जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच बीड यांचे समोर.
तक्रार क्रमांक – 154/2011 तक्रार दाखल तारीख – 01/10/2011
तक्रार निकाल तारीख– 18/04/2013
राजुबाई पंडीत ढवळे
वय 67 वर्षे, धंदा शेती व घरकाम,
रा.लिंबगांव ता.अंबाजोगाई जि.बीड. ..अर्जदार
विरुध्द
1) मा.तहसीलदार,
तहसील कार्यालय,अंबाजोगाई
ता.अंबाजोगाई जि.बीड
2) विभाग प्रमुख,
कबाल इन्शुरन्स ब्रोकींग सर्व्हीस प्रा.लि.
शॉप नं. राज अपार्टमेंट,सिडको,औरंगाबाद. ...गैरअर्जदार
3) नॅशनल इन्शुरन्स कंपनी
दुसरा मजला, र्स्टलिंग सिनेमा बिल्डींग,
65, मुर्झाबन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई 400 001
-----------------------------------------------------------------------------------
समक्ष - श्रीमती निलीमा संत, अध्यक्ष
श्रीमती माधुरी विश्वरुपे, सदस्य.
-----------------------------------------------------------------------------------
तक्रारदारातर्फे - अँड.ए.एस.पावसे
गैरअर्जदार क्र.1 तर्फे – कोणीही हजर नाही.
गैरअर्जदार क्र.2 तर्फे - स्वतः
गैरअर्जदार क्र.3 तर्फे - अँड. एस.एल.वाघमारे
------------------------------------------------------------------------------------
निकालपत्र
(घोषित द्वारा ः-श्रीमती नीलिमा संत,अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,तक्रारदाराचे पती पंडीत शंकरराव ढवळे यांचा मृत्यू दि.01.12.2006 रोजीला पाण्यात बूडून झाला. मयत व्यवसायाने शेतकरी होते. अर्जदाराने सदर घटनेची माहिती अंबाजोगाई पोलिस स्टेशन यांना दिली. त्यांनी घटनेची नोंद करुन पंचनामा केला. त्यानंतर शव विच्छेदन केले. महाराष्ट्र शासनाने शेतक-यांच्या लाभासाठी शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा योजना राबवली आहे. या योजने अंतर्गत तक्रारदाराने योग्य त्या कागदपत्रांसह प्रस्ताव तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचे मार्फत सामनेवाला क्र.2 व 3 यांचेकडे पाठवला. परंतु अद्यापपर्यत तिचा दावा मंजूर अथवा नामंजूर झाल्याचे तिला समजले नाही. म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली आहे आणि त्या अंतर्गत विमा रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदाराने तक्रारीसोबत क्लेम फॉर्म, 7/12, 8-अ उतारा, घटनास्थळ पंचनामा, इन्क्वेस्ट पंचनामा, शवविच्छेदन अहवाल व कागदपत्रे दाखल केली. तसेच विलंब माफीचा अर्ज ही केला आहे. सदरची तक्रार दाखल करण्यास दोन वर्ष सात महिन्याचा विलंब झालेला आहे.
सामनेवाला मंचासमोर हजर झाले. सामनेवाले क्र.2 कबाल इन्शुरन्स यांच्या लेखी जवाबानुसार त्यांना सदरचा दावा दि.27.02.2007 ला मिळाला आणि त्यांनी तो सामनेवाला क्र.3 यांचेकडे दि.25.6.2007 रोजीला पाठवला. सामनेवाला क्र.3 यांच्या लेखी म्हणण्यानुसार त्यांना विलंब माफीच्या अर्जासोबत दावा मिळाला. परंतु विलंब माफीसाठी तक्रारदाराने दिलेली कारणे योग्य नाहीत. कायदयाबाबत अज्ञान हे विलंब माफीचे कारण होऊ शकत नाही. त्यामुळे तो अर्ज रदद व्हावा. तक्रारदाराने नेमका कधी व कोणाकडे प्रस्ताव दाखल केला हे स्पष्ट केलेले नाही.
तक्रारदाराने स्वतः म्हटल्याप्रमाणे तिचा दावा मंजूर अथवा नामंजूर झालेला नाही. त्यामुळे सदरची तक्रार प्रिमॅच्यूअर आहे. त्यामुळे सामनेवाला यांने सेवेत त्रूटी केली असे म्हणता येणार नाही.
मयताच्या वयाबाबतचा कोणताही पुरावा तक्रारदाराने दाखल केलेला नाही. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
अर्जदारातर्फे विद्वान वकील श्री.पावसे व सामनेवाले क्र.3 तर्फे विद्वान वकील श्री. वाघमारे यांचा युक्तीवाद ऐकला. दाखल कागदपत्रांचा अभ्यास केला.
तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितले की, त्यांनी विमा दावा दि.29.01.2007 रोजीच तहसील कार्यालय अंबाजोगाई यांचेकडे दिला होता. प्रत्यक्ष मंचात तक्रार दाखल करण्यास 2 वर्ष 7 महिने एवढा विलंब झाला आहे. परंतु तक्रारदाराच्या पतीचा मृत्यू झाल्यामुळे तिला धक्का बसला होता तसेच ती अशिक्षित असल्यामुळे कायदेशीर प्रक्रियेचे ज्ञान नव्हते. शिवाय दाव्याचे काहीही उत्तर अद्यापही तक्रारदाराला मिळालेले नाही. त्यामुळे तक्रारीस कारण सुरुच आहे. सबब, तक्रार मंजूर करण्यात यावी.
सामनेवाला यांचे वकिलांनी सांगितले की, सदरचा मृत्यू विहीरीत बूडून झाला एवढेच दाखल कागदपत्रांवरुन दिसते. तो अपघाती आहे,आत्मघाती आहे अथवा खुन आहे यांचा कोठेही उल्लेख नाही. सदरच्या सामनेवाला यांना अद्यापही विमा प्रस्ताव मिळालेला नाही. तक्रारदार सदरच्या मंचापासून काही गोष्टी जाणीवपूर्वक लपवत आहे. तो स्वच्छ हातांनी मंचासमोर आलेला नाही. मयताच्या वयाचा पुरावा नाही अशा परिस्थितीत तक्रारदाराची तक्रार नामंजूर करण्यात यावी.
वरील विवेचनावरुन असे दिसते की, सामनेवाला विमा कंपनी यांना अद्यापही योग्य त्या कागदपत्रांसह विमा प्रस्ताव प्राप्त झाला नाही अशा परिस्थितीत दाव्याच्या गुणवत्तेवर काहीही मतप्रदर्शन न करता तक्रारदाराने विमा प्रस्ताव योग्य कागदपत्रांसह सामनेवाला क्र.3 यांना पाठवावा व त्यांनी तो गुणवत्तेच्या निकषावर निकाली काढावा असा आदेश देणे योग्य ठरेल असे मंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराने आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सामनेवाला क्र.3
नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांचेकडे पाठवावा.
2. सामनेवाला क्र.3 यांनी तो विलंबाचा मुददा वगळून गुणवत्तेवर दावा प्राप्त
झाल्यापासून 30 दिवसांचे आंत निकाली काढावा.
3. खर्चाबददल आदेश नाही.
4. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम 20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
श्रीमती माधूरी विश्वरुपे, श्रीमती नीलिमा संत,
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड