रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग – रायगड.
तक्रार क्रमांक 08/2011
तक्रार दाखल दिनांक :- 01/02/2011
निकालपत्र दिनांक :- 31/12/2014
श्री. दिलीप खंडेराव राऊत,
रा. बोरीस, पो. नवगांव,
ता. अलिबाग, जि. रायगड. ..... तक्रारदार
विरुध्द
1. टी.आय.एल.आर. (तालुका निरिक्षक भूमी अभिलेख)
कार्यालय, अलिबाग, जि. रायगड.
2. श्री. महेंद्र गणपत उंदिरे,
रा. द्वारा टी.आय.एल.आर.,
ता. अलिबाग, जि. रायगड. ..... सामनेवाले
उपस्थिती - तक्रारदारांतर्फे ॲड. सुशिल पाटील
सामनेवाले क्र. 1 व 2 तर्फे ॲड. भूषण जंजिरकर
समक्ष – मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा.सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
मा. सदस्य, श्री.रमेशबाबू बी. सिलीवेरी,
– नि का ल प त्र –
(31/12/2014)
द्वारा मा. सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
1. तक्रारदारांनी सदरहू तक्रार सामनेवाले यांचेविरुध्द त्यांनी तक्रारदार यांच्या मिळकतीची सदोष मोजणी केली त्यामुळे अप्रत्यक्षरित्या सदर मिळकतीतील बालार्क वसंत राऊत यांनी केलेल्या अतिक्रमणास ते कारणीभूत असल्याने दाखल केलेली आहे.
2. तक्रारीची थोडक्यात हकीकत अशी की, तक्रारदारांची मौजे बोरीस, ता. अलिबाग येथे स. नं. 3, हि. नं. 8 ही मिळकत असून या मिळकतीच्या उत्तर बाजूचे हद्दीला लागून श्री. बालार्क वसंत राऊत यांची स. नं. 3, हि. 5 क/2 ही मिळकत आहे. या सामाईक हद्दीवर तक्रारदारांचे सन 1995 च्या पूर्वीपासून झाडांचे कुंपण अस्तित्वात होते व तेथे त्यांना कायमस्वरुपी विटांचे कुंपण घालण्याचे असल्याने वाद निर्माण होऊ नये याकरीता सामनेवाले क्र. 1 चे कार्यालयात हद्द कायम मोजणी करीता अर्ज केला होता. त्यास अनुसरुन दि. 25/03/09 रोजी सामनेवाले क्र. 2 हे वाद ठिकाणी आले, व सामनेवाले क्र. 2 यांनी वादग्रस्त मिळकतीची मोजणी केली. सदरच्या मोजणीचे तंत्र व त्यांनी अनुसरलेली पध्दत चुकीची होती असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. कारण जमिन मोजणीमध्ये हद्द कायम करताना त्या जागेवर पूर्वीचे मोजणीची दगड अस्तित्वात असताना ते विचारात घेणे आवश्यक असताना ते विचारात घेतले गेले नाहीत. तक्रारदाराच्या वहिवाटीचे क्षेत्र प्रत्यक्षात त्यांच्या असलेल्या वहिवाटीपेक्षा कमी दाखविले. त्यामुळे तक्रारदारांना आपले पूर्वीचे कुंपण काढून नवीन मोजणीच्या वेळी दाखविलेल्या हद्दीवर कुंपण केले व त्यामुळे पूर्वीचे त्यांचे ताब्यात असलेले क्षेत्र त्यांनी सोडून दिले व त्या सोडून दिलेल्या क्षेत्रावर श्री. बालार्क राऊत यांनी अतिक्रमण करुन आपली स्वत: ची हद्द कायम केली. त्यानंतर तक्रारदारांना पुन्हा सदरची मोजणी संशयास्पद वाटल्याने त्यांनी पुन्हा मोजणीसाठी सामनेवाले 1 कडे अर्ज दिला. त्यास अनुसरुन दि. 06/06/09 रोजी पुन्हा सामनेवाले 1 चे प्रमुख मुख्यालय सहाय्यक श्री. व्ही.के. पाटील यांनी जागेवर येऊन परत मोजणी केली असता सदर मोजणीत सामनेवाले 2 यांनी दि. 25/03/09 रोजीच्या मोजणीत चूक केल्याचे स्पष्ट झाले. त्याबाबत सादर केलेल्या अहवालात सदरच्या चुका नमूद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले 2 विरुध्द तक्रार दाखल केलेली आहे, व सामनेवाले यांच्या चुकीमुळे श्री. बालार्क राऊत यांनी तक्रारदाराच्या जागेत अतिक्रमण केल्याने तक्रारदारांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याने त्याच्या नुकसानभरपाई पोटी रक्कम रु. 10,000/- सामनेवाले यांनी द्यावेत अशी मागणी तक्रारदारांनी केलेली आहे.
3. तक्रारदारांनी नि. 5 वर तक्रारीस सोबतचे ॲफीडेव्हीट व पुराव्याचे शपथपत्र दि. 29/09/11 रोजी दाखल केले आहे. तसेच नि. 4 वर स. नं. 3, हि. नं. 8 व स. नं. 3, हि. नं. 10 ची झेरॉक्सप्रत, स. नं. 3, हि. 5 क/2 चा सातबारा उतारा, मोजणीचा नकाशा, स. नं. 3, हि. नं. 8 व स. नं. 3, हि. नं. 10 च्या उताऱ्याची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले यांना लेखी जबाब दाखल करणेसाठी नोटीस पाठविण्यात आली. सामनेवाले 1 यांनी दि. 15/04/11 रोजी लेखी जबाब दाखल केला, तसेच सामनेवाले 2 यांनी दि. 13/08/11 रोजी लेखी जबाब दाखल केला. तसेच दि. 19/08/11 रोजी प्रतिज्ञापत्र दाखल केले. दि. 31/01/14 रोजी तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. तसेच सामनेवाले 2 च्या वकीलांनी त्यांचा लेखी जबाब हाच त्यांचा लेखी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरशिस दिली. सामनेवाले 1 यांचा लेखी जबाब दाखल आहे. परंतु त्यांनी लेखी युक्तीवाद दाखल केलेला नाही, सबब, त्यांचा लेखी जबाब हाच लेखी युक्तीवाद समजण्यात येतो. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले 1 व 2 चा लेखी जबाब व तक्रारदारांनी दाखल केलेला लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करता खालील मुद्दे निष्कर्षासाठी निघतात.
मुद्दे | निष्कर्ष |
मुद्दा क्रमांक 1 – तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? व तक्रारदारांची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (1) (O) नुसार सेवा या प्रकारात मोडते काय ? | नाही. |
मुद्दा क्रमांक 2 – तक्रारदारांची तक्रार मंजूर होणेस पात्र आहे काय ? | नाही |
कारणमीमांसा
मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार सामनेवाले 2 यांनी दि. 25/03/09 ची मोजणी चुकीची केल्यामुळे त्यांचे ताब्यात असलेले क्षेत्र त्यांनी नवीन मोजणी प्रमाणे असलेल्या हद्दीनुसार सोडले, व त्या क्षेत्रावर श्री. बालार्क राऊत यांनी अतिक्रमण केले त्यामुळे त्यांचे नुकसान झालेले आहे. सामनेवाले यांनी सदरची मोजणी त्यांनी सरकारी कर्मचारी म्हणून केलेली होती व ती त्यांनी शासकीय सेवा बजावताना केलेली आहे. त्यामुळे ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1) (ड) नुसार तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत. त्यामुळे या मंचास प्रस्तुत तक्रार चालविणेचा अधिकार नाही अशी हरकत उपस्थित केलेली आहे. सामनेवाले 1 हे शासकीय कर्यालय व सामनेवाले 2 हे शासकीय कर्मचारी असून तक्रारदारांनी जमिन मोजणीसंबंधी भरलेली फी व त्या अनुषंगाने केलेली मोजणी हा सेवेचा करार होऊ शकत नाही. जमिनीची मोजणी करणे व तद्नुषंगाने मोजणी प्रकरणी चौकशी करुन जागेवर वहिवाट दाखविणे व नकाशा बनविणे हा सामनेवाले यांचे कार्यालयाच्या कर्तव्याचा भाग आहे. सामनेवाले 1 हे शासकीय कार्यालय व सामनेवाले 2 हे त्याचे शासकीय कर्मचारी असून मोजणीचे काम व त्या अनुषंगाने उद्भवलेले काम हे त्यांचे Statutory function असून त्यामुळे दिलेली कोणतीही सेवा ही (service for consideration) मोबदल्यात येत नाही. त्यामुळे जमिनीची मोजणी ही सेवा या सदरात मोडू शकत नाही. त्यामुळे सामनेवाले हे मोजणीकामी सेवा देणारी संस्था नसल्यामुळे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2(1) (O) मध्ये नमूद “सेवा” या सदरात तक्रारदारांची तक्रार मोडत नाही. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक होऊ शकत नाहीत.
मुद्दा क्रमांक 2 - तक्रारदारांनी सामनेवाले 1 यांचे कार्यालयात स.नं. 3 हि 8 या जमिनीची मोजणी होऊन मिळणेकरीता अर्ज केला होता. या मिळकतीच्या उत्तर बाजूचे हद्दीला लागून बालार्क राऊत यांची स.नं. 3 हि. 5 क / 2 ही मिळकत आहे. या मिळकतीच्या हद्दीवरुन त्यांच्यात वाद आहेत, व तक्रारदार यांना आपले मिळकतीला कुंपण करावयाचे असल्याने या हद्दीवरुन वाद होऊ नये याकरीता त्यांनी सदरहू अर्ज दिलेला होता. त्याप्रमाणे सामनेवाले 2 यांनी दि. 25/03/09 रोजी जागेवर येऊन मोजणी केली. सदरहू मोजणीचे वेळी सामनेवाले यांनी चुकीची हद्द दाखविली त्यामुळे तक्रारदार यांनी कमी क्षेत्रात कुंपण केले. पूर्वीचे हद्दी प्रमाणेचे जादा क्षेत्र रिकामे ठेवले व त्या क्षेत्रावर श्री. बालार्क राऊत यांनी अतिक्रमण केले. प्रत्यक्षात तक्रारदारांचे म्हणण्यानुसार पूर्वीचीच हद्द बरोबर होती. त्यामुळे सामनेवाले यांनी सदोष मोजणी केल्यामुळे तक्रारदारांचे क्षेत्रावर राऊत यांनी अतिक्रमण केल्याने त्यांचे आर्थिक व मानसिक नुकसान झाल्याने त्याच्या नुकसानभरपाई पोटी रक्कम रु. 10,000/- सामनेवाले कडून मिळणेकरीता सदरहू तक्रार तक्रारदारांनी दाखल केलेली आहे.
तक्रारदारांचे वकीलांनी युक्तीवादात मा. सर्वोच्च न्यायालयाचे AIR (SC)2008-0-2957, दिनांक 22 एप्रिल, 2008, रिजनल प्रॉव्हीडंट फंड कमिशनर विरुध्द भवानी या न्यायनिवाडयानुसार सदरच्या तक्रारदारांची तक्रार चालविण्याचे अधिकार ग्राहक मंचाला असल्याचे नमूद केले. सदरहू निष्कर्ष या प्रकरणात लागू होणार नाही. कारण त्याठिकाणी तक्रारदारांस Provident Fund ह्या scheme ची सेवा मिळत होती. प्रॉव्हीडंट फंड ही एक scheme आहे. त्याची सेवा तक्रारदार घेत असल्याने ते या ठिकाणी ग्राहक होतात. परंतु या प्रकरणामध्ये सामनेवाले हे मोजणी अधिकारी आहेत. ते कोणतीही scheme राबवित नाहीत. त्यामुळे वर नमूद प्रॉव्हीडंट फंडच्या प्रकरणातील तत्त्व हे या प्रकरणाला लागू होणारे नाही. तसेच मा. राज्य आयोग, मुंबई यांनी अपिल क्र. 371/08 Taluka Inspector Land Records, Tasgaon V/s. Sukumar Chougule मध्ये पारीत अपील प्रकरणातील निर्णयाचे अवलोकन करता, जमिनीच्या मोजणीचे प्रकरण हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 2 (1) (O) मध्ये नमूद केलेल्या “सेवा” या सदरात मोडत नसल्याचे स्पष्ट केले आहे. निव्वळ मोजणीची फी घेतल्यामुळे मोजणी संबंधाने “सेवा” द्यावी असा त्याचा अर्थ होत नाही. असे देखील मा. राज्य आयोगाने स्पष्ट केलेले आहे. जमिनीची मोजणी व त्या संबंधीचे कार्य ही Sovereign Function असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे सदरहू मंचाला या संदर्भात कोणतेही आदेश पारीत करता येणार नाहीत, असे मंचाचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे तक्रारदारांची तक्रार मंजूर होण्यास पात्र नसल्याने त्या दृष्टीकोनातून आम्ही खालील अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
अंतिम आदेश
1. तक्रार क्रमांक 8/2011 फेटाळण्यात येते.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभयपक्षांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाण - रायगड-अलिबाग.
दिनांक – 31/12/2014
(रमेशबाबू बी. सिलीवेरी) (उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्य सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.