निकालपत्र :- (दि.22.11.2010.(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 भागीदारी पेढीस नोटीस पाठविली असता सदर नोटीस पत्ता बदलला असलेबाबतचा शेरा होवून परत आलेली आहे. सामनेवाला क्र.3 यांना नोंद पोच डाकेने नोटीस पाठविली. परंतु, सदर नोटीस स्विकारली नसल्याबाबत पोस्टाचे सही-शिक्का असलेले पाकीट प्रस्तुत प्रकरणी परत आलेले आहे. सामनेवाला क्र.4 यांना नोटीस बजावणी होवून ते प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत. सामनेवाला क्र.2 (अ) (ब) यांनी म्हणणे दाखल केले. तसेच, सामनेवाला क्र.5 बँकेने म्हणणे दाखल केले आहे. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला क्र.2 (अ) (ब) व सामनेवाला क्र.5 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, कोल्हापूर येथील महानगरपालिका हद्दीतील सि.स.नं.296, प्लॉट नं.46, कसबा बावडा, कोल्हापूर ही मिळकत सामनेवाला क्र.4 यांच्या मालकी वहिवाटीची आहे. सदर सामनेवाला क्र.4 यांनी सामनेवाला क्र.1 भागीदारी पेढीचे भागीदार, सामनेवाला क्र.2 व 3 यांना दि.02.03.2000 रोजी विकसन करारपत्रान्वये विकसन करणेकरिता दिली होती. त्याप्रमाणे सदर मिळकत विकसित करुन त्यावर ‘श्रीकृपा अपार्टमेंट’ बांधलेली आहे. सदर इमारतीतील दुस-या मजल्यावरील एस-2 ही मिळकत तक्रारदारांनी खरेदी घेणेबाबत दि.09.09.2002 रोजी करार केलेला आहे व सामनेवाला क्र.1 ते 3 यांना एकूण रक्कम रुपये 5,60,000/- अदा केलेली आहे. त्याप्रमाणे सामनेवाला क्र.1 ते 3 यांना कराराप्रमाणे संपूर्ण मोबदला अदा करुन फ्लॅटचा ताबा घेतलेला आहे. परंतु, सदर फ्लॅटचे अद्याप खरेदीपत्र करुन दिलेले नाही. (3) तक्रारदार पुढे सांगतात, सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी उपरोक्त उल्लेख केलेली मिळकत कर्जासाठी सामनेवाला क्र.5 बँकेस तारण दिलेली आहे व त्याची वस्तुस्थिती तक्रारदारांना नुकतीच संमजून आलेली आहे. सामनेवाला बँकेने सदर श्रीकृपा अपार्टमेंटमध्ये सदानिका किंवा गाळा यांची खरेदी होताना कर्ज वसुलीबाबत कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. सदरचे कर्ज नियमबाहय दिलेले आहे. सामनेवाला क्र.1 ते 4 यांनी श्रीकृपा अपार्टमेंटवरील थकित कर्जाचे बोजे भागविणे आवश्यक होते. सामनेवाला क्र.2(अ) व (ब) हे सामनेवाला यांचे सरळ वारस. सदर वारस तक्रारदारांची मागणी पूर्ण करणेस जबाबदारी आहेत. तक्रारदार हे सेवानिवृत्त असून आजारी आहेत. तक्रारदारांच्या पत्नीला सामनेवाला यांच्यामुळे मानसिक व शारिरीक त्रास झालेला आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी तक्रारीत नमूद केलेल्या फलॅट क्र.एस्.2 चे डीड ऑफ अपार्टमेंट (नोंद खरेदीखत) करुन देणेचा आदेश व्हावा. तसेच, सामनेवाला क्र.1 ते 3 सामनेवाला क्र.5 बँकेचा श्री.कृपा अपार्टमेंटखालील जमीन व फलॅट नं.एस्.2 यावर असणारा बोजा भागाविणेबाबत आदेश व्हावा. तसेच, सामनेवाला यांनी फलॅट नं.एस्-2 चे जप्ती व विक्री करु नये असा आदेश व्हावेत अशी विंनेती केली आहे. मानसिक-शारीरिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेचा आदेश व्हावा. तसेच, सामनेवाला बँकेने कर्जापोटी फलॅटची जप्ती वगैरे केलेस सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी स्विकारलेली रककम रुपये 5,60,000/- द.सा.द.शे.24 टक्के व्याजाने परत करणेबाबतची विनंती केली आहे. (4) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत करारपत्र दि.03.09.2009, सामनेवाला क्र.1 ते 3 यांना वेळोवेळी दिलेल्या रक्कमांच्या पावत्या, फलॅट खरेदी कराराच्या नोंदणीची सुची क्र.2 इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (5) सामनेवाला क्र.1 (अ) व (ब) यांनी तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारलेली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.2, मयत, अनिल दत्तात्रय यांच्याकडून वारसा हक्काने कोणतीही स्थावर, जंगम मिळकत सदर सामनेवाला यांना मिळालेली नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.2 यांची जबाबदारी सदर सामनेवाला यांचेवर कायद्याने येत नाही. तसेच, वारसांची जबाबदारी मर्यादित स्वरुपाची आहे; सामनेवाला क्र.5 यांनी कर्जाची जबाबदारी सदर सामनेवाला यांचेवर ठेवलेली नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार सदर सामनेवाला यांचेविरुध्द चालणेस पात्र नाही. (6) सामनेला क्र.5 बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात कथन करतात, तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये कोणतेही ग्राहक हे नाते निर्माण होत नाही. तसेच, तक्रारदारांना कोणतीही सेवा दिलेली नाही. सदर मिळकत तारण घेऊन कर्ज पुरवठा केला असल्याने मिळकतीवरती असणारा अग्रहक्क सामनेवाला बँकेचा आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व कॉम्पेनेसटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (7) सामनेवाला क्र.5 बँकेने त्यांच्या म्हणण्यासोबत कर्जखाते उतारा, तारण-गहाण खत, मालमत्ता पत्रक इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (8) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे बारकाईने अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत ही सामनेवाला क्र.4 यांच्या मालकी वहिवाटीची आहे्. सदर मिळकत विकसित करणेसाठी सामनेवाला क्र.1 भागीदारी पेढीस विकसन करारपत्रान्वये दिलेली आहे. सदर भागीदारी पेढीने सदर मिळकत विकसन करुन सदर ठिकाणी श्रीकृपा अपार्टमेंट या नांवाची इमारत बांधलेली आहे. सदर अपार्टमेंटमधील दुसल्या मजल्यावर फलॅट नं. एस्-2 खरेदी घेणेबाबतचा करार सामनेवाला भागीदारी पेढी व तक्रारदार यांचेमध्ये झालेला आहे. कराराप्रमाणे सदनिकेची संपूर्ण रक्कम रुपये 5,60,000/- सामनेवाला क्र.1 ते 3 यांना अदा झालेली आहे. इत्यादी वस्तुस्थिती या मंचाचे निदर्शनास येते. (9) सामनेवाला क्र.5 ही बँक आहे. सदर मिळकत विकसित करीत असताना सामनेवाला क्र.1 ते 3 यांनी सामनेवाला क्र.5 यांचेकडे कर्ज घेवून सदर तक्रारीत उल्लेख केलेली मिळकत बँकस तारण दिलेली आहे. सदरचे कर्ज थकित असल्याने सामनेवाला बँकेने संपूर्ण मिळकतीवर बोजा निर्माण केलेला आहे. सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी सदरचा बोजा दूर करुन व मिळकत निर्वेध करुन तक्रारदारांना सदनिकेचे नोंद खरेदीपत्र दिलेले नाही. या वस्तुस्थितीकडे या मंचा लक्ष वेधले आहे; तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये सामनेवाला क्र.2 हे मयत झाले असल्याने सामनेवाला 2 (अ) व (ब) हे सरळ वारस असल्याने त्यांच्यावरती सामनेवाला क्र.2 यांची जबाबदारी येते असे प्रतिपादन केले आहे. परंतु, सदर सामनेवाला क्र.2 (अ) व (ब) यांच्या वकीलांनी सदरची परिस्थिती नाकारुन सामनेवाला क्र.2 यांच्याकडून सामनेवाला क्र. 2(अ) व (ब) यांना कोणतीही स्थावर व जंगम मिळकत येत नसल्याचे प्रतिपादन केले आहे. भागीदारी पेढीमधील भागीदार मयत झाला असेल सदर भागीदाराची मिळकत प्रत्यक्ष वारसांना जात असेल अशा परिस्थितीमध्ये भागादारी पेढीची जबाबदारी वारसावर येईल. परंतु, प्रस्तुत प्रकरणी सदर भागीदारी पेढीची मिळकत अथवा मयत भागीदाराची मिळकत प्रत्यक्ष सदर सामनेवाला क्र.2 (अ) व (ब) यांना वारसा हक्काने आलेली आहे याबाबतचा कोणताही पुरावा प्रस्तुत कामी दाखल नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 भागीदारी पेढीचे भागीदार सामनेवाला क्र.2 यांचे वारस सामनेवाला क्र.2(अ) व (ब) यांचेवरती भागीदारी पेढीची कोणतीही जबाबदारी असणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच यत आहे. (10) सामनेवाला क्र. 1 भागीदारी पेढीचे भागीदार सामनेवाला क्र.3 हे प्रस्तुत प्रकरणी हजर झालेले नाहीत. उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले असता सदर सामनेवाला यांनी कराराप्रमाणे तक्रारदारांच्याकडून रक्कम रुपये 5,60,000/- स्विकारुन तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सदनिका एस्-2 चा ताबा तक्रारदारांना दिलेला आहे. परंतु, सदर सदनिकेचा ताबा देत असताना मिळकत निर्वेध व निजोखमी करणेची जबाबदारी बांधकाम व्यावसायक या नात्याने सदर सामनेवाला यांचेवर आहे. सदर सामनेवाला यांनी मिळकतीवरील संपूर्ण बोजा दूर करुन तक्रारदारांना सदनिकेची नोंद खरेदीपत्र करुन देणे याची जबाबदारी सामनेवाला क्र.3 यांची येत आहे. (11) तक्रारदारांनी सदनिकेचा करार करणेपूर्वीच सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांनी मिळकतीवर सामनेवाला क्र.5 या बँकेचे कर्ज घेवून सदर मिळकत तारण घेतलेली आहे. तसेच, सामनेवाला क्र.5 बँक व तक्रारदार यांच्यामध्ये कोणताही प्रिव्हिटी ऑफ कॉन्ट्रॅक्ट नाही. तसेच, सामनेवाला क्र.5 बँकेने तक्रारदारांना कोणतीही सेवा दिलेली नाही. याचा विचार करता तक्रारदारांच्या मागणी विषयी सामनेवाला क्र.5 बँकेस जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (12) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत सामनेवाला क्र.5 बँकेने तक्रारीत उल्लेख केलेली सदनिका एस्-2 याची जप्ती अथवा विक्री करणेस सामनेवाला बांधकाम व्यावसायिक यांना अदा केलेली रक्कम रुपये 5,60,000/- व्याजासह देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. भविष्यात घडणा-या घटनेच्या शक्यतेबाबत दाद मागता येणार नाही. सबब, तक्रारदारांच्या सदर विनंतीचा हे मंच विचार करीत नाही. (13) उपरोक्त संपूर्ण विवेचन विचारात घेवून हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. 2. सामनेवाला क्र.3 बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारीत उल्लेख केलेल्या मिळकतीवरील तसेच सदनिका नं. एस्-2 यावरील सामनेवाला क्र.5 बँकेचा असलेला बोजा दूर करुन तसेच मिळकत निर्वेध व निजोखमी करुन सदरनिका नं. एस्.-2 चे नोंद खरेदी पत्र करुन द्यावे. 3. सामनेवाला क्र.3, बांधकाम व्यावसायिक यांनी तक्रारदारांना शारीरीक व आर्थिक नुकसानीपोटी रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्त) द्यावेत. 4. सामनेवाला क्र.3, बांधकाम व्यावसाकिय यांनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1,000/- (रुपये एक हजार फक्त) द्यावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |