निकालपत्र
(घोषीत द्वारा- मा. सौ. स्मिता बी.कुलकर्णी, अध्यक्षा )
1. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांच्या विरुध्द सेवेत त्रुटी दिल्याच्या कारणावरुन तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. अर्जदार यांनी दिनांक 06/02/2013 रोजी नोकीया कंपनीचा एक मोबाईल मॉडेल नं. नोकीया लुमिया 920, ज्याचा IME No. 354149053436298 असा असून गैरअर्जदार 1 यांच्याकडून रु. 36,500/- रुपयाला खरेदी केलेला आहे. सदर मोबाईल खरेदी करतांना गैरअर्जदार 1 यांनी प्रस्तुत मोबाईलवर 1 वर्षाची वॉरंटी असल्याचे सागितले परंतू वॉरंटी कार्ड अर्जदारास दिले नाही. जवळपास 9 ते 10 महिने मोबाईल वापरला असता सदरच्या मोबाईलमध्ये मोबाईलचे बटन स्विच ऑन करणे या ठिकाणी बिघाड झाला व अर्जदाराचा मोबाईल चालू व बंद योग्यरित्या होत नव्हता त्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार 1 यांच्याकडे सदरचा मोबाईल दुरुस्तीसाठी घेवून गैरअर्जदार 1 यांच्याकडे गेला असता गैरअर्जदार 2 यांच्याकडे जावून मोबाईल दुरुस्ती करावा असे सांगितले. त्यानंतर अर्जदार गैरअर्जदार 2 यांच्याकडे मोबाईल दुरुस्तीसाठी गेला असता गैरअर्जदार 2 यांनी मोबाईल कंपनीकडे पाठवावा लागेल व त्यासाठी 8 ते 10 दिवस लागतील असे सांगितले. गैरअर्जदार 2 यांनी सदर मोबाईल दुरुस्त करण्यासाठी 4,000/- रुपये लागतील असेही सांगितले. अर्जदार यांनी मोबाईलची वॉरंटी ही दिनांक 6/2/2014 पर्यंत असल्याने वॉरंटी कालावधीमध्ये मोबाईल दुरुस्ती करुन दया किंवा वॉरंटी नाही असे लेखी दया असे सांगितले असता गैरअर्जदार 2 यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अर्जदार यांच्या मोबाईलची वॉरंटी दिनांक 06/02/2014 पर्यंत आहे परंतू असे असतांना देखील गैरअर्जदार यांनी अर्जदाराचा मोबाईल दुरुस्ती न करता देवून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केलेला असून अर्जदारास मानसिक, आर्थिक व शारिरीक त्रास दिलेला आहे. अर्जदार हे गैरअर्जदार यांच्याकडे दि. 15/01/2014 व 23/01/2014 रोजी गेले असता गैरअर्जदारांनी अर्जदाराचा मोबाईल दुरुस्ती न करुन दिल्यामुळे अर्जदाराने सदरची तक्रार दाखल केलेली आहे. तक्रारीमध्ये अर्जदार यांनी गैरअर्जदार यांना आदेश देण्यात यावा की, गैरअर्जदार यांनी अर्जदार यांचा नोकीया लुमिया 920, हा मोबाईल वॉरंटी कालावधीमध्ये दुरुस्ती करुन दयावा तसेच अर्जदाराचा सदरचा मोबाईल दुरुस्ती होत नसल्यास नवीन मोबाईल देण्याबाबत अथवा मोबाईलची रक्कम रुपये 36,500/- व्याजासह परत करण्याबाबतचा आदेश करण्यात यावा. गैरअर्जदार यांनी दिलेल्या सेवेबाबत अर्जदारास झालेल्या आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 10,000/- तसेच दावा खर्चापोटी रक्कम रु. 5,000/- गैरअर्जदार यांनी अर्जदारास दयावेत अशी विनंती तक्रारीमध्ये अर्जदार यांनी केलेली आहे.
3. गैरअर्जदार यांना नोटीस तामील होवूनही गैरअर्जदार 1 हे प्रकरणात हजर झालेले नसल्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फा सुनावणीचा आदेश पारीत करण्यात आला.
4. गैरअर्जदार 2 हे प्रतिनिधी मार्फत हजर झाले व आपला लेखी जबाब दाखल केला. गैरअर्जदार 2 यांना लेखी जबाब थोडक्यात खालील प्रमाणे.
5. अर्जदाराने त्याच्या मागणीचा दावा हा अर्जदाराचा मोबाईल वॉरंटी पिरियडमध्ये दुरुस्तीकरुन देण्याबाबत केलेला आहे परंतू वॉरंटी पिरियडमध्ये मोबाईल असल्यास तो वॉरंटी कालावधीत दुरुस्ती करुन देण्याची मागणी करण्याची गरज नाही. अर्जदाराच्या मोबाईलची वॉरंटी ही दिनांक 05/02/2014 ला संपलेली आहे. अर्जदाराने केलेल्या तक्रार अर्जामध्ये जाणूनबुजून दिनांक टाकलेला नाही. अर्जदार हा मोबाईल दुरुस्तीसाठी मुदतीमध्ये नोकीया केअरकडे न आल्यामुळे त्याची दुरुस्ती नोकीया केअरने विनामोबदला करुन दयावी ही मागणी संयुक्तीक नाही. परंतू अर्जदाराने त्याचा मोबाईल नोकीया केअरकडे जमा केल्यास सेवा शुल्क व पार्ट रिप्लेस्मेंट चार्जेसशिवाय केवळ पार्ट कॉस्ट घेवून दुरुस्ती करुन देण्याची ग्वाही गैरअर्जदार 2 हे देतात. अर्जदाराच्या मोबाईलचा वॉरंटी कालावधी संपल्यामुळे केवळ मानसिक त्रास देवून आपली मागणी पूर्ण करुन घेण्याचा केवीलवाणा प्रयोग अर्जदाराने केलेला आहे. अर्जदार हा मोबाईलची वॉरंटी संपलेली असल्यामुळे दुरुस्तीसाठी नोकीया केअर या ठिकाणी आलेलाच नाही. अर्जदाराने तक्रारीमध्ये दिलेल्या दिनांक 15/01/2014 व 23/01/2014 या दोन्हीही तारखा काल्पनिक आहेत त्यामुळे अर्जदारची तक्रार नामंजूर करावी अशी विनंती लेखी जबाबाद्वारे गैरअर्जदार 2 यांनी केलेली आहे.
6. अर्जदार यांनी पुराव्याकामी शपथपत्र व कागदपत्र दाखल केली. अर्जदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्राचे अवलोकन केले असता खालील बाबी स्पष्ट होतात.
7. अर्जदार यांनी गैरअर्जदार 1 यांच्याकडून दिनांक 06/02/2013 रोजी नोकीया लुमिया 920, हा मोबाईल रक्कम रु. 36,500/- ला खरेदी केलेला असल्याचे स्पष्ट होते. अर्जदार यांच्या तकारीतील कथनावरुन अर्जदार यांनी खरेदी केलेल्या मोबाईल हॅडसेटमध्ये बिघाड झालेला आहे व झालेला बिघाड हा गैरअर्जदार 2 यांनी वॉरंटी कालावधीत दुरुस्ती करुन दिलेला नाही. अर्जदार यांनी आपल्या या म्हणण्याच्या पुष्टयर्थ कुठलाही कागदोपत्री पुरावा तक्रारीसोबत दिलेला नाही. अर्जदार यांचा मोबाईल हॅडसेट नादुरुस्ती झाला असल्याबद्दलचा कुठलाही पुरावा मंचासमोर दिलेला नसून नादुरुस्त झालेला मोबाईल हॅडसेटही अर्जदार यांनी मंचासमोर दाखवलेला नाही त्यामुळे अर्जदार यांनी आपली तक्रार पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही, असे मंचाचे मत आहे.
वरील विवेचनावरुन मंच खालील आदेश देत आहे.
आदेश
1. अर्जदाराची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारास मोफत देण्यात याव्यात.