तक्रार क्र.152/2015.
तक्रार दाखल दि.06-07-2015.
तक्रार निकाली दि.23-05-2016.
अनिकेत सुभाष खरोटे ,
रा.1339, रविवार पेठ, वाई,
ता.वाई, जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
स्क्वेअर कंन्स्ट्रक्शन,
श्री. संपत विष्णु वरे,
रा. 1338, ऋतुजा अपार्टमेंट,
फ्लॅट नं. एफ-2, रविवार पेठ, वाई,
ता.वाई, जि.सातारा. .... जाबदार.
.....तक्रारदारतर्फे-अँड.एस.बी.मोरे.
.....जाबदारतर्फे- अँड.व्ही.पी.जगदाळे.
न्यायनिर्णय
(मा.श्री. श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी न्यायनिर्णय पारित केला.)
1. प्रस्तुत तक्रारदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,1986 चे कलम 12 प्रमाणे जाबदारांचे सेवात्रुटीबाबत दाखल केला आहे. प्रस्तुत तक्रार अर्जातील तक्रारदाराचे थोडक्यात कथन खालीलप्रमाणे-
2. तक्रारदाराचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे,-
प्रस्तुत तक्रारदार हे 1329, रविवार पेठ, वाई, ता.वाई, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत व जाबदार हे बांधकाम व्यावसायिक असून ते ‘स्क्वेअर कन्स्ट्रक्शन्स’ या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. प्रस्तुत जाबदार हे इमारतीसाठी जागा विकत घेऊन किंवा विकसन करारनामा करुन विकसीत करण्यास घेऊन त्यावर इमारती बांधून त्या विक्रीचा व्यवसाय करतात. सन 2013 मध्ये या जाबदार यांनी वाई येथील सि.स.नं. 1338 क्षेत्रफळ 288.5 चौ.मी., रविवार पेठ, वाई येथील जागा विकसीत करण्यासाठी रजिस्टर विकसन करारनामा क्र. 316/2013 दि.24/1/2013 21.1 चौ मिटर हे सदाशिव काळे व बाळकृष्ण काळे यांचेकडून विकसीत करण्यासाठी खरेदी घेतले व विषयांकित सि.स.नंबरची ऊर्वरीत सर्व मिळकतधारकाकडून मिळकत जाबदार यांनी रजि. दस्ताने खरेदी केली आहे व या विषयांकित जागेवरती जाबदार यांनी ‘ऋतुजा अपार्टमेंट’ या नावाने सदनिका बांधण्याचे योजले. प्रस्तुत तक्रारदार यांना रहिवासासाठी सदनिकेची आवश्यकता असलेने जाबदार यांच्या जाहिरातीला अनुसरुन त्यांनी 2 बीएचके सदनिका घेण्याचे ठरवून जाबदार यांचेकडे गेले व जाबदार यांनी विषयांकित सदनिकाबाबत नगरपालीका मंजूर आराखडा, बांधकाम परनानगी तसेच इतर अनुषंगिक कागदपत्रे दाखविल्यानंतर तक्रारदार यांनी पहिल्या मजल्यावरिल एफ-3 हा 830 चौ. फू. (77.13 चौ.मि.) क्षेत्रफळाची सदनिका घेण्याचे ठरले व त्याची जाबदार यांनी सांगितलेली एकूण किंमत रक्कम रु.17,90,000/- (रुपये सतरा लाख नव्वद हजार मात्र) ठरली. या व्यवहारास तक्रारदाराचे वडिल सुभाष दत्तात्रय खरोटे हे उपस्थित होते. याप्रमाणे दि. 8/1/2014 रोजी यातील जाबदार यांनी तक्रारदार यांना मे. दुय्यम निबंधकसो वाई यांचेकडे रजि. क्र. 162/2014 ने विषयांकित सदनिकेबाबतचा करारनामा नोंदविण्यात आला. त्यावेळी या तक्रारदार यांनी या जाबदार यांना रक्कम रु.3,58,000/- (रुपये तीन लाख अठ्ठावन्न हजार मात्र) ची रक्कम रोख दिली. कराराप्रमाणे बांधकाम टप्प्याप्रमाणे ऊर्वरित रक्कम रु.14,32,000/- (रुपये चौदा लाख बत्तीस हजार मात्र) या तक्रारदार यांनी जाबदार यांना संपूर्ण पूर्ण दिले आहेत. त्यामुळे यातील जाबदार यांनी दि. 7/1/2015 रोजी विषयांकित सदनिकेचे खरेदीपत्र तक्रारदार यांना करुन दिले व त्याचा ताबाही दिला.
प्रस्तुत तक्रारदार यांनी विषयांकित सदनिकेचा ताबा घेतलेनंतर गृहप्रवेश केल्यावर त्यांना असे आढळून आले की, विषयांकित सदनिकेमधील कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. उदा. सदनिकेतील किचन कट्टा, त्याखालील टाईल्स व बाथरुममधील काचा लावलेल्या नाहीत, मुख्य दरवाजा खराब, हलक्या दर्जाचा आहे. सदनिकेचे क्षेत्रफळ नमूद क्षेत्रापेक्षा कमी आहे ते कार्पेट क्षेत्र 581 चौ.फूट भरले ते नियमानुसार 756 चौ. फूट इतके हवे होते. तसेच सदनिकेचे क्षेत्रफळ हे 73.00 चौ.फूटाने कमी भरत आहे व हे क्षेत्र वापरुन या जाबदार यांनी हॉलमध्ये एकेरी भिंत बांधून 73.00 चौ. फूटाची लहान खोली तयार केली आहे. जी नगरपालिकेने मंजूर केलेल्या सदनिकांचे आराखडयामध्ये नाही व ते त्याचा व्यावसायिक वापर करित आहेत. वास्तविक ही खोली या तक्रारदाराचे सदनिकेचा अविभाज्य भाग आहे. याबाबत जाबदार यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर देवून दमदाटी व मारामारीची भाषा केली. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन कराराप्रमाणे तक्रारदार यांना पूर्ण क्षेत्रफळाची सदनिका न देवून अंतर्गत बांधकामामध्ये दोष व अपूर्णता ठेवून, निकृष्ठ साहित्य वापरुन त्यांची फसवणूक करुन कराराप्रमाणे पूर्ण क्षेत्रफळाची सदनिका न देवून या तक्रारदार यांची फसवणूक केली व सदोष सेवा दिली व या सर्व त्रूटी जाबदार यांनी त्वरित दूर करुन देण्याबाबत विनंती करुनही न दिलेने तक्रारदार यांनी वकीलांमार्फत दि.8/5/2015 रोजी नोटीस पाठविली व त्यांना नोटीस मिळूनसुध्दा जाबदार यांनी वरील सेवात्रुटी तक्रारदार यांना दूर करुन दिलेल्या नाहीत. त्यामुळे जाबदार यांच्या वरील सेवा त्रुटीबाबत तक्रारदार यांनी जाबदारांविरुध्द तक्रार दाखल केली व त्यांचेकडून तक्रारदार यांचे सदनिकेचा भाग असलेले 73.00 चौ. फूट ची रुम तक्रारदार यांचे ताब्यात द्यावी. सदनिका क्र. एफ-3 शेजारी काढलेला बेकारयदेशीर दरवाजा बंद करावा व या सदनिकेमधील बांधकाम व किचनरुम मधील अर्धवट राहिलेले बांधकाम पूर्ण करुन द्यावे, मानसिक, शारिरीक त्रासाबाबत रक्कम रु.1,00,000/- व अर्ज खर्च मिळावा अशी विनंती मागणी मे मंचास तक्रारदार यांनी केली आहे.
3. प्रस्तुत तक्रारदार यांनी प्रकरणी नि. 1 कडे त्यांची तक्रार, तक्रारीपृष्ठयर्थ्य नि. 2 कडे शपथपत्र, नि.4 कडे तक्रारदारतर्फे विधिज्ञ सागर मोरे वगैरे यांचे वकिलपत्र, नि.5 सोबत नि.5/6 कडे रजिस्टर करारनामा, नि.5/7 कडे रजिस्टर डिड ऑफ अपार्टमेंट नि.5/8 कडे तक्रारदार यांनी जाबदारांना पाठवलेल्या नोटीसांची फोटोकॉपी, नि.5/8 कडे नोटीसीला जाबदारांनी दिलेली उत्तरी नोटीस, नि.10 कडे जाबदारांना नोटीस मिळालेची पोष्टाची पोहोच पावती, नि.11 कडे जाबदारांना रजि. पोष्टाने नोटीसा पाठवलेबाबत पोष्टाची पावती, नि.5/12 कडे घोषणापत्र, नि.5/13 कडे तक्रारदार यांचे जाबदारांचे फेर आराखडयावर घेतलेल्या हरकतीवर वाई नगरपालीकेने जाबदाराना पाठविलेली नोटीस, नि. 5/14 कडे विषयांकित अपार्टमेंटची जाहिरात, नि.5/15 कडे विषयांकित अपार्टमेंटचे फोटो, नि. 11 सोबत नि.11/1 कडे श्री. अमोल खोतलांडे यांचा विषयांकित सदनिकेच्या मोजमापाच्या वस्तुस्थितीचा अहवाल, नि.11/2 यातील जाबदारांनी या तक्रारदार यास पाठवलेली नोटीस, नि. 11/3 कडे तक्रारदाराचे सदनिकेची विज बिल भरलेची पावती, नि. 12 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 13 कडे पुरावा संपलेची पुरसीस, नि. 14 कडे लेखी युक्तीवाद इत्यादी कागदपत्रे पुराव्याकामी यातील तक्रारदार यांनी प्रकरणी दाखल केली आहेत.
4. यातील जाबदारांना मे मंचामार्फत रजिस्टर पोष्टाने नोटीसा पाठविण्यात आल्या. प्रस्तुत नोटीस यातील जाबदारांना मिळूनही प्रस्तुत जाबदार मंचात वारंवार पुकारुनही गैरहजर, जाबदार ते स्वतः किंवा त्यांचेतर्फे विधिज्ञांमार्फत प्रकरणी हजर झाले नाहीत त्यामुळे त्यांचेविरुध्द नि. 1 वरती त्यांचेविरुध्द मंचाने एकतर्फा आदेश पारीत केलेले आहेत. त्यानंतर यातील जाबदार यांनी दि.19/10/2011 रोजी नि. 9 कडे अर्ज व नि.10 कडे वकिलपत्र दाखल करुन त्यांचे अँड. व्ही.पी.जगदाळे यांचेमार्फत हजर झाले. परंतु त्यापूर्वीच मे मंचाने दि.28/8/2015 रोजी या जाबदारांविरुध्द ‘एकतर्फा’ आदेश पारीत केला असलेने व तो रद्द करण्याचे अधिकार या मंचास नसल्याने जाबदार यांचा नि. 9 चा अर्ज नामंजूर करण्यात आला. त्यामुळे या जाबदारांविरुध्द प्रकरण एकतर्फा चौकशीस घेऊन तक्रारदार यांचा युक्तीवाद ऐकून प्रकरण निकालासाठी घेणेत आले.
5. प्रस्तुत तक्रारदारांचा तक्रार अर्ज, त्यासोबतचे शपथपत्र, नि. 5 व नि.11 सोबतची पुराव्याची कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, लेखी युक्तीवाद त्यातील मतितार्थ, यांचा विचार करता प्रस्तुत प्रकरणाच्या न्यायनिर्णयासाठी आमचेसमोर खालील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दा उत्तर
1. प्रस्तुत तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत काय?- होय.
2. प्रस्तुत जाबदारांनीया तक्रारदार यांना रजि.करार, डीड,
ऑफ अपार्टमेंटमधील नमूद क्षेत्राप्रमाणे किंमत आकारणी
करुन प्रत्यक्षात कमी क्षेत्राची सदनिका देवून व
सदोष बांधकाम केलेली सदनिका तक्रारदार यांना देवून
या तक्रारदारांना सदोष सेवा दिली आहे काय?- होय.
3. अंतिम आदेश? तक्रार अंशतः मंजूर.
6. कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 3
प्रस्तुत तक्रारदार हे 1329, रविवार पेठ, वाई, ता.वाई, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. यातील जाबदार हे बांधकाम व्यावसायिक असून ते निरनिराळया ठिकाणच्या जागा विकसन करारनामेने खरेदी घेऊन त्यावर सदनिका (अपार्टमेंटस्) उभारुन त्या विक्री करण्याचा जाबदारांचा व्यवसाय आहे. यातील जाबदार यांनी वाई, ता.वाई, जि.सातारा येथील रविवार पेठेतील सि.स.नं. 338 क्षेत्र 288.5 चौ.मि. ही मिळकत मूळ मालक श्री. सदाशिव व बाळकृष्ण सखाराम काळे यांचेकडून खरेदी घेऊन त्यावर ‘ऋतुजा अपार्टमेंट’ या नावाने सदनिका संकुल उभा करणेचे ठरवले होते. त्याप्रमाणे या जाबदारांनी त्याची जाहीरातसुध्दा केलेली होती. त्यास अनुसरुन या तक्रारदार यांनी जाबदारांचे गृहसंकुलामध्ये पहिल्या मजल्यावरील एफ-3, 2 BHK सदनिका यांचे क्षेत्र एकूण बिल्टअप एरिया 830 चौ.फूट क्षेत्राची सदनिका बुक केली. या सदनिकेची एकूण किंमत रक्कम रु.17,90,000/-(रुपये सतरा लाख नव्वद हजार मात्र) ठरली होती. त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदारांनी वरील क्रमांकाची विषयांकित सदनिकेचा साठेखत करारनामा दि.8/1/2014 रोजी वाई दुय्यम निबंधक कार्यालय, वाई यांचे कार्यालयात रजि. दस्त क्र. 162/2014 ने अँडव्हान्सपोटी रक्कम रु.3,58,000/- (रुपये तीन लाख अठ्ठावन्न हजार मात्र) जाबदारांनी रोख स्विकारुन तक्रारदार यांना रजिस्टर करुन दिलेला होता. हे नि. 5/6 कडील तक्रारदार यांनी दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन दिसून येते. या बाबी उभयपक्षकारांना मान्य आहेत. वरील व्यवहारावरुन प्रस्तुत जाबदार हे सेवापुरवठादार व तक्रारदार हे सेवा घेणारे असे नाते उभयतांमध्ये असलेचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारदार हे या जाबदारांचे ग्राहक आहेत हे निर्विवादरित्या शाबीत होते. त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6(1) प्रस्तुत प्रकरणातील नि.5/6 कडे तक्रारदार यांनी दाखल केलेला जाबदारांनी तक्रारदार यांना विषयांकित सदनिका पहिला मजला क्र. एफ-3 बाबतचा करारनामा, नि.5/7 कडील मे. दुय्यम निबंधक कार्यालयाकडे जाबदारांनी तक्रारदार यांना रजि. करुन दिलेला रजि. दस्त क्र. 122/2015, दि. 7/1/2015 चा ‘डिड ऑफ अपार्टमेंट’, नि. 5/8 चे मे. दुय्यम निबंधक, वाई यांचेकडील रजि.दस्त क्र. 450/2014 दि.4/2/2014 चे घोषणापत्र व त्यातील नमूद मजकूर पाहीला असता तक्रारदार यांची पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. एफ-3 ही 830.00 चौ.फू. 77.13 चौ. मि. क्षेत्राची असून तिची एकूण किंमत रक्कम रु.17,90,000/- होती व सदरची सदनिका 2 बीएचके होती हे पूर्णतः शाबीत होते. परंतु या तक्रारदारांना या जाबदारांनी दि.7/1/2015 रोजी विषयांकित सदनिकेचा प्रत्यक्ष ताबा दिला. तक्रारदार यांना त्यांच्या विषयांकित सदनिकेचे रजि. खरेदीपत्र दि.7/1/2015 रोजी करुन दिले व त्याचवेळी सदनिकेचा कब्जा जाबदारांनी तक्रारदार यांना दिला. त्यानंतर जेव्हा या तक्रारदार यांनी त्यांच्या विषयांकित सदनिकेचा कब्जा घेऊन रहिवासासाठी जेव्हा ते सदनिकेत गेले त्यावेळी त्यांना रजि. कागदपत्रांमध्ये नमूद क्षेत्रापेक्षा ती लहान सदनिका असलेचे त्यांना जाणवले व विषयांकित सदनिकेमध्ये खालील अपूर्णता (त्रुटी) आढळून आल्या.
2. किचन कट्टयामधील टाईल्स व बाथरुममधील काचा लावलेल्या नाहीत.
3. मुख्य दरवाजा खराब झाला असून तो हलक्या दर्जाचा आहे.
4. कराराप्रमाणे व नियमाप्रमाणे विषयांकित सदनिकेचे लोडिंग बोजा कमी करुन क्षेत्रफळ हे 75.6 चौ.फूट इतके असावयास हवे होते ते 581/- चौ.फूट इतके भरते.
5. या तक्रारदाराचे विषयांकित सदनिका एफ-3 च्या हॉलमध्ये यातील जाबदारांनी एक एकेरी भिंत बांधून हॉलच्या पलिकडे अंदाजे 73.00 चौ.फूटाची खरेदी (जी मंजूर आराखडयात नाही) ती तयार केलेली आढळून आली व त्याचा बेकायदेशीरपणे वापर हे जाबदार करीत आहेत व ती खोली तक्रारदाराचे सदनिकेचा भाग आहे.
7. सदनिकेचा ताबा घेतलेली सदनिकेमध्ये इलेक्ट्रीक फिटींग केलेले नव्हते व विद्युत जोडणी दिलेली नव्हती ती या तक्रारदाराने स्वतः करुन घेतले. या सदोष कामाबाबत व त्रुटीबाबत आम्ही प्रस्तुत तक्रारदार यांनी प्रकरणी नि. 5/11 ते नि.5/13 चे फोटो अभ्यासले असता विषयांकित सदनिकेच्या बाथरुममध्ये टाईल्स घातलेचे दिसून येत नाही, काचा लावलेल्या नाहीत, दरवाजे हे टवके उडालेले व खराब स्थितीत आहेत. पर्यायाने मुख्य दरवाजे हे हलक्या लाकडाचे दिसून आले. त्याचप्रमाणे तक्रारदाराचे तक्रारीचे अनुषंगाने या तक्रारदार यांची प्रकरणाचे नि.11/1 कडे श्री. अमोल खोतलांडे (बी.ई.सिव्हील) शिवचैतन्य कन्स्ट्रशन अँड असोसिएट, लायसन नं.86 या इंजिनियर कडून विषयांकित सदनिकेचे क्षेत्रफळ यातील सदोषता, अपूर्ण कामे याबाबत तपासणी करुन घेऊन त्यांचा अहवाल सादर केला आहे. ते तपासले असता तक्रारदारांचे विषयांकित सदनिकेचा एकूण कारपेट क्षेत्र 578.526 चौ. फूट म्हणजेच 53.766 चौ.मीटर इतके भरले आहे हे निर्विवादरित्या शाबित होते व त्यामुळे तक्रारदाराचे विषयांकित सदनिकेचे क्षेत्र अंदाजे 73.00 चौ. फूट हे तक्रारदाराचे सदनिकेचे असून ते अनाधिकाराने बेकायदेशीररित्या तक्रारदाराची फसवणूक करुन या जाबदारांनी बळकावलेचे स्पष्ट होते व ही या जाबदाराने त्यांच्या व्यवसायामध्ये अनुचित प्रथेचा वापर करुन कराराप्रमाणे निर्धारित क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची सदनिका ती कराराप्रमाणे आहे असे भासवून तक्रारदाराला देवून सदनिका अंतरगत बांधकामामध्ये अपूर्णतः व सदोषतः ठेवून त्यांची फसवणूक केली. याबाबत या तक्रारदाराने यातील जाबदारांकडे स्वतः भेटून प्रसंगी वकिलामार्फत नि. 5/8 प्रमाणे नोटीस पाठवून विषयांकित सदनिकेमधील सदोषता दूर करुन द्यावी व 75.00 चौ.फूट जागा ताब्यात द्यावी अशी मागणी करुनही त्याप्रमाणे जाबदारांनी पूर्तता केली नाही. व तक्रारदाराना सदोष सेवा दिली आहे हे निर्विवादरित्या शाबित होते. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूरीस पात्र आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे मुद्दा क्र. 2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
8. प्रस्तुत प्रकरणाची नोटीस यातील जाबदारांना रजिस्टर पोष्टाने पाठविण्यात आली. सदर नोटीस जाबदाराना मिळाली. परंतू त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदार हे स्वतः किंवा त्यांच्यातर्फे वकील नेमून प्रकरणी हजर होऊन त्यांचे आक्षेप/कैफियत निर्धारित वेळेत प्रकरणी दाखल केली नाही. त्यामुळे मंचाने या जाबदारांविरुध्द नि. 1 वरती जाबदारांविरुध्द एकतर्फा आदेश पारीत केला आहे. त्यानंतर यातील जाबदारांनी नि. 15 कडे दि.5/2/2015 रोजी त्यांच्याविरुध्दचा एकतर्फा आदेश रद्द करावा व जाबदारतर्फे सोबत दाखल केलेली कागदपत्रे दाखल करुन घ्यावीत असा अर्ज दिला. त्यावर तक्रारदाराचे म्हणणे घेऊन मे. मंचाने जाबदारांचा अर्ज “या जाबदारांचेविरुध्द ते मंचानी पूर्वीच एकतर्फा आदेश केलेने तो रद्द करणेचा अधिकार या मे. मंचास नसलेने जाबदारांचा अर्ज नामंजूर केला” यानंतर मे. मंचाचे या आदेशाविरुध्द प्रस्तुत जाबदारांनी मे.राज्य आयोग किंवा योग्य त्या आयोगात जाऊन या मंचाचा आदेश रद्द करुन आणलेला नाही त्यामुळे या मंचाचा आदेश ग्राहक संरक्षण कायदा कलम 24 प्रमाणे कायम झालेला आहे. त्यामुळे तक्रारदाराचे तक्रारीस जाबदारांचे आक्षेप नाहीत. तक्रारदार यांनी त्यांची तक्रार पुराव्यासह मंचात शाबित केलेली आहे.
7. वरील सर्व विवेचन व कारणमिमांसा याला अधिन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. प्रस्तुत जाबदार यांनी तक्रारदार याना कराराप्रमाणे ठरलेल्या क्षेत्रापेक्षा कमी
क्षेत्रफळाची व अपूर्ण व सदोष कामांची सदनिका देवून या तक्रारदार यांना
सदोष सेवा दिली आहे असे घोषीत करण्यात येते.
3. यातील जाबदारांनी बांधलेल्या ‘ऋतुजा अपार्टमेंट’ मधील सदनिका क्र.एफ-3
दुसरा मजला मधील बाथरुममधील व किचनरुममधील अर्धवट राहिलेले काम,
सदोष दरवाजे यांचे काम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांचे आत
तक्रारदार यांना पूर्ण करुन द्यावे.
4. यातील जाबदारांनी तक्रारदार यांना तक्रारदाराचे हॉलमध्ये शेजारी एकेरी भिंत
बांधून तयार केलेली 73.00 चौ. फूटाची खोली तक्रारदाराचे ताब्यात सदर
आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांचे आत द्यावी.
5. यातील जाबदारांनी विषयांकित सदनिका एफ-3 शेजारी बसवलेला दरवाजा बंद
करुन द्यावा किंवा काढून घ्यावा व तक्रारदाराचे सदर मागणीची पूर्तता सदर
आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांचे आत करावी.
6. प्रस्तुत जाबदारांनी या तक्रारदाराना या जाबदारांकडून त्यांची, फसवणूक झालेने
झालेल्या मानसिक, शारिरिक त्रासापोटी रक्कम रु.75,000/- (रुपये पंच्याहत्तर
मात्र) व अर्ज खर्चापोटी रक्कम रु.7,000/- (रुपये सात हजार मात्र) सदरचा
आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदारांना अदा करावेत.
7. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांनी
यातील जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे
कारवाई करणेची मुभा राहील.
8. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
9. प्रस्तुत आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य द्याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि.23-05-2016.
सौ.सुरेखा हजारे, श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.