मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार, सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 29/03/2011) 1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अन्वये मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार क्र. 2 हा गैरअर्जदार क्र. 1 चा एजेंट आहे व गैरअर्जदार क्र. 1 कंपनीने ‘वंडरब्ल्यू’ नावाचे गॅसची बचत करणारे इलेक्ट्रो मॅग्नेटीक उपकरणे बाजारात आणले. या योजनेमध्ये प्रत्येक व्यक्तीस रु.1,999/- या उपकरणाकरीता जमा करुन सदस्य व्हायचे होते व त्यांना सदर उपकरण मिळणार होते आणि गैरअर्जदारांच्या निर्देशानुसार तक्रारकर्त्याने 61 सदस्य या उपकरणाकरीता बनविले व प्रत्येकाकडून रु.1,999/- जमा करुन एकूण रु.1,21,939/- चा डिमांड ड्राफ्ट हा दि.03.01.2009 रोजी गैरअर्जदार क्र. 1 ला पाठविला व सोबत 61 लोकांचे नाव व पत्ते पाठविले. परंतू आजतागायत गैरअर्जदारांनी सदर उपकरण पाठविले नाही व विचारणा केली असता उडवाउडवीचे उत्तरे दिली, म्हणून तक्रारकर्त्याने एक कायदेशीर नोटीसही पाठविला असता त्याचे उत्तरात आश्वासन दिल्यावरही उपकरण न पुरविल्याने तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे आणि मागणी केली आहे की, रु.1,21,939/- परत करावे, मानसिक त्रासाबाबत व नुकसान भरपाईबाबत रु.2,000/- प्रत्येकी 61 सदस्यांना मिळावे. तक्रारीचे पुष्टयर्थ तक्रारकर्त्याने एकूण 5 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. 2. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांवर बजावण्यात आली असता गैरअर्जदारांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये तक्रारीवर काही प्राथमिक आक्षेप उपस्थित केले. त्यांच्या मते तक्रारकर्ता ग्रा.सं.का.च्या ‘ग्राहक’ संज्ञेत मोडत नाही. गैरअर्जदार क्र. 1 ही कंपनी मल्टी लेव्हल मार्केटींग कंपनी आहे व त्यांचा तक्रारकर्त्यासोबत ग्राहक म्हणून संबंध नाही. गैरअर्जदार कंपनी ही बिजनेस डिस्ट्रीब्युटरशिप देते व त्यामुळे डिस्ट्रीब्युटर हा ग्राहक होऊ शकत नाही. त्यांनी आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरामध्ये तक्रारकर्त्याची तक्रार नाकारुन खारीज करण्याची मागणी केली. 4. गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपल्या लेखी उत्तरामध्ये ते गैरअर्जदार क्र. 1 चे अधिकृत विक्रयधिकारी आहे. पुढे गैरअर्जदार क्र. 2 यांनी असे नमूद केले आहे की, तक्रारकर्ता हा सदस्य असून प्रत्येक सदस्याला कंपनीच्या उत्पादनाचे महत्व सांगून सदस्य तयार करावे लागतात व त्यातून मिळणा-या नफ्याचे सदस्यांना वाटप केल्या जाते. या प्रकरणामध्ये तक्रारकर्ता हा ग्राहक नसून कंपनीचा सदस्य आहे व नफा कमविण्याकरीता व्यवसाय करीत आहे. आपल्या परिच्छेदनिहाय उत्तरामध्ये गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्याचे बहुतांश म्हणणे नाकारले असून तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 5. सदर तक्रार मंचासमोर युक्तीवादाकरीता 16.03.2011 आली असता उभय पक्षांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तसेच सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे मंचाने अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आहे. -निष्कर्ष- 6. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, तो खाजगी व्यवसाय करतो. तसेच तक्रारीचे स्वरुप पाहता तक्रारकर्ता हा रु.1,999/- भरुन गैरअर्जदार क्र. 1 चा सदस्य झाला आणि त्याने 61 सदस्य बनविले. सदर योजना ही चेन मार्केटींग संदर्भातील आहे व यामध्ये तक्रारकर्ता हा नफा कमविण्याच्या दृष्टीने सदर व्यवसाय करीत होता ही बाब प्रामुख्याने जाणवते. त्यामुळे तक्रारकर्ता हा ग्रा.सं.का.च्या ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नाही, म्हणून तो गैरअर्जदारांचा ग्राहक ठरत नाही. त्यामुळे तक्रारकर्ता व गैरअर्जदार यांच्यामधील वादाचे निराकरण करण्याची अधिकार मंचास नसल्यामुळे सदर तक्रार निकाली काढण्यात येते. तक्रारकर्त्याने आपला वाद योग्य त्या न्यायालयासमोर सोडवावा. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते. तक्रारकर्ता आपला वाद सोडवून घेण्याकरीता योग्य न्यायालयात जाण्यास मुक्त आहे. 2) खर्चाबाबत काहीही आदेश नाही.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |