोजी सर्प दंशानेच झाला होता व त्या शेतकरी होत्या त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जी योजना शेतक-यासाठी राबविण्याचा प्रयत्न केला त्याचे हक्कदार, अर्जदार हे मयताचे पती या नात्याने हक्कदार आहेत. गैरअर्जदारांचा आक्षेप आहे की, मयतास अज्ञान मुले व मुली आहेत व त्यांना यामध्ये पार्टी केलेले नाही या कारणामूळे हा क्लेम मंजुर करता येणार नाही.? गैरअर्जदाराचा दुसरा आक्षेप असा आहे की, मृत्यूनंतर एक आठवडयाच्या आंत क्लेम दाखल करायला पाहीजे होते व तो मुदतीत दाखल न केल्यामुळे तो खारीज करण्यात यावा. अर्ज लवकरात लवकर दाखल करणे हे जरी क्रमप्राप्त होते तरी ती अट काही मँडेटरी अट नाही. घरातील जबाबदार व्यक्ति आकस्मिकपणे मृत्यू पावल्यानंतर सर्वच कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतो व त्या परिस्थितीत ते एक आठवडयाच्या आतच तहसीलदार कार्यालयात जाऊन क्लेम दाखल करण्याच्या मनःस्थितीत नसतात. या उलट असे दिसते की, मृत्यूनंतर दहावा किंवा तेरावा केल्या शिवाय कोणतेही कुटूंब घराबाहेर देखील पडत नाही. त्यामुळे लवकरात लवकर क्लेम दाखल करावा ही अट जरी असली तरी त्यामूळे मुदतीत क्लेम जरी दिला नसेल तर तो नामंजुरच करावयास पाहीजे असे मुळीच नाही कारण ती अट मॅंडेटरी नाही. म्हणुन हया कारणास्तव ही फिर्याद नामंजुर करता येणार नाही. 13. गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचे मान्यवर विधीज्ञ श्री.अविनाश कदम यांनी असा युक्तीवाद केला की, पोस्ट मॉर्टेम रिपोर्टमध्ये डॉक्टरने जरी मृत्यू हा सर्प दंशाने झाला आहे असे लिहीले असले तरीही त्यापुढे असेही लिहीले आहे की, मृत्यू झालेले निश्चित कारण व्हिसेराचा वैज्ञानिक रिपोर्ट आल्यानंतर देण्यात येईल. त्यांनी असा युक्तीवाद केला की, व्हिसेरामध्ये विष असल्याचा उल्लेख नाही. त्यामूळे मृत्यू सर्प दंशानेच झाले हे सिध्द होत नाही. जर व्हिसेरामध्ये विषच नव्हते तर मग मृत्यू हा, डॉक्टरच्या म्हणण्याप्रमाणे सर्प दंशानेच झालेला आहे म्हणजे आकस्तिक मृत्यू आहे. म्हणुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 हे आपली जिम्मेदारी टाळू शकत नाही. 14 वर उल्लेख केल्याप्रमाणे गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी आपल्या लेखी म्हणण्याचा परिच्छेद क्र. 5 मध्ये असा उल्लेख केला आहे की, वस्तुतः सदरील सौ. उज्वला पावडे यांचा मृत्यू वैद्यकिय निष्काळजीपणामुळे किंवा योग्य उपचार न केल्यामुळे झाला आहे.? गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांना हा साक्षात्कार कशाच्या आधारे झाला हे कळावयास मार्ग नाही.? गैरअर्जदार क्र. 2 व 3 नामांकित इंशुरन्स कंपनी आहे म्हणुन त्यांच्याकडून निरर्थक विधाने अपेक्षित नाही. ज्या घटना सत्य आहेत व माहीती आहेत तेही टाळणे उचीत नाही जे सत्य आहे ते प्रामाणिकपणे कबुल केले पाहीजे व जेंव्हा घरातील महत्वाची व्यक्ति अशा अपघाताने अचानक जाते तेंव्हा त्यांच्या वारसदारा विषयी सहानुभूती दाखविणे हे सामाजीक व नैतिक कर्तव्य आहे असे वाटते. 15. एकंदरीत कागदपत्र व दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकता, गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी हा क्लेम वकीलाची नोटीस मिळाल्या बरोबरच परस्पर निपटून टाकायला पाहीजे होते परंतु दुर्दैवाने असे झाले नाही म्हणुन फिर्यादीला या न्यायमंचापुढे यावे लागले. फिर्यादीने त्यांचे अज्ञान मुला मुलीना या फिर्यादीत शेरीक केले नाही असे जरी उलट पक्षाचे म्हणणे असले तरी जेंव्हा पैसे देण्याचा प्रसंग येईल त्या वेळी ते पैसे अर्जदाराला त्याच्या साठी व त्याच्या अज्ञान मुलांसाठी म्हणुनच देण्यात येतील व अर्जदार हे कुटूंबाचे कर्ते पुरुष असल्यामुळे सदरील अटीवर त्यांना पैसे देण्यास कोणताही प्रत्यवाय नाही असे वाटते. 16. एकंदरीत कागदपत्रावरुन सदरील सौ.उज्वला पावडे यांचा मृत्यू सर्प दंशानेच झालेले असल्यामुळे तो अपघाती मृत्यू आहे व महराष्ट्र शासनाच्या योजनेनुसार त्यांनी त्यांचा विम्याचा हप्ता गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांचेकडे भरलेला असल्यामुळे मयताचे लाभार्थी वारस रु.1,00,000/- मिळण्यास हक्कदार आहेत, असे या न्यायमंचास वाटते. 17. वकीला तर्फे नोटीस देऊन देखील गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी विम्याच्या योजनेचे पैसे न दिल्यामुळे त्यांनी सेवेत उघड उघड त्रुटी केलेली आहे व म्हणुन सदरील रक्कमेवर फिर्याद दाखल केलेल्या तारखेपासुन त्यांना व्याजही द्यावे लागेल त्याचप्रमाणे त्यांनी फिर्यादीस या ग्राहक मंचापर्यंत येण्यास भाग पाडल्यामुळे व मानसिक त्रास दिल्यामुळे व कोर्टाचा खर्च म्हणुन रु.2,000/- व मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- देखील द्यावे लागतील असे आमचे मत आहे. वरील सर्व गोष्टींचा विचार करुन वरील मुद्ये चर्चीत केलेले आहेत, त्यावरुन आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. 18. आदेश. 1. फिर्यादीची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते. 2. हा निकाल लागल्या पासुन 30 दिवसांच्या आंत गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी अर्जदारास शेतकरी अपघात विम्याचे रक्कम रु.1,00,000/-, त्यावर फिर्याद दाखल केलेल्या तारखेपासुन म्हणजे दि.13/08/2010 पासुन 9 टक्के व्याजाने परत करावेत, तसे न केल्यास वरील सर्व रक्कमेवर फिर्याद दाखल केलेल्या तारखेपासुन 15 टक्के व्याजाने ती पुर्ण रक्कम मिळेपर्यंत द्यावेत. 3. या दाव्याचा खर्च म्हणुन गैरअर्जदार क्र. 2 व 3 यांनी फिर्यादीस रु.2,000/- द्यावे व मानसिक त्रासाबद्यल रु.5,000/- द्यावे. 4. गैरअर्जदार क्र. 1 व 4 यांच्या विरुध्द आदेश नाही. 5. संबंधीत पक्षकार यांना निकाल कळवावा. (श्री.बी.टी.नरवाडे पाटील) (श्रीमती.सुवर्णा.देशमुख) अध्यक्ष सदस्या गो.प.निलमवार.लघूलेखक
| [HON'BLE MRS. Member Mrs.S.R. Deshmukh] MEMBER[HON'BLE President B.T.Narwade] PRESIDENT | |