तक्रारदारातर्फे अॅड. श्री. अभिजीत हरताळकर हजर
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री. प्रशांत मैंदर्गी हजर
निकाल
पारीत दिनांकः- 28/09/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून दि. 20/10/2007 रोजी जाबदेणार क्र. 1 यांनी उत्पादीत केलेली “अॅक्सेस 125” ही स्कुटर खरेदी केली. सदरची स्कुटर ही दोन महिने व्यवस्थित चालली, मात्र त्यानंतर वेगाने चालता-चालता अचानक बंद पडू लागली. अशा वेळी स्कुटर पुन्हा बटनस्टार्ट होत नव्हती, त्याकरीता कीक मारावी लागत होती. तक्रारदारांनी प्रथम दि. 10/1/2008 रोजी स्कुटर जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी टाकली. परंतु जाबदेणार क्र. 2 स्कुटर दुरुस्त करू शकले नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये जवळ-जवळ दहा ते बारा वेळा गाडी दुरुस्तीकरीता टाकली. तरीही जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदारांच्या स्कुटरच्या समस्यांचे निराकरण केले नाही. त्यानंतर जाबदेणार क्र. 2 यांच्या विनंतीवरुन, जाबदेणार क्र. 1 यांनी इंजिनिअरला पाठविले, परंतु काहीही उपयोग झाला नाही. जाबदेणार क्र. 1 व 2 तक्रारदारांच्या स्कुटरच्या समस्या सोडवू शकले नाहीत. स्कुटरमध्ये असलेल्या या समस्यांमुळे तक्रारदारांना या स्कुटरचा वापर करता आला नाही, प्रवासाकरीता इतर माध्यमांचा, म्हणजे कार व ऑटो रिक्शाचा वापर करावा लागला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, स्कुटरमध्ये उत्पादकिय दोष आहे, त्यामुळे जाबदेणारांनी त्यांना स्कुटर बदलून नवी स्कुटर द्यावी किंवा त्या स्कुटरची किंमत द.सा.द.शे. 12% व्याजदराने व रक्कम रु. 5000/- त्यांनी दुरुस्तीसाठी केलेला खर्च आणि रक्कम रु. 10,000/- मानसिक व शारीरिक त्रासापोटी नुकसान भरपाई, रक्कम रु. 10,000/- तक्रारीचा खर्च व इतर दिलासा द्यावा, अशी मागणी तक्रारदार करतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी स्कुटर Prescribed manner मध्ये चालविली नसल्यामुळे व स्कुटर चालविण्यास तक्रारदार अकार्यक्षम असल्यामुळे त्यांना समस्यांना तोंड द्यावे लागले. तक्रारदारांना स्कुटर व्यवस्थित चालविता येत नसल्यामुळे त्यामध्ये समस्या उद्भवल्या. तक्रारदारांनी स्वत:च कबुल केले आहे, की पुण्यातील गर्दीच्या रस्त्यावर त्यांना स्कुटर चालविणे अवघड जाते, याचाच अर्थ तक्रारदार हे स्कुटर चालविण्यास अकार्यक्षम आहेत, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. तक्रारदारांनी जेव्हा-जेव्हा स्कुटर जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी दिली होती, तेव्हा-तेव्हा जाबदेणार क्र.2 यांनी ती व्यवस्थित दुरुस्त करुन दिलेली आहे व तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे, हे ते जाबदेणार जॉबकार्डवरुन सिद्ध करू शकतात. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणार क्र. 1 यांचे सर्व्हिस इंजिनिअर पुण्यामध्ये आले असताना त्यांनी तक्रारदारांच्या स्कुटरची पूर्णपणे तपासणी केली, त्यावेळी सर्व्हिस इंजिनिअरला स्कुटरमध्ये कुठलाही उत्पादकिय दोष आढळला नाही. तक्रारदारांनी स्कुटर रफली चालविल्यामुळे आणि ‘युजर्स मॅन्युअल’ मध्ये सांगितलेल्या सुचनांप्रमाणे स्कुटर न चालविल्यामुळे त्यामध्ये दोष निर्माण झालेले आहेत. तक्रारदारांनी जाबदेणारांकडून पैसे उकळण्यासाठी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे, म्हणून ती खर्चासहित नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] तक्रारदारांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व त्याबरोबर संदेश ऑटोमोबाईल्स यांचे दि. 12/11/2011 रोजीचे सर्टिफिकिट दाखल केले आहे.
6] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडून दि. 20/10/2007 रोजी जाबदेणार क्र. 1 यांनी उत्पादीत केलेली “अॅक्सेस 125” ही स्कुटर खरेदी केली. सदरची स्कुटर ही दोन महिने व्यवस्थित चालली, मात्र त्यानंतर वेगाने चालता-चालता अचानक बंद पडू लागली. अशा वेळी स्कुटर पुन्हा बटनस्टार्ट होत नव्हती, त्याकरीता कीक मारावी लागत होती, म्हणून तक्रारदारांनी दि. 10/1/2008 रोजी जाबदेणार क्र. 2 यांच्याकडी ती दुरुस्तेसाठी टाकली. त्यावेळी जाबदेणार क्र. 2 यांनी तक्रारदारास जॉब कार्ड दिले नाही. तक्रारदारांनी दि. 24/4/2009 रोजीच्या जॉब कार्डाची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये “Self Starter Not working, Battery defect” असे नमुद केल्याचे दिसून येते. याचा अर्थ, तक्रारदारांनी सन 2007 मध्ये स्कुटर खरेदी केली आणि सन 2009 पर्यंत त्यामध्ये एकच म्हणजे सेल्फ स्टार्टरची समस्या होती, म्हणजे जाबदेणारांनी जवळ-जवळ दोन वर्षे त्या समस्याचे निराकरण केलेले नव्हते. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांना स्कुटर व्यवस्थित चालविता येत नव्हती, ते स्कुटर चालविण्यास अकार्यक्षम होते, तसेच तक्रारदारांनी Prescribed manner आणि users manual नुसार स्कुटर चालविली नसल्यामुळे स्कुटरमध्ये समस्या निर्माण झाल्या. यासाठी जाबदेणारांनी कुठलाही पुरावा/जॉब कार्ड दाखल केले नाही. स्कुटरमध्ये कुठला दोष आहे याची सर्वस्वी जबाबदारी ही तक्रारदारांची आहे, असे जाबदेणारांनी तोंडी युक्तीवादाच्या वेळी सांगितले. यासाठी तक्रारदारांनी संदेश ऑटोमोबाईल्स यांचे दि. 12/11/2011 रोजीचे सर्टिफिकिट दाखल केले आहे. सदरच्या सर्टिफिकिटमध्ये, त्यांनी 18 महिन्यांच्या कालावधीमध्ये चार वेळा सुझुकी अॅक्सेस नं. एम.एच.-12एफके 6874 ची सर्व्हिसिंग केलेली आहे आणि या कालावधीमध्ये, button start, Battery Discharge आणि Idling of vehicle varies या समस्या उद्भवल्या, असे नमुद केले आहे. सदरचे सर्टिफिकिट हे नोव्हे. 2011 चे आहे, याचा अर्थ जवळ-जवळ चार वर्षे बटन स्टार्टची समस्या तशीच होती. जाबदेणारांनी चार वर्षामध्ये या समस्यांचे निराकरण केले नाही, उलटपक्षी तक्रारदारांनाच स्कुटर व्यवस्थित चालविता येत नाही, ते स्कुटर चालविण्यास अकार्यक्षम आहेत त्यामुळे समस्या उद्भवल्या असे वारंवार म्हटले. परंतु त्यासंबंधी कुठलाही पुरावा मंचामध्ये दाखल केला नाही. वास्तविक पाहता, जाबदेणार हे सेल आणि सर्व्हिस या व्यवसायामध्ये आहेत, त्यांच्याकडे पुरेसा पुरावा उपलब्ध असतो, परंतु तो त्यांनी दाखल केलेला नाही. तक्रारदारांना व्यवस्थित गाडी चालविता येत नाही, त्यामुळे त्यामध्ये समस्या उद्भवल्या, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे, याचा अर्थ गाडीमध्ये समस्या आहेत हे जाबदेणार मान्य करतात त्यामुळे तक्रारदारांच्या म्हणण्यास पुष्टी मिळते. तक्रारदारांनी सन 2007 मध्ये खरेदी केलेल्या स्कुटरमध्ये सन 2011 किंवा अद्यापपर्यंत बटन स्टार्टची समस्या होती, वारंवार जाबदेणार क्र. 2 यांच्याकडे दुरुस्तीसाठी टाकूनही त्यांनी ती दुरुस्त करुन दिलेली नाही यावरुन स्कुटरमधील बटनस्टार्टच्या मशिनरीमध्ये उत्पादकीय दोष आहे, हे स्पष्ट होते. म्हणून जाबदेणारांनी तक्रारदारांच्या स्कुटरमधील बटनस्टार्टच्या मशिनरीमध्ये असलेला दोष दूर करुन स्कुटर निर्दोष करुन द्यावी.
तक्रारदार प्रस्तुतच्या तक्रारीद्वारे संपूर्ण स्कुटर बदलून देण्याची मागणी करतात, परंतु जॉब कार्ड व संदेश ऑटोमोबाईल्स यांच्या दि. 12/11/2011 रोजीच्या प्रमाणपत्रावरुन
तक्रारदारांच्या संपूर्ण स्कुटरमध्ये उत्पादकिय दोष नसल्याचे दिसून येते, त्यामुळे जाबदेणारांनी तक्रारदारास स्कुटरच्या बटनस्टार्टची मशिनरी नविन वॉरंटीसह बदलून द्यावी, जेणेकरुन स्कुटर रस्त्यावर चालण्यायोग्य (Roadworthy) होईल, असा आदेश मंच पारीत करते.
कोणतेही वाहन बटनस्टार्ट घेण्यामागचा हेतू हा शारिरीक त्रास होऊ नये असा असतो, म्हणून तक्रारदारांनी खरेदी करतानाच बटनस्टार्ट स्कुटर खरेदी केली होती. परंतु तक्रारदारांना याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे साहजिकच त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला असेल. त्यामुळे तक्रारदार रक्कम रु. 5,000/- नुकसान भरपाई मिळण्यास हक्कदार ठरतात.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणार क्र. 1 व जाबदेणार क्र. 2 यांनी वैयक्तीक
आणि संयुक्तीकरित्या तक्रारदारास त्यांच्या “सुझुकी
अॅक्सेस 125” स्कुटरच्या बटनस्टार्टची मशिनरी नविन वॉरंटीसह, या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत बदलून द्यावी व स्कुटर Roadworthy
करुन द्यावी.
3. जाबदेणार क्र. 1 व जाबदेणार क्र. 2 यांनी वैयक्तीक
आणि संयुक्तीकरित्या तक्रारदारास रक्कम रु. 5,000/-
(रु. पाच हजार फक्त) नुकसान भरपाईपोटी आणि रक्कम रु. रु. 1,000/-(रु. एक हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
4. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.