Maharashtra

Ahmednagar

CC/18/153

Parshram Gabaji Hon - Complainant(s)

Versus

Swami Samartha Krushi Seva Kendra - Opp.Party(s)

28 Jul 2020

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, अहमदनगर
पराग बिल्डींग,जिल्हाधिकारी कार्यालय आवार,अहमदनगर फोन नं. (0241) 2347917
आदेश
 
Complaint Case No. CC/18/153
( Date of Filing : 09 May 2018 )
 
1. Parshram Gabaji Hon
A/P- Chandegaon, Tal- Kopargaon
Ahmednagar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Swami Samartha Krushi Seva Kendra
A/P- Pohegaon, Tal- Kopargaon
Ahmednagar
Maharashtra
2. Eagle Seeds & Biotech Ltd.
Behind 117, Silver Sanchora, Castle, 7, R.N.T. Marg,, Opposite University, Tukoganj, Indore
Indore
Madhya Pradesh
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. V. C. Premchandani PRESIDENT
 HON'BLE MRS. C. V.Dongare Member
 HON'BLE MR. M. N. Dhake MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party: N.V. Maniyar, Advocate
Dated : 28 Jul 2020
Final Order / Judgement

निकालपत्र

निकाल दिनांक – २८/०७/२०२०

(द्वारा मा.सदस्‍य : श्री.महेश निळकंठ ढाके)

___________________________________________________________

१.   तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १२ प्रमाणे सदर तक्रार दाखल केलेली आहे.

२.   तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी की, तक्रारदार हे मौजे पोहेगांव ता. कोपरगांव येथे श्री.स्‍वामी कृषी सेवा केंद्र या नावाने कृषी सेवा केंद्राचे दुकान आहे. सदर दुकानात सामनेवाला हा खते बी बीयाणांची विक्री करतो. तक्रारदार यांनी दिनांक ०८-११-२०१७ रोजी गव्‍हाचे ४९६ बी. सामनेवाले क्र.१ यांचे दुकानमधुन सामनेवाले क्र.२ कंपनीचे सीडचे बियाणे तीन पिशव्‍या प्रत्‍येकी ४० किलो ग्रॅम वजनाचे रूपये १,५००/- प्रमाणे एकुण रक्‍कम रूपये ४,५००/- दुकानमधुन खरेदी केलेले आहे. यापैकी नं. १ यांनी सांगितले नं.२ या कंपनीच्‍या  गोणीवर बीयाणाचा लावलेला ब्रॅण्‍ड सरकारी तपासणी करून आलेला आहे, ते सर्टीफाईड बियाणे आहे. त्‍यास सरकारची मंजुरी आहे. त्‍यामुळे तक्रारदार यांनी स्‍वामी समर्थ कृषी केंद्राचे मालकावर भरवसा ठेवला, विश्‍वास ठेवला व बियाणे खरेदी केले. सदरचे गव्‍हाचे बियाणे हे गोणी फोडल्‍यानंतर चांगले दिसत होते.  तक्रारदाराने सामनेवाले क्र.१ कडुन पैसे देवुन बिल घेतले व बीयाणे घेतले ते बीयाणे गट नं. १४२/२ क्षेत्र ३ एकर मौजे चांदेकसारे येथे त्‍या बीयाणांची पेरणी केली. वेळोवेळी रासायनिक व शेणखते दिली. तसेच गव्‍हास वेळोवळी चारपाणी दिले. गव्‍हाचे पिक चांगले यावे म्‍हणुन किटकनाशक औषधे मारणे या गव्‍हाची पेरणी दिनांक १०-११-२०१७ रोजी केली त्‍यास खताच्‍या मात्रा वेळोवेळी दिल्‍या व पिकाची पुर्ण वाढ झाल्‍यावर दाणे भरणेचे अवस्‍थेत पिकात भेसळ असल्‍याचे निष्‍पन्‍न झाले आहे व निदर्शनास आले.  तक्रारदार यांनी पंचायत समिती कोपरगांव येथे कृषी अधिकारी तसेच गुणनियंत्रण निरिक्षक पंचायत समिती, कोपरगांव यांचेकडे तक्रार करून त्‍यांचे मार्फत जमीनीत या गव्‍हाचे पिकाची पाहणी केली. त्‍यावेळेस सदरचे बियाणामध्‍ये भेसळ असल्‍यामुळे गव्‍हामुळे अन्‍य  वाहनाची ११ टक्‍के भेसळ आढळुन आलेली आहे. त्‍यामुळे पिकलेला गहु खाण्‍यास योग्‍य नाही. तक्रारदार यास झालेला ६० क्विंटल गहु जनावरांना खाद्य म्‍हणुन विकावा लागला. त्‍यामुळे गव्‍हास अत्‍यंत कमी भाव मिळाला आहे व तक्रारदार याची सुमारे ६० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळणेसाठी सदरचा दावा दाखल केला आहे.

३.   तक्रारदाराने तक्रारीत अशी मागणी केलेली आहे की, तक्रारदार यांना मौजे चांदेकसारे येथे गट नं.१४२/२ या ३ एकर जमीनीत ६० क्विंटल झालेल्‍या गव्‍हात ११ टक्‍के भेसळ असल्‍यामुळे जनावरांना खाद्य म्‍हणुन विक्री करावा लागला त्‍यामुळे रूपये ६०,०००/- चे नुकसान झाले आहे, ती नुकसान भरपाई सामनेवाले क्र.१ व २ कडुन तक्रारदारास मिळावी.

४.   तक्रारदाराने तक्रारीसोबत नि.२ वर शपथपत्र दाखल केले आहे. निशाणी ४ वर दस्‍तएवेज यादीसोबत एकुण ८ कागदपत्रांचे छायांकीत प्रती दाखल केलेल्‍या  आहेत. त्‍यामध्‍ये पोस्‍टल ऑर्डर, केस फाईल, शपथपत्र, तक्रार अर्ज, सातबारा उतारा, बियाणे खरेदी बील, गुणनियंत्रक निरीक्षक पंचायत समिती, कोपरगाव यांचा अहवाल, कंपनीस पाठवलेली नोटीस दाखल केलेली आहे. निशाणी १५ वर तक्रारदारातर्फे लेखी युक्तिवाद दाखल करण्‍यात आला.

५.   सामनेवाले क्र.१ व २ यांनी संयुक्तिपणे नि.९ वर लेखी कैफीयत दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये त्‍यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील कथन खोटे आहे असे नमूद करून नाकारलेले आहे. पुढे असे म्‍हटले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले क्र.२ ने उत्‍पादीत केलेले बियाणे सामनेवाले क्र.१ कडुन खरेदी केले आहे. सदर बियाणे हे प्रमाणीत असुन, बियाणे हे बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा आंध्र प्रदेश रिलीज ऑर्डर सोबत जोडली आहे. तक्रारदाराने जो साताबारा उतारा दाखल केला आहे त्‍यामध्‍ये  गट नं.१४२/२ मध्‍ये तक्रारदाराच्‍या नावे एकूण ०१ हे. ६५ आर जमीन आहे. परंतु उर्वरीत जमीनीत कोणते पिक घेतले हे कुठेही नमूद केले नाही. तसेच जो सातबारा उतारा गट नं.१४२ चा जोडलेला आहे त्‍यामध्‍ये सदर जमीन ही जीरायत असुन जमीन भिजवणी करीता कोणतेही साधन ७/१२ वरून दिसून येत नाही. एवढेच नाही तर जो तपासणी अहवाल तक्रार अर्जासोबत दिलेला आहे त्‍याचे निरीक्षण केले असता तो तपासणी अहवाल दिनांक १२-०२-२०१८ रोजीचा आहे. त्‍यामध्‍ये पेरणीचा दिनांक १०-११-२०१७ रोजीचा असुन तक्रारदाराने सादर केलेल्‍या कागदपत्रामध्‍ये तक्रारदाराने त्‍याचे गहू पिकास, कोणते व किती खते दिली याचा उल्‍लेख नाही. तक्रारदाराने कोणतेही खताच्‍या खरेदीच्‍या पावत्‍या  जोडल्‍या नाहीत. सामनेवाले क्र. १ व २ यांना सदर तपासणी अहवालाच्‍यावेळी पंचनामा करतेवेळेस सुचना देणे तक्रारदारावर तसेच भेट देणा-या समितीवर बंधनकारक असतांना एवढेच नाही तर सामनेवाले क्र.१ व २ यांची साक्ष नोंदविणे आवश्‍यक आहे. असे असतांना देखील सामनेवाले क्र.१ व २ यांना कोणीही सूचना दिलेली नाही व जो काही तपासणी अहवाल आहे तो सामनेवालेवर बंधनकारक नाही. तसेच ज्‍या बियाणाचे लॉटची तक्रार आहे त्‍या लॉटच्‍या बियाणाचा साठा शिल्‍लक आहे अगर नाही याची माहिती घेणे साठा असल्‍यास उपलब्‍ध  साठ्यामधून बियाणे कायद्याप्रमाणे नमुना काढणे व बियाणे चाणी प्रयोगशाळा येथे तो नमुना पाठवुन बियाणाच्‍या गुणवत्‍तेबद्दल खात्री करून घेणे हे समितीच्‍या सदस्‍यांवर बंधनकारक आहे. परंतु अशी कोणतीही कार्यवाही सदरच्‍या  तक्रारीच्‍या वेळेस करण्‍यात आलेली नाही. सामनेवाले क्र.१ व २ नमूद करतात की त्‍यांनी सामनेवाले क्र.२ यांचेद्वारे उत्‍पादीत आणि बियाणे प्रमाणीकरण यंत्रणा गुजरात राज्‍य बिज प्रमाणीकरण यंत्रणाद्वारे प्रमाणीत केलेले बियाणे तक्रारदारास बिलाद्वारे विक्री केलेले आहे व बियाणाच्‍या गुणवत्‍तेमध्‍ये तक्रारदार क्र.१ व २ यांच्‍या ठिकाणी कोणताही फेरबदल करण्‍यात आलेला नाही. सामनेवाले यांनी बियाणे खरेदी केल्‍यानंतर त्‍यांनी योग्‍य प्रकारे साठवणूक करून ठेवली होती व चांगल्‍या व चांगल्‍या स्थितीतच तक्रारदारास विक्री केलेले आहे. बियाण्‍यातील दोष ठरविणेकरीता प्रयोग शाळेच्‍या निष्‍कर्षाची आवश्‍यकता आहे. तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्‍या निर्देषाप्रमाणे समितीचे अहवाल हे स्‍वयं स्‍पष्‍ट पाहिजे, परंतु येथे अहवालामध्‍ये किती टक्‍के नुकसान झाले हे नमुद नाही. शासनाचे परिपत्रकानुसार पंचनाम्‍यास एकही अधिकारी हजर नसल्‍यामुळे सदर पंचनामा हा कायदेशिर नाही. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह खारीज करण्‍यात यावी, अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.  

          सामनेवाले यांनी कैफीयतीसोबत दस्‍तऐवजयादी दाखल केली आहे. त्‍यामध्‍ये बियाणे विक्रीबाबतचा फॉर्म नं. ‘सी’, बियाणे विक्री केलेल्‍या शेतक-यांची यादी, बियाणे खरेदी पावती, डिलीव्‍हरी चालान, बियाण्‍याचा साठा रजिस्‍टर दाखल आहे.  

६.   तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार, शपथपत्र व त्‍यांनी दाखल केलेले कागदपत्र, सामनेवाले यांनी दाखल केलेली कैफीयत, कागदपत्रे तसेच उभयपक्षांनी केलेला युक्तिवाद याचे अवलोकन केले असता मंचासमोर न्‍यायनिर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्‍यांचे उत्‍तर आम्‍ही सकारण खालील कारणमिमंसेप्रमाणे देत आहोत.

अ.नं.

मुद्दे

निष्‍कर्ष

(१)

तक्रारदार हे सामनेवालेचे ग्राहक आहेत काय ?

होय

(२)

सामनेवालेने तक्रारदारास सेवेत त्रुटी दिली आहे  काय ?

होय

(३)

तक्रारदार हे सामनेवालेकडुन नुकसान भरपाईची रक्‍कम मिळणेस पात्र आहे काय ?

अंशतः होय

(४)

आदेश काय ?

अंतिम आदेशा प्रमाणे

कारणमिमांसा

७.  मुद्दा क्र. (१) : तक्रारदार हे मौजे पोहेगाव तालुका कोपरगाव जिल्‍हा  अहमदनगर येथील रहिवासी असून, तक्रारदाराने त्‍याच्‍या मालकीच्‍या मौजे चंदेकासारे येथील शेत मिळकत गट क्रमांक 142/2 क्षेत्र 3 एकर, येथे गहू पेरण्‍यासाठी सामनेवाले क्रमांक १ यांचेकडून सामनेवाले क्रमांक २ यांनी उत्‍पादित केलेले गव्‍हाचे ४९६ वाणाचे बियाणे दिनांक ०८-११-२०१७ रोजी खरेदी केले. तक्रारदाराने त्‍याचे बिल तक्रारीसोबत दस्‍तऐवज मध्‍ये दाखल केले आहेत. तक्रारदाराने सामनेवाले क्रमांक १ कडुन सामनेवाले क्र.२ यांनी उत्‍पादित केलेले गव्‍हाचे बियाणे खरेदी केले आहे. यावरून ही बाब स्‍पष्‍ट होते की तक्रारदार हा सामनेवाले क्रमांक १ व २ यांचा ग्राहक आहे. म्‍हणुन मुद्दा क्रमांक १ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.

८.  मुद्दा क्र. (२) : तक्रारदाराने सामनेवाला क्रमांक १ कडुन सामनेवाला क्र.२ उत्‍पादित केलेले गहू बियाणे तक्रारदाराने दिनांक ०८-११-२०१७ रोजी विकत घेतले. सदर गहू बियाणे ४९६ हे तक्रारदाराने आपल्‍या शैक्षणिक मिळकतीत म्‍हणजेच गट क्रमांक १४२/२ यात दिनांक १०-११-२०१७ रोजी गव्‍हाची पेरणी केली. सदर गव्‍हाचे बियाणे पेरणी केल्‍यानंतर, बियाणेमध्‍ये ११ टक्‍के  भेसळ असल्‍यामुळे गव्‍हाचे पिकाचे नुकसान होऊन रूपये ६०,०००/- चे नुकसान झाले व सदरील गहू हा जनावरांना खाद्य म्‍हणुन विकावा लागला हा तक्रारीच्‍या  वादाचा मूळ मुद्दा आहे. यासंदर्भात तक्रारदाराने गुण नियंत्रक निरीक्षक पंचायत समिती कोपरगाव यांचा अहवाल तसेच बियाणे खरेदी पावती तक्रारीसोबत दाखल केली आहे. सदर अहवालात पुढीलप्रमाणे कथन नमुद आहे.

  श्री. परशराम गबाजी होन रा.चांदेकसारे यांनी गहु पिकाच्‍या वाण ४९६ कंपनी ईगल सीड्स अॅण्‍ड बायोटेक लि. लॉट नंबर 34457CI या गहु बियाण्‍यात भेसळ असल्‍याची इकदेस लेखी तक्रार केली होती. त्‍या  अन्‍वये श्री.परशराम गबाजी होन रा.चांदेकसारे यांच्‍या गट क्रमांक १४२/२ क्षेत्र ३ एकर यांच्‍या क्षेत्रास भेट दिली असता सदर भेटीचे अभिप्राय खालीलप्रमाणे आहेत. भेटीची दिनांक १५-०२-२००८.

  1.  श्री.परशराम गबाजी होन रा.चांदेकसारे यांनी गहु वाण GW 496 Lot No.34457CI या गहु वाणाचे उत्‍पादक कंपनी ईगल सीड्स अॅण्‍ड बायोटेक लि. इंदोर बियाणेची खरेदी श्री.स्‍वामी समर्थ कृषी सेवा केंद्र पोहेगाव ता. कोपरगाव या कृषी सेवा केंद्रातुन केली आहे. Lot No.34457CI या वाणाच्‍या ५ नग बॅगा (40 kg packing) त्‍यांनी त्‍यांच्‍या  चांदेकसारे गट क्रमांक १४२/२ मध्‍ये पेरणी दिनांक १०-११-२०१७ रोजी केली. त्‍यांनी आवश्‍यक त्‍या खताच्‍या मात्रा व मशागत गहु पिकास केली.
  2.  परंतु नंतर पिकाची पुर्ण वाढ झाल्‍यावर पिक दाणे भरण्‍याच्‍या  अवस्‍थेत पिकात भेसळ असल्‍याचे (अन्‍य वाणाची) निदर्शनास आले. श्री. परशराम गबाजी होन रा. चांदेकसारे यांचे गट क्रमांक १४२/२ क्षेत्रास भेट देऊन १ मी x १ मी मध्‍ये चार ठिकाणी निरीक्षणे नोंदवली असता सदर क्षेत्रात अन्‍य वाणाची भेसळ ११% आढळुन आली. समांतर प्‍लॉट पाहणीत श्री.सखाराम सहादु होन रा.चांदेकसारे यांच्‍या क्षेत्रातही गहु बियाण्‍यात भेसळ आढळुन आली. त्‍यांचे प्रमाण ९.४ % आढळुन आली. त्‍यामुळे शेतक-यांनी उत्‍पादीत केलेल्‍या गव्‍हाच्‍या प्रतीवर विपरीत परिणाम होण्‍याची शक्‍यता आहे.   

     प्रामुख्‍याने उत्‍पादन कंपनी व विक्रेता हे काय सांगतील त्‍यावरच शेतकरी विश्‍वास ठेवून बियाणांची खरेदी करून पेरणी करीत असतात. तक्रारदाराने तालुका कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केल्‍यानंतर त्‍यांनी केलेल्‍या पिकांची पाहणी व पंचनामामध्‍ये जर काही त्रुटी असेल तर त्‍याचा फायदा हा सामनेवाले यांना निश्चितच घेता येणार नाही. सदर प्रकरणात सामनेवाला यांनी जर त्‍यांचा गहु सदोष नसल्‍याबाबत त्‍यांनी बियाणे पृथकरण प्रयोग शाळेकडे पाठविण्‍याबाबत अर्ज केला पाहिते होता. परंतु सामनेवालेनेसुध्‍दा तशा प्रकारचा अर्ज मे. आयोगास दिलेला नाही. सामनेवले यांनी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ चे कलम १३ (१) (सी) मधील तरतुदीनुसार बियाणे तपासणी करण्‍यासाठी उपलब्‍ध करून दिले नाही असा आक्षेप घेतला आहे. वास्‍तविक कोणताही शेतकरी बियाणे शेतात पेरणी केल्‍यानंतर त्‍या बियाण्‍यातील नमुने साठवुन ठेवत नाही. तपासणीसाठी वादातील लॉटचे बियाणे संबंधीत कृषी अधिकारी यांनी उत्‍पादक कंपनीकडुन बियाणे उपलब्‍ध करून घेऊन त्‍याची प्रयोगशाळेतून तपासणी करणे आवश्‍यक आहे. वादातील बियाणे प्रयोगशाळेत उपलब्‍ध करून देण्‍याची कायदेशीर जबाबदारी ही बियाणे उत्‍पादक कंपनीची आहे. तसेच तक्रारदाराने पेरणी केलेल्‍या  गव्‍हाचे ४९६ या वाणाचे बियाणे हे इतर शेतक-यांनी पेरलेले होते. परंतु तक्रारदार वगळता ईतर कोणत्‍याही शेतक-याने या बियाण्‍याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, या म्‍हणण्‍याच्‍या समर्थनार्थ कोणतेही कागदपत्रे दाखल केलेले नाही. या बाबी या प्रकरणात विचारात घेता, सामनेवाले यांनी घेतलेल्‍या आक्षेपात कोणतेही तथ्‍य असल्‍याचे आढळून येत नाही, असे आयोगाचे मत आहे.

     सामनेवाले क्र.१ व २ यांचेमार्फत मे. राष्‍ट्रीय ग्राहक आयोग नवी दिल्‍ली  यांचे पुढील न्‍यायनिवाडे दाखल केले आहे.

  1. Zimidara Agro Center Vs. Sukhdev Singh & Anr. – Revision Petition No.2354 of 2016
  2. Maharashtra Hydbrid Seeds Company Pvt Ltd. Vs. Sukhdev Singh & Anr. Revision Peition No.1917 of 2016

      सदरील न्‍यायनिवाडे हे या प्रकरणात तंतोतंत लागू पडत नाही, असे आयोगाचे मत आहे. वरील विवेचनावरून सामनेवाले क्र.१ ने सामनेवाले क्र.२ यांनी उत्‍पादित केलेले भेसळयुक्‍त गहू ४९६ वाणाचे बियाणे असल्‍याचे तक्रार दाखल केलेल्‍या कागदपत्रांवरून त्‍यांनी दिलेल्‍या शपथपत्रावरून सिध्‍द झालेले आहे. सामनेवाले क्र.२ यांनी उत्‍पादित केलेले भेसळयुक्‍त बियाणे सामनेवाले क्र.१ याने तक्रारदाराला विक्री केले या बाबीस सामनेवाले क्र.१ व २ संयुक्‍तरित्‍या  जबाबदार असून त्‍यांनी तक्रारदाराला द्यावयाचे सेवेत त्रुटी दिली आहे, असे मंचाचे मत आहे. म्‍हणुन मुद्दा क्रमांक २ चे उत्‍तर होकारार्थी देण्‍यात येत आहे.     

९.  मुद्दा क्र. (३) :  तक्रारदाराने भेसळयुक्‍त दोहा जनावरांना खाद्य म्‍हणून ६० हजार रूपयांना विकावा लागला, याबाबत तसेच गहू पिकास कोणते खते  दिली याबाबत कुठलाही पुरेसा पुरावा मे. आयोगासमोर दिलेला नाही. गुणनियंत्रक निरिक्षक पंचायत समिती, कोपरगाव यांच्‍या अहवालात ११% भेसळ असल्‍याचे म्‍हटले आहे. सदर भेसळयुक्‍त बियाणे असल्‍याचे सिध्‍द झाल्‍यामुळे तक्रारदारास गहू ४९६ वाणाचे बियाणे खरेदीची रक्‍कम रूपये ५,२५०/- गहू पेरणी केल्‍याचा दिनांक १०-११-२०१७ पासून ९ टक्‍के प्रमाणे व्‍याजासह सामनेवाले क्रमांक १ व २  यांनी संयुक्तिकरीत्‍या अथवा वैयक्तिकरित्‍या द्यावे, या निष्‍कर्षाप्रत हा आयोग येत आहे. म्‍हणुन क्र.३ चे उत्‍तर अंशतः होकारार्थी देण्‍यात येत आहे.

      तक्रारदाराने त्‍याचे तक्रारीचा खर्च तसेच शारीरिक, मानसिक त्रासापोटी त्रास झाला असल्‍याची कुठलीही मागणी केली नसल्‍याने मे. आयोगास तक्रारदारास मानसिक, शारीरिक त्रासापोटी व तक्रार खर्च देता येणार नाही.

१०.  मुद्दा क्र. (४) : मुद्दा क्रमांक १, २ व ३ चे विवेचनावरून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करणेत येत आहे.  

आदेश

१. तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येत आहे.

 

२. सामनेवाले यांनी तक्रारदाराला झालेली नुकसान भरपाईची रक्‍कम रूपये ५,२५०/- (पाच हजार दोनशे पन्‍नास मात्र) दिनांक १०-११-२०१७ रोजीपासुन द.सा.द.शे. ९ टक्‍के व्‍याजासह रक्‍कम द्यावी.  .

३. वर नमूद आदेशाची पुर्तता सामनेवाले यांनी आदेशाची प्रत                                        मिळण्‍यापासून ३० दिवसाच्‍या आत करावी.

४. या आदेशाची प्रथम प्रत उभय पक्षकार यांना निःशुल्‍क देण्‍यात यावी.

 

५. तक्रारदार यांना या प्रकरणाची ‘’ब’’ व ‘’क’’ फाईल परत  करावी.

 
 
[HON'BLE MR. V. C. Premchandani]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. C. V.Dongare]
Member
 
 
[HON'BLE MR. M. N. Dhake]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.