::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, कल्पना जांगडे (कुटे) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 31/01/2017)
अर्जदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदयाचे कलम 12 अन्वये दाखल केली आहे.
अर्जदाराच्या तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे.
1. अर्जदाराने आपल्या तक्रारीत असे कथन केले आहे कि, तक्रारकर्त्याचे वडील मयत श्री. विठ्ठल धर्मा तुराणकर हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासनाने शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत गैरअर्जदार क्रं. 1 मार्फत गैरअर्जदार क्रं. 2 कडून तक्रारकर्त्याचे वडिलांचा रू.1,00,000/- चा विमा उतरविला होता. अर्जदाराचे वडीलांना दि.5/9/2013 रोजी ते शेतामध्ये बकरी चारण्याकरीता गेले असतांना सर्पदंश झाला व उपचारादरम्यान दि. 13/09/2013 रोजी शासकीय रूग्णालय, नागपूर येथे त्यांचा मृत्यु झाला.
2. तक्रारकर्त्याचे वडिलांचा अपघातात मृत्यु झाल्यानंतर अर्जदाराने दि. 29.10.2013 रोजी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत विम्याची रक्कम मिळण्याकरीता आवश्यक दस्तावेजांसह तलाठयामार्फत दोन प्रतीत गैरअर्जदार क्रं. 2 कडे क्लेम सादर केला. अर्जदारांनी वेळोवेळी विमादाव्याची रक्कम मिळण्याकरीता प्रयत्न केले परंतु गैरअर्जदार क्र.2 ने विमादाव्याची रक्कम दिली नाही. गैरअर्जदार क्र.2 ने दिनांक 26/8/2014 चे पत्रान्वये अयोग्य कारण दर्शवून अर्जदाराचा विमा दावा फेटाळला. अर्जदाराने अर्जासोबत आवश्यक दस्तावेज दिल्यानंतरही गैरअर्जदार क्रं. 2 ने अर्जदारांस विमादाव्याची रक्कम न देता अर्जदाराचा विमा दावा नामंजूर करून सेवेत त्रुटी केलेली आहे. सबब अर्जदाराने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करून तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्र.2 ने शेतकरी जनता अपघात विमा दाव्याची रक्कम रु. 1,00,000/-, व्याजासह देण्याचे आदेश व्हावे. तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रु. 50,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावा.
3. अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदार क्रं 1 व 2 विरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्रं. 1 यांना नोटीस प्राप्त होवूनसुध्दा ते मंचासमोर उपस्थीत न झाल्याने दि.11/5/2016 रोजी गैरअर्जदार क्र.1 यांच्या विरूध्द सदर प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश् नि.क्र.1 वर पारीत करण्यांत आला.
4. गैरअर्जदार क्रं. 2 हजर होवून त्यांनी नि. क्रं. 13 वर आपले लेखीउत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये नाकबूल केले आहे की मयत विठ्ठल धर्मा तुराणकर हयांना दिनांक 5 सप्टेंबर, 2013 रोजी सर्पदंश झाला व त्यात दि.13/9/2013 रोजी त्यांचा नागपूर येथे मृत्यु झाला. गैरअर्जदार क्र.2 यांनी आपल्या विशेष कथनात नमूद केले की अर्जदाराने मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांच्या सर्व वारसांना तक्रारीमध्ये पक्ष बनविले नाही या कारणाने आवश्यक पक्षाचे अभावी अर्जदाराची सदर तक्रार अदखलपात्र व बेकायदेशीर असल्यामुळे खारीज होण्यांस पात्र आहे. अर्जदाराने मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांचे मृत्युनंतर अती विलंबाने स्पष्टीकरण दिलेले आहे. या प्रकरणी अर्जदाराने घडलेल्या घटनेनंतर दवाखान्यात घेतलेल्या औषधोपचाराचे संबंधीत दस्तावेज क्लेमसोबत जोडलेले नाहीत अथवा गैरअर्जदार क्र.2 ने मागणी करूनही पुरविलेले नाहीत किंवा गैरअर्जदार क्र.2 ला उपलब्ध करून दिले नाहीत. अर्जदाराने तक्रारीत नमूद केलेली घटना तसेच या प्रकरणात पोलीसांद्वारे केलेल्या चौकशीचा पंचनामा तयार करण्यात आलेला नाही. सदर घटना कुठे घडली तसेच मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांचा मृत्यु नेमका कोणत्या कारणाने झाला याचा कागदोपत्री पुरावा अर्जदाराने विमा क्लेमसोबत सादर केलेला नाही. गैरअर्जदार क्र.2 यांनी अर्जदाराने सादर केलेल्या विमादाव्याची योग्य दखल घेवून क्लेमसोबत जोडलेल्या दस्तावेजांची पडताळणी केल्यानंतरच अर्जदाराचा क्लेम संबंधीत विमा योजनेअंतर्गतच्या अटी व शर्तींचे अधीन राहून नामंजूर केलेला आहे. गैरर्जदार क्र.2 यांनी आपले सेवेत कोणतीही न्युनता ठेवलेली नाही. विमा पॉलिसीतील अटी व करारातील तरतुदींनुसार गैरअर्जदारांची नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी नाही. सबब अर्जदाराचा अर्ज खारीज होण्यांस पात्र आहे.
5. अर्जदाराचा अर्ज, दस्तावेज, तक्रारअर्ज हेच शपथपञ समजण्यांत यावे, अशी पुरसीस दाखल, तसेच दि. 5 जानेवारी, 2017 रोजीचे आदेशपत्रावरील नोंदीनुसार, अर्जदार यांचे अधिवक्ता यांनी लेखी युक्तीवाद दाखल करावयाचा नाही असे तोंडी सांगितले. अर्जदाराचा तोंडी युक्तिवाद ऐकण्यांत आला. तसेच गैरअर्जदार क्रं 2 यांचे लेखीउत्तर, शपथपत्र तसेच गैरअर्जदार क्र.2 यांनी लेखी युक्तिवाद दाखल न केल्यामुळे अनुक्रमे दि. 13 जानेवारी, 2017 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचे लेखी युक्तीवाद व दिनांक 25 जानेवारी, 2017 रोजी गैरअर्जदार क्र.2 यांचे तोंडी युक्तिवादाशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश नि.क्र.1 वर पारीत. अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 1 यांचा ग्राहक आहे काय ? नाही.
(2) अर्जदार गैरअर्जदार क्रं. 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय.
(3) गै.क्रं 2 यांनी अर्जदाराप्रती अनुचित व्यवहार पद्ध्तीचा होय.
अवलंब केला आहे काय ?
(4) गैरअर्जदार क्रं. 2 यांनी अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे
काय ? होय.
(5) आदेश काय ? अंतीम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः-
6. गैरअर्जदार क्रं. 1 यांनी महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा काढण्याकरीता विना मोबदला मदत केली असल्याने अर्जदार हा गैरअर्जदार क्रं.1 यांचा ग्राहक नाही. सबब मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
7. तक्रारकर्त्याचे वडील मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांच्या मालकीची गांव अंतुर्ला, ता.चंद्रपूर जिल्हा - चंद्रपूर येथे शेतजमीन आहे. अर्जदाराने नि. क्रं. 5 वर दाखल केलेले दस्त क्रं. 18 ते 23 सात बारा उतारा, मयत विठ्ठल ऊर्फ विठोबा यांचे नांवाने शेतजमीन असल्याचे तलाठयाचे प्रमाणपत्र, फेरफारपत्र व इतर दस्तावेजांवरुन मयत विठ्ठल धर्मा तुराणकर हे शेतकरी होते हे सिध्द होत आहे. महाराष्ट़्र शासनाने शेतकरी जनता अपघात विमा योजने अंतर्गत शेतक-यांचा विमा उतरविण्यात आला होता व अर्जदाराचे वडील मयत विठ्ठल धर्मा तुराणकर हे शेतकरी होते व त्यांचा सुदधा विमा गैरअर्जदार क्रं. 2 कडून उतरविण्यात आला होता व अर्जदार मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांचा मुलगा असल्याने त्यांचा वारसदार आहे. या सदंर्भात अर्जदाराने नि.क्रं 5 नुसार दस्त क्रं. 4, 7 व 21 वर शिधापत्रिका, ओळखपत्र आणि वारसान प्रकरणाची नोंदवही दाखल केले आहे व अर्जदार हा मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांच्या मृत्यु नंतर विम्याचा लाभधारक असल्याने गैरअर्जदार क्रं. 2 यांचा ग्राहक आहे हे सिध्द होत आहे. तसेच अर्जदाराने सदर प्रकरणात मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांचे इतर वारसांनी अर्जदारांस सदर विमादाव्याची रक्कम मिळण्याकरीता हरकत नाही असे लेखी दिले. सदर संमतीपत्र दस्त क्र.17 वर दाखल केलेले आहे त्यामुळे इतर वारसांना तक्रारीमध्ये पक्ष न बनविल्यामूळे तक्रार खारीज होण्यांस पात्र आहे हा गैरअर्जदाराने घेतलेला आक्षेप ग्राहय धरता येत नाही. सबब मुद्दा क्रं. 2 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 3 व 4 बाबत ः-
8. अर्जदाराचे वडील मयत विठ्ठल धर्मा तुराणकर हे दिनांक 5/09/2013 रोजी शेतामध्ये गेले असतांना त्यांचे डाव्या पायाचे बोटाला सापाने दंश केल्याने त्यांना चंद्रपूर येथे सरकारी दवाखान्यामध्ये उपचाराकरीता भरती करण्यांत आले. तेथे उपचार सुरू असतांना तेथील डॉक्टरांचे सल्ल्यानुसार पुढील उपचाराकरीता नागपूर मेडीकल कॉलेज येथे दिनांक 6/9/2013 रोजी भरती केले व तेथेच उपचारादरम्यान मयत विठ्ठल धर्मा तुराणकर हे दिनांक 13/9/2013 रोजी मरण पावले हे अर्जदाराने नि.क्रं 4 वर दाखल केलेल्या दस्त क्रं 2,3 व 9 ते 12 पोलीस पाटील दाखला, प्रमाणपत्र, अकस्मात मृत्यु खबरीबुक, शवविच्छेदन अहवाल व इतर दस्तावेजांमधे नमुद आहे. दस्त क्र.10 शवविच्छेदन अहवालाची पडताळणी करतांना असे निदर्शनास आले की, त्यामधे पान नं 7 वर मृत्युचे कारण “ Snake bite ” असे नमुद आहे.
अर्जदारांनी नि.क्रं 4 वर दाखल केलेल्या शवविच्छेदन अहवाल, अकस्मात मृत्यु खबरी बुक, व इतर दस्तावेजांवरून, अर्जदार यांचे वडील मयत विठ्ठल धर्मा तुराणकर यांना दिनांक 5/09/2013 रोजी सर्पदंश झाला व उपचाराकरीता ते नागपूर येथे दवाखान्यात भरती असतांना त्यांचा दिनांक 13/9/2013 रोजी अपघाती मृत्यु झाला हे सिध्द होत आहे. त्यांच्या अपघाती मृत्यु नंतर अर्जदार यांनी दि. 29/10/2013 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे आवश्यक सर्व दस्तावेजांसह विमा दाव्याची रक्कम मिळण्याकरीता अर्ज केला. सदर अर्ज नि.क्र.4 वर दस्त क्र.1 वर दाखल आहे. अर्जदाराने विमादाव्याचा अर्ज केल्यानंतरही गै.क्रं 2 यांनी दिनांक 27/8/2014 चे पत्रान्वये अर्जदाराचा विमा दावा, घटनास्थळ पंचनामा व उपचार घेतल्याचा पुरावा नसल्याने फेटाळला. गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमा दावा अयोग्य कारणावरून नामंजुर करून अर्जदाराप्रति अनुचित व्यवहार पध्दतीचा अवलंब केला व न्युनतम सेवा दिली हे सिध्द होत आहे असे या मंचाचे मत आहे. सबब मुद्दा क्रं. 3 व 4 चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 5 बाबत ः-
9. मुद्दा क्रं. 1 ते 4 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं. 1 विरुध्द कोणताही आदेश नाही.
(3) गैरअर्जदार क्रं. 2 यांनी अर्जदार यांना विमा दाव्याची रक्कम
रु. 1,00,000/- व त्यावर तक्रार दाखल झाल्याचे दिनांक 21/5/2015
पासुन अर्जदाराच्या हातात रक्कम पडे पर्यन्त द.सा.द.शे. 8 टक्के
व्याजासह, आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावी.
(4) गैरअर्जदार क्रं. 2 यांनी अर्जदाराला झालेल्या शारीरिक व मानसिक
ञासापोटी रु. 5,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- आदेशाची प्रत
मिळाल्यापासून 45 दिवसाचे आत दयावी.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
(6) सदर आदेश संकेत स्थळावर टाकण्यात यावा.
चंद्रपूर
दिनांक - 31/01/2017