आदेश पारित द्वारा मा. सदस्या श्रीमती गीता रा. बडवाईक 1. तक्रारकत्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये विरूध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटीबाबत दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणेः-
2. तक्रारकर्त्याने टी.व्ही.सी. स्काय शॉप कंपनीकडून दिनांक 30/01/2011 ला मोबाईल आय.कॉन. जी फोर टच स्क्रीन मोबाईलचा ऑर्डर दिला होता. त्या मोबाईलची किंमत रू. 6,490/- असून घरपोच डिलीव्हरी चार्ज रू. 200/- अशी एकूण रू. 6,690/- होती. दिनांक 08/02/2011 ला विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या घरी मोबाईल आणून दिला व त्याच दिवशी मोबाईलचे पैसे तक्रारकर्त्याने दिले. 3. तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे की, मोबाईल घेतल्यानंतर 5 दिवसानंतरच मोबाईल खराब झाला. मोबाईलमधील सेन्सर (स्क्रीन प्रॉब्लेम) काम करीत नव्हता. त्यामुळे तक्रारकर्त्याने लगेचच विरूध्द पक्ष यांच्याकडे तक्रार नोंदविली. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला काही फोन नंबर दिले होते. त्या फोन नंबरवर तक्रार केल्यानंतर तक्रारकर्त्याला सांगण्यात आले की, त्यास दुसरा मोबाईल 12 दिवसांच्या अवधीमध्ये देण्यात येईल. परंतु 12 दिवसांत मोबाईल न आल्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा त्याच नंबरवर (18602335786, 02228447301, 9223204994) फोन केला. त्यांनी सुध्दा त्या कंपनीचा नवीन मोबाईल त्यांच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे 7 दिवसांपर्यंत वाट पाहावी लागणार असे सांगितले. तक्रारकर्त्याने 7 दिवसपर्यंत वाट पाहून सुध्दा तक्रारकर्त्याला नवीन मोबाईल मिळाला नाही म्हणून पुन्हा त्याच नंबरवर फोन लावला असता त्यांनी परत 4 दिवस वाट पहा असे सांगितले तसेच नवीन मोबाईल कंपनीचे व्यक्ती घेऊन येतील व जुना मोबाईल घेऊन जातील असे सांगितले. परंतु 4 दिवस लोटून देखील नवीन मोबाईल तक्रारकर्त्याला देण्यात आला नाही. तक्रार दाखल करेपर्यंत सुध्दा तक्रारकर्त्यास नवीन मोबाईल देण्यात आलेला नाही. विरूध्द पक्ष यांनी मोबाईलची 6 महिन्याची वॉरन्टी दिली होती. वॉरन्टीच्या कालावधीमध्ये मोबाईलमध्ये बिघाड झाला असता विरूध्द पक्ष यांनी तो दुरूस्त करून दिला नाही अथवा दुसरा नवीन मोबाईल देखील दिला नाही ही विरूध्द पक्ष यांची कृती ही त्यांच्या सेवेतील त्रुटी असल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार दाखल केली आहे. 4. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत मोबाईलची किंमत रू. 6,690/- मिळावी तसेच शारीरिक व मानसिक त्रासाबद्दल नुकसानभरपाई आणि तक्रारीच्या खर्चाची मागणी केली आहे. आपल्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ तक्रारकर्त्याने डिलीव्हरी चालान कम रिसीट, मोबाईलचे वॉरन्टी कार्ड आणि जाहिरात इत्यादी कागदपत्रे जोडलेली आहेत. 5. मंचाची नोटीस विरूध्द पक्ष यांना प्राप्त झाल्यानंतर विरूध्द पक्ष गैरहजर राहिले तसेच विरूध्द पक्ष यांनी त्यांचे उत्तर सुध्दा दाखल केलेले नाही. 6. तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र व दस्तऐवज यावरून मंचासमोर पुढील प्रश्न उपस्थित होतो. तक्रारकर्त्याची तक्रार मान्य होण्यास पात्र आहे काय? -ः कारणमिमांसा ः- 7. विरूध्द पक्ष यांना मंचाची नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी तक्रारकर्त्याच्या तक्रारीला उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांना तक्रारकर्त्याची तक्रार मान्य आहे. 8. तक्रारकर्त्याने दाखल केलेले शपथपत्र, तक्रार व दस्तऐवज यावरून ही बाब स्पष्ट होते की, तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडून आयकॉन जी-4 हा मोबाईल रू. 6,690/- मध्ये खरेदी केला. तसेच मोबाईलच्या वॉरन्टी कार्डमध्ये व जाहिरातीमध्ये सुध्दा मोबाईलची 6 महिन्यांची वॉरन्टी दिली आहे. मोबाईल खरेदी केल्यानंतर फक्त 5 दिवसात त्यामध्ये दोष निर्माण झाला. तक्रारकर्त्याने विरूध्द पक्ष यांच्याकडे तक्रार करून देखील त्यांनी त्यामधील दोष दूर करण्यासाठी प्रयत्न तर केलेच नाहीत उलट तक्रारकर्त्याला ‘आज देतो, उद्या देतो’ असे म्हणून नवीन मोबाईल सुध्दा जुन्या मोबाईलच्या बदल्यात दिला नाही. ही विरूध्द पक्ष यांची कृती निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रुटी दर्शविते. 9. तक्रारकर्त्याने डिलीव्हरी चालान कम रिसीट दाखल केलेली आहे, ज्यामध्ये अटी व शर्ती नमूद केलेल्या आहेत. यामधील नंबर 2 शर्त आहे की, “Goods once sold shall not be taken back or exchanged”. वस्तु विकल्यानंतर वस्तुबाबतची सर्व प्रकारची सेवा ग्राहकास पुरविणे ही विक्रेत्याची जबाबदारी असते. त्यामुळे विरूध्द पक्ष यांची जबाबदारी विक्रीनंतर सेवा देण्याची असून देखील एकदा विकलेली वस्तु परत घेतली जाणार नाही अथवा बदलून दिली जाणार नाही ही अट टाकणे म्हणजेच त्यांनी अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. भविष्यात आपल्या बिलांमध्ये विरूध्द पक्ष यांनी सदर अट व शर्त नमूद करू नये असेही मंचाचे स्पष्ट मत आहे. विरूध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचा मोबाईल खराब होऊनही त्यास दुसरा मोबाईल बदलून दिलेला नाही अथवा त्याच्या जुना मोबाईलची दुरूस्ती सुध्दा करून दिलेली नाही. ही विरूध्द पक्ष यांची कृती निश्चितच त्यांच्या सेवेतील त्रुटी आहे. विरूध्द पक्षाच्या सेवेतील त्रुटीमुळे तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला तसेच आपल्या न्याय्य मागण्यांसाठी मंचामध्ये तक्रार दाखल करावी लागली. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासहित तसेच नुकसानभरपाईसह मंजूर होण्यास पात्र आहे असे मंचाचे मत आहे. करिता आदेश. आदेश तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 1. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याचा खराब झालेला आयकॉन जी-4 मोबाईल त्याच मॉडेलच्या दुस-या मोबाईल ने नवीन वॉरन्टीसह बदलून द्यावा. तसेच तक्रारकर्त्याने त्याच्याकडे असलेला सदर मोबाईल विरूध्द पक्ष यांना परत करावा. 2. विरूध्द पक्ष हे जर सदर मोबाईल बदलून देण्यास असमर्थ असतील तर त्यांनी मोबाईलची किंमत रू. 6,690/- ही द.सा.द.शे. 9% व्याजासह अदा करावी. व्याजाची आकारणी तक्रार दाखल केल्याच्या दिनांकापासून तर प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत करण्यात यावी. 3. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासाची नुकसानभरपाई म्हणून रू. 1,000/- द्यावेत. 4. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी प्रस्तुत तक्रारीच्या खर्चाबद्दल तक्रारकर्त्याला रू. 500/- द्यावे. 5. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी भविष्यात त्यांच्या बिलामध्ये “Goods once sold shall not be taken back or exchanged” ही अट टाकू नये. 6. विरूध्द पक्ष यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांचे आंत करावी.
| HONABLE MR. N. V. BANSOD, MEMBER | HONABLE MRS. R. D. KUNDLE, PRESIDENT | HONABLE MRS. Geeta R Badwaik, Member | |