निकालपत्र :- (दि.25.11.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 ते 5 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला क्र.1 ही भाजीपाली बियाणांचे उत्पादक आहेत. सदर कंपनीचा कारभार सामनेवाला क्र.2 हे पहात आहेत. सामनेवाला क्र.3 हे सदर कंपनीचे घाऊक विक्रेते असून सामनेवाला क्र.4 हें किरकोळ विक्रेते आहेत. सामनेवाला क्र.5 हे बियाणे खरेदी करुन रोप वाटिकेचा व्यवसाय करतात. (3) तक्रारदार हे शेतकरी असून त्यांच्या मालकीची मौजे आगर येथे गट नं.704 ही शेतजमीन आहे. तक्रारदार हे शेतजमीतीतून भाजीपाला व विविध पिके घेत आहेत. सामनेवाला क्र.1 व 2 यांनी उत्पादित केलेली ‘एफ-1 हायब्रिड किमया’ या जातीची बियाणे फलॉवर भाजीपाल्यासाठी त्याची निवड केली. तसेच, सामनेवाला क्र.5 यांचेकडे रोपांची चौकशी केली. त्यानुसार दि.07.04.2008 रोजी प्रति शेकडा रुपये 30/- प्रमाणे एकूण 10000 रोपांची खरेदी केली. सामनेवाला यांनी दिलेल्या शिफारशीनुसार तक्रारदारांनी त्यांच्या शेतामध्ये रोपांची लागण केली व आवश्यकतेप्रमाणे खते व औषधांच्या फवारण्या केल्या. (4) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, उपरोक्तप्रमाणे लागण केल्यानंतर 60 दिवसांनी गड्डे पडणेस सुरवात झाली. परंतु, सदरचे गड्डे पांढरे व मोठया आकाराचे न पडता कमी आकाराचे व जांभळट रंगाचे पडण्यास सुरुवात झाली. सदर बाब सामनेवाला क्र.5 यांना समक्ष सांगितली. त्यांनी बोरॉनची फवारणी न केल्याने नुकसान झालेचे सांगितले. तक्रारदार हे अनुभवी शेतकरी असून त्यांना 25 ते 30 वर्षे फलॉवर पिक घेण्याचा अनुभव आहे. सामनेवाला उत्पादक कंपनीच्या निकृष्ट बियाणांमुळेच नुकसान झालेचे तक्रारदारांना समजून आले. सामनेवाला कंपनीचे सेल्स ऑफिसर श्री.रवि घेजी तसेच सामनेवाला क्र.4 यांचेकडे तक्रारदारांनी नुकसान भरपाईची तोंडी मागणी केली असता त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदारांनी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती, कोल्हापूर यांचेकडे दि.15.09.2008 रोजी लेखी तक्रार केली असता सदर समितीने दि.20.09.2008 रोजी तक्रारदारांच्या प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामा व निरीक्षण घेतले व सदर प्लॉटमध्ये 5 टक्के गड्डे चांगले व 95 टक्के कमी आकाराचे व जांभळट रंगाचे असल्याचे दिसून आले व निकृष्ट बियाणे असल्याचा निष्कर्ष काढला. (5) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांना अंदाजे 30 किलोच्या 600 पिशव्या इतका माल उत्पादित झाला असता. त्यावेळी स्थानिक भाव हा रुपये 150/- होता. त्यामुळे तक्रारदारांचे सुमारे रुपये 90,000/- चे नुकसान झाले. सदर नुकसानी देणेस सामनेवाला हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. याबाबत सामनेवाला यांना वकिलामार्फत नोटीसही पाठविली. त्यास त्यांनी खोटया मजकूराची उत्तरी नोटीस पाठविली. सबब, फलॉवरचे बाजारभावाप्रमाणे झालेली नुकसानी रुपये 90,000/-, मानसिक त्रासापोटी रुपये 40,000/-, खर्च रुपये 5,000/- इत्यादी देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (6) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत मौजे आगर येथील गट नं.704 चा 7/12 चा उतारा, फ्लॉवर गड्डयाचे फोटो, कृषि विभाग जि.प. यांची नोटीस व पंचनामा, दि.22.09.2008 चे दै.तरुण भारतचे वृत्तपत्र, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवाल, सामनेवाला यांना पाठविलेली नोटीस व पोहोचपावती, सामनेवाला यांची उत्तरी नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (7) सामनेवाला क्र.1 ते 5 यांनी एकत्रितपणे म्हणणे दाखल करुन तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. सदर सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यामध्ये सामनेवाला उत्पादक कंपनीचे निकृष्ट बियाणे असलेबाबतचे तक्रारदारांचे कथन नाकारले आहे. सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीने दिलेल्या अहवालाबाबत कोणताही ठोस शास्त्रीय पुरावा नाही. बियाणांची तपासणी प्रयोगशाळेत न करता दिलेला अहवाल चुकीचा आहे. सामनेवाला कंपनीतर्फे श्री.रवि घेजी यांनी फलॉवर गड्डयाचा रंग हा वातावरणातील बदलामुळे जांभळट होतो. त्यास बियाणे कारणीभूत होत नाही असा जबाब बियाणे समितीसमोर दिलेला आहे. तसेच, बियाणांची लागवड केल्यावर त्यापासून रोपे तयार झालेली आहे. रोपांची लागवड केल्यावर त्यांची वाढ उत्तम झालेली आहे व गड्डे लागलेले आहेत. यावरुन बियाणांमध्ये दोष नाही हे सिध्द होते. केवळ दिवस व रात्र यामधील तापमानातील बदल आणि पिक फुलो-यात आले असता प्रतिकूल वातावरण परिस्थिती ही बाब नैसर्गिक असून त्यामुळे फ्लॉवरेच्या गड्डयांचा रंग जांभळट झालेला आहे. (8) सामनेवाला त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी मागितलेली नुकसानी ही बेकायदेशीर आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी विनंती केली आहे. (9) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद सविस्तर व विस्तृतपणे ऐकले आहेत. तसेच उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. सामनेवाला बियाणे उत्पादक कंपनीचे तक्रारीत उल्लेख केलेल्या फ्लॉवर बियाणांपासून तयार केलेली फ्लॉवर रोपे तक्रारदारांनी खरेदी केलेली आहेत व त्यांनी त्यांच्या शेतामध्ये त्याची लागवड केली आहे ही वस्तुस्थिती निर्वीवाद आहे. सामनेवाला यांनी निकृष्ट बियाणे असल्याचे नाकारले आहे. प्रस्तुत प्रकरणी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचे अवलोकन केले असता सदर समितीने दिलेला अहवाल हा अत्यंत त्रोटक असून याबाबत शास्त्रीय आधाराचा कुठेही उहापोह केलेला नाही. सामनेवाला यांच्या बियाणाच्या उगवण शक्तीबाबत तक्रारदारांची तक्रार नाही. सदर बियाणांची उगवण चांगली झाली आहे. फ्लॉवरचे गड्डे हे कमी आकाराचे व जांभळट रंगाचे असलेचे दिसून येत आहे. याबाबत या मंचाने Handbook of Agricultural Science - Editor Dr.S.S.Singh या कृषिशास्त्राच्या पुस्तकातील उता-याचे अवलोकन केले असता फ्लॉवरला येणारा जांभळट रंग हा बोरॉन त्रुटीमुळे येवू शकतो. तसेच, वातावरणातील बदलाचाही त्यावर परिणाम होवू शकतो. हवामानातील बदलामुळे पिकावर परिणाम होत असेल तर त्यामध्ये बियाणाचा दोष आहे असे म्हणता येणार नाही. तसेच, जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा अहवालही निर्णायक पुरावा म्हणून वाचता येणार नाही. याबाबत पूर्वाधार म्हणून पुढील पूर्वाधार हे मंच विचारात घेत आहे :- 1. Appeal No.945/2006 M/s. Nirmitee Biotech Vs. R.N.Sankpal & Others, decided on 30.04.2008 - State Commission, Mumbai. 2. 2005 (II) CPJ (SC) Page No.13 - Hariyana Seeds Dev. Corp. Ltd. Vs. Sadhu & Others. 3. Appeal No. 1207/2008 Golden Seeds Pvt. Ltd. Vs. B.N.Bhavnath & Others, decided on 18.02.2009 - State Commission, Mumbai. 4. 2009 (II) CPJ Page No.414, Somnath Kashinath Ghodse Vs. Vilas G. Jagtap & Others. 5. CPJ II (2000) (SC) Page No.1 - Chanran Singh Vs. Healing Touch Hospital. (10) उपरोक्त विवेचन व पूर्वाधार विचारात घेता सामनेवाला कंपनीच्या बियाणे सदोष आहेत हे सिध्द होत नाही. सबब, हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |