निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) गैरअर्जदारांनी भेसळयुक्त बियाणे विक्री केल्याच्या आरोपावरुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, गैरअर्जदार क्रमांक 2 मोन्सँटो इंडिया लिमिटेड, मुंबई यांनी उत्पादीत केलेले मक्याचे दोन बॅग बियाणे गैरअर्जदार क्र 1 सुयश अग्रो ट्रेडर्स, यांच्याकडून दिनांक 6/6/2007 रोजी खरेदी केले होते. सदर बियाणाची त्याने स्वत:च्या शेतामध्ये योग्य पध्दतीने लागवड केली. परंतु ज्यावेळी मक्याच्या झाडांना कणसे लागली त्यावेळी कणसातील दाने पूर्णपणे भरलेले नसल्याचे दिसून आले. म्हणून त्याने दिनांक 12/10/2007 रोजी कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांच्याकडे गैरअर्जदार क्र 2 यांनी उत्पादीत केलेल्या बियाण्यामध्ये भेसळ असल्याबाबत तक्रार दिली. त्यावरुन जिल्हास्तरीय चौकशी समितीने त्याच्या शेतातील मक्याच्या पिकाची पाहणी केली. त्यानंतर चौकशी समितीने दिहनांक 12/11/2007 रोजी त्याच्या शेतातील मक्याच्या बियाण्यामध्ये 20 ते 25 टक्के भेसळ होती असा निष्कर्ष अहवालाद्वारे दिला. गैरअर्जदारांनी त्यास मक्याचे बोगस बियाणे विकी करुन अनुचित व्यापार केला म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास भेसळयुक्त बियाण्यापोटी तसेच मानसिक त्रास व शारीरिक त्रासापोटी रु 1 लाख देण्यात यावेत. गैरअर्जदार क्र 1 यांना नोटीस पाठविण्यात आली परंतु नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिले म्हणून त्यांच्या विरुध्द ही तक्रार एकतर्फी चालविण्यात आली. गैरअर्जदार क्र 2 यांनी लेखी निवेदन दाखल केले. त्यांचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्यांनी उत्पादीत केलेले बियाणे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून खरेदी केले होते. सदर बियाणे भेसळयुक्त असल्याबाबत तक्रारदाराने जिल्हास्तरीय चौकशी समितीकडे तक्रार दिल्या बाबत त्यांना माहिती नाही. तक्रारदाराने मक्याच्या बियाण्याचे व्यवस्थापन करणेबाबत देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे व्यवस्थित पालन केले नाही. मक्याच्या कणसामध्ये दाने भरलेले नसतील तर त्यासाठी केवळ भेसळयुक्त बियाणे कारणीभूत नसून त्यासाठी अनेक नैसर्गिक घटक कारणीभूत असतात. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेले बियाणे चांगल्या दर्जाचे होते आणि तक्रारदाराला त्यापासून चांगले उत्पन्न झालेले आहे. तक्रारदाराने मंचासमोर जिल्हास्तरीय चौकशी समितीचा जो अहवाल दाखल केलेला आहे तो गैरअर्जदारांच्या अनुपस्थितीत करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या शेतातील पिकाची पाहणी करण्यापूर्वी कृषी अधिका-याने गैरअर्जदारांना कोणतीही सूचना दिलेली नाही आणि त्याने मक्याच्या बियाण्याच्या गुण्धर्मांबाबत कोणतीही माहिती घेतली नव्हती. कृषी अधिका-याने मक्याच्या पिकाचे गुणधर्म माहित नसताना चुकीच्या पध्दतीने अभिप्राय दिलेला असून बियाणे भेसळयुक्त आहे किंवा नाही ही बाब केवळ बियाणाची प्रयोगशाळेत तपासणी केल्यानंतरच कळू शकते . परंतु तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 13(1)(क) मधील तरतुदीनुसार बियाणे प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी मंचासमोर सादर केलेले नाही. तक्रारदाराला विक्री करण्यात आलेले बियाणे चांगल्या दर्जाचे होते. बियाणे भेसळयुक्त असल्याबाबत तक्रारदाराने योग्य पुरावा दिलेला नाही आणि म्हणून तक्रारदार कोणतीही नुकसान भरपाई मिळण्यास पात्र नाही त्यामुळे ही तक्रार फेटाळावी अशी मागणी गैरअर्जदार क्र 2 यांनी केली आहे. दोन्हीही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे - गैरअर्जदार क्र 2 मोन्सँटो इंडिया लिमिटेड, यांनी नाही.
उत्पादीत केलेले मक्याचे बियाणे भेसळयुक्त असल्याचे तक्रारदार सिध्द करु शकतात काय? 2. तक्रारदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय? नाही. 3. आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 व 2 :- तक्रारदाराच्या वतीने युक्तीवाद करण्यात आला. गैरअर्जदार क्र 2 च्या वतीने लेखी युक्तीवाद दाखल करण्यात आला. गैरअर्जदार क्र 2 यांनी उत्पादित केलेले मक्याचे बियाणे भेसळयुक्त असल्याचे सिध्द करण्यासाठी तक्रारदाराने जिल्हास्तीय चौकशी समितीने दिनांक 12/10/2007 रोजी केलेली पाहणी पंचनामा आणि कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषर औरंगाबाद यांनी दिलेला अहवाल दाखल केला आहे. जिल्हास्तरीय चौकशी समितीने दिनांक 12/10/2007 रोजी तक्रारदाराच्या शेतातील मक्याच्या पिकाची पाहणी केली त्यावेळी चौकशी समितीने तयार केलेल्या पंचनाम्यामध्ये मक्याचे बियाणे भेसळयुक्त असल्याबाबत कोणतेही निरीक्षण नोंदविलेले नाही. पंचनाम्यामध्ये समितीने केवळ दाने भरलेल्या आणि न भरलेल्या कणसांचे प्रमाण किती आहे याचाच उल्लेख केलेला आहे परंतु समितीने पंचनाम्यामध्ये भेसळयुक्त बियाणे आढळून आल्याबाबत कोणताही अभिप्राय नोंदविलेला नाही. जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी कोणतीही तारीख नमूद न केलेला जो अहवाल दिला होता त्या अहवालामध्ये देखील अत्यंत अशास्त्रीय पध्दतीने निष्कर्ष नोंदविण्यात आलेला आहे. मक्याच्या कणसामध्ये 20 ते 25 टक्के कणसे लहान दिसून आली केवळ या कारणामुळे बियाणामध्ये भेसळ होती असा निष्कर्ष कृषी विकास अधिकारी औरंगाबाद यांनी त्यांच्या अहवालात नमूद केला आहे. वास्तविक कणसाच्या आकारावरुन बियाण्यामध्ये भेसळ होती किंवा नाही हे ठरविणे योग्य नाही. तक्रारदाराच्या शेतातील मक्याच्या झाडाच्या पानांचा रंग, आकार, पानावरील लव, इ. गुणधर्म विचारात घेऊन भेसळीबाबतचा निष्कर्ष काढता आला असता किंवा ज्या लॉटमधील बियाणे तक्रारदाराने खरेदी केले होते त्याच लॉटमधील बियाणे समितीने गैरअर्जदारांकडून घेऊन त्याची प्रयोगशाळेत तपासणी करुन त्यानंतरच बियाण्यातील भेसळीबाबतचा निष्कर्ष काढणे योग्य ठरले असते. आमच्या मतानुसार तक्रारदाराने सादर केलेला पाहणी पंचनामा व कृषी विकास अधिका-याने दिलेला अहवाल हा अपूर्ण असून त्यावरुन गैरअर्जदार क्र 2 यांनी उत्पादीत केलेले बियाणे भेसळयुक्त असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य ठरत नाही. सदर पुराव्यावरुन मक्याचे बियाणे भेसळयुक्त असल्याचे सिध्द होत नाही म्हणून मुद्दा क्र 1 व 2 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. म्हणून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येतो. आदेश - तक्रारदाराची तक्रार फेटाळण्यात येते.
- तक्रारीचा खर्च आपापला सोसावा.
- संबंधितांना आदेश कळविण्यात यावा.
-
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |