निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- सामनेवाले यांचा कार, मोटर सायकल, सायकल, इत्यादीचे पँकीग करुन वाहून नेण्याचा व्यवसाय आहे. ते कार बंद कंटेनर किंवा कार कॅरिअर्समधून वाहून नेतात. तक्रारदाराला त्याची मारुती-800 ए/सी कार क्र.एचआर-03-एच-2278, हरीयाणातील पंचकुला येथून नवी मुंबई येथे आणावयाची होती. त्यासाठी त्याने सामनेवाले यांची सेवा घेतली. सामनेवाले यांनी तक्रारदाराची कार, कार कंटेनरमधून आणून द्यावयाचे ठरले होते. त्यासाठी रु.8,000/- चार्ज केला. दि.26.08.2008 रोजी तक्रारदाराने त्याची कार उत्तम स्थितीत सामनेवाले यांच्या ताब्यात दिली. त्यानंतर, तक्रारदाराने कारच्या बाबतीत सामनेवाले यांना ब-याच वेळा फोन करुन चौकशी केली. शेवटी दि.09.09.2008 रोजी सामनेवाले यांनी कार नवी मुंबई येथे आणून दिली, त्यावेळी तक्रारदाराला सामनेवाले यांचेकडून कळाले की, त्यांनी कार आणण्यासाठी चालक नेमला होता व त्याने निष्काळजीपणे कार चालविल्यामुळे हरियाणा येथील गुरगांव येथे तिला अपघात झाला. 2 तक्रारदाराचे म्हणणे की, सामनेवाले यांनी कबूल केले होते की, कार फक्त कार कंटेनरमधूनच आणली जाईल. परंतु त्यांनी कंन्साईनमेंट नोटच्या शर्ती व अटींचा भंग केला आहे व गाडी चालवत आणण्यासाठी चालकाच्या ताब्यात दिली. त्यामुळे कारला अपघात झाला व गाडीचे खूप नुकसान झाले. पर्यायाने त्याचे खूप आर्थिक नुकसान झाले. दि.09.09.2008 रोजी कार त्याच्याकडे आणल्यानंतर, त्याला अपघाताबद्दल त्याला कळाले. त्या अगोदर, सामनेवाले यांनी अपघाताबद्दल त्याला काहीच सांगितले नाही. तक्रारदाराने ती गाडी दुरुस्त करण्याच्या खर्चाबाबत नवी मुंबई येथील एस.के.व्हील्स् यांचेकडून दरपत्रक घेतले व सामनेवाले यांना फोन करुन तडजोडीबद्दल प्रयत्न केला. त्यांना नोटीसही पाठविली. परंतु सामनेवाले यांनी कार दुरुस्त करण्यास किंवा त्या कार ऐवजी दुसरी कार देण्याबाबत जबाबदारी घेतली नाही ते स्तब्ध राहिले. यावरुन त्यांना तक्रारदाराची नुकसान भरपाई भरुन द्यावयाची नाही हे स्पष्ट झाले, म्हणून तक्रारदाराने सदरची तक्रार केली आहे. त्याची मागणी आहे की, सामनेवाले यांनी त्याला रु.2,50,000/- नुकसानभरपाई द्यावी व इतर न्यायाचे व मंचाला वाटतील ते योग्य आदेश व्हावेत. 3 सामनेवाले क्र.1 व 3 यांना तक्रारीची पब्लिक नोटीस देऊनही ते हजर झाले नाहीत. सामनेवाले क्र.2 यांना नोटीस मिळूनही ते हजर झाले नाहीत, म्हणून सर्व सामनेवाले यांचे विरुध्द एकतर्फाचा आदेश करण्यात आला. 4 आम्हीं तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकला व कागदपत्रं वाचली. तक्रारदाराने खालील कागदपत्रांच्या प्रतीं दाखल केलेल्या आहेत. अ तक्रारदाराचे ओळखपत्रं ब सामनेवाले यांनी दिलेली कंसाईनमेंट नोट क सामनेवाले यांनी दिलेले कोटेशन व बिल ड बरकले एटो मोबाईल लि., यांचे जॉब कार्ड. इ एफ.आय.आर. ई ड्रायव्हरचे लायसन्स् उ गाडीचे फोटोग्राफ ऊ दुरुस्तीच्या खर्चाबाबत एस.के.व्हिल्स् यांनी दिलेले इस्टीमेट ए तक्रारदाराने सामनेवाले यांना दिलेली नोटीस ऐ कुरिअर कंसाईनमेंट प्रत ओ सामनेवाले क्र.1 यांना नोटीस मिळाल्याबद्दलची पोच औ एस.के.व्हिल्स् प्रा.लि.यांनी गाडीच्या दुरुस्तीचे दिलेले बिल अं मारुती कारचे बरकले अटो मोबाईल या डिलरने दिलेले कोटेशन अः इन्शुरन्स् कंपनीने तक्रारदाराला दिलेल्या धनादेशाची प्रत क सर्व्हेअर रिपोर्ट ख पॉलीसी प्रत 5 वरील कागदपत्रांवरून हे सिध्द होते की, तक्रारदाराने सामनेवाले यांचेशी त्याची मारुती-800 ए/सी कार हरियाणा येथील पंचकुला येथून नवी मुंबई येथे आणण्यासाठी करार केला होता व त्यानुसार, दि.26.08.2008 रोजी मारुती कार चांगल्या स्थितीत सामनेवाले यांच्या ताब्यात दिली होती. तक्रारदाराचे म्हणणे आहे की, गाडी सामनेवाले यांनी कंटेनरमधून आणून द्यायचे कबूल केले होते. तक्रारदाराचा हा आरोप सामनेवाले यांनी हजर होऊन नाकारला नाही. तक्रारदाराने त्याच्या तक्रारीच्या पृष्ठर्थ, त्याचे शपथपत्रं दाखल केले आहे. त्यामुळे तक्रारदाराचे हे म्हणणे मान्य करण्यासारखे आहे. मात्र सामनेवाले यांनी गाडी पंचकुला येथून नवी मुंबईला आणण्यासाठी ड्रायव्हर नेमला व गाडी त्याच्या ताब्यात दिली. ती कार ड्रायव्हर चालवत आणत असताना हरियाणा येथील गुरगांवजवळ कारला अपघात झाला व कारचे खूप नुकसान झाले. सामनेवाले यांना तक्रारदाराने त्याबद्दल कळविले, परंतु त्यांनी नुकसान भरपाई दिली नाही किंवा गाडी दुरुस्त करण्याची जबाबदारी घेतली नाही. तक्रारदाराने ती गाडी एस.के.व्हिल्स् यांचेकडून दुरुस्त करुन घेतली. 6 तक्रारदाराने या दुरुस्तीच्या खर्चाबाबत एस.के.व्हिल्स् यांनी दिलेले बिल दाखल केले आहे. ते बिल रु.2,12,295/- चे आहे. तक्रारदाराने रु.2,50,000/- ची नुकसान भरपाई मागितली आहे. तक्रारदाराने हयां बिलाची रक्कम रु.2,12,295/- एस.के.व्हिल्स् प्रा.लि. याचा दिल्याचा पुरावा दाखल केला नाही. गाडीची आयडीव्ही रु.1,50,000/- असतांना तक्रारदाराने तिचा दुरुस्ती खर्च रु.2,12,295/- एवढा खर्च केला हे मनाला पटत नाही. तक्रारदाराचे दुरुस्ती खर्चाबाबतचे म्हणणे मान्य करता येत नाही. तक्रारदाराने विमा कंपनीकडे क्लेम दाखल केला होता. त्या कामी त्यांनी सर्व्हेअरची नेमणूक केली होती. सर्व्हेअरने गाडीच्या नुकसानीची पाहणी करुन खालीलप्रमाणे निष्कर्ष काढले. SCHEDULE Summary | Liability on Repair Basis (incl. Items found damaged on opening out) | Rs.1,46,940.00 | Liability on Total Loss Basis (incl. Incidental Charges) | Rs.1,39,500.00 | Liability on Cash Loss Basis | Rs.87,842.00 | Liability on Net of Salvage Basis | Rs.1,24,500.00 |
विमा कंपनीने तक्रारदाराला रु.87,842/- एवढी नुकसान भरपाई दिलेली आहे. गाडीची आयडीव्ही (Insurance Declared Value) रु.1,50,000/- होती. गाडीच्या सॉलवेजची जास्तीत जास्त किंमत रु.25,000/- होती, त्याबद्दलचे कोटेशन तक्रारदाराने दाखल केले आहे. म्हणजेच तक्रारदाराचे प्रत्यक्षात रु.1,25,000/- चे नुकसान झाले आहे त्यापैकी त्याला इन्शुरन्स् कंपनीने रु.87,842/- एवढी रक्कम दिलेली आहे. बाकी रक्कम रु.37,158/- देण्यास सामनेवाले जबाबदार आहेत. तसेच त्यावर द.सा.द.शे.9 दराने व्याज मंजूर करणे योग्य वाटते. तक्रारदाराला जो मानसिक त्रास झाला त्यासाठी सामनेवाले नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. मंचाच्या मते खालील आदेश न्यायाच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. आदेश (1) तक्रार अर्ज क्र.167/2010 अंशतः मंजूर करण्यात येतो. (2) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरित्या रु.37,158/- तक्रारदाराला द्यावेत व त्यावर द.सा.द.शे.9 दराने तक्रार दाखल दि.06/02/2009 पासून ते रक्कम फिटेपावेतो व्याज द्यावे. (3) सामनेवाले क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिकरित्या किंवा संयुक्तिकरित्या तक्रारदाराला रु.10,000/- नुकसान भरपाई द्यावी व या तक्रारीचा खर्च रु.5,000/- द्यावा. (4) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |