अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, जळगाव
तक्रार क्रमांक 1042/2010 तक्रार दाखल तारीख - 12/08/2010
तक्रार निकाल तारीखः- 28/11/2013
कालावधी 03 वर्ष 3 महीने 6 दिवस
नि. 28
श्रीमती लताबाई रघुनाथ शिंपी, तक्रारदार
उ.व. 40,वर्षे, धंदाः घरकाम, (अॅड. सतीष पवार)
रा.नगाव खुर्द, ता. अमळनेर,
जि. जळगांव.
विरुध्द
1. तहसिलदार,
तहसिल कार्यालय, अमळनेर,
ता. अमळनेर, जि. जळगांव, सा.वा.क्र.1 व 3 विरुध्द एकतर्फा
2. व्यवस्थापक सा.वाला नं. 2 तर्फे
नॅशनल इन्शुरन्स कं.लि. (अॅड. एस.व्ही.देशमुख)
साईबाबा मार्केट, केळकर मार्केट जवळ,
बळीराम पेठ, जळगांव, ता.जि. जळगांव.
3. व्यवस्थापक
कबाल इन्शुरन्स प्रायव्हेट लि.
4 अ, देहमंदीर सोसायटी, श्रीरंगनगर,
माईलेले श्रवण विकास महाविदयालयाजवळ,
पंपीग स्टेशन रोड, नाशिक. .
नि का ल प त्र
(निकालपत्र अध्यक्ष, मिलींद सा. सोनवणे, अध्यक्ष यांनी पारित केले)
प्रस्तुत तक्रार तक्रारदार यांनी, सामनेवाला यांनी सदोष सेवा दिल्याच्या कारणास्तव ग्राहक संरक्षण कायदा 1986 (या पुढे संक्षिप्तरित्या ‘ग्रा.सं.कायदा1986’ ) च्या कलम 12 नुसार दाखल केलेली आहे.
2. तक्रारदार यांचे पती रघुनाथ पंडीत शिंपी मु.पो. नगाव खुर्द, ता.अमळनेर, जि. जळगांव, येथील रहीवासी होते. त्यांचा शेती हा व्यवसाय होता. दि. 27/12/2006 रोजी त्यांचे अपघाती निधन झाले. मयत, रघुनाथ पंडीत शिंपी हे शेतकरी होते. महाराष्ट्र शासन निर्णय कृषी व पणन विभाग क्र. एनएआयएस 1204/सी.आर.-166/11-अ/दि. 05 जानेवारी 2005 चे निर्णयानुसार प्रपत्र-अ, शासनाने प्रत्येक शेतक-याचा रु. 1 लाखाचा व्यक्तीगत विमा काढलेला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी अपघातात मयत झाल्यावर त्याच्या वारसास विमा दाव्यापोटी रक्कम रु. 1 लाख अपघाती विमा योजनेअंतर्गत देय आहे.
3. या योजनेनुसार तक्रारदार यांनी तहसिलदार अमळनेर, यांच्या तर्फे योग्य त्या परिपत्रकासह विमा रक्कम मागणी दावा शासनाच्या परिपत्रकानुसार पाठविला. त्यानंतरही सामनेवाला यांनी तक्रारदाराची विमापॉलीसीची रक्कम दिलेली नाही. म्हणुन तक्रारदारांनी विमा योजनेपोटी रु. 1 लाख मिळावे तसेच मानसिक, शारीरीक त्रासापोटी रु. 25,000/- त्यावर 18 टक्के व्याज मिळण्यासाठी या मंचात तक्रार दाखल केलेली आहे.
4. तक्रारदार यांनी नि. 02 तक्रार अर्ज, नि. 3 वर प्रतिज्ञापत्र, नि. 5 वर पत्ता पुरसीस, नि. 6 वर दस्तऐवजा सह दस्त ऐवज त्यात नि. 6/1 वर 7/12 उतारा, नि. 6/2 वर रेशनकार्ड, नि. 6/3 वर निवडणुक ओळखपत्र, नि. 6/4 वर पी.एम.रिपोर्ट, नि. 6/5 वर मृत्युप्रमाणपत्र, नि. 6/6 वर तक्रारदाराचे मुलीचा शाळा सोडल्याचा दाखला, नि. 6/7 वर तक्रारदाराचे पती रघुनाथ यांचा शाळा सोडल्याचा दाखला, नि. 6/8 वर तक्रारदाराच्या मुलाचा शाळा सोडल्याचा दाखला, इ. कागदपत्रे तक्रार अर्जा सोबत जोडलेली आहे.
5. मंचा तर्फे सामनेवाला यांना नोटीस काढली असता सामनेवाला नं. 2 यांनी निशाणी 10 लगत खुलासा दाखल केलेला आहे. त्यांचा बचाव असा की, तक्रारदाराने दाखल केलेला 7/12 तिच्या नावाचा आहे. तिच्या पतीच्या नावे तो 7/12 उतारा नाही. त्याच प्रमाणे तक्रारदाराने क्लेम फॉर्म दाखल केल्या बाबत कोणताही पुरावा सादर केलेला नाही. त्या संदर्भात तिने त्यांच्याशी कोणताही पत्र व्यवहार केलेला नाही. थोडक्यात तक्रारदाराचे पती शेतकरी नव्हते व तिने सामनेवाला क्र. 1 यांच्या कडे सामनेवाला क्र. 2 च्या माध्यमातुन त्यांना कोणताही क्लेम फॉर्म भरुन दिलेला नाही, असा दुहेरी बचाव सामनेवाला क्र. 2 यांनी घेतला आहे.
6. सामनेवाला क्र. 1 व 3 यांच्या विरुध्द आमच्या पुर्वाधिकारी मंचाने दि. 07/03/2012 रोजी प्रस्तृत तक्रार अर्ज त्यांच्या विरुध्द एकतर्फा चालविण्यात यावा, असा हुकूम केला आहे. परिणामी, त्या सामनेवाल्यांनी प्रस्तृत तक्रार अर्जास आव्हानीत केलेले नाही.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्ये निष्कर्ष
1. तक्रारदार सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय ? होय
2. सामनेवाल्यांनी तक्रारदारास सेवा देतांना
कमतरता केली काय ? सा.वाला क्र. 2 बाबत होय
3. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
का र ण मि मां सा
मुद्दा क्र. 1 बाबत
8. तक्रारदाराच्या पतीने शेतकरी अपघात योजने अंतर्गत विमा घेतलेला नव्हता
असे सामनेवाल्यांचे म्हणणे नाही. तिचा पती शेतकरी नव्हता असे सामनेवाला क्र. 2
चे म्हणणे आहे. कारण तक्रारदाराने दाखल केलेला गट क्र. 112 चा 7/12 चा उतारा
स्पष्ट करतो की, त्यावर केवळ तक्रारदाराचे नांव आहे. तिच्या पतीचे नाही, मात्र त्या
7/12 उताराचे अवलोकन करता असे दिसुन येते की, त्या 7/12 उतारास तक्रारदाराचे
नांव, फेरफार नोंद क्र. 987 अन्वये लागलेले आहे. तक्रारदाराने नि. 22 अ/ 1 ला
फेरफार नोंद 987 ची सत्यप्रत दाखल केली आहे. त्यात असे नमूद आहे की,
दि.27/12/2006 रोजी रघुनाथ शिंपी म्हणजेच, तक्रारदाराचे पती मयत झाल्याने
तक्रारदार व तिच्या मुला मुलींची नावे गट क्र. 112 ला लागलेली आहे. म्हणजेच,
मृत्यु समयी तक्रारदाराचे पती, त्या गटाचे मालक, म्हणुन शेतकरी होते. ही
बाब स्पष्ट होते. तिचे पती यांचा शेतकरी अपघात विमा नव्हता असे सामनेवाले क्र.
2 चे म्हणणे नाही, म्हणजेच तिचे पती त्यांचे ग्राहक होते हे त्यांना मान्य आहे.
परिणामी ग्रा.सं.कायदा 1986 कलम 2(1) ड ला असलेल्या स्पष्टीकरणा अन्वये,
रघुनाथ चे वारस म्हणुन तक्रारदार सामनेवाला क्र. 2 यांची ग्राहक ठरते. यास्तव
मुद्दा क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 बाबत
9. सामनेवाला क्र. 2 यांनी असाही बचाव घेतलेला आहे की, तक्रारदाराने तिचे पती मयत झाल्यानंतर तिने शासन निर्णया नुसार सामनेवाला क्र. 1 यांच्या कडे दाखल केलेल्या क्लेम फॉर्मची प्रत दाखल केलेली नाही. तक्रारदाराने विमा रक्कम मिळण्याची मागणी करणारा क्लेम फॉर्म दाखल केलेला नसल्यामुळे, त्यांनी तिला सेवा देण्यास कमतरता केली, असे म्हणता येणार नाही.
10. ही बाब खरी आहे की, तक्रारदाराने सामनेवाला क्र. 1 यांच्या कडे क्लेम फॉर्म दाखल केला की नाही, ही बाब शाबीत करण्यासाठी तिने त्यांच्या कडे जमा केलेल्या फॉर्मची ऑफीस कॉपी दाखल केलेली नाही. मात्र हे देखील तेवढेच खरे आहे की, क्लेम फॉर्म दाखल केला किंवा नाही, या बाबतची ऑफीस कॉपी प्रत्येक ग्रामीण भागातील शेतकरी असणारा व्यक्ती, जपुन ठेवेलच असे ठाम पणे म्हणता येणार नाही. तक्रारदाराने त्या ऐवजी नि. 18/1 ला, माहीतीच्या अधिकाराखाली सामनेवाला क्र. 1 यांनी शेतकरी अपघात विमा योजने अंतर्गत कोणकोणत्या व्यक्तींचे क्लेम फॉर्म त्यांना प्राप्त झाले व ते पुढे सामनेवाला क्र. 2 यांच्या कडे पाठविले की नाही, या बाबतची प्राप्त माहीती दाखल केलेली आहे. त्यात अनु. क्र. 89 ला तक्रारदाराच्या पतीचे नांव नमूद आहे तसेच, क्र. 9 च्या स्तंभामध्ये तिचा क्लेम फॉर्म सामनेवाला क्र. 2 यांच्या कडे दि. 22/09/2007 रोजी पाठविण्यात आल्या बाबत देखील स्पष्टपणे नोंद दिसून येते. वरील पुराव्याच्या पार्श्वभुमीवर सामनेवाला यांचा बचाव की त्यांना क्लेम फॉर्म मिळाला नाही, यात तथ्य उरत नाही. त्यामुळे तक्रारदाराने क्लेम फॉर्म जमा केला व तो सामनेवाला क्र. 1 यांनी दि. 22/09/2007 रोजी सामनेवाला क्र. 2 यांना पाठविला ही बाब, सादर पुराव्यातुन स्पष्टपणे समोर येते. सामनेवाला क्र. 2 यांनी त्यावर काहीही कार्यवाही केलेली नाही, ही बाब देखील सादर पुराव्यातुन समोर आलेली आहे. त्यामुळे तक्रारदार पात्र असून ही तिला विम्याची रक्कम न देवून सामनेवाला क्र. 2 यांनी सेवेत कमतरता केलेली आहे. सामनेवाला क्र. 1 व 3 यांची प्रस्तृत प्रकरणात मर्यादीत व केवळ फॉरर्वडींग एजन्सी म्हणुन भुमिका असल्यामुळे त्यांनी सेवेत कमतरता केली असे म्हणता येणार नाही. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही सामनेवाला क्र. 2 च्या पुरता होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 बाबत
11. मुद्दा क्र. 1 व 2 यांचे निष्कर्ष होकारार्थी दिलेले आहेत, ही बाब लक्षात घेता असे स्पष्ट होते की, तक्रारदाराचे पती सामनेवाला क्र. 2 यांचे ग्राहक होते. त्यांच्या मृत्यु पश्चात तक्रारदार ही देखील त्यांची ग्राहक आहे. सामनेवाला क्र. 2 यांच्या कडे दि. 22/09/2007 रोजी सामनेवाला क्र. 1 यांनी क्लेम फॉर्म पाठवूनही त्यांनी तक्रारदारास विम्याची रक्कम दिलेली नाही. त्यामुळे तक्रारदार विम्याची रक्कम रु. 1,00,000/- मिळण्यास पात्र ठरते. कोणतेही योग्य व संयुक्तीक कारण नसतांना सामनेवाला क्र. 2 यांनी तक्रारदाराचा विमा दावा अदयाप पावेतो मंजुर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार रु. 20,000/- इतक्या मानसिक त्रासास देखील पात्र आहे, असे आमचे मत आहे. तसेच, वरील कारणास्तव दि. 22/09/2007 रोजी पासुन रु. 1,00,000/- द.सा.द.शे. 10 टक्के व्याज मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहे. त्याचप्रमाणे प्रस्तृत अर्जाच्या खर्चापोटी रु. 1500/- मिळण्यास देखील तक्रारदार पात्र आहे, असे आमचे मत आहे. यास्तव मुद्दा क्र. 3 च्या निष्कर्षापोटी आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाला क्र. 2 यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास विमा क्लेमपोटी रू. 1,00,000/- (एक लाख मात्र) विमा क्लेम प्राप्त झाल्याचा दिनांकापासून म्हणजेच दि. 22/09/2007 पासून द.सा.द.शे. 10 टक्के व्याजाने अदा करावेत.
2. सामनेवाला क्र. 2 यांना आदेशित करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास मानसिक त्रासापोटी पोटी रू. 20,000/- व अर्ज खर्चापोटी रू.1 500/- अदा करावेत.
3. निकालपत्राच्या प्रती उभय पक्षांस विनामुल्य देण्यात याव्यात.
दि. 28/11/2013
जळगांव.
(श्री.मिलींद सा सोनवणे)
अध्यक्ष
(श्री. सी.एम.येशीराव )
सदस्य