न्या य नि र्ण य
व्दाराः- मा. सौ. सविता प्र. भोसले, अध्यक्षा
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी OPPO-R 829 White (R 1) हा मोबाईल फोन रक्कम रु. 25,000/- रोख स्वरुपात देवून इनव्हॉईस नं. 3488 ने दि. 3/11/2014 रोजी वि.प.क्र.3 यांचेकडून खरेदी केला आहे. त्यावेळी वि.प. क्र.3 यांचे सांगणेवरुन तक्रारदार यांनी सिस्का गॅजेट सिक्युअर मोबाईल इन्शुरन्स रक्कम रु.1,000/- वि.प. क्र.3 यांचेकडून खरेदी केला आहे. त्यावेळी वि.प. क्र.3 यांनी, मोबाईल फोनला काहीही झाले किंवा तो चोरीला गेला तर तुम्हाला सदर मोबाईलच्या इन्व्हॉईस रकमेच्या 90 टक्के रक्कम परत मिळेल, असे सांगितले होते. दि. 1/9/15 रोजी तकारदाराचा सदरचा मोबाईल अचानक बंद पडला म्हणून तक्रारदार यांनी तो वि.प. क्र.3 यांचेकडे जमा केला. वि.प. क्र.3 यांनी तो मोबाईल वि.प.क्र.1 यांचेकडे जमा केल्याचे सांगितले. त्यावेळी वि.प. क्र.1 यांनी तक्रारदारांना मॅसेज पाठवून विमा क्लेमसाठी कागदपत्रे जमा करण्यास कळविले. त्यानुसार तक्रारदारांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रे वि.प.क्र.3 यांचे कर्मचारी श्री सचिन पाटील यांचेकडे जमा केली व त्यांनी ती वि.प. क्र.1 यांचेकडे पाठवून दिली. तदनंतर 15 दिवसांनी श्री सचिन पाटील यांनी, तुमचा मोबाईल दुरुस्त होत नाही, त्यामुळे मोबाईलच्या किंमतीच्या 90 टक्के रक्कम परत मिळेल, असे सांगितले. तदनंतर तक्रारदार यांनी वारंवार वि.प. क्र.1 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वाट पाहण्यास सांगितले. तदनंतर वि.प.क्र.1 यांचे श्री रणधीर यांनी तक्रारदरास फोन करुन, तुमचा फोन दुरुस्त झाला आहे, दुरुस्तीची रक्कम रु.1,500/- भरुन तो घेवून जा असे सांगितले. अशा प्रकारे वि.प.क्र.1 योचे हलगर्जीपणामुळे सदरचा मोबाईल वि.प. क्र.1 यांचेकडे 6 महिने पडून राहिला व विमाक्लेमची रक्क्म वि.प. यांनी दिली नाही. म्हणून तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुतकामी नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 50,000/-, मानसिक त्रासापोटी रु.50,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- वि.प. कडून वसूल होवून मिळावे अशी विनंती याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने प्रस्तुतकामी अॅफिडेव्हीट, कागदयादीसोबत मोबाईल खरेदीची पावती, इन्शुरन्सची पावती, मोबाईल जमा केल्यानंतर वि.प. यांचेकडून आलेले मॅसेजेस, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस, त्याची पोहोच, पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी वि.प. क्र.1 ते 3 यांना नोटीस लागू होऊनही सदर वि.प. याकामी गैरहजर राहिलेने वि.प. यांचेविरुध्द एकतर्फा आदेश नि.1 वर पारीत झालेला आहे.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने सदर तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दे विचारात घेतले.
अ. क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत काय ? | होय. |
2 | वि.प. कंपनीने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदार वि.प. यांचेकडून मोबाईलचे विमा क्लेमची रक्कम मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालील नमूद आदेशाप्रमाणे. |
वि वे च न –
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे कारण तक्रारदार यांनी त्यांचे OPPO-R 829 White (R 1) या मोबाईलसाठी वि.प. क्र.3 यांचे सांगणेवरुन सिस्का गॅजेट सिक्युअर मोबाईल इन्शुरन्स रक्कम रु.1,000/- वि.प. क्र.3 यांचेकडून खरेदी केला ही बाब कागदयादीसोबतचे अ.क्र.2 वरील पावतीवरुन स्पष्टपणे दिसून येते. वि.प. यांनी याकामी हजर होवून प्रस्तुत बाब नाकारलेली नाही. सबब, तक्रारदार व वि.प. हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत ही बाब निर्विवादपणे स्पष्ट सिध्द झाली आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिले आहे, कारण तक्रारदाराने वर नमूद केलेप्रमाणे त्यांचे OPPO-R 829 White (R 1) या मोबाईलसाठी वि.प. क्र.3 यांचे सांगणेवरुन सिस्का गॅजेट सिक्युअर मोबाईल इन्शुरन्स रक्कम रु.1,000/- या किंमतीस खरेदी केला. तक्रारदाराचे कथनानुसार सदरचा मोबाईल दि.1/9/15 रोजी अचानक बंद पडला म्हणून त्यांनी तो वि.प.क्र.3 यांचेकडे दुरुस्तीसाठी दिला. त्यांनी तो वि.प.क्र.1 यांचेकडे जमा केला. परंतु तदनंतर वि.प.क्र.3 यांचे कर्मचारी श्री सचिन पाटील यांनी तक्रारदारास फोन करुन सांगितले की, तक्रारदारांचा मोबाईल दुरुस्त होत नसल्यामुळे तक्रारदारास मोबाईलच्या इनव्हॉईसच्या किंमतीपैकी 90 टक्के रक्कम परत देण्यात येईल. परंतु तदनंतर अनेकवेळा संपर्क साधूनही तक्रारदारास सदरची क्लेम रक्कम मिळाली नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. म्हणून तक्रारदारांनी वि.प. यांना वकीलामार्फत दि. 05/08/16 रोजी नोटीस पाठविली. सदरची नोटीस वि.प.क्र.1 ते 3 यांना मिळाली परंतु त्यास कोणताही प्रतिसाद वि.प. यांनी दिलेला नाही असे तक्रारदाराचे कथन आहे. तक्रारदारांनी पाठविलेल्या सदरचे नोटीसीची प्रत व सदरची नोटीस वि.प. यांना प्राप्त झालेची पोहोच याकामी तक्रारदार यांनी दाखल केली आहे. सदरच्या सर्व बाबी वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेल्या नाहीत. वि.प. क्र.1 ते 3 यांना तक्रारअर्जाची नोटीस लागू होऊनसुध्दा ते याकामी मंचात हजर झाले नाहीत. सबब, वि.प. यांचेविरुध्द नि.1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. म्हणजेच वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदाराचे तक्रारअर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब, तक्रारदाराने तक्रारअर्जात केले कथनांवर विश्वासार्हता ठेवणे न्यायोचित वाटते. तक्रारदाराने वि.प. यांना पाठविलेल्या नोटीसीस वि.प. यांनी कोणताही प्रतिसाद दिल्याचे अभिलेखावरुन दिसून येत नाही. तक्रारदारांचे सदरचे नोटीसीतील कथने अथवा प्रस्तुत तक्रारअर्जातील कथने वि.प. यांनी याकामी हजर होवून नाकारलेली नाहीत. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी विम्याचे हप्त्यापोटी रक्कम रु.1,000/- स्वीकारुनही तक्रारदाराला त्याचे दोषयुक्त मोबाईलच्या किंमतीच्या 90 टक्के रक्कम अदा केली नाही ही बाब तक्रारदारांनी शाबीत केली आहे असे या मंचाचे मत आहे. सबब, वि.प.क्र.1 व 2 यांनी तक्रारदाराला सदोष सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. वि.प.क्र.3 यांचा मोबाईलचे विमादाव्याशी कोणताही संबंध नसल्याने त्यांना याकामी जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
8. सबब, वि.प. क्र.1 व 2 यांचेकडून तक्रारदार मोबाईलचे विमाक्लेमपोटी मोबाईलच्या इन्व्हॉईस किंमतीच्या 90 टक्के म्हणजे रक्कम रु.22,500/- परत मिळणेस तसेच प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाची रक्कम वसूल होवून मिळणेस पात्र आहेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.2,000/- अशी रक्कम वि.प. यांचेकडून वसूल होवून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
सबब, प्रस्तुत कामी आम्ही पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत.
- आ दे श -
1) तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशत: मंजूर करणेत येतो.
2) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना रक्कम रु.22,500/- अदा करावी. प्रस्तुत रकमेवर तक्रारअर्ज दाखल केले तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष तक्रारदाराचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के दराने व्याज वि.प. यांनी तक्रारदाराला अदा करावे.
3) मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- (रक्कम रुपये तीन हजार फक्त) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.2,000/- (रक्कम रुपये दोन हजार फक्त) वि.प.क्र.1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदाराला अदा करावेत.
4) वर नमूद सर्व आदेशांची पुर्तता वि.प. यांनी आदेशाची प्रत मिळाले तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5) विहीत मुदतीत आदेशांची पुर्तता न केलेस ग्राहक सरंक्षण कायदा, 1986 कलम 25 व 27 प्रमाणे वि.प. विरुध्द कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6) आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठवाव्यात.