तक्रारदार : स्वतः हजर. सामनेवाले : एकतर्फा. *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* निकालपत्रः- , श्री.वि.गं.जोशी, सदस्य ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* न्यायनिर्णय 1. तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे. 2. सा.वाले क्र.1 हे यांत्रिक उत्पादक आहेत. आणि सा.वाले क्र.2 हे डिलर आहेत. त्यामुळे सा.वाले क्र.1 व 2 दोन्हीही सेवा पुरविणारे आहेत. 3. तक्रारदार असे निवेदन करतात की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून मार्च, 2008 मध्ये एक स्कुटर विकत घेतली. पण त्याचा ताबा त्यांनी एप्रिल, 2008 मध्ये घेतला. कारण त्यांना असे आश्वासन दिले गेले होते की, अर्थसंकल्पात अबकारी कर कमी झाला असल्यामुळे त्यांनी जर स्कुटरचा ताबा एप्रिल मध्ये घेतल्यास त्यांना रु.1,867/- सुट मिळेल. 4. तक्रारदारांचे असे म्हणणे की, त्यांना दिल्या गेलेल्या स्कुटरमध्ये निर्मिती दोष आहेत. कारण उत्पादकाने सांगितल्याप्रमाणे व ब्रोशरमध्ये छापल्याप्रमाणे प्रस्तुत स्कुटर एका लिटर मागे 65 किलोमिटर येवढे धावपृष्टांक (मायलेज) देत नाही असे आढळून आले. या बाबत तक्रारदारांनी बराच पत्र व्यवहार केला. तसेच त्यांनी पाच वेळा वादग्रस्त स्कुटर सा.वाले यांचेकडे दुरुस्तीसाठी पाठविली. तरीसुध्दा धावपृष्टांकनात कोणताही फरक घडून आला नाही. त्यामुळे नाईलाजाने तक्रारदारांना ही तक्रार मंचापुढे दाखल करावी लागली. व त्यांनी खालील मागण्या केल्या. 1) रु.1,867/- अबकारी कराचा परतावा 9 टक्के व्याजासहीत. 2) स्कुटरची मुळ रक्कम रु.46,686/- 9 टक्के व्याजाने दि.1.3.08 पासुन ते रक्कम देई पर्यत. 3) रु.50,000/- नुकसान भरपाई व रु.5000/- तक्रार अर्जाचा खर्च. 5. तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत तक्रारीला पुरक अशी कागदपत्र दाखल केली आहेत. सा.वाले हे नोटीस मिळूनसुध्दा मंचा समोर हजर राहीले नाहीत. तक्रारदारांनी सा.वाला यांना नोटीस बजावल्याचे शपथपत्र व पोच पावती हजर केली आहे. त्यामुळे सा.वाला यांचे विरुध्द ग्राहक तक्रार निवारण कायदा 1986 कलम 13(2) (ब) (ii) अन्वये एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारदारांनी आपल्या मागण्यांच्या पृष्टयर्थ शपथपत्र दाखल केले. 6. तक्रारदारांचा युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच तक्रार अर्ज व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषंगीक कागदपत्रे, शपथपत्र यांची पहाणी व अवेलोकन केले असता तक्रारीच्या निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाला यांचे सेवेत कमतरता आहे हे तक्रारदारांनी सिध्द केलेले आहे का ? | होय. | 2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई व तक्रार अर्जाचा खर्च मिळविण्यास पात्र आहेत का ? | होय. रु.5000/- + रु.1000/- | 3 | आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांनी सादर केलेल्या उत्पादकांचे ब्रोशरचे अवलोकन केले असता त्यात स्पष्ट नमुद केले आहे की, सदर नमुन्याची स्कुटर ही एका लिटरला 65 मिलोमिटर येवढे धावपृष्टांक देते. परंतु तक्रारदारांचा असा अनुभव आहे की, सदर स्कुटर 35 किलोमिटर पेक्षा कमी येवढा धावपृष्टांक देते. याबाबत तक्रारदारांनी उत्पादकाशी व डिलरशी वेळोवेळी पत्र व्यवहार केला. तसेच इतर निर्मिती दोष असल्या बद्दलच्या तक्रारी केल्या. 8. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार वादग्रस्त स्कुटर एक धक्का देवून मध्येच बंद पडते. तसेच सकाळी स्कुटर चालु करण्यासाठी पाच ते सहा वेळा किक मारावी लागते. स्कुटर स्वयंबटणावर सुरु होत नाही. पुढच्या चाकातुन आवाज येतो. वर नमुद केलेले दोष सा.वाला यांच्या कार्यशाळेत सदर स्कुटर पाच ते सहा वेळा पाठविल्यानंतरसुध्दा दुरुस्त करुन दिले नाहीत. 9. सा.वाला यांनी वादग्रस्त स्कुटरचे धावपृष्टांकन(मायलेज) वाढवून देवू शकले नाहीत. परंतु धावपृष्टांकन वाढीसाठी सा.वाले यांनी तक्रारदारांना वेगवेगळे प्रयोग करण्यास सांगीतले. तसेच साधारणतः 1000 किलोमिटर मायलेज झाल्यानंतर 65 किलोमिटरचे धावपृष्टांकन मिळण्याची शक्यता आहे. असे सांगीतले तक्रारदारांनी कार्यशाळेत वेळोवेळी स्कुटर पाठविल्याच्या पृष्टयर्थ जॉब कार्ड सादर केले आहे. त्यामध्ये सर्व दोष नमुद केलेले आहेत. 10. तक्रारदारांनी वादग्रस्थ स्कुटर दि.31 मार्च, 2010 मध्ये विकत घेतली. तसेच सदर स्कुटरची विमा पॉलीशी ही सुध्दा दि.31.3.2010 ची आहे. ही तारीख तक्रारदारांनी सादर केलेल्या बिलात व विमा पॉलीसीच्या कागदपत्रात नमुद आहे. त्यामुळे अबकारी कराचा परतावा त्यांना मिळेल याची शक्यता नाही व तसे लेखी आश्वासनसुध्दा सा.वाले यांनी दिलेले नाही. आबकारी कराच्या नियमावली प्रमाणे तक्रारदारांची खरेदी ही 2009-2010 या आर्थिक वर्षात येते. त्यामुळे जरी त्यांनी स्कुटरचा ताबा पुढील वर्षात घेतला असला तरी त्यांना अबकारी करात सुट मिळणार नाही. 11. वरील सर्व बाबींचा विचार करता सा.वाला यांच्या सेवेत कमतरता आहे. तसेच त्यांच्या ब्रोशरमध्ये धावपृष्टांकन 65 किलोमिटर असल्याचा उल्लेख आहे. परंतु प्रत्यक्षात तसे नाही. सा.वाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे दिसून येते. तक्रारदार हे त्याच नमुन्याची दुसरी नविन स्कुटर किंवा व्याजासहीत स्कुटरची किंमत परत मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारदार यांना सा.वाला यांच्याकडून नुकसान भरपाई रु.5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/- दिल्यास योग्य व न्यायोचित ठरेल असे मंचाचे मत आहे. 12. सा.वाला यांना रितसर नोटीस मिळूनसुध्दा ते मंचासमोर हजर होऊन त्यांनी आपली कैफीयत दाखल केली नाही व तक्रारदारांच्या आरोपांचे खंडण केले नाही. त्यामुळे तक्रारदारांने शपथपत्रासहीत दाखल केलेली तक्रार वर नमुद केलेल्या मर्यादेत खरी आहे असे गृहीत धरुन तक्रारदारांच्या मागण्या मान्य करण्यात येत आहेत. 13. उक्त विवेचन लक्षात घेता मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 342/2010 अंशतः मंजूर करण्यात येते. 2. सामनेवाले क्र.1यांनी तक्रारदारांना Invoice क्र.365 प्रमाणे त्याच नमुन्याची व एका लिटरला 65 किलोमिटर धावपृष्टांकन(मायलेज) देणारी नवी कोरी स्कुटर द्यावी. किंवा शक्य नसल्यास सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना स्कुटरची मुळ किंमत रक्कम रु.46,686/-व त्यावर द.सा.द.शे.9 टक्के दराने दिनांक 1.4.2010 पासून रक्कम देईपर्यत व्याज द्यावे. 3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्हणून रु.5000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1000/- द्यावेत. 4. तक्रारदारांनी सामनेवाले यांना वादग्रस्त स्कूटर परत केल्यानंतरच आदेशाचे कलम 2 प्रमाणे तक्रारदार सामनेवाले हयांचेकडून कार्यवाही करुन घेऊ शकतील. 5. वरील रक्कमा/स्कुटर सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना न्यायनिर्णयाची प्रत मिळाल्यापासून 60 दिवसाचे आत अदा करावी. 6. सामनेवाला क्र.2 च्या विरुध्द आदेश नाहीत. 7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |