- निकालपत्र –
(पारित व्दारा- सौ.चंद्रिका किशोरसिंह बैस, मा.सदस्या)
( पारित दिनांक-24 नोव्हेंबर, 2016)
1. तक्रारकर्त्याने प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 अन्वये विरुध्दपक्ष कंपनी तर्फे आयोजित बँकाक सहलीसाठी रक्कम भरुनही, सहलीला न नेल्यामुळे भरलेली रक्कम परत मिळण्यासाठी विरुध्दपक्ष कंपनी विरुध्द प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याचे कथन थोडक्यात येणे प्रमाणे-
तक्रारकर्ता नागपूर शहरात उपरोक्त नमुद पत्त्यावर राहतो. विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग एवं रिटेल ट्रेडींग कंपनी या नावाने ग्राहक उपयोगी वस्तुंची ठोक व चिल्लर विक्री करतात. विरुध्दपक्ष कंपनी ही वस्तुंच्या विक्रीसाठी विविध योजना राबविते. तक्रारकर्ता विरुध्दपक्ष कंपनीच्या विक्री योजने मध्ये सभासद बनला व त्याला विशीष्ट एवढया रकमेच्या विक्रीचे लक्ष्य पूर्ण करणे अनिवार्य होते. विरुध्दपक्ष कंपनीच्या तीन प्रकारच्या योजना ज्यामध्ये सिल्व्हर लेव्हल, गोल्ड लेव्हल आणि प्लॅटीनम लेव्हल असे तीन स्तर होते. विशीष्ट रकमेच्या विक्री नंतर त्या त्या स्तरावर तक्रारकर्ता पात्र होऊन विरुध्दपक्ष कंपनीच्या योजने नुसार फायदे मिळतील असे त्याला सांगण्यात आले. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीचा सभासद होण्यासाठी अनिवार्य शुल्क रुपये-9000/- भरले. तक्रारकर्त्याने योजने अंतर्गत विशीष्ट रकमेची विक्री केल्या नंतर तो सिल्व्हर लेव्हलला पोहचल्याचे आणि बँकाक सहलीचे तिकीट घेण्यास पात्र झाल्या बाबत विरुध्दपक्ष कंपनीने दिनांक-30/09/2010 रोजीचे पत्राव्दारे त्याला कळविले. त्या सोबत तो गॅस सेवर किट, रिबॉक घडयाळे आणि विक्रीवरील कमीशन मिळण्यास पात्र झाला असल्याचेही त्यास कळविण्यात आले.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, बँकाक सहलीचा फायदा घेण्यासाठी त्याने विरुध्दपक्ष कंपनीच्या बँक खात्यामध्ये दिनांक-22/02/2010 रोजी रुपये-30,800/- एवढी रक्कम जमा केली व आवश्यक कागदपत्र जमा केले. त्याची मुख्य तक्रार अशी आहे की, त्याला विरुध्दपक्ष कंपनीने आश्वस्त केल्या प्रमाणे मोफत वस्तु मिळाल्या नाहीत तसेच रुपये-30,800/- जमा करुनही बँकाक सहलीचे तिकिट मिळाले नाही किंवा जमा केलेली रक्कम परतही मिळाली नाही. तसेच विरुध्दपक्ष कंपनीने बँकाक सहली बद्दल पुढे लेखी काहीही कळविले नाही. अशाप्रकारे विरुध्दपक्ष कंपनीचे हे कृत्यू अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवे अंतर्गत मोडते. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीच्या नागपूर शाखेत वारंवार जाऊन तसेच दुरध्वनीव्दारे विचारपूस केली परंतु केवळ आश्वासनां व्यतिरिक्त कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीस दिनांक-08/08/2012 रोजी कायदेशीर नोटीस पाठविली परंतु नोटीस मिळूनही प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून शेवटी त्याने प्रस्तुत तक्रार मंचा समक्ष दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्ष कंपनी विरुध्द खालील मागण्या केल्यात-
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनी मध्ये भरलेली रक्कम रुपये-30,800/- दिलेल्या तारखे पासून ते प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 18% व्याज दराने परत देण्याचे विरुध्दपक्षास आदेशित व्हावे. त्याच बरोबर त्याला झालेल्या मानसिक , शारिरीक व आर्थिक त्रासा बद्दल रुपये-50,000/- आणि तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-10,000/- विरुध्दपक्षा कडून देण्याचे आदेशित व्हावे.
03. प्रस्तुत तक्रारीमध्ये यातील विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग एवं रिटेल ट्रेडींग कंपनी (इंडीया) लिमिटेड यांचे उपरोक्त नमुद पत्त्यावर मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठविण्यात आली. सदरची नोटीस विरुध्दपक्ष कंपनीस मिळाल्या बाबतची पोच नि.क्रं-29 म्हणून अभिलेखावर दाखल आहे परंतु अशी नोटीस प्राप्त झाल्या नंतरही विरुध्दपक्ष कंपनी तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तरही सादर केले नाही म्हणून विरुध्दपक्ष कंपनी विरुध्द तक्रार एकतर्फी चालविण्याचा आदेश मंचाने पारीत केला.
04. तक्रारकर्त्याने तक्रारी सोबत त्याचे श्रीराम अर्बन को-ऑप.बँक, नागपूर येथील बँकेत असलेल्या खात्याचा उतारा दाखल केला. तसेच विरुध्दपक्ष कंपनीने तक्रारकर्त्यास दिनांक-30 सप्टेंबर, 2010 रोजी पाठविलेल्या पत्राची प्रत, विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग कंपनीचे अटी व शर्तीचा दस्तऐवज, तक्रारकर्त्याला सिल्व्हर लेव्हल मिळाल्या बाबतचे विरुध्दपक्ष कंपनीचे प्रमाणपत्र, बँकाक सहली संबधी माहिती असलेला दस्तऐवज, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीला पाठविलेली कायदेशीर नोटीसची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतींचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने विलंब माफ व्हावा यासाठी प्रतिज्ञालेखावरील अर्ज सादर केला. तसेच मौखीक युक्तीवादा संदर्भात पुरसिस सादर केली.
05. तक्रारकर्त्याची प्रतिज्ञालेखा वरील तक्रार तसेच तक्रारी सोबत दाखल केलेल्या दस्तऐवजांचे मंचा तर्फे काळजीपूर्वक अवलोकन करण्यात आले. तसेच तक्रारकर्त्याचा लेखी युक्तीवाद यावरुन मंचाचा निष्कर्ष खालील प्रमाणे-
:: निष्कर्ष ::
06. तक्रारकर्त्याची तक्रार ही प्रतिज्ञालेखावर दाखल आहे. विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग एवं रिटेल ट्रेडींग कंपनी (इंडीया) लिमिटेड यांचे उपरोक्त नमुद पत्त्यावर मंचाचे मार्फतीने रजिस्टर पोस्टाने पाठविलेली नोटीस विरुध्दपक्ष कंपनीस मिळाल्या बाबतची पोच नि.क्रं-29 म्हणून अभिलेखावर दाखल आहे परंतु नोटीस प्राप्त झाल्या नंतरही विरुध्दपक्ष कंपनी तर्फे कोणीही मंचा समक्ष उपस्थित झाले नाही वा लेखी उत्तरही सादर केले नाही तसेच तक्रारकर्त्याने तक्रारीत त्यांचे विरुध्द केलेली विधानेही खोडून काढलेली नाहीत. अशापरिस्थितीत तक्रारकर्त्याने प्रतिज्ञालेखावरील केलेल्या तक्रारीतील कथन मंचाव्दारे विचारात घेण्यात येते.
07. तक्रारकर्त्याने आपल्या तक्रार अर्जाव्दारे विरुध्दपक्ष कंपनी विरुध्द केलेल्या आरोपांचे संदर्भात पुराव्या दाखल दस्तऐवजाच्या प्रती तक्रारी सोबत दाखल केल्यात, ज्यामध्ये त्याचे श्रीराम अर्बन को-ऑप.बँक, नागपूर येथील बँकेत असलेल्या खात्याचा उतारा दाखल केला, ज्यामध्ये तक्रारकर्त्याने दिलेला क्रं 7218, दिनांक-22/02/2010 रोजीचा रक्कम रुपये-30,800/- चा दिनांक-23/02/2010 रोजी IC To Clg. VAIDYA ENT नावाने क्लियर झाल्याचे आणि तेवढी रक्कम त्याचे खात्यातून वजावट झाल्याचे दिसून येते. तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखावरील तक्रारी नुसार त्याने सदरची रक्कम ही विरुध्दपक्ष कंपनीचे विक्री योजने नुसार सिल्व्हर स्तर प्राप्त केला असल्याने बँकाक सहीलीसाठी विरुध्दपक्ष कंपनीचे खात्यात जमा केली होती. या रकमेच्या संदर्भात विरुध्दपक्ष कंपनी तर्फे कोणतेही लेखी निवेदन सादर न केल्यामुळे सदरची रक्कम विरुध्दपक्ष कंपनीलाच प्राप्त झालेली आहे असे मंचाव्दारे विचारात घेण्यात येते.
08. विरुध्दपक्ष कंपनीने तक्रारकर्त्यास दिनांक-30 सप्टेंबर, 2010 रोजीचे दिलेल्या पत्रात तो बँकाक सहलीसाठी पात्र ठरला असून त्याने त्यांचे प्रतिनिधी श्री राजु भाई यांचेशी संपर्क साधण्यास सुचित केलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीची सिल्व्हर लेव्हल गाठल्याचे प्रमाणपत्र सुध्दा दाखल केलेले आहे. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष कंपनीला रजिस्टर पोस्टाने कायदेशीर नोटीस पाठवून त्याने बँकाक सहीलीसाठी भरलेली रक्कम परत मिळण्यास विनंती करणारी नोटीसची प्रत सुध्दा अभिलेखावर दाखल केलेली आहे. या सर्व दाखल दस्तऐवजांच्या प्रतीं वरुन तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील विधानांना बळकटी प्राप्त होते.
09. तक्रारकर्त्याने बँकाक सहलीसाठी विरुध्दपक्ष कंपनी मध्ये रक्कम जमा केलेली असल्याने तो विरुध्दपक्ष कंपनीचा ग्राहक ठरतो. विरुध्दपक्ष कंपनीने बँकाक सहीलीचे नावाखाली तक्रारकर्त्या कडून दिनांक-23//02/2010 रोजी रुपये-30,800/- प्राप्त केल्याचे त्याचे श्रीराम अर्बन को-ऑप.बँक लिमिटेड, नागपूर खात्यातील उता-या मधील नोंदी वरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याचे प्रतिज्ञालेखावरील कथना प्रमाणे विरुध्दपक्ष कंपनीने सदरची रक्कम परत दिली नाही वा आश्वासित केल्या प्रमाणे बँकाक सहलीला नेले नाही. विरुध्दपक्ष कंपनीची ही कृती अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब आणि दोषपूर्ण सेवे अंतर्गत मोडते, त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याने विरुध्दपक्ष कंपनी मध्ये दिनांक-23/02/2010 रोजी जमा केलेली रक्कम रुपये-30,800/-, जमा केल्याचे दिनांका पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो वार्षिक 9% दराने व्याजासह परत मिळण्यास पात्र आहे, तसेच त्याला झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/- आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/- विरुध्दपक्ष कंपनी कडून मिळण्यास पात्र आहे, असे मंचाचे मत आहे.
10. वरील सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन मंचा तर्फे प्रस्तुत तक्रारीत खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
::आदेश::
1) तक्रारकर्ता श्री योगेश अविनाश जोशी यांची विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग एवं रिटेल ट्रेडींग कंपनी (इंडीया) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक, कार्यालय-बी-12, तळमजला, वडाळा उद्दोग भवन, नायगाव क्रॉस रोड, वडाळा पश्चीम मुंबई यांचे विरुध्दची तक्रार खालील प्रमाणे अंशतः मंजूर करण्यात येते.
(02) विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग एवं रिटेल ट्रेडींग कंपनी तर्फे संचालक यांनी तक्रारकर्त्या कडून बँकाक सहलीपोटी स्विकारलेली रक्कम रुपये-30,800/-(अक्षरी रुपये तीस हजार आठशे फक्त) दिनांक-23/02/2010 पासून ते रकमेच्या प्रत्यक्ष्य अदायगी पावेतो द.सा.द.शे.-9% दराने व्याज यासह मिळून येणारी रक्कम तक्रारकर्त्यास परत करावी.
(03) विरुध्दपक्ष कंपनीचे दोषपूर्ण सेवेमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) आणि तक्रारखर्च म्हणून रुपये-5000/-(अक्षरी रुपये पाच हजार फक्त) विरुध्दपक्ष स्वदेशी मार्केटींग कंपनी तर्फे संचालकानीं तक्रारकर्त्यास द्दावेत.
(04) सदर आदेशाचे अनुपालन स्वदेशी मार्केटींग एवं रिटेल ट्रेडींग कंपनी (इंडीया) प्रायव्हेट लिमिटेड तर्फे संचालक यांनी निकालपत्राची प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांका पासून 30 दिवसांचे आत करावे.
(05) निकालपत्राच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन देण्यात याव्यात