जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 427/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-07/12/2012.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 20/02/2014.
गिरीष नारायण मिस्तरी,
उ.व.सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.7, ज्ञानदिप अपार्टमेंट, चैतन्य नगर,
प्रोग्रेसिव्ह इंग्लीश मिडीयम स्कुल समोर,जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. स्वामी एजन्सी तर्फे प्रोप्रायटर,
26, टुरिस्ट कॉम्प्लेक्स, नेहरु चौक,जळगांव.
2. एलजी इलेट्रॉनिक्स इंडीया प्रा.लि.,
तर्फे मॅनेजींग डायरेक्टर किंवा प्राधिकृत अधिकारी,
302, सिडको नंबर 3, हॉटेल रंगिरी समोर,जालना रोड,
औरंगाबाद,ता.जि.औरंगाबाद. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.केतन जयदेव ढाके वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 तर्फे श्री.विजय पी.पाटील वकील.
विरुध्द पक्ष क्र.2 तर्फे श्री.पी.आर.झंवर वकील.
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः विरुध्द पक्षांनी तक्रारदाराला निकृष्ठ दर्जाचा फ्रीज विक्री केल्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार हे वर पत्यावरील रहीवाशी असुन व्यापार करतात. विरुध्द पक्ष क्र.1 हे नामांकीत व्यापारी असुन इलेक्ट्रॉनिक्स कंपनीच्यांचे अधिकृत विक्रेते आहेत. तक्रारदार यांना नोव्हेंबर,2008 मध्ये फ्रीज विकत घ्यावयाचा असल्याने अनेक कंपन्यांनी उत्पादीत केलेल्या फ्रीजचा तपास करुन तपासाअंती तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 2 उत्पादीत फ्रीज त्यांचे अधिकृत विक्रेते विरुध्द पक्ष क्र. 1 कडुन घेण्याचे ठरविले. तक्रारदारास विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी एलजी कंपनीतर्फे उत्पादीत होणा-या फ्रीज बाबतची माहिती देऊन सदरचा फ्रीज घेण्याचे आश्वासन दिले. तक्रारदाराने विरुध्द पक्ष यांचे आश्वासनावर विश्वास ठेवुन विरुध्द पक्ष क्र. 1 चे दुकानातुन दि.13/11/2008 रोजी एलजी कंपनीचा मॉडेल नंबर 241 एनएमयु व सिरियल क्रमांक 015448 असलेला फ्रीज रोख रक्कम रु.11,500/- इतक्या किंमतीस बिल क्रमांक 1590 अन्वये खरेदी केला. सदरच्या फ्रीज ची विरुध्द पक्ष क्र. 2 कंपनीकडुन 7 वर्षाचे वॉरंटी कार्ड इडब्ल्युओ 81229182 दिलेले होते. फ्रीजची विरुध्द पक्ष क्र. 1 कडील तज्ञ व्यक्तीकडुन तक्रारदाराचे घरी सेटींग केल्यानंतर आठ दहा दिवसातच फ्रीज योग्य प्रकारे कुलींग देत नसल्याचे तक्रारदाराचे निर्दशनास आले. तक्रारदाराने त्याबाबतची तक्रार विरुध्द पक्षाकडे केली असता त्यांनी तज्ञ व्यक्ती पाठवुन तक्रारदाराचे फ्रीजची थर्मोस्टेटची सेटींग करुन दिली व आता कोणतीही तक्रार येणार नाही असे सांगीतले. परंतु तरी देखील तक्रारदाराचा फ्रीज हा योग्य कुलींग देत नव्हता, त्यात ठेवण्यात येणा-या वस्तु कायम खराब होऊन जात त्यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्षाकडे दर महीना पंधरा दिवसांनी तक्रार करीत राहीले त्या प्रत्येक तक्रारी नुसार विरुध्द पक्षाकडील तज्ञ येऊन सेटींग केल्याचे भासवुन तक्रार येणार नाही असे सांगत गेले. सरतेशेवटी मे,2010 च्या उन्हाळयात सदर फ्रीजचे कुलींग फारच कमी झाले तेव्हा तक्रारदाराने विरुध्द पक्षाकडे केलेल्या तक्रारीनुसार विरुध्द पक्षाकडील तज्ञ तक्रारदाराचे घरी आला व फ्रीजची तपासणी करुन क्रॉम्प्रेसर विक अथवा गॅस कमी झाला असल्याचे सांगुन पुन्हा काहीतरी किरकोळ दुरुस्ती करुन गेला तसेच फ्रीज मधील प्रॉब्लेम कायमचा दुर करण्यासाठी कंपनीकडुन काही पार्ट मागवावे लागतील व ते येईपर्यंत आहे त्या परिस्थितीत फ्रीज सुरु ठेवण्याचे सांगीतले. तसेच कंपनीकडुन पार्ट न आल्यास नवीन फ्रीज देण्याचेही सांगीतले. फ्रीजची 7 वर्षाची वॉरंटी असतांनाही विरुध्द पक्षाने तक्रारदाराला विक्री केलेल्या फ्रीज मध्ये योग्य ती दुरुस्ती करुन निवारण न करुन देऊन सदोष सेवा दिलेली आहे. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर करण्यात यावा, तक्रारदाराकडील विरुध्द पक्षाने दिलेला फ्रीज हा सदोष असतांनाही विक्री केल्याचे जाहीर होऊन मिळावे तसेच तक्रारदाराकडील फ्रीज स्विकारुन त्यास एलजी कंपनीचा नवीन फ्रीज देण्याचे आदेश व्हावेत, आर्थिक नुकसानीपोटी रु.15,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या.
4. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जात नमुद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदाराला कधीही एलजी कंपनीचा फ्रीज घेण्याबाबत प्रवृत्त केलेले नव्हते व नाही. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षाकडुन त्यांचे आवडीचा फ्रीज विकत घेतलेला आहे. तक्रारदाराचे तुर्तातुर्त अर्ज व मुळ तक्रार अर्जातील संपुर्ण मजकुर हा चुकीचा खोटा व लबाडीचा असल्याने विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदार याने तक्रार अर्जात नमुद केलेला फ्रीज विकत घेतल्यानंतर त्यास 7 वर्षाचे वॉरंटी कार्ड भरुन दिलेले होते हा संपुर्ण मजकुर खोटा व बेकायदेशीर आहे. तक्रारदाराने तक्रार अर्जासोबत दाखल केलेले वॉरंटी कार्ड हे अपुर्ण असुन त्यासोबत एक पानाची प्रत जाणुनबुजून दाखल केलेली नाही. तक्रारदाराच्या घरातील विजेचा कमी जास्त दाब, योग्य त्या इले.फीटींगचा अभाव, तक्रारदाराचे फ्रीज वापराचे अज्ञान यामुळे तक्रारदाराचा फ्रीज वारंवार खराब होत असे. व प्रत्येक समस्येचे विरुध्द पक्षाने निवारण करुन दिलेले आहे. तक्रारदारास कधीही नवीन फ्रीज देण्यात येईल असे सांगीतले नव्हते व नाही व तशी वॉरंटी कार्ड मध्ये तरतुदही नाही. विरुध्द पक्ष हे फ्रीजचे विक्रेते असुन उत्पादक कंपनीला प्रस्तुतकामी सामील न करता तसेच तज्ञ अहवाल दाखल न करता केलेला अर्ज खोटा व बनावट आहे. वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराची तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी केलेली आहे.
5. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. तक्रारदाराचे तक्रारीतील संपुर्ण कथन व मागणी पुर्णपणे बनावट व चुकीची असुन विरुध्द पक्षास मान्य नाही. तक्रारदारला एलजी कंपनीचा फ्रीज घेण्याचे आवाहन केले हे तक्रारदाराचे कथन चुकीचे व बेकायदेशीर आहे. तक्रारदाराने दि.13/11/2008 रोजी फ्रीज विकत घेतला हे बरोबर आहे तथापी वॉरंटी बाबतचा संपुर्ण मजकुर चुकीचा आहे. वॉरंटी व गॅरंटी यात अमुलाग्र फरक आहे. तक्रारदाराने फ्रीज विकत घेतल्यानंतर तज्ञ व्यक्तीने त्याचे घरी जाऊन फ्रीज ची सेटींग करुन देऊन योग्य प्रकारे चालु करुन दिला होता व कुलींग देखील व्यवस्थीत होत होती. ज्या ज्या वेळी ग्राहकांकडुन तक्रारी येतात त्या त्या वेळी वॉरंटी कालावधी असेल तर पार्ट बदलुन योग्य ती दुरुस्ती करुन दिली जाते तथापी फ्रीजचे कुलींगमध्ये थोडा त्रास असल्याने तो दुरुस्त करण्यास तक्रारदाराला सांगीतले असता त्याने संपुर्ण फ्रीज बदलुन दया अशी मागणी केली. वास्तविक कुलींगसाठी जो काही त्रास तक्रारदाराला वाटत होता तो त्रास कमी होण्यासाठी तक्रारदाराला सांगीतलेला मार्ग स्विकारण्याऐवजी तक्रारदाराने नवीन फ्रीज मिळण्याची मागणी केली व फ्रीज ला दुरुस्त करु नका असे सांगीतले. तक्रारदाराने फ्रीज बदलुन मिळावा अशी चुकीची व बेकायदेशीर मागणी केलेली आहे. तक्रारदारास संबंधीत फ्रीज चा पार्ट न आल्यास फ्रीज बदलुन दिला जाईल असे कधीही सांगीतलेले नव्हते व नाही. तक्रारदाराच्या फ्रीज मध्ये कोणताही दोष नव्हता व नाही मात्र नवीन फ्रीज मिळण्याचे लाभापोटी तक्रारदाराने प्रस्तुतचा खोटा चुकीचा अर्ज केलेला आहे. सबब वरील सर्व कारणांचा विचार होऊन तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी केलेली आहे.
6. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, विरुध्द पक्ष यांचे लेखी म्हणणे, व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर.
1. विरुध्द पक्षांनी तक्रारदारास सेवा देण्यात त्रुटी केली
आहे काय ? होय.
2. तक्रारदार कोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतीम आदेशानुसार
7. मुद्या क्र. 1 - तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 2 कंपनीने उत्पादीत केलेला एलजी कंपनीचा फ्रीज रक्कम रु.11,500/- या किंमतीस बिल क्रमांक 1590 अन्वये विरुध्द पक्ष क्र.2 यांचेकडुन खरेदी केला याबाबत उभयतांमध्ये कोणताही वाद नाही. तक्रारदाराने सदरचा फ्रीज खरेदी केल्यानंतर आठ दिवसातच त्यात कुलींग बाबतचा दोष निर्माण होऊन व्यवस्थतरित्या कुलींग होत नसल्याची प्रमुख तक्रार तक्रार अर्जातुन उपस्थित करुन विरुध्द पक्ष यांनी विक्री केलेला फ्रीज सदोष असल्याने तो परत घेऊन त्यास एलजी कंपनीचा दुसरा अन्य नवीन फ्रीज देण्याची प्रमुख विनंती तक्रार अर्जातुन केलेली आहे.
8. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी याकामी हजर होऊन लेखी म्हणणे व युक्तीवादातुन तक्रारदाराचे तक्रारीचे परिच्छेदनिहाय खंडन केलेले आहे. तसेच विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे परिच्छेद क्र. 3 मध्ये तक्रारदाराचे फ्रीज चे कुलींग मध्ये थोडा त्रास असल्याचे नमुद करुन तसेच तो दुरुस्त करणे गरजेचे आहे असे सांगीतले असता तक्रारदाराने फ्रीज बदलुन मिळणेची मागणी केली असल्याचे नमुद केलेले आहे.
9. वरील एकुण विवेचनावरुन तक्रारदाराचे फ्रीज मध्ये कुलींग बाबत दोष असल्याचे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी लेखी म्हणण्यातील परिच्छेद क्र.3 मधुन मान्य केलेले आहे. सदरचा दोष हा वारंवार निर्माण होत असल्याचे कथन करुन तक्रारदाराने सदर सदोष फ्रीज बदलुन नवीन फ्रीज देण्याची विनंती केलेली आहे. तक्रारदाराने वारंवार तक्रारी करुन तसेच विरुध्द पक्षाने त्यांचे वारंवार निवारण करुनही फ्रीज मधील कुलींगचा दोष कायमचा दुरु होत नसल्याने तक्रारदाराने व्यथीत होऊन विरुध्द पक्षास नोटीस दिल्याचे व सरतेशेवटी या मंचासमोर तक्रार दाखल केल्याचे तक्रारदाराचे विधिज्ञांनी त्यांचे युक्तीवादात सांगीतले. तक्रारदाराचा तक्रार अर्ज, सोबत दाखल केलेले शपथपत्र व उभयतांचा युक्तीवाद इत्यादीचे अवलोकन करता तक्रारदारास कुलींग मध्ये दोष असलेला फ्रीज विक्री करुन विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास त्रृटीयुक्त सेवा दिल्याचे निष्कर्षास्तव आम्ही मुद्या क्र. 1 चे उत्तर होकारार्थी देत आहोत.
10. मुद्या क्र. 2 - तक्रारदाराचा तक्रार अर्ज मंजुर करण्यात यावा, तक्रारदाराकडील विरुध्द पक्षाने दिलेला फ्रीज हा सदोष असतांनाही विक्री केल्याचे जाहीर होऊन मिळावे तसेच तक्रारदाराकडील फ्रीज स्विकारुन त्यास एलजी कंपनीचा नवीन फ्रीज देण्याचे आदेश व्हावेत, आर्थिक नुकसानीपोटी रु.15,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.5,000/- मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने केलेली आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदारास कुलींग मध्ये दोष असलेला फ्रीज विक्री केल्याचे निष्कर्ष आम्ही वर नमुद केलेले आहे. सबब तक्रारदाराचे ताब्यातील फ्रीज आहे त्या परिस्थितीत विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी स्विकारावा व त्या बदल्यात तक्रारदारास त्याच मेकचा दुसरा नवीन फ्रीज तात्काळ द्यावा तसेच तक्रारदारास फ्रीज मध्ये कुलींग व्यवस्थीत होत नसल्याने झालेल्या आर्थिक नुकसानी दाखल रु.5,000/-, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/- व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.3,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या द्यावेत असे आदेश देणे न्यायोचित होईल. सबब वरिल विवेचनावरुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजुर करण्यात येतो.
2. विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदाराचे ताब्यात आहे त्या परिस्थितीत असलेला फ्रीज ताब्यात घ्यावा व तक्रारदारास त्याच मेकचा दुसरा नवीन फ्रीज तात्काळ द्यावा.
3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास झालेल्या आर्थिक नुकसानी दाखल रु.5,000/- (अक्षरी रु.पाच हजार मात्र) , मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.5,000/-(अक्षरी रु.पाच हजार मात्र) व तक्रार अर्जाचे खर्चादाखल रु.3,000/- (अक्षरी रु.तीन हजार मात्र) आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसांचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 20/02/2014.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.