निकालपत्र :- (दि.01/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.7 यांनी हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले. सामनेवाला क्र. 2 ते 4 व 9 वकीलांमार्फत हजर होऊन लेखी म्हणणे दाखल केले. तसेच सामनेवाला क्र.5 यांनी लेखी म्हणणे दाखल केले आहे.सामनेवाला क्र.1,6, 8, 10 व 11 यांना नोटीस लागू होऊनही ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही.सबब प्रस्तुत सामनेवाला यांचे विरुध्द एकतर्फा आदेश पारीत करणेत आला. उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासहीत अदा न केलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार हे वयोवृध्द असून गारगोटी येथे राहतात. त्यांना स्वत:चे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून ते पेन्शनर आहेत. त्यांना मासिक पेन्शन रक्कम रु.341/- मिळते. तक्रारदाराने त्यांचे पत्नीचे नांवे नमुद सामनेवाला पत संस्थेमध्ये दि.09/07/2001 रोजी दामदुप्पट परत ठेव योजनेखाली ठेव पावती क्र.367 व 368 खाते क्रमांक अनुक्रमांक 387 व 388, तसेच खाते पान नं.2/175 व 2/176 नुसार प्रत्येकी रक्कम रु.25,000/- प्रमाणे ठेवी ठेवल्या होत्या. नमुद ठेवी परत मिळणेची तारीख दि.09/04/2006 आहे. तक्रारदाराचे पत्नीचे दि.28/06/2008 रोजी निधन झाले असून तक्रारदार हे सदर ठेवीची नोंद वारस आहेत. तक्रारदार यांनी दि.20/08/2001 रोजी वरील नमुद ठेव पावती पैकी ठेव पावती क्र.368 तारण गहाण ठेवून रक्कम रु.10,000/- चे कर्ज घेतलेले होते. तक्रारदाराने कर्ज खातेची माहिती व खाते उतारा मिळणेसाठी मागणी केली होती. मात्र सामनेवाला यांनी खाते उतारा देणेचे टाळले व त्याचा उल्लेख दि.17/04/2006 च्या सामनेवाला यांनी तक्रारदारास पाठवलेल्या खुलाशाच्या पत्रात नमुद आहे. प्रस्तुतच्या ठेव रक्कमा मिळत नसलेने तक्रारदाराने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गारगोटी यांचेकडे लेखी तक्रार अर्ज दाखल केला. तसेच दि.18/05/2005 रोजी तहसिलदार ता.भुदरगड जि.कोल्हापूर यांचेकडेही अर्ज दाखल केला. तदनंतर जरुर ती कारवाई न झालेने दि.13/06/2008 रोजी सहाय्यक निबंधकांकडे फेर अर्ज केला. एवढे करुनही तक्रारदारास ठेव रक्कमा न मिळालेने जिल्हा संघटना अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचेकडे लेखी तक्रार अर्ज केला. त्यावर दि.14/05/2009 व दि.07/08/2009 रोजी पत्र व्यवहार केलेला आहे. त्यास चेअरमन यांनी दि.25/05/2009 व दि.14/08/2009 रोजी लेखी उत्तर पाठवले. मात्र ठेव रक्कमा परत मिळाली नसलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह मंजूर करुन सामनेवाला संस्थेकडे जमा असलेल्या दोन्ही ठेव पावत्यांच्या रक्कमा व्याजासहीत परत मिळाव्यात. नमुद ठेव पावती क्र.367 ही तारण गहाण देऊन रक्कम रु.10,000/- सदर रक्कमेतून वजा करुन घेणेस तक्रारदारास काही हरकत नाही अशी विनंती सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने तक्रारीसोबत अधिकारपत्र, तसेच नमुद ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, पत्नीचे मृत्यू प्रमाणपत्र, ठेव पावती तारण गहाण खातेचा खातेउतारा, सामनेवालांनी तक्रारदारास दिलेले पत्र, तक्रारदाराने सहाय्यक निबंधक, तहसिलदार, अखिल भारतीय ग्राहक पंचायत यांचेकडे दिलेल्या लेखी तक्रार अर्जांच्या सत्यप्रती, सहाय्यक निबंधक यांनी सामनेवाला संस्थेस पाठवलेल्या पत्रांच्या सत्यप्रती, सामनेवाला यांचे आलेले उत्तर, सामनेवाला संस्थेच्या संचालक मंडळाची यादी इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (4) सामनेवाला क्र.7 यांनी दाखल केलेले लेखी म्हणणेप्रमाणे त्यांनी सन-2001 मध्ये सामनेवाला संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे व सदर राजीनामा सामनेवाला संस्थेने स्विकारलेला आहे. तक्रारदाराने संस्थेमध्ये ठेवी ठेवल्या होत्या किंवा नाही याची माहिती नाही. प्रस्तुत तक्रारदाराच्या ठेवी देणेशी प्रस्तुत सामनेवाला यांचा काहीही संबंध नाही. तक्रारदाराने मला विनाकारण त्रास देणेस प्रयत्न केलेला आहे. सदर मंचाची नोटीस आलेने प्रसतुतचे म्हणणे दाखल करत असलेचे नमुद केले आहे. (5) सामनेवाला क्र.7 यांनी आपल्या लेखी म्हणणेसोबत त्यांचा राजीनामा स्विकारलेची सत्यप्रत दाखल केली आहे. (6) सामनेवाला क्र.5 यांनी आपल्या लेखी म्हणणेप्रमाणे तक्रार अर्जातील कलम 1 ते 8 मधील मजकूर चुकीचा आहे. कलम 3 मधील रक्कमेच्या तपशीलाचा मजकूर चुकीचा आहे. प्रस्तुतच्या तक्रार अर्जास कारण घडलेले नाही. त्यामुळे प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. प्रस्तुत सामनेवाला यांनी दि.08/01/2002 रोजी राजीनामा दिलेला असून सामनेवाला संस्थेच्या कारभाराशी कोणताही संबंध राहिलेला नाही. राजीनामा दिल्यानंतर सामनेवाला संस्थेने केलेल्या कोणत्याही व्यवहारास प्रस्तुत सामनेवाला यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदारांचा व्यवहार हा प्रस्तुत सामनेवाला संचालक असतानाच्या कालावधीतील नाही. सबब प्रस्तुतची तक्रार सामनेवालांविरुध्द चालणेस पात्र नाही. सहाय्यक निबंधक यांना असलेल्या तक्रारीस कायदेशीर उत्तर व म्हणणे दिलेले आहे. तक्रारदाराने खोटी व चुकीची तक्रार दाखल केलेली असलेने सामनेवालाविरुध्द तक्रार काढून टाकणे आवश्यक आहे. तसेच सामनेवाला यांना झालेला कोर्ट खर्च तक्रारदाराने देणे आवश्यक आहे. सबब तक्रारदाराची तक्रार नामंजूर करुन सामनेवाला क्र.5 यांना आलेला खर्च तक्रारदार यांनी देणेचा आदेश व्हावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (6) सामनेवाला क्र.5 यांनी आपले म्हणणेच्या पुष्टयर्थ सहाय्यक निबंधक यांना पाठविलेले पत्र, तसेच सहाय्यक निबंधक यांचे आलेले पत्र व त्यासंबंधीच्या पावत्या व पोचपत्र इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत. (7) सामनेवाला क्र.2 ते 4 व 9 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्ज खोटा,लबाडीचा व साधनीभूत असलेने मान्य व कबूल नाही. तक्रार अर्ज कलम 1 मधील तक्रारदार व त्यांचे पत्नी सौ. नंदा यांचे नांवे संस्थेत ठेव ठेवलचा मजकूर खरा व बरोबर आहे. सदर ठेवी ठेव पावती क्र.367 व 368 रक्कम रु.25,000/- प्रत्येकी प्रमाणे दि.09/07/2001 रोजी ठेवलेली होती व त्याची मुदत दि.28/06/2008 रोजी संपते. तक्रारदाराची पत्नी दि.28/06/20008 रोजी मयत झालेचा उल्लेख आहे. मात्र तक्रारदाराने नंदा रंगराव खामकर मयत तर्फे वारस असा अर्ज दाखल न करता स्वत: तक्रारदार म्हणून अर्ज केलेला म्हणून तो कायदयाने चालणेस पात्र नाही. तक्रारदाराचे मयत पत्नी हिने ठेव पावती क्र.367 तारण देऊन रक्कम रु.10,000/- चे दि.20/08/2001 रोजी कर्ज घेतले होते व सदरचे कर्ज पूर्ण थकीत आहे. सदरचे कर्जाची पूर्णफेड झालेशिवाय नमुद ठेवीची रक्कम कायदयाने देता येत नाही. कायदयातील तरतुदीनुसार सामनेवाला संस्था मयत नंदा खामकर यांचे वारसाविरुध्द म.स.कायदा कलम 91 खाली मुदतीत वाद दाखल करीत आहेत. तक्रारदाराने कलम 6 मध्ये दि.09/04/2006 रोजी सव्याज रक्कम दिली असलेचा मजकूर खोटा व आपमतलबी आहे. सामनेवालाने तक्रारदारास कर्ज खातेचा उतारा दिलेला आहे. तसेच दि.17/04/2004 रोजी दिलेला खुलासा बरोबर आहे. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, गारगोटी, अखिल भारतीय ग्राहक पंचायत कोल्हापूरयांचेकडे योग्य खुलासा केला आहे. पावती क्र.368 ची सर्व रककम वेळोवेळी ठेवीदारास मिळालेली आहे व पावती क्र. 367 कर्जाची पूर्णफेड झालेशिवाय सदर ठेव रककम कायदयाने परत करता येत नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज नामंजूर वहावा अर्जदाराचा अर्ज मुदतीत नाही. सामनेवाला क्र.2 यांनी दि.27/03/2006 रोजी संचालक मंडळाचा राजीनामा दिलेला आहे. तक्रारदाराने सामनेवाला संस्था व तिचे संचालकांना वेठीस/खर्चात आणणेसाठी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला असलेने तक्रारदाराकडून प्रस्तुत सामनेवाला यांना कॉम्पेसेंटरी कॉस्ट रक्कम रु.10,000/- दयावी अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ ठेव तारण कर्जाचा उतारा, ठेव रक्कमेचा खातेउतारा, तक्रारदार यांचे सेव्हींग ठेव खाते पान क्र.39 चा उतारा, तक्रारदारास रक्कम अदा केलेबाबतच्या एकूण 13 पावत्या, ठेव क्र.367 चा खातेउतारा इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (9) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र. 2 ते 4 व 9 तसेच सामनेवाला क्र. 5 व सामनेवाला क्र. 7 यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाच्या मुद्दयाचा विचार करावा लागतो. अ) तक्रारदाराने त्यांचे पत्नीचे नांवे सामनेवाला संस्थेत ठेव पावती क्र.367 व 368 प्रत्येकी रक्कम रु.25,000/-प्रमाणे एकूण रक्कम रु.50,000/-दि. 09/07/2001 रोजी दामदुप्पट ठेव योजनेखाली ठेवलेचे नमुद रक्कम भरणा पावती, ठेव पावत्यांच्या सत्यप्रती इत्यादीवरुन निर्विवाद आहे. तसेच प्रस्तुतची बाब सामनेवाला यांनी मान्य केलेली आहे. ब) तक्रारदाराने आपल्या तक्रारीतील कलम 5 मध्ये दि.20/08/2001 रोजी ठेव पावती क्र. 368 तारण गहाण ठेवून रक्कम रु.10,000/- कर्ज घेतलेचे नमुद केले आहे. मात्र कलम 11 मध्ये तक्रारदाराने केलेल्या कलम 2 मध्ये ठेव पावती क्र.367 ची पावती तारण गहाण ठेवलेचे नमुद केले आहे व सदर रक्कम कर्जाची रक्कम वजावट करुन उर्वरित रक्कम देणेबाबत विनंती केलेली आहे. याचा विचार करता सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन ठेव पावती क्र.368 वर ठेव तारण कर्ज दिलेले आहे तसेच तक्रारदाराने कलम 5 मध्ये सदर ठेव पावती वर कर्ज घेतलेचे नमुद केलेले आहे. ठेव पावती क्र.367 ची रक्कम रु.25,000/- तक्रारदाराचे सेव्हींग खाते क्र.61 पान नं.39 वर जमा केलेली आहे ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. क) ठेव पावती क्र.367 वर दि.09/06/2001 रोजी रक्कम रु.25,000/- दामदुप्पट योजनेखाली भरलेले होते व सदर खाते उता-यावरुन तसेच ठेव पावतीच्या सत्यप्रतीवरुन प्रस्तुत ठेवीची मुदत दि.09/04/2006 रोजी संपतेबाबतची नोंद आहे. तसेच त्याच पध्दतीने ठेव पावती क्र.368 बाबतही नोंदी आहेत. सदर मुदत संपलेनंतर दामदुप्पटीप्रमाणे प्रत्येक ठेवीमागे प्रत्येकी रक्कम रु.50,000/- इतकी ठेवीदारास मिळाली असती. मात्र ठेव पावती क्र. 367 वरील रक्कम रु.25,000/- दि.11/09/2002 रोजी तक्रारदाराचे सेव्हींग खातेवर जमा केलेचे दिसून येते. मात्र प्रस्तुत कालावधीमध्ये व्याजाची रक्कम मात्र जमा केलेचे दिसून येत नाही व सदरची बाब युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला यांचे वकीलांनी मान्य केलेली आहे. सबब प्रस्तुत ठेव पावतीची रक्कम मुदत संपणेपूर्वीच तक्रारदाराचे सेव्हींग खातेस वर्ग केली असलेने तक्रारदारास सदर ठेवीपोटी रक्कम रु.50,000/- मागणी करता येणार नाही. सदर रक्कम सेव्हींग खातेस जमा झालेनंतर तक्रारदाराने वेळोवेळी रक्कमा काढलेल्या आहेत व रक्कम काढलेबाबतच्या पावत्या प्रस्तुत प्रकरणी दाखल आहेत. तसेच तक्रारदारने प्रस्तुतची बाब नाकारलेली नाही. युक्तीवादाच्या वेळेस तक्रारदाराने सदर रक्कमा उचल केलेची बाब मान्य केली आहे. नमुद खाते उता-याचे अवलोकन केले असता सदर खातेवर 15 टक्के व्याजाची नोंद आहे व त्याप्रमाणे दि.30/09/2001 अखेर रक्कम रु.863/- व दि.31/03/2002 अखेर रक्कम रु.1,934/- व्याज जमा केलेची नोंद आहे. मात्र तदनंतर दि.19/09/2002 अखेर व्याजाची नोंद दिसून येत नाही. सबब सदर कालावधीतील व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. असे एकंदरीत होणारे दि.09/07/2001 पासून ते 11/09/2002 पर्यंतचे कायदेशीर व्याज मिळणेस पात्र आहेत. ड) ठेव पावती क्र.368 वर तक्रारदारचे पत्नीने रक्कम रु.10,000/- चे ठेव तारण कर्ज घेतलेचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत कबूल व मान्य केलेले आहे. सामनेवाला यांनी ठेव पावती क्र.368 च्या खातेउता-याची सत्य प्रत दाखल केलेली आहे. सदर खातेउता-यावर 15 टक्के व्याजाची नोंद असून सदर ठेव पावती दामदुप्पटीची असून तिची मुदत दि.09/04/2006 रोजी संपते व सदर मुदतीरोजी तक्रारदाराचे खातेवर रक्कम रु.50,000/- जमा नोंद आहे. तसेच प्रस्तुत ठेव पावतीवर ठेव तारण कर्ज रक्कम रु.10,000/- घेतलेले असून सदर कर्ज दि.28/08/2001 रोजी अदा केलेचे दिसून येते. सदर कर्जाचा व्याजदर हा 17 टक्के आहे. ठेव तारण कर्ज हे ठेवीचा व्याजदर व कर्जाचा व्याजदर यामध्ये 2 टक्केच्या फरकाने दिले जाते. सबब सदर ठेवीचा व्याजदर 15 टक्के व कर्जाचा व्याजदर 17 टक्के हे कायदेशीररित्या योग्य आहे. सदर कर्जाची मुदतसुध्दा जेव्हा ठेवीची मुदत संपते त्याच दिवशी संपलेली आहे व सदर मुदतीअखेर प्रस्तुत खातेवर काहीही रक्कमेचा भरणा न केलेने मुद्दल अधिक व्याज मिळून रक्कम रु.21,647/- येणे बाकी दर्शविली आहे. तसेच प्रस्तुत मुदतीनंतर मिळणारी ठेवीची रक्कम रु.50,000/- मधून सदर कर्जाची रक्कम रु.21,647/- वजा जाता. रक्कम रु.28,353/- अनामत खातेस वर्ग केलेचे प्रस्तुत ठेव खातेउता-यावर देणे रक्कम म्हणून नमुद केलेचे दिसून येते. सामनेवालांनी दाखल केलेल्या तक्रारदाराचे सेव्हींग खाते क्र.61 पान नं.39 हे प्रस्तुतची रक्कम अनामत खातेवर वर्ग करेपर्यंत प्रस्तुत सेव्हींग खाते अस्तित्वात असतानाही तसेच नमुद खाते बंद केलेबाबतची नोंद सदर खातेउता-यावर दिसून येत नाही अशी वस्तुस्थिती असतानाही सामनेवाला प्रस्तुतची रक्कम अनामत खातेवर वर्ग करणेऐवजी तक्रारदाराचे प्रस्तुत सेव्हींग खातेवर जमा वर्ग करु शकले असते. परंतु सामनेवाला यांनी ते केलेले नाही. सबब तक्रारदार हे ठेव पावती क्र.368 वरील व्याजासहीत कर्जाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम रु.28,353/- वर दि.10/04/2006 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज मिळणेस पात्र आहे. (10) कलम क्र. 9 मधील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी ठेव पावती क्र. 367 वरील दि.09/07/2001 ते दि.11/09/2002 अखेरील होणारे कायदेशीर व्याज तक्रारदाराचे सेव्हींग खातेस वर्ग केलेले नाही. प्रस्तुत ठेवीची मुद्दल रक्कम फक्त वर्ग केलेली आहे. तर ठेव पावती क्र. 368 वरील उर्वरित रक्कम रु.28,353/- तक्रारदाराचे सेव्हींग खाते अस्तिवात्व असतानाही अनामत खातेस वर्ग केलेले आहे. ही सामनेवालांची सेवेतील गंभीर त्रुटी आहे. कारण सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेमध्ये तक्रारदाराची पत्नी नंदा रंगराव खामकर यांचे नांवे तक्रारदाराने ठेव रक्कमा ठेवलेचे मान्य केलेले आहे.तसेच दि.28/06/2008 रोजी तक्रारदाराचे पत्नीचा मृत्यू झालेचे दाखल मृत्यू प्रमाणपत्रावरुन निदर्शनास येते. तसेच प्रस्तुत ठेव पावत्यांवर वारस म्हणून तक्रारदाराचे नांव स्प्ष्टपणे नमुद केलेले आहे. सबब पत्नीचे मृत्यूनंतर तक्रारदार प्रस्तुत ठेव रक्कमा व्याजासहीत मिळणेस पात्र आहे. तसेच प्रस्तुत तक्रारदाराचे नमुद सामनेवाला संस्थेमध्ये सेव्हींग खाते असलेचे स्वत: सामनेवाला यांनी मान्य केलेले आहे व त्याबाबतचा खाते उतारा दाखल केलेला आहे या वस्तुस्थितीची सामनेवालांना पूर्णत: माहिती असतानाही ठेवीवरील व्याज न देणे तसेच उर्वरित रक्कम अनामत खातेस वर्ग करणे ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदार कलम 9 मध्ये नमुद केलेप्रमाणे ठेव पावती क्र.367 वरील व्याज तसेच ठेव पावती क्र.368 वरील उर्वरित रक्कम व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत. सामनेवाला क्र.7 यांनी दि.28/11/2001 रोजी सामनेवाला संस्थेने त्यांना पाठवलेले पत्र प्रस्तुत कामी हजर केलेले आहे व सदर पत्रानुसार त्यांचेवर शिफारस केलेल्या कर्जाची जबाबदारी ठेवून संस्थेच्या मासिक मिटींग ठराव 10/12 अन्वये राजीनामा मंजूर केलेचे नमुद केले आहे. मात्र नमुद तक्रारीतील ठेवी या दि.09/07/2001 रोजीच ठेवलेल्या आहेत. सबब सदर ठेवी ठेवताना प्रस्तुत सामनेवाला हे संचालक म्हणून कार्यरत होते सबब सामनेवाला क्र.7 यांनी राजीनामा दिला म्हणजे त्यांची जबाबदारी संपत नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सदरच्या रक्कमा व आदेशीत रक्कमा देणेसाठी सर्व सामनेवाला हे वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) प्रस्तुतच्या ठेवी मिळणेसाठी तक्रारदाराने सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था गारगोटी तसेच तहसीलदार यांचेकडे तक्रारी केलेल्या आहेत याची दखल न घेतलेने प्रस्तुतची तक्रार सदर मंचास दाखल केलेली आहे. त्यासाठी तक्रारदाराला झालेल्या तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास ठेव पावती क्र. 367 वरील रक्कम रु.25,000/- वर ठेव ठेवले तारखेपासून म्हणजे दि.09/07/2001 ते दि.11/09/2002 पर्यंत ठेव पावतीवर नमुद व्याजदर म्हणजे द.सा.द.शे. 15 टक्के प्रमाणे व्याज दयावे. (3) सामनेवाला यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदारास ठेव पावती क्र. 368 वरील उर्वरित रक्कम रु.28,353/- अदा करावी. सदर रक्कमेवर दि.10/04/2006 ते संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के प्रमाणे व्याज दयावे. (4) सामनेवाला यांनी तक्रारदारस तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |