रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
तक्रार क्रमांक 107/2015
तक्रार दाखल दि. 30/04/2015
तक्रार निकाली दि. 09/09/2015.
श्री. मकरंद कृष्णराव बेदरकर,
रा. कृष्णकुंज, 3/12, बाजारवॉर्ड,
नंदादीप बार जवळ, विरार (पूर्व),
ता. वसई, जि. ठाणे. 401303. ...... तक्रारदार.
विरुध्द
. 1. स्वप्ननगरी होम्स बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्स,
कार्यालय –शॉप नं. 23,
आदीशक्ती को. ऑप. हौसिंग सोसा. मर्या.,
नवीन पनवेल रेल्वे स्टेशनचे समोर,
नवीन पनवेल, (पूर्व), जि. रायगड.
2. स्वप्ननगरी होम्स बिल्डर्स ॲण्डडेव्हलपर्स
तर्फे प्रोप्रा. अनिल दामोदर पोटे,
रा. साईस्पर्श अपार्टमेंट, रुम नं. 202,
प्लॉट नं. 12 ए, सेक्टर 04 ए,
लडका हॉटेल मागे, आसूडगांव, ता. पनवेल. ...... सामनेवाले
समक्ष -मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर,
मा. सदस्या, श्रीमती उल्का अं. पावसकर
उपस्थिती- तक्रारदारतर्फे वकील – ॲड. मयेकर
सामनेवाले एकतर्फा
- न्यायनिर्णय -
द्वारा- मा. अध्यक्ष, श्री. उमेश वि. जावळीकर
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांना कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. सामनेवाले यांनी पनवेल येथील मौजे नेरे पाडा, गट क्र. 153 या बिनशेती भूखंडावर जय संतोषी माँ हौसिंग कॉम्प्लेक्स या नांवाने निवासी सदनिका तयार करुन त्या विकण्याचा प्रकल्प सुरु केला होता. तक्रारदार व सामनेवाले यांच्यात चर्चा होऊन सदनिकेच्या मोबदल्यापोटी ठरलेल्या एकूण रकमेपैकी अर्धी रक्कम म्हणजे 50% रक्कम तक्रारदारांनी सामनेवाले यांना द्यावयाची व उरलेल्या अर्ध्या रकमेबाबत सामनेवाले तक्रारदारांना कर्ज प्रकरण करुन देणार होते. त्याप्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांची जाहिरात पाहून सामनेवाले बांधीत असलेल्या इमारतीमधील विंग सी, पहिला मजल्यावरील सदनिका क्षेत्रफळ 600 चौ. फूट (2 बी.एच.के.) ही निवासी सदनिका रक्कम रु. 1,500/- प्रति चौ. मीटर प्रमाणे एकूण मूल्य रक्कम रु. 9,00,000/- ला खरेदी करण्याचे निश्चित केले. तक्रारदारांनी सामनेवाले यांना दि. 25/06/12 रोजी धनादेशाद्वारे रक्कम रु. 1,00,000/- व रोख रक्कम रु. 50,000/- अशी एकूण रक्कम रु. 1,50,000/- राखणावळ रक्कम व डेव्हलपमेंट चार्जेस म्हणून अदा केले. परंतु सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारांना केवळ रु. 1,00,000/- चीच पावती दिली उर्वरित रु. 50,000/- ची पावती दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना त्यांनी मागणी केल्याप्रमाणे दि. 30/09/12 पर्यंत धनादेशाद्वारे रक्कम रु. 1,00,000/- अदा केली. अशाप्रकारे तक्रारदार यांनी सामनेवाले यांना सदनिकेच्या मोबदल्यापैकी एकूण रक्कम रु. 2,50,000/- अदा केले होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदनिकेचा ताबा सन 2014 पर्यंत देण्यात येईल असे सांगितले. वरीलप्रमाणे रक्कम तक्रारदारांनी सामनेवाले यांना अदा केल्यानंतर सदनिकेचा नोंदणीकृत करारनामा करणे ही सामनेवाले यांची कायदेशीर जबाबदारी होती व त्याबाबत वेळोवेळी तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे विचारणा केली असता, सामनेवाले यांनी दि. 11/03/13 रोजी नोटरी करारनामा करुन मोफा कायद्यातील तरतूदीनुसार आवश्यक अटी सदर करारनाम्यामध्ये समाविष्ट केल्या नाहीत. तक्रारदारांनी त्याबाबत सामनेवाले यांच्याकडे विचारणा केली असता, सामनेवाले यांनी कोणतेही समपर्क उत्तर तक्रारदारांना दिले नाही. तसेच तक्रारदारांनी प्रत्यक्ष केलेल्या पाहणीमध्ये सदनिका बांधकाम अद्याप सुरु न झाल्याने त्यामुळे तक्रारदारांनी दि. 10/12/14 रोजी तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस पाठविली. परंतु सदर नोटीसा सामनेवाले क्र. 1 ने कार्यालय बंद केल्याने लेफ्ट या शेऱ्याने तर सामनेवाले 2 ने नोटीस न स्विकारल्याने अनक्लेम शेऱ्याने परत आल्या. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांना अदा केलेली रक्कम व्याजासह परत करावी, तक्रार खर्च व नुकसानभरपाईसह तक्रार मान्य करावी अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
3. तक्रार दाखल झाल्यानंतर सामनेवाले यांना मंचाने लेखी जबाब दाखल करण्यासाठी नोटीस पाठविली. परंतु मंचाची नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले मंचासमक्ष हजर न झाल्याने व त्यांनी लेखी जबाब दाखल न केल्याने त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आले. सदर आदेश आज रोजी अबाधित आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, त्यांनी दाखल केलेली कागदपत्रे, पुरावा शपथपत्र, तक्रारदारांची वादकथने यावरुन तक्रार निकालकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
मुद्दा क्रमांक 1 - सामनेवाले यांनी तक्रारदारांस कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा न
देऊन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब तक्रारदार सिध्द
करतात काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 2 - सामनेवाले तक्रारदारांस नुकसानभरपाई देण्यास पात्र आहेत काय ॽ
उत्तर - होय.
मुद्दा क्रमांक 3 - आदेश ॽ
उत्तर - तक्रार अंशतः मान्य.
कारणमीमांसा -
5. मुद्दा क्रमांक 1 व 2 - सामनेवाले यांनी तक्रारदारांसोबत केलेल्या नोटरी करारनाम्याचे अवलोकन केले असता, सदनिकेचे एकूण मूल्य रु. 9,00,000/- निश्चित करुन रक्कम रु. 2,50,000/- अदा केल्याची बाब नमूद आहे. परंतु सदरहू करारनामा मोफा कायद्यातील तरतूदीनुसार नसून सदनिकेचा ताबा देण्याबाबत निश्चित दिनांकही करारनाम्यात नमूद नाही. सामनेवाले यांनी सदरहू करारनाम्यानंतर मोफा कायद्यातील तरतूदीनुसार करारनामा करण्यास तक्रारदारांस लेखी कळविल्याबाबत किंवा कोणतीही अन्य उपाययोजना केल्याबाबत कागदपत्रे मंचात दाखल नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिका विक्री व्यवहाराची एकूण रक्कम रु. 2,50,000/- अदा केल्याबाबत पावती मंचात दाखल आहे. तसेच नोटरी करारनाम्यात नमूद केल्याप्रमाणे सदनिकेची एकूण विक्री रक्कम रु. 9,00,000/- पैकी रक्कम रु. 2,50,000/- सामनेवाले यांनी स्विकारली आहे. यावरुन सदनिकेची एकूण विक्री रक्कम रु. 9,00,000/- ला निश्चित केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरुन सिध्द होते.
6. सामनेवाले यांनी तक्रारदारांकडून सदनिकेची संपूर्ण रक्कम स्विकारुन मोफा कायद्यातील तरतूदीनुसार नोंदणीकृत कराराबाबत कोणतीही उपाययोजना न करुनसदनिकेचा ताबा विहीत मुदतीत तक्रारदारांना देण्याबाबत लेखी पत्रव्यवहार न करुन तसेच तक्रारदारांच्या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान सदनिकेचे बांधकाम अद्याप सुरु न करुन बांधकाम पूर्णत्वानंतर सर्व सोयी सुविधांसहीत सदनिकेचा वैध ताबा तक्रारदारांना अद्याप न देऊन ग्राहक संरक्षण अधिनियमातील तरतूदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब सिध्द होते. तक्रारदारांनी सामनेवाले यांना सदनिकेच्या ताब्यासाठी अदा केलेली रक्कम सामनेवाले यांनी अन्य प्रयोजनासाठी वापरून तक्रारदारांना भाडेतत्वावर वास्तव्य करावे लागल्याची बाबही तक्रारदारांनी मंचासमक्ष दाखल केलेल्या भाडे करारावरुन सिध्द होते. सबब, सामनेवाले हे तक्रारदारांस नुकसानभरपाई रक्कम व भाड्याची रक्कम देण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
7. उपरोक्त निष्कर्षांवरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
-: अंतिम आदेश :-
1. तक्रार क्र. 107/2015 अंशत: मान्य करण्यात येते.
2. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी तक्रारदार यांस कराराप्रमाणे सदनिकेचा ताबा विहीत मुदतीत न देऊन तसेच नोंदणीकृत करारनामा न करुन देऊनसेवा सुविधा पुरविण्यात कसूर केल्याची बाब जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांना मौजे नेरे पाडा, गट क्र. 153 या बिनशेती भूखंडावर जय संतोषी माँ हौसिंग कॉम्प्लेक्स या नांवाने सामनेवाले बांधीत असलेल्या सी विंग, पहिला मजल्यावरील सदनिका क्षेत्रफळ 600 चौ. फूट (2 बी.एच.के.) या निवासी सदनिकेचा मोफा कायद्यातील तरतूदीनुसार नोंदणीकृत करारनामा या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत करुन द्यावा.
4. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 3 ची पूर्तता केल्यानंतर तक्रारदार यांस मौजे नेरे पाडा, गट क्र. 153 या बिनशेती भूखंडावर जय संतोषी माँ हौसिंग कॉम्प्लेक्स या नांवाने सामनेवाले बांधीत असलेल्या सी विंग, पहिला मजल्यावरील सदनिका क्षेत्रफळ 600 चौ. फूट (2 बी.एच.के.) या निवासी सदनिकेचा सर्व सोयी सुविधांसह कायदेशीर वैध ताबा या आदेशप्राप्ती दिनांकापासून 60 दिवसांत द्यावा.
5. सामनेवाले क्र. 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 3 व 4 ची पूर्तता करणे शक्य नसल्यास सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस, त्यांनी वर नमूद सदनिका व्यवहारापोटी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना अदा केलेली रक्कम रु. 2,50,000/- (रु. दोन लाख पन्नास हजार मात्र) दि. 30/09/12 पासून ते दि. 09/09/15 पर्यंत द.सा.द.शे. 12% व्याजासहीत या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
6. सामनेवाले क्र. 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे वर नमूद क्र. 5 ची पूर्तता विहीत मुदतीत न केल्यास सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदारांस त्यांनी सदनिका व्यवहारापोटी सामनेवाले क्र. 1 व 2 यांना अदा केलेली रक्कम रु. 2,50,000/- (रु. दोन लाख पन्नास हजार मात्र) दि. 30/09/12 पासून ते तक्रारदारांस संपूर्ण रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 15% व्याजासहीत या आदेशप्राप्ती दिनांकापासून 30 दिवसांत अदा करावी.
7. सामनेवाले क्र. 1 व 2 यांना वैयक्तिक व संयुक्तिकपणे तक्रारदार यांना, त्यांना भाडे तत्त्वावर रहावे लागल्याने अदा करावी लागलेली रक्कम, तक्रार खर्च, मानसिक व शारीरिक त्रासापोटी एकूण रक्कम रु. 1,50,000/- (रु. एक लाख पन्नास हजारमात्र) या आदेशप्राप्ती दिनांकापासून 60 दिवसांत अदा करावेत.
8. न्याय निर्णयाच्या सत्यप्रती उभयपक्षांना तात्काळ पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग.
दिनांक –09/09/2015.
(उल्का अं. पावसकर) (उमेश वि. जावळीकर)
सदस्या अध्यक्ष
रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.