जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
ग्राहक तक्रार क्रमांक : 131/2015.
तक्रार दाखल दिनांक : 05/03/2015.
तक्रार आदेश दिनांक : 08/06/2016. निकाल कालावधी: 01 वर्षे 03 महिने 03 दिवस
प्रभावती प्रमोद मार्डीकर, वय 39 वर्षे, व्यवसाय : घरकाम,
रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद. तक्रारकर्ता
विरुध्द
सुयोग इन्स्टिटयुट ऑफ ग्रीन इमु स्वंयरोजगार प्रशिक्षण संस्था,
नाशिक – 422 101. द्वारा : ज्ञानेश्वर पी. पाटील, मुख्य कार्यालय,
पहिला मजला, भुतडा संकूल बिटको पॉईंट, नाशिक रोड,
नाशिक – 422 101. विरुध्द पक्ष
गणपुर्ती :- श्री. एम.व्ही. कुलकर्णी, अध्यक्ष
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य श्री. मुकूंद बी. सस्ते, सदस्य
तक्रारदार यांचेतर्फे विधिज्ञ : एस.एच. साळुंके
विरुध्द पक्ष अनुपस्थित / एकतर्फा आदेश
न्यायनिर्णय
सौ. विद्युलता जे. दलभंजन, सदस्य यांचे द्वारा :-
1. तक्रारकर्ती यांचेद्वारे उपस्थित वादविषय थोडक्यात असा आहे की, विरुध्द पक्ष यांच्या संस्थेमार्फत व्यवसायविषयक मार्गदर्शन व व्यवसायाचे साहित्यासह कच्चा माल पुरवण्यात येतो. तक्रारकर्ती यांना रोजगाराची आवश्यकता होती आणि विरुध्द पक्ष यांच्या जाहिरातीप्रमाणे त्यांनी पेपर पत्रवाळी (थाळी) बनवण्याच्या व्यवसायासाठी तुळजापूर येथील संपर्काचे ठिकाण असणा-या समाधान गॅस सर्व्हीसेस, तुळजापूर येथे संपर्क साधला. त्यावेळी विरुध्द पक्ष यांनी एक मशिन प्रतिदिन 20 किलो माल तयार करते, असे आश्वासन दिले. त्यामुळे तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून प्रतिमशिन रु.12,000/- प्रमाणे रु.3,24,000/- अदा करुन एकूण 27 मशिन खरेदी केल्या. तक्रारकर्ता यांनी प्रत्यक्षात मशिन वापरण्यास सुरुवात केली असता एका मशिनवर प्रतिदिन केवळ 3 ते 4 किलो माल निघू लागला. त्याबाबत विरुध्द पक्ष यांच्याशी संपर्क साधला असता मशिन परत नेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्ती यांना कच्चा माल पुरवठा केला नाही. त्यामुळे तक्रारकर्ती यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. उपरोक्त वादविषयाचे अनुषंगाने तक्रारकर्ती यांनी विरुध्द पक्ष यांच्याकडून मशिनची किंमत रु.3,24,000/- मिळण्यासह मानसिक त्रासाकरिता रु.50,000/- नुकसान भरपाई व तक्रार खर्च रु.10,000/- व्याजासह देण्याचा विरुध्द पक्ष यांना आदेश करण्यात यावा, अशी विनंती केली आहे.
2. प्रस्तत प्रकरणी जिल्हा मंचाने विरुध्द पक्ष यांना नोटीस काढून बजावणीकरिता पाठवली असता विरुध्द पक्ष यांनी नोटीस स्वीकारली नाही. तसेच ते मंचापुढे उपस्थित राहिले नाहीत आणि लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे त्यांच्याविरुध्द एकतर्फा चौकशीचे आदेश करण्यात येऊन सुनावणी पूर्ण करण्यात आली.
3. तक्रारकर्ता यांची तक्रार व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केले असता, तसेच तक्रारकर्ती यांच्या विधिज्ञांचा मौखिक युक्तिवाद ऐकल्यानंतर तक्रारीमध्ये उपस्थित वादविषयाचे निवारणार्थ खालील मुद्दा उपस्थित होतो.
मुद्दे उत्तर
1. तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? नाही.
2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमीमांसा
4. मुद्दा क्र. 1 :- तक्रारकर्ती हिने स्वंयराजेगारासाठी कागदी पत्रावळी बनविण्याच्या व्यवसायासाठी विरुध्द पक्षाकडून त्याबद्दलचे मशीन विकत घेतले. तक्रारकर्ती ही तुळजापूर येथील रहिवाशी असून तिने आपला व्यवसाय घरकाम असा लिहिलेला आहे. अशाप्रकारे स्वंयरोजगार करुन पोटा-पाण्यासाठी मिळकत करणे, हा व्यवसाय ‘ग्राहक’ या व्याख्येमध्ये येऊ शकला असता. मात्र तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाकडून एकूण 27 मशीन खरेदी केल्या. प्रत्येक मशीनची किंमत रु.12,000/- असल्यामुळे एकट्या माणसाला 27 मशिन चालवता येण्यासारखी परिस्थिती दिसून येत नाही. म्हणजेच तक्रारकर्ती हिला अनेक कामगार नेमणे भाग आहे.
5. तक्रारकर्तीचे कथन आहे की, प्रत्येक मशीनवर 20 किलो माल तयार होईल, असे विरुध्द पक्षाने आश्वासन दिले होते. म्हणजेच 27 मशीनवर रोज 540 किलो माल तयार होणे अपेक्षीत होते. त.क.नेच दाखल केलेल्या विरुध्द पक्षाच्या माहितीपत्रकाप्रमाणे 20 किलो उत्पादन काढल्यास रु.300/- नफा रोज मिळू शकतो. म्हणजेच 27 मशीनवर दिवसाला रु.8,100/- नफा मिळू शकतो. म्हणजेच 30 दिवसाला रु.2,43,000/- नफा मिळू शकतो. म्हणजेच एक वर्षामध्ये रु.25,00,000/- पेक्षा जास्त नफा मिळू शकतो. असा व्यवसाय हा स्वंयरोजगार या व्याख्येमध्ये येऊ शकणार नाही, असे आमचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हिने मशीन हे व्यवसायिक कारणासाठी घेतले व त्यामुळे ती ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2 (डी)(1) प्रमाणे ‘ग्राहक’ संज्ञेमध्ये येणार नाही, असे आमचे मत आहे. म्हणून आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर नकारार्थी देतो आणि खालीलप्रमाणे आदेश करतो.
आदेश
1. तक्रारकर्तीची तक्रार रद्द करण्यात येते.
2. खर्चासंबंधी कोणतेही आदेश नाहीत.
3. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत नि:शुल्क देण्यात यावी.
(श्री. मुकूंद बी. सस्ते) (सौ. व्ही.जे. दलभंजन) (श्री. एम.व्ही. कुलकर्णी)
सदस्य सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, उस्मानाबाद.
-00-
(संविक/स्व/श्रु245-17616)